सुदर्शन क्रिया एक लयबद्ध श्वसनाचे तंत्र आहे जे तणाव दूर करुन भावनांचे नियमन करते आणि शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यास मदत करते. सुदर्शन क्रियेच्या नियमित सरावाने आणि जीवन शैलीतील बदल स्वीकारून, जगातील अनेक व्यक्ति त्यांच्या दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडत तणाव मुक्त जीवन जगत आहेत.
सुदर्शन क्रिया कशी काम करते?
श्वासाचे नियमन करून सुदर्शन क्रिया कार्य करते. आपला श्वास आपल्या भावनांशी जोडलेला असतो. जेंव्हा आपण रागावतो तेंव्हा आपण लहान श्वास घेतो. जेंव्हा आपण दुःखी असतो तेंव्हा आपण दीर्घ श्वास घेतो. जसे आपल्या भावना आपल्या श्वासाची लय बदलतात, त्याचप्रमाणे आपण श्वासांच्या सहाय्याने आपल्या मनाची स्थिती बदलू शकतो. सुदर्शन क्रिया ही मानसिक तणाव, राग, चिंता आणि दुःख या सारख्या नकारात्मक भावनांना शरीरातून मुक्त करण्यासाठी श्वासाच्या वेगवेगळ्या लयीचा वापर करते. हे तंत्र आपल्याला नैसर्गिकरित्या मनाच्या एका आनंदी, आरामदायक आणि ऊर्जात्मक मनस्थिती कडे नेऊन पोहोचवते.
राग : श्वास लहान आणि जलद बनतो. | दुःख : श्वास दीर्घ आणि खोल बनतो. |
सुदर्शन क्रिया मन आणि शरीर यांच्या मध्ये सुसंवाद आणतो.
आपल्या शरीर आणि मनाच्या विशिष्ट लयी आहेत. उदाहरणार्थ, आपल्याला ठराविक वेळी भूक लागते आणि झोपण्याची गरज असते. तसेच, आपल्या श्वासातला, ना आणि विचारांना एक लय आहे. संशय, चिंता आणि आनंद एका ठराविक लयी मध्ये येतात आणि जातात. समान भावना वर्षाच्या एका ठराविक वेळेस येतात. जेंव्हा मन आणि शरीराची लय समक्रमित नसते तेंव्हा आपल्याला अस्वस्थता वाटण्याची शक्यता असते. सुदर्शन क्रिया मन आणि शरीराच्या लयी मध्ये एक सुसूत्रता आणते, त्यामुळे निरोगी असण्याची आणि आनंदाची भावना येते.
सुदर्शन क्रियेचा उगम
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना १७ सप्टेंबर १९८१ या दिवशी, शिमोगा गावी, भद्रा नदीच्या किनारी, दहा दिवसांच्या मौन व उपवासानंतर सुदर्शन क्रियेचे ज्ञान प्राप्त झाले.
दहा दिवस मौनामध्ये बसण्यास ते कसे प्रेरित झाले हे सांगताना गुरुदेव म्हणाले, “मी आधीच जगभर फिरलो होतो. मी योग आणि ध्यान शिकवत होतो. पण तरी लोकांना आनंदाने जगण्यासाठी कशी मदत करावी या मी विचारात होतो. मला काही तरी कमतरता वाटत होती. जरी लोक आध्यात्मिक साधना करत असले तरी त्यांच्या जीवनाचे निरनिराळे कप्पे असतात. जेंव्हा ते बाहेर त्यांच्या दैनंदिन जीवनात येतात तेंव्हा ते खूप वेगळे असतात. म्हणून मी विचार करत होतो की मनातील शांती आणि जीवनाची बाह्य अभिव्यक्ती यामधले अंतर कसे भरून काढू शकतो. मौनाच्या दरम्यान सुदर्शन क्रियेची एक प्रेरणा मिळाली. काय द्यायचं आहे आणि कधी द्यायचं आहे हे निसर्गाला ज्ञात आहे. मी मौनातून बाहेर आल्यानंतर मला जे काही ज्ञात होतं ते मी शिकवायला सुरुवात केली अणि लोकांना खूप छान अनुभव येत होते. त्यांना आतून एकदम निर्मळ, स्वच्छ वाटत होतं.”
कालांतराने सुदर्शन क्रिया ही गुरुदेव श्री श्री रवीशंकर यांनी त्याच वर्षी स्थापन केलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या अनेक कार्यशाळांची कोनशीला बनली.
सुदर्शन क्रियाचे फायदे
सुदर्शन क्रियेचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रवि शंकर म्हणतात, ”झोपेत आपण थकवा दूर करतो पण खोलवर असलेला तणाव आपल्या शरीरात व मनात तसाच रहातो”. सुदर्शन क्रिया संपूर्ण शरीर आणि मनाची आतून शुद्धी करते. मन आणि शरीरातील खोलवर असलेला तणाव निघून जाण्यात सुदर्शन क्रिया या तंत्राचे किती फायदे आहेत हे १०० हून अधिक स्वतंत्र अभ्यासांतून दिसून येते.
या सुदर्शन क्रिया चे फायदे असे आहेत :
- अति चिंता, नैराश्य, मानसिक धक्क्यानंतर येणारा ताण (PTSD), आणि वाढलेला ताण यापासून मुक्ती मिळते.
- आवेग आणि व्यसनाधीन स्वभाव कमी करते.
- आत्मसन्मान आणि जीवन समाधान सुधारते.
- मनांची एकाग्रता वाढवते.
- चांगली झोप लागते.
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
- रक्तदाब कमी करते.
- श्वसन कार्य सुधारते.
सुदर्शन क्रिया कोणासाठी आहे ?
ज्यांना जीवन जास्त चांगल्या प्रकारे जगायचे आहे आणि तणावमुक्त जगायचे आहे त्यांच्यासाठी. जीवनाच्या सर्व क्षेत्रातील आणि सर्व वयोगटांतील लोकं सुदर्शन क्रियेचे फायदे अनुभवत आहेत. विद्यार्थी आणि व्यावसायिक व्यक्ती यांनी एकाग्रता आणि उत्पादकता यामध्ये सुधारणा अनुभवली आहे. उद्योजक आणि गृहिणी यांनी वृद्धींगत ऊर्जा पातळी अणि स्वास्थ्य अनुभवले आहे. माजी अतिरेकी आणि तुरुंगातील कैदी यांनी हिंसक प्रवृत्ती सोडल्या आहेत आणि त्यांचे मुख्य प्रवाहात पुनर्वसन झाले आहे. युद्ध निर्वासित आणि हिंसाचाराचे बळी त्यांच्या भूतकाळातील मानसिक आघातातून बाहेर पडून नियमित जीवन जगण्यास सक्षम झाले आहेत.