१. पोट ‘भरल्याचे’ समाधान टिकून राहते
दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावना दीर्घ काळ पर्यंत टिकून राहते. म्हणून दोन जेवणामध्ये दही खाल्ल्यास भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
२. भरपूर प्रथिनांनी युक्त आहार
दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि कॅल्शियम आहे जे शरीरात सहज शोषले जाते आणि शरीराची गरज भागते.
३. ऊर्जेने युक्त आहार
दही खाल्ल्याने भरपूर ऊर्जा त्वरित मिळते आणि धकाधकीनंतरचा थकवा त्वरित निघून जातो. दही आणि साखर खाल्ल्याने काम शक्ती वाढते. नपुंसकत्व कमी होण्यास मदत होते.पुरुष बीजांची संख्या आणि गुणवत्ता सुधारते.
४. प्रतिकारशक्ती वाढते
दही खाल्ल्याने शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पेशी कार्यरत होऊन शरीरातील संरक्षक यंत्रणा बळकट बनते. त्यामुळे विषाणूंचा नायनाट होऊन संसर्गजन्य आजार होत नाहीत. दातातील कीड नाहीशी होते.
५. मधुमेह नियंत्रित राहतो
दह्यामुळे रक्तशर्करेची पातळी योग्य राखली जाऊन मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत होते. मधुमेहामध्ये होणारी गुप्तागांची खाज कमी होते.
६. पचन क्रिया सुधारते
दही पचायला हलके आहेच. तसेच दह्यामुळे जठरातील आणि आंतड्यातील पाचक रस स्त्रवण्यास मदत होते, जेणेकरून जड अन्न देखील सहज पचते. खूप तिखट, तेलकट, मसालेदार, चमचमीत जेवणासोबत दही खाल्ल्यास असा आहार बाधत नाही.
७. हृदय विकाराची शक्यता कमी होते
दह्यामध्ये रक्तातील चरबी घटवण्याची क्षमता आहे. त्यामुळे विविध हृदय विकारांची शक्यता कमी होते. रक्त दाब नियंत्रित राहतो.
८. जीवनसत्वानी परिपूर्ण
विटॅमिन बी ५, बी १२ सारख्या जीवन सत्वानी परिपूर्ण असलेने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि मज्जा संस्था निरोगी राहते. कॅल्शियम आणि जीवनसत्व ‘ड‘ मुळे दात आणि हाडे बळकट होतात. मणक्याचे आरोग्य सुधारते.
९. आतड्यांचे आरोग्य सुधारते
लॅक्टो बॅक्टेरीया सारखे आतड्यांच्या आरोग्यास पोषक जीवाणू दह्यात असल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते, आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. पोट नियमित साफ होते.
१०. चेहरा, त्वचा उजळते
चेहऱ्यावर, त्वचेवर मध आणि बदाम तेलासोबत पंधरा मिनिटे दही वापरल्याने मृत आणि रापलेली त्वचा निघून जाते. कांती उजळ बनते. संत्र्याच्या सालीसोबत दही लावल्याने रंग उजळतो. गुलाब पाणी आणि हळदी सोबत दही लावल्याने त्वचा उजळ आणि मुलायम बनते. लिंबू रस आणि दह्याच्या वापराने त्वचेवरील, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
११. केसांसाठी उपयुक्त
तीस मिनिटांपर्यंत केसांना दही लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुतल्यास केस मऊ आणि रेशमी बनतात. मेंदी सोबत लावल्यास परिणाम आणखी वाढतो. दह्यातून काळी मिरी पावडर आठवड्यातून दोनदा केसांना लावल्यास केसातील कोंडा नाहीसा होतो. केसांच्या मुळांना दही आणि बेसन लावल्याने केस गळती कमी होते.
१२. मानसिक स्वास्थ्यासाठी
दह्याचा वापर आहारात सातत्याने केल्याने मेंदूतील सकारात्मकता वाढवणाऱ्या पेशीमधील रासायनिक प्रक्रिया वाढीस लागून चिंता, नकारात्मक विचार आणि औदासिन्य कमी होऊन मानसिक स्वास्थ्य टिकून राहणेस मदत होते हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.
दही- दही, चक्का, पनीर, ताक, कढी, मठ्ठा या स्वरुपात तसेच रायता, कोशंबीर, दहीवडे, श्रीखंड इत्यादीच्या माध्यमातून आहारात येते.
अगदी उंट, शेळी, म्हैस आणि गाय शिवाय इतर सर्व दुभत्या जनावरांच्या दुधाचे दही वापरले जाते. आजकाल सोयाबीन आणि नारळाच्या दुधाचे दही काही रुग्णांसाठी वापरले जाते.
चविष्ट दह्याचे स्वास्थ्यपूर्ण उपयोग
“दही भात-पौष्टिक आहार“ – जागतिक आरोग्य संघटना.
थंड आणि मधुर दही कोणाला आवडत नाही? दही कशा सोबतही खा – त्याची चव वाढवतेच. दही फक्त आहाराची लज्जतच वाढवत नाही तर आरोग्यही प्रदान करते. म्हणून तर सर्व आहार तज्ञांची यादी दह्याशिवाय सुरु आणि पूर्ण होत नाही.
सर्वच प्राण्यांचे दुध आणि दुग्धजन्य पदार्थ पौष्टिक आहेत, परंतु या पौष्टीकतेमध्ये दह्याचा क्रमांक वरचा लागतो कारण दह्यासोबत खाल्लेले अन्न सहज पचते आणि त्या अन्नातील जीवनसत्वे आणि प्रथिने सहजरीत्या रक्तात आणि शरीरात शोषली जातात. म्हणून दह्याला ‘परिपूर्ण आहार‘ म्हणून सर्वत्र मान्यता आहे.
- रोचनं दीपनं वृष्यं स्नेहनं बलवर्धनम् /
पाकेऽम्लमुष्णं वातघ्नं मंगल्यं बृंहणं दधि //२२५// - पीनसे चातिसारे च शीतके विषमज्वरे /
अरुचौ मूत्रकृच्छ्रे च कार्श्ये च दधि शस्यते //२२६// - शरद्ग्रीष्मवसन्तेषु प्रायशो दधि गर्हितम् /
रक्तपित्तकफोत्थेषु विकारेष्वहितं च तत् //२२७//
चरक संहिता सूत्रस्थान – २७
चरक संहिता,सूत्रस्थान २७ मध्ये दह्याची उपयोगिता वर्णन केली आहे. यावरून दही स्वादाबरोबरच कसे स्वास्थ्यपूर्ण आहे हे लक्षात येते.
(स्वाद, पचनशक्ती, लैगिक वासना आणि वंगण उत्पन्न करणारे, बल आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे, चवीने तूरट, ऊष्ण, वात संतुलित करणारे, मांगल्य आणि पौष्टिकता वाढवणारे, श्वसन मार्ग ओला राखणारे, अतिसार (जुलाब) रोखणारे, थंडी आणि ज्वर, विषमज्वर कमी करणारे, आहाराची अरुची कमी करणारे, मूत्र मार्गातील अडथळा कमी करणारे, कृशता कमी करणारे, शरद, उन्हाळा आणि वसंत ऋतूमध्ये अपायकारक, रक्तदोष, पित्त आणि कफामध्ये अपायकारक)
दही रुचकर, दीपक, स्निग्ध, बलवर्धक, ऊष्ण आणि पौष्टिक आहे.
१०० ग्रॅम दह्या मध्ये आढळणारे महत्वाचे घटक
- पाणी (Water) ८९%
- प्रोटीन (Protien) ३%
- चरबी (Fat) ४%
- खनिज (Minerals) १%
- कार्बोहायड्रेड्स (Carbo Hydrades) ३%
- कॅल्शियम (Calcium) १४९ मिली
- लोह (Iron) ०.२ मिली
- विटामिन ए (VitaminA) १०२ युनिट
- विटामिन बी(Vitamin B) अल्प
- विटामिन सी(Vitamin C) १ मिली
- कॅलरोफिक ६० मूल्य
भारतीय वंशाची गाय
सर्व दुभत्या प्राण्यांमध्ये ‘भारतीय वंशाच्या गायी‘ दुध-दही-दुभत्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत श्रेष्ठ आहेत. विदेशी तसेच संकरीत गायी निव्वळ ए-१ प्रोटीन युक्त दुध देतात. या ए-१ प्रोटीन मुळे मधुमेह, कर्करोग, हृदय रोग आणि मानसिक तणाव-औदासिन्य तसेच इतर आजार बळावतात हे आत्ता प्रयोगांती सिद्ध झाले आहे. मात्र भारतीय वंशाच्या गायी निव्वळ ए-२ प्रोटीन युक्त दुध देतात जे या रोगांना प्रतिरोध करते. या गायींचा आहार नैसर्गिक असलेने यांच्या दुधामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते, शक्ती आणि उर्जा प्राप्त होते. म्हणून आयुर्वेदिक औषधोपचारामध्ये या दुधासोबत बरीच औषधे घेतली जातात. हिचे तूप देखील औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. गोमुत्रामध्ये १०४ % रोग प्रतिकार शक्ती आहे. शेण देखील जंतू संसर्ग कमी करते तसेच ते एक उत्कृष्ट खत आहे. अशारितीने या गायींचे पंच गव्य (दुध, दही, तूप, शेण आणि मूत्र) आपल्या दैनंदिन जीवनासाठी तसेच शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या गायीच्या दुधामध्ये वर नमूद केलेले सर्व लाभ ओतप्रोत आहेत. म्हणून या दह्याचे वैशिष्ट्य खास आहे.
दही खाण्याबाबत घ्यावयाची काळजी
- कच्चे दही अजिबात खाऊ नये,कारण त्यामुळे त्रिदोष बिघडू शकतात.
- शक्यतो रात्री दही खाऊ नये, खायचेच असेल तर साखर किंवा काळी मिरी पूड घालून खाल्ल्यास पित्त वाढत नाही.
- दह्यामुळे आहार वाढू शकतो. तसेच दही पौष्टिक असल्याने वजन वाढू शकते.
- दह्यामध्ये संपृक्त (saturated) चरबी असल्याने हृदय विकारात तसेच टाईप-२ मधुमेहामध्ये घातक ठरू शकते.