पित्त दोष म्हणजे काय?
पित्त हा शब्द “तप” या शब्दापासून आला आहे. ज्याचा अर्थ ‘उष्ण करणे’ आहे. शरीरातील पित्तामध्ये उष्णता (अग्नी) आणि आर्द्रता (जल) या दोन्ही मूलभूत घटकांचा समावेश होतो. त्याचा द्रव स्वभाव त्याला गतिशीलता प्रदान करतो.
अष्टांग हृदयम्: सूत्रस्थान या आयुर्वेद ग्रंथात पित्ताच्या सात गुणांचे वर्णन केले आहे:
‘पित्तं सस्नेह तीक्ष्णोष्णं लघु विसरण सारं द्रवम्’
पित्त किंचित तेलकट, भेदक, उष्ण, हलके, गंधयुक्त, मुक्त-वाहणारे द्रवरूप असते. पित्तामुळे चयापचय किंवा परिवर्तन होते. पित्त हे अन्नपचन, शरीराचे तापमान राखणे, दृश्य धारणा, त्वचेचे रूपरंग, बुद्धी आणि भावना नियंत्रित करते. पित्त दोषातील असंतुलन शारीरिक आणि भावनिक अस्वस्थताला कारणीभूत ठरते, जसे की :
पित्त दोषाची लक्षणे (Pitta Dosha Symptoms)
१. पित्त दोषाची शारीरिक लक्षणे
- तहान आणि/ किंवा भूक वाढलेली असणे
- संसर्ग
- केस पांढरे होणे आणि/किंवा गळणे
- हार्मोन्सचे असंतुलन
- चक्कर येणे आणि/किंवा अर्धशिशी
- तीव्र उष्णता जाणवणे आणि शरीराला थंड करणारे पदार्थ हवेसे वाटणे
- श्वासाची / शरीराची दुर्गंधी
- घसा बसणे
- अन्न न मिळाल्यास मळमळणे
- निद्रानाश
- स्तन/अंडकोष यामध्ये कोमलता येणे
- मासिक पाळीत मोठ्या प्रमाणात किंवा वेदनादायक रक्तस्त्राव
२. पित्त दोषाची वर्तनामध्यें दिसून येणारी लक्षणे
- अधीरता
- वैफल्य
- अति अहंकारी वर्तणूक
- अवास्तव मोठे ध्येय/ निकालांचा ध्यास
- चीड
- मत्सर
- बिनबुडाचे निष्कर्ष काढणे.
- अस्थिरतेची भावना
- परिपूर्णतावादी प्रवृत्ती
एक संतुलित पित्तदोष, हेतू आणि ध्येयांचा योग्य पाठपुरावा करण्याची क्षमता, वाढीव एकाग्रता, समस्या सोडवण्याची क्षमता आणि आत्मविश्वास हे सर्व वृद्धींगत करतो.
पित्त दोष असंतुलनाची कारणे
- पित्त वाढवणारे पदार्थ खाणे (तिखट, आंबट, खारट, खूप मसालेदार, अती-तळलेले, रासायनिक प्रक्रिया केलेले, लाल मांस)
- कॅफीन (कॉफी), काळा चहा, निकोटीन (धूम्रपान), अल्कोहोल आणि इतर उत्तेजक पदार्थांचे सेवन
- सूर्यप्रकाशात जास्त काळ व्यतीत करणे (शेकोटीला वणव्यात बदलू शकते)
- भावनिक ताणतणाव
- जास्त काम करणे आणि/किंवा कमी विश्रांती घेणे
पित्त दोष असंतुलित असल्यामुळे होणारे परिणाम:
- छातीत जळजळ
- सूर्यप्रकाशामुळे होणारी त्वचेची जळजळ, इसब, त्वचारोग, मुरूम
- ऍसिड रिफ्लेक्स, पेप्टिक अल्सर
- ज्वर
- रक्ताच्या गुठळ्या आणि लकवा
- मूत्रपिंडाला संसर्गरोग
- हायपरथायरॉईडीझम
- कावीळ
- सांध्यातील तीव्र जळजळ (संधिवात)
- अतिसार
- सदैव तीव्र थकवा असण्याचे संलक्षण
- खराब दृष्टी किंवा अंधत्व
- स्वयंप्रतिकार अभाव विकार
- ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव डिसऑर्डर(एक मनोविकार)/नैराश्य
पित्त दोषासाठी घरगुती उपाय
१. आपल्या आहाराच्याबाबतीत जागरूक रहा
पित्त शांत करणारे पदार्थ (कडू, तुरट, गोड चवीचे अन्न) खा. दूध, तूप, लोणी हेही पित्त शांत करणारे पदार्थ आहेत. आंबट फळांपेक्षा गोड फळांना प्राधान्य द्या. मध आणि काकवी वगळता सर्व गोड पदार्थांचे सेवन करता येते
असंतुलित पित्त संतुलित करण्यासाठी येथे ५ सोप्या कृती दिलेल्या आहेत
२. मध्यम मार्ग निवडा
कृती आणि विश्रांती यांना संतुलित करा. कामामध्ये जास्त गुंतू नका आणि विश्रांतीमध्येही जास्त व्यस्त राहू नका. आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि नैसर्गिक लय पुनःस्थापित करण्यासाठी येथे काही दिनचर्येबाबत सूचना दिलेल्या आहेत.
३. चांगल्या गोष्टींचा आनंद घ्या
नियमित जेवण घ्या आणि थोडा वेळ निसर्गाच्या आणि चांगल्या व्यक्तींच्या सहवासात घालवा.
४. ध्यान करा
ध्यान केल्याने मन शांत होते आणि भावनिक ताण (ज्यामुळे पित्तदोषाचे असंतुलन होते), कमी होतो. म्हणून, दररोज ध्यान करणे चांगले आहे. ऑनलाइन ध्यान आणि श्वास कार्यशाळेत तुम्ही ध्यान कसे करावे हे शिकू शकता.
५. काही योगासने आणि प्राणायाम यांचा सराव करा
खालील योगासने पित्त संतुलित करण्यात मदत करतात:
- मार्जरीआसन
- शिशु आसन
- चंद्र नमस्कार
- उत्कटासन
- भुजंगासन
- विपरीत शलभासन
- पश्चिमोत्तासन
- अर्ध नौकासन
- अर्ध सर्वांगासन
- सेतुबंधासन
- शवासन
६. पित्तदोषासाठी आयुर्वेदिक औषधे घ्या
खालील आयुर्वेदिक औषधे पित्त दोषाकरिता आहेत जी पित्त संतुलन परत मिळवून देऊ शकतात. कृपया लक्षात घ्या की यापैकी कोणतेही औषध प्रशिक्षित आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावे:
- अमलापित्तरी वटी (अति ऍसिडिटी साठी)
- अविपत्तीकर चूर्ण (पचन समस्या, हायपर एसिडीटी)
- यष्टिमधु (एसिड पेप्टिक रोगांसाठी)
- निशामलाकी (अॅलर्जीविरोधी)
मत्सर किंवा निराश वाटणे आणि तीव्र थकवा, ऍसिड रिफ्लक्स (पोटातील आम्ल अन्ननलिकेत वर येणे) आणि छातीत जळजळ यासारख्या परिस्थितींवर उपाय एकच आहे: तुमचा पित्त दोष संतुलित ठेवा.
तुम्ही श्री श्री आयुर्वेद हॉस्पिटल किंवा पंचकर्म केंद्रात पित्त दोष संतुलित करणाऱ्या उपचारांचा लाभ घेऊ शकता.