ओणम हे राजा महाबली यांच्या लोकांच्या भेटीचे प्रतीक आहे. हा १० दिवसाचा सोहळा सगळ्या मल्याळी लोकांसाठी खूप आनंददायी असतो, जे आपल्या राजाचे स्वागत करतात.
ओणम हा एक कापणी उत्सव सुद्धा आहे. घरासमोर विविध रंगीबेरंगी फुलांनी (पूकलम) मांडलेल्या फुलांच्या सुरेख रांगोळ्यांमुळे विपुलता आणि समृद्धीची भावना निर्माण होते, हे ओणम सणाचे वैशिष्ठ्य आहे. सोन्याच्या दागिन्यांनी आणि नवीन वस्त्रांनी सजलेल्या स्त्रियांबद्दल तर बोलायलाच नको. ओणम उत्सवाचा प्रत्येक भाग हा भूतकाळातील वैभवाची आठवण करून देणारा आहे. भव्य साध्या (एक विस्तृत मेजवानी) त्यानंतर कैकोट्टीकली (एक सुंदर नृत्य), तुंबी तुल्लाल आणि कुम्मतीकली आणि पुली काली यांसारखे इतर लोकनृत्य सादर केले जाते.
ओणम हा सण महान असूर राजा महाबळी पाताळ लोकातून त्यांच्या घरी परत येण्याचे स्मरण करवतो.
प्रल्हादाचा नातू , महाबळी, एक बलवान आणि विद्वान राजा होता जो ज्ञानाचा खूप आदर करायचा. महाबळी एक यज्ञ करत होता , जेव्हा एका बुटक्या, तरुण, तेजस्वी मुलाने यज्ञशाळेत प्रवेश केला. महाबळीने प्रथे प्रमाणे त्या तेजस्वी मुलाचे स्वागत केले आणि त्याला विचारले की त्याला काय हवे आहे. त्या तरुण मुलाने केवळ तीन पावले इतकी जागा देण्याची विनंती केली.
‘पाहुणे दुसरे कोणीही नसून स्वतः भगवान विष्णू आहेत’, असे महाबळी यांना त्यांचे गुरु शुक्राचार्य यांनी सावध करून सुद्धा ते लगेचच तीन पावले जमीन देण्यास तयार झाले.
दंत कथा अशी आहे की तीन पावलांची मंजुरी मिळताच तरुण वामनाने त्रिविक्रमाचे भव्य दिव्य रूप घेतलं आणि पहिल्या पावलाच्या मापात पूर्ण धरती सामावून घेतली. नंतर त्याच्या दुसऱ्या पावलात त्याने संपूर्ण आकाश व्यापून टाकले. ह्या दोन पावलांमध्ये महाबळीचे पूर्ण राज्य, पृथ्वी आणि आकाश व्यापून टाकले. वामनाने मग राजाला विचारले की त्याने तिसरे पाऊल कुठे ठेवावे.
भगवंताचा सर्वात मोठा भक्त, प्रल्हादाचा नातू , राजा महाबळी, ह्याने आनंदाने तिसऱ्या पावलासाठी, पूर्ण श्रद्धेने आणि आत्मसमर्पण भावनेने आपले डोके अर्पण केले.
भगवंताने त्याची शरणागतीची वृत्ती ओळखून त्याला आशीर्वाद दिला आणि पुढच्या मन्वंतरामध्ये त्याला इंद्र बनवण्याचे वचन देऊन पाताळात पाठवले आणि आश्वासन दिले की भगवंत स्वतः पाताळाच्या द्वाराचे राखण करतील.
महाबलीच्या लोकांच्या विनंतीला मान देऊन, विष्णूने महाबलीला दरवर्षी एकदा त्याच्या लोकांमध्ये येण्याची, पाताळातून राज्यात परत जाण्याची परवानगी दिली. हा दिवस ओणम सण म्हणून साजरा केला जातो.
एक खोल अर्थ
ही वामन अवताराची अख्यायिका पौराणिक आहे, म्हणजे, गहन सत्याची अभिव्यक्ती, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक घटने पासून मिळालेला एक नैतिक धडा, एका कथेत गुंफलेला. महाबळी एक महान असूर राजा होता. तो गर्विष्ठ होता कारण जेथ पर्यंत त्याची नजर जाईल तेवढी जमीन त्याच्या मालकीची होती आणि त्याला अजिंक्य मानले जात असे.
ज्ञान आणि नम्रता व्यक्तीला अहंकाराच्या पलिकडे जाण्यास मदत करते, जे पृथ्वी किंवा आकाशाएवढा मोठा होऊ शकतो. वामना प्रमाणेच अहंकारावर देखील तीन साध्या चरणांत विजय मिळवता येतो.
प्रथम चरण : पृथ्वीचे मोजमाप करा – आजूबाजूला बघा आणि या पृथ्वीवरील तुमच्यासारख्या इतर सजीवांच्या निखळ संख्येने विनम्र व्हा.
दुसरे चरण : आकाशाचे मोजमाप करा – वर आकाशाकडे पहा आणि त्यांच्या निखळ विशालतेने आणि ब्रह्मांडातील इतर ग्रहांच्या प्रचंड संख्येने आणि या विश्वात आपण किती क्षुल्लक आहोत या जाणीवेने विनम्र व्हा.
तिसरे चरण : तुमच्या डोक्यावर हात ठेवा – हे लक्षात घ्या की केवळ सजीवांच्याच नव्हे तर ब्रह्मांडाच्या जन्म आणि मृत्यूच्या चक्रात, आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा कालावधी खूप लहान आहे आणि व्यापक दृष्टिकोनाने आपण जी भूमिका बजावतो, ती ब्रह्मांडाच्या तुलनेत खूपच लहान आहे.
श्रावण महिन्याचे महत्त्व
ओणम हा थिरुवोनं किंवा श्रावणमचे छोटे स्वरूप आहे, कारण हा सण भारतीय दिनदर्शिकेत, श्रावण महिन्यातील श्रावण नक्षत्राच्या खाली येतो. श्रावण हा महिना भारतीय दिन दिनदर्शिकेत सामान्यतः उत्तरेकडे जुलै – ऑगस्ट मध्ये आणि दक्षिणेकडे ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये येतो.या महिन्याला श्रावण असे म्हणतात , कारण ह्या महिन्यातील पौर्णिमा श्रावण नक्षत्राच्या विरुद्ध दिशेला असते.
आकाशातील 3 पावलांचे ठसे
श्रवण हा तारा पश्चिमी खगोलशास्त्रात अल्टेयर नावाने ओळखला जाणारा ताऱ्यांचा समूह आहे, अक्विला तारामंडलातील तेजस्वी तारा आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी झेपावणारा बीटा आणि गामा अक्विला.
हे तीन तारे वामनाच्या त्याच्या विशाल त्रिविक्रम रूपातील तीन पावलांचे ठसे म्हणून चित्रित केले आहेत. महाबली आणि वामन यांच्या दंत कथेचा या ताऱ्याच्या श्रावण नावाशी काय संबंध आहे? श्रावण या शब्दाचा अर्थ ऐकणे, लक्ष देणे असा होतो. महाबलीच्या अवज्ञाचा परिणाम दर्शविणारे तीन तारे लोकांना ऐकण्यासाठी आणि चांगल्या सल्ल्याकडे लक्ष देण्यासाठी आकाशात सतत स्मरण करत उभे आहेत.