वसंत पंचमी किंवा बसंत पंचमी हा हिवाळा संपून उन्हाळा चालू होण्याआधीचा एक काळ असतो. मकर संक्रांती नंतर (१४/१५ जानेवारी नंतर) सूर्य हळू हळू उत्तर दिशेकडे सरकतो आणि हवेतील उन्हाळा वाढू लागतो. हा बदल भारतीय उपखंडात खूप आल्हाद दायक असतो कारण थंडीच्या तीव्रतेपासून सुटका मिळते. वसंत पंचमी ते होळी या तीस दिवसांच्या संक्रमण काळानंतर खरा उन्हाळा चालू होतो.
![](https://www.artofliving.org/in-en/app/uploads/2023/09/Vasant-Panchami-compressed.jpg)
भारतीय कालगणनेनुसार (चंद्रभ्रमणावर आधारित) वसंत पंचमी हा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवा दिवस असतो. हा महिना ख्रिस्त कालगणनेनुसार जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात येतो.
वसंत पंचमी ची संकल्पना “त्रिदेवी” शी जोडली गेली आहे
वसंत पंचमीला या भारत भूमीत खूप महत्व दिले गेले आहे. पुरातन काळापासून हा सण सरस्वती नदीशी पण जोडला आहे. भारतातील अनेक भागांत या सणाला देवी सरस्वतीची पूजा केली जाते. सरस्वती देवीची पूजा घरी करतात आणि सरस्वतीच्या देवळात सजावट करतात. भक्तांची गर्दी होते, भारताच्या दक्षिण भागात लोक या सणाला श्री पंचमी म्हणतात. श्री हे लक्ष्मी देवीचे एक नाव आहे. वसंत पंचमीच्या दिवशी देवी पार्वतीने महादेव शंकरांचा तप भंग करण्यासाठी कामदेवास पाठवले होते. त्यामुळे वसंत पंचमी हा सण या तीनही देवींशी निगडित आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर या दिवशी ज्ञान, ऐश्वर्य आणि सृजनात्मक शक्ती ही तीन मूल्ये असलेला हा दिवस आहे.
सरस्वती नदी व सरस्वती देवीशी संबंध कसा जोडला गेला आहे ?
वसंत पंचमी हा सण सरस्वती नदीशी कसा जोडला गेला आहे?
ते पाहूया.
![](https://www.artofliving.org/in-en/app/uploads/2023/09/Saraswati-connect-Vasant-Panchami-compressed.jpg)
सरस्वती नदी ही भारताच्या वायव्य भागात वाहणारी पुरातन नदी आहे. कालांतराने ती सुकली होती. त्या दिवसांत उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळून नदीत पाणी वाढले आणि नदी पुनर्जीवीत झाली. नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर मोहरीची रोपे फुलली. मोहरीच्या पिवळ्या रंगाच्या फुलांनी नदीचे दोन्ही तट लांबपर्यंत सजून जायचे. भारतीय परंपरेनुसार पिवळा रंग ‘ ज्ञानाचे ‘ प्रतीक आहे. पिवळा रंग वसंत ऋतुचे प्रतीक आहे. देवी सरस्वती ‘ज्ञानाची देवता’ आहे. त्यामुळे या नदीला सरस्वती नाव पडले.
या दिवशी ज्ञानाचा उत्सव साजरा होतो
पुरातन काळी, अनेक ऋषींनी त्यांचे आश्रम सरस्वती नदीच्या किनारी बांधले. महर्षि वेदव्यास सुद्धा इथेच रहात होते. सरस्वती नदीच्या किनारी वेद, उपनिषद आणि अनेक ग्रंथ लिहिले गेले व संग्रहित केले गेले. त्यामुळेच या नदीला देवी सरस्वती शी म्हणजेच विद्येच्या देवतेशी जोडले गेले.
वसंत पंचमीला देवी सरस्वतीला पिवळे वस्त्र परिधान केले जाते ज्याने या सणाचे आणि नदीचे नाते अधोरेखित होते. भाविक सुध्दा पिवळे वस्त्र धारण करतात आणि पिवळ्या रंगाच्या अन्नाचे वाटप करतात. वसंत पंचमी हा देवी सरस्वतीचा म्हणजेच विद्येच्या देवतेचा दिवस असल्याने काही ठिकाणी या दिवशी मुलांचे शालेय शिक्षण सुरु करण्याची प्रथा आहे.
फेब्रुवारी – छोटा आणि आनंददायी महिना
देवी सरस्वती ही सृजनशिलतेची देवी आहे. पुरातन काळात वसंत पंचमी ते होळी या महिन्याभराच्या काळात “वसंत उत्सव” हा सण साजरा केला जायचा. आपल्याला माहीत आहे की वसंत पंचमी फेब्रुवारी महिन्यात येते. फेब्रुवारी महिना लग्न करण्यासाठी उत्तम आहे. जाणकार सांगतात पुष्कळ देवांचे लग्न याच महिन्यात झालं आहे. शंकर आणि पार्वती यांचा विवाह याच महिन्यात झाला आहे.
![](https://www.artofliving.org/in-en/app/uploads/2023/09/Shiva-parvati-Vasant-Panchami.jpg)
वसंत पंचमीची आख्यायिका
आता आपण वसंत पंचमीशी संबंधित लोकप्रिय आख्यायिका थोडक्यात पाहू.
भगवान शंकर महादेव कडक तप करत होते. तारकासूर नावाच्या राक्षसाला वर होता की फक्त शंकराचा मुलगाच त्याला मारू शकतो. त्याने जगभर उच्छाद मांडायला सुरवात केली. भगवान शंकर बऱ्याच काळापासून पासून गहिरे ध्यान करुन संन्यासी बनले होते. त्यांचे परत लग्न होणे इतक्यात शक्य नव्हते. त्याची पहिली पत्नी सती हिने समाधी घेतली होती. तेवढ्यात सती ही पार्वती बनून परत आली. शंकर प्रसन्न होण्यासाठी तिने कठोर तपश्चर्या केली. पण शंकर काही हलले नाहीत. मग पार्वती देवीने कामदेवाला पाठवले शंकरांना ध्यानातून बाहेर काढण्यासाठी. कामदेव शंकराकडे गेले तो दिवस होता वसंत पंचमीचा. शंकरांना आकर्षित करण्यासाठी व ध्यानातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी कैलासावर भ्रामक वसंत ऋतु निर्माण केला! शंकर नंतर जागे झाले आणि क्रोधित होऊन त्यांनी कामदेवाची राख केली. पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला. त्यांना कार्तिकेय नावाचा मुलगा झाला. कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला.
वसंत पंचमी भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते
सरस्वती पूजा म्हणून साजरा केला जाणारा दिवस असण्याव्यतिरिक्त, वसंत पंचमी हा दिवस भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.
पंजाब मध्ये या सणाला पतंग उडवून पतंगोत्सव साजरा करतात. लोक पिवळे वस्त्र धारण करतात आणि पिवळ्या रंगाचा भात खातात. शीख लोक पिवळ्या रंगाची पगडी घालतात. महाराष्ट्रात नवविवाहित जोडपी पिवळ्या रंगाचे कपडे घालून देवळात जातात. राजस्थानात लोक या दिवशी चमेलीचा हार घालतात. बिहार मध्ये पुरातन काळात याच दिवशी सूर्यदेवाची मूर्ती बसवण्यात आली होती. या दिवशी मूर्तीला स्नान घालून सुशोभित करतात.
![](https://www.artofliving.org/in-en/app/uploads/2023/09/Vasant-Panchami-Celebration-compressed.jpg)
सुफी मुसलमान वसंत पंचमी महत्वाची मानतात
सुफी परंपरेनुसार सुफी कवी अमीर खुसरो यांनी १३ व्या शतकात काही हिंदू महिलांना पिवळी फुले घालताना पहिले, तेव्हा त्यांनी ही पद्धत सुफी मुसलमाना मध्ये पण चालू केली. त्यानंतर त्यांनी ही प्रथा सुफींमध्ये आणली, जी आजपर्यंत चिश्ती समुदायातील सुफी मुस्लिमांद्वारा पाळली जाते. वसंत पंचमी हा तो दिवस आहे जेव्हा काही सुफी मुस्लिम दिल्लीतील सुफी संत निजामुद्दीन अवलिया यांच्या कबरी जवळ साजरा करतात.
अशा प्रकारे वसंत पंचमी हा सण भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो. हा दिवस प्रेमाचा आणि ज्ञानाचा असतो.
आपली संस्कृती खूप आकर्षित करणारी आहे, नाही कां? तेवढाच आपल्या परंपरेत स्वास्थ्यावर भर दिला आहे. हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषी मुनिंनी स्वास्थ्य टिकवण्यासाठी अनेक पद्धती सांगितल्या आहेत. या पद्धती अधिक जाणण्यासाठी “आर्ट ऑफ लिव्हिंग” चा “ऑनलाईन मेडिटेशन आणि ब्रेथ वर्कशॉप” नक्की करा.