गुरु परंपरा म्हणजे गुरूंची वंशावळ ज्यांनी पिढयानपिढया समाजाच्या हितासाठी ज्ञान उपलब्ध करून दिले आहे. गुरुकडून शिष्याकडे ज्ञान हस्तांतरण करण्याची ही प्रथा आहे. या प्रथेमुळे भारतीय उपखंडातील ज्ञानाच्या प्रमुख शाखांतील ज्ञान जतन झाले आहे

गुरु परंपरेचे महत्त्व

गुरु-शिष्य परंपरेमुळे मानसिक विषाद, ज्यापासून कोणतीही पिढी अनभिज्ञ नाहीये, त्यापासून मुक्त होण्याचे ज्ञान प्रत्येक पिढीला उपलब्ध करून दिले गेले आहे.

या परंपरेतील प्रत्येक गुरूंनी शाश्वत ज्ञान त्यांच्या काळातील पिढीला समजेल अशा भाषेत उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक गुरू परंपरेने जगासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. या परंपरेमुळे अनेक महान ग्रंथ उदयास आले आणि प्रत्येक परंपरेतील गुरूंची प्रभावी व्यक्तिमत्त्वे आणि वैशिष्ट्ये होती. त्यांचे स्मरण केल्याने थोड्या काळासाठी कां  होईना त्यांचे गुण आपल्यामध्ये जिवंत होतात.

अद्वैत गुरु परंपरा

अद्वैत तत्त्वज्ञान सांगते की विश्वातील प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येकजण एक चैतन्य आहे. गुरुदेव श्री श्री रविशंकर स्पष्ट करतात, “अद्वैत तत्वज्ञान हे क्वांटम भौतिक शास्त्रासारखे आहे, जे स्पष्ट करते की सर्व काही एखाद्या लाटेप्रमाणे कार्य करते. रसायनशास्त्रात अनेक घटक आणि समस्थानिक (isotopes) आहेत. परंतु क्वांटम भौतिक शास्त्रामध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञाला, आवर्त सारणी (periodic table) उपलब्ध नाही कारण तेथे सर्व काही केवळ अणूमात्र आहे. ”

अद्वैत गुरु परंपरा हा अद्वैतासारख्या पवित्र तत्वज्ञानाच्या गुरुंचा वंश आहे. आदि शंकराचार्य, वेद व्यास आणि महर्षी वशिष्ठ यांसारखे प्रसिद्ध गुरु या गुरूंच्या वंशातील आहेत. त्यांच्या योगदानामुळे अद्वैताचे ज्ञान युगानुयुगे जिवंत राहिले  आहे. या वंशाने उपनिषद आणि भगवद्गीता यांसारख्या धर्मग्रंथांचे ज्ञान हस्तांतरित केले आहे, तसेच आध्यात्मिक अनुभव देणारे ज्ञानाचे इतर स्त्रोत देखील उपलब्ध करून दिले आहेत..

अद्वैत गुरुंच्या विस्मयकारक कथा

सुरुवातीला, फक्त शिव होता, शाश्वत चैतन्य – पहिले गुरु. या चैतन्याच्या सागरात नारायण आदिशेषाच्या आधाराने तरंगत होता, जो आदिशेष हे सतर्कतेचे प्रतीक आहे. जेव्हा नारायणाने त्याच्या सभोवतालच्या चैतन्याशी एकरूपता अनुभवली, तेव्हा ब्रह्म देवाचा जन्म झाला, जो विश्वाच्या सर्जनशील वृत्तीचे प्रतीक आहे. त्यानंतर ब्रह्मदेवाची अनेक रूपे झाली. शिव, नारायण आणि ब्रह्मा या सूक्ष्म शक्ती सृष्टीच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात.

ब्रम्हाच्या चैतन्य शक्तीतून ऋषी वसिष्ठ नामक एक मानसपुत्र किंवा वैयत्तिक चेतना जन्माला आली. ऋषी वसिष्ठ हे मानवातील सर्वात ज्ञानी होते. ऋषी वसिष्ठांनी श्रीरामांना जगाची कर्तव्ये पार पाडताना एकाग्र आणि समभावने कसे राहायचे याचे मार्गदर्शन केले. ऋषी वसिष्ठ आणि श्री राम यांच्यातील संवाद हा ‘योगवसिष्ठ’ या नावाने परिचित असून जो जगाच्या भ्रामक स्वरूपावर भाष्य करणारा ग्रंथ आहे.

ऋषी वसिष्ठ यांचा मुलगा शक्ती,  ज्यांच्या पुढच्या पिढीमध्ये  ऋषी पाराशर. ऋषी पाराशर यानां काळ, खगोलशास्त्र, ज्योतिष, वैद्यकशास्त्र आणि वैदिक विधी यांचे परिपूर्ण ज्ञान होते. ऋषी पराशर यांनी एका मत्स्यकन्येशी विवाह केला आणि त्यातून त्यांना कृष्णद्वैपायन व्यास नामक पुत्र रत्नं प्राप्त झाले. हेच ऋषी व्यास पुढे जाऊन, अद्वैत गुरु परंपरेच्या इतिहासातील एक महान विद्वान म्हणून नावारूपास आले.

वेदांचे एकत्रीकरण करण्यासाठी ऋषी व्यासांनी विविध प्रदेशांतील ऋषींना भेटण्यासाठी भारतीय उपखंडाचा प्रवास केला. त्यांना वेदांच्या ११८० शाखा माहित होत्या आणि त्यांनी वेदांत सूत्रे (म्हणजे उपनिषदांचा सारांश), महाभारत ज्यात भगवद्गीता हा एक भाग आहे, योगसूत्रे, व्यासभाष्य आणि श्रीमद भागवत यांचे लेखन केले.

ऋषी व्यास यांच्यानंतर त्यांचे पुत्र शुक देव या गुरुपरंपरे मध्ये येतात. शुक देव यांच्या जन्माची एक मनोरंजक कथा आहे. एकदा भगवान शिव देवी पार्वतीला एक कथा सांगत होते आणि ती कथा ऐकताना पार्वतीचा कथेच्या मध्येच डोळा लागला. दरम्यान, एक पोपटही ही कथा ऐकत होता. कथेच्या ऐकण्यातून आलेल्या ज्ञानामुळे प्रभूने त्यांचे कथन चालू ठेवावे अशी त्याची इच्छा होती. म्हणून त्याने देवी पार्वतीच्या होकारार्थी नादांचे अनुकरण सुरू ठेवले. जेव्हा भगवानांनी कथा संपवली आणि देवी पार्वती झोपी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांना समजले की दुसरे कोणीतरी कथेला होकारार्थी आवाज देत होते. 

त्यांनी पहिले तर तो एक पोपट होता. रागावून ते त्याच्या कडे धावले. पोपट जाऊन,  व्यास आणि त्यांच्या पत्नीच्या कुटीरमध्ये लपला. ऋषी व्यासांनी पोपटाच्या वतीने भगवान शिवाकडे क्षमा मागितली आणि त्याला आश्रय दिला. पोपटाच्या आत्म्याने ऋषी व्यास यांच्या गरोदर पत्नीच्या गर्भाशयात प्रवेश केला. हा आत्मा नंतर शुकदेव  म्हणून नावाजला गेला. त्याने जगाच्या भ्रमात अडकण्याच्या भीतीने जन्म घेण्यास नकार दिला आणि गर्भात राहूनच आपल्या वडिलांच्या प्रवचनातून ज्ञान प्राप्त करण्यास प्राधान्य दिले.१६ वर्षांनंतर, शुकदेवाचा जन्म झाला. ज्याने नंतर अर्जुनाचा नातू राजा परीक्षित याला श्रीमद्भागवतम् हा भक्तिग्रंथ सांगितला.  हा पवित्र ग्रंथ, कलियुगासाठी अंतिम उपाय म्हणून ओळखला जातो, हा भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार, विशेषत: भगवान कृष्ण यांच्या कथांचा संग्रह आहे.

त्याचप्रमाणे, अनेक गुरु हे अद्वैत गुरु परंपरेचा भाग आहेत. अद्वैत तत्त्वज्ञान हे एवढे आकर्षक आणि सखोल असताना सुद्धा नंतरच्या युगात जेव्हा कर्मकांडांना मूळ तत्त्वज्ञानापेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झाले , तेव्हा त्याचे मूल्य आणि लोकांमध्ये लोकप्रियता कमी होऊ लागली. 

आदि शंकराचार्य: अद्वैत तत्वज्ञानाचे पुनरुज्जीवन करणारे गुरु

७ व्या शतकात, आदि शंकराचार्यांची त्यांचे गुरू गोविंद भगवद् पादा यांची नर्मदा नदीच्या काठावर भेट झाली,  जे स्थान आजच्या मध्य प्रदेशात येते. गुरू गोविंदांनी आदि शंकराचार्यांना विचारले, ‘तुम्ही कोण आहात?’ प्रत्युत्तरात आदि शंकराचार्यांनी निर्वाण शटकम रचले ज्याचे प्रारंभी कडवे  खालीलप्रमाणे आहे.

मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं

न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।

न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः

चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥१॥

मी मन नाही, बुद्धी नाही, अहंकार पण नाही 

मी ऐकण्याचे अवयव (कान) किंवा चाखण्याचे (जीभ), वास (नाक) किंवा पाहणे (डोळे) नाही.

ना मी आकाश, ना पृथ्वी, ना अग्नी ना वायू,

मी शिव आहे, परम शुभ असे चैतन्य-आनंद.

मी (शिव) शुभरूप आहे. 

गुरु गोविंद आपल्या शिष्यावर प्रसन्न झाले. त्यांनी त्याला शिष्यत्वा दीक्षा दिली. कालांतराने, गुरु गोविंदांनी आदि शंकराचार्यांना सनातन धर्माची पुनर्रचना करण्यास मदत करणारी कार्ये सोपवली. नामशेष होत चाललेल्या अद्वैत शास्त्रांचे शंकराचार्यांनी पुनरुज्जीवन केले. उपनिषदांचे विस्मरण होत गेलेले ज्ञान त्यांनी सोप्या पद्धतीने जनतेसमोर आणले. त्यांनी भारतीय उपखंडाच्या उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम दिशांना स्थापन केलेल्या चार ज्योति्मठांची स्थापना केली. 

आदि शंकराचार्यांच्या शिष्यांनी आणि नंतरच्या गुरूंनी अद्वैत तत्त्वज्ञानाचे ज्ञान टिकवून ठेवण्यास मदत केली आहे. त्यांचे खरोखर आभार, आपण सर्व एक आहोत हे अनुभवण्याची संधी आपल्याला अजूनही आहे.

स्वामी हरी हरा यांनी दिलेल्या माहितीवर आधारित

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *