लहान मुले आपल्याला मार्ग दाखवतात

आळशीपणावर मात कशी करावी? हा प्रश्न आपण स्वतःला अनेक वेळा विचारत असतो. आळस ही एक घटना आहे ज्याचा आपल्या सर्वांवर परिणाम होतो. कित्येकदा आपला स्वतःचा त्याच्याबरोबर सतत झगडा सुरु असतो, परंतु आपल्यापैकी अनेक जणांसाठी तो एक परिचित सोबती आहे ज्याची आपल्याला सवय झाली आहे.

तुम्हाला माहिती आहे का की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये आळसासाठी राष्ट्रीय आळस दिवस आहे?

तर आळशीपणा काय आहे? 

काहीही करायची इच्छा नसणे किंवा कामे करणे पुढे ढकलणे या भावनेशी आपण सर्व परिचित आहोत. विशेषतः व्यस्त किंवा तणावपूर्ण दिवसानंतर असे वाटू शकते. आपल्या सर्वांना काही ‘निवांत’ क्षण आणि विश्रांतीची गरज वाटणे ठीक आहे. पण ते क्षण जरा अधिक लांबले आणि असे वारंवार होऊ लागले की काय होते?

गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, “नेहमी आरामदायक राहण्याच्या इच्छेने तुम्ही आळशी बनता. तुम्ही रोज ठरवता, ‘हो, मी सकाळी ६ वाजता उठून प्राणायाम करणार आहे’ आणि सकाळी तुम्ही म्हणता, ‘अरे खूप थंडी आहे, उद्या किंवा आज रात्री करेन.’

जेव्हा तुम्हाला काहीही करण्याची इच्छा नसेल किंवा तुम्हाला माहिती आहे की जी कार्ये करणे तुम्हाला गरजेचे आहे तरीही तुम्ही ती पुढे ढकलता, तेव्हा काय होते? तुम्ही आळशीपणाच्या दुष्टचक्रात अडकले असण्याची शक्यता आहे. कामाची निर्धारित कालमर्यादा चुकवणे, नातेसंबंधात तणाव निर्माण होणे आणि आरोग्य खालावणे असे आळशीपणाचे अनेक गंभीर दुष्परिणाम आहेत.

आळशीपणाची कारणे काय आहेत? 

प्रेरणा नसणे, अपयशाची भीती, नैराश्य, संपूर्ण थकवा, झोप न लागणे आणि तंत्रज्ञान किंवा सोशल मीडियाचे व्यसन यासारख्या विविध कारणांमुळे आळस होऊ शकतो. समस्येचे निराकरण करण्यासाठी मूळ कारण ओळखणे आवश्यक आहे.

आळसावर मात कशी करावी?

आळशीपणावर मात करण्यासाठी येथे सात सूचना आहेत.

१. गुरुदेवांची तीन रहस्ये

गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, “आळसातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे: लोभ, प्रेम किंवा भीती. त्यातील एकाला घट्ट धरा.”

प्रेम

आळशीपणावर मात कशी करावी यासाठी प्रेम हे तुमचे सर्वोत्तम उत्तर असू शकते. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करायला आवडते तेव्हा तुम्ही ते काम हाती घेतात आणि वेळेत पूर्ण करता. किंवा जर तुमचे एखाद्यावर प्रेम असेल तर तुम्ही आळस न करता त्या व्यक्तीशी निगडीत काम हाती घेता. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना वचन दिले की, “मी हे नक्की करणार आहे, तर तुमचा आळस नाहीसा होईल.”

आपण ज्याच्यावर खूप प्रेम करतो त्याला वचन देण्याची परंपरा आहे. तुम्ही त्यांना काहीतरी वचन देता आणि तुम्ही त्याचे पालन करता. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या भावाला वचन दिले आहे की तुम्ही त्याला किंवा तुमच्या भाचीला विमानतळावर घ्यायला याल. तुम्हाला सकाळी उठायला खूप आळशी वाटत असले तरी तुम्ही उठून विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागतच कराल, अगदी मध्यरात्री का होईना.

प्रेम तुम्हाला आळशीपणा आणि कामाची चालढकल दूर करण्यात मदत करू शकते.

भीती

आणि भीती देखील. उदाहरणार्थ, तुम्ही वेळेवर एखादी गोष्ट पूर्ण न केल्यास, तुम्हाची कानउघाडणी केली जाऊ शकते. जर तुम्हाला कोणी सांगितले की, “तुम्ही हे केले नाही तर तुम्ही संकटात पडाल”, तर आळस नाहीसा होतो. किंवा, जर तुम्ही आळशी असाल आणि कोणी तुम्हाला “अहो आग लागली आहे” असे सांगितले, तर आगीची भीती सर्व आळस दूर करू शकते. निकड आळस दूर करते.

लोभ

लोभ तुम्हाला प्रेरित करते का? उदाहरणार्थ, तुम्हाला एखादे कार्य अंतिम मुदतीत पूर्ण केल्याने तुम्हाला बक्षीस मिळेल. ही गोष्ट ते काम करण्यास प्रवृत्त करते का? आळशीपणावर मात करून एका ध्येयासाठी काम करण्यात लोभ हे प्रलोभन म्हणून काम करते.

अशा प्रकारे, प्रेम, लोभ आणि भीतीने तुम्ही आळशीपणावर मात करू शकता, परंतु प्रेम हाच अधिक पसंतीचा मार्ग आहे.

आळस दूर करण्याची रहस्ये | गुरुदेव श्री श्री रविशंकर

२. योग, ध्यान आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करा

योग, ध्यान आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम तुमची उर्जेची पातळी वाढवण्यासाठी खूप मदत करू शकतात आणि तुमच्या शरीराला आणि मनाला आवश्यक विश्रांती देखील देतात, तुमचा आळस दूर करतात.

संशोधनात असे दिसून आले आहे की सुदर्शन क्रिया तणाव कमी करू शकते, जे आळशीपणाचे एक प्रमुख कारण आहे.

“सुदर्शन क्रिया आणि ध्यानामुळे माझी विचार प्रक्रिया बदलली आहे. व्यक्तिशः मला हे समजले आहे की माझ्या सर्व आळशीपणाचे मूळ माझ्या विचारातच आहे. ध्यान आणि ज्ञानाने मला प्रवाहासोबत वाहात जाण्यापेक्षा कृतीशील करण्यास मदत केली आहे.” असे सुहासिनी भट्टाचार्य, वरिष्ठ सेल्सफोर्स सल्लागार, आयबीएम इंडिया यांचे म्हणणे आहे.

बॉम्बे कुल्फीच्या व्यवस्थापकीय भागीदार पूनम शाह सांगतात, “श्री श्री योग लेव्हल २ चा सराव केल्यानंतर मला खूप उत्साही वाटते कारण मी कोणत्याही अलार्मशिवाय लवकर आणि वेळेवर उठायला सुरुवात केली आहे. याव्यतिरिक्त, माझ्या सहनशक्तीची पातळी वाढली आहे, कारण मी आता दिवसभरात अधिक कार्ये पूर्ण करण्यास सक्षम आहे, माझ्या आळशीपणाच्या प्रवृत्तीवर मात करत आहे.”

३. “मी आळशी आहे” हे लेबल काढा

तुम्ही अनावधानाने तुमच्या ‘लेबल’ चे समर्थन करू शकता. आळशीपणापासून मुक्त होण्याच्या या मार्गावर, कोणतेही स्वतःला लेबल लावणे टाळा आणि कोणताही विश्वास टाकून द्या. कोणता तुम्ही गोंधळून विचारता? तुमच्या मनात आधीपासूनच – ‘मी आळशी आहे’ – असा विश्वास आहे तो. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वतःला आळशी म्हणता तेव्हा स्वतःला थांबवा. स्वतःला आळशी असे लेबल लावण्याऐवजी आपली उत्पादकता वाढवण्याचे मार्ग विकसित करा.

गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, “आळशीपणाचे लेबल काढून टाकणे महत्त्वाचे आहे. आपण तसे न केल्यास, आपण त्यानुसार वागणे सुरू ठेवतो. आणि जेव्हा तुम्ही शेवटी लेबल टाकून टाकाल, तेव्हा तुम्हाला एका शक्यतेची झलक दिसेल. बदलाची शक्यता, जुने साचे मोडून नवीन सुधारित स्वरूप शोधण्याची संधी.”

४. आयुर्वेदिक उपचारांमध्ये स्वतःला झोकून द्या

आयुर्वेदानुसार, आळशीपणाची भावना शरीरात कफ वाढण्याशी संबंधित आहे. प्रत्येक मानवी शरीरातील तीन दोषांपैकी एक कफ हा पृथ्वी आणि जल या घटकांचा संयोग आहे.

आयुर्वेदिक मसाज आणि उपचार कफ घटक कमी करण्यास मदत करू शकतात. योग, व्यायाम, श्वासोच्छवासाचे तंत्र (प्राणायाम) आणि ध्यान हे घटक संतुलित करण्यास आणि आळस दूर करण्यास मदत करतात. मसाज किंवा कोणताही आयुर्वेदिक उपचार हे ताजेतवाने करणारे असतात. तुमचे जे मित्र तुम्हाला आळशीपणावर मात कशी करावी हे विचारत असतात, त्यांना सांगण्यासाठी ही एक अतिशय छान टिप असू शकते.

५. छोट्या प्रमाणात सुरुवात करा

स्वतःला एक छोटेसे वचन द्या आणि काही झाले तरी ते मोडू नका. आज फक्त २० मिनिटे चालण्याचे ठरवा आणि उद्या ते २२ मिनिटे वाढवू शकता. जे वचन स्वतःला द्यायचे आहे, ते द्या. आणि त्याला चिकटून राहा. तुम्ही असा मित्र शोधू शकता जो तुम्‍ही कार्य पूर्ण करेपर्यंत तुम्‍हाला प्रेरित करेल. किंवा ज्याच्याशी तुम्हाला मैत्रीपूर्ण स्पर्धा करायची आहे अशी एखादी व्यक्ती निवडा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुम्हाला कर्तृत्वाची जाणीव होईल आणि तुम्हाला पुढील कार्यांसाठी तयार करेल.

६. आपण जसे खातो तसे होतो

खूप प्रक्रिया केलेले अन्न तुम्ही खात आहात का? साखरेचे सेवन कदाचित प्रमाणाबाहेर असू शकेल. बर्‍याच अन्न घटकांमध्ये रसायने आणि परिरक्षक (प्रीझरव्हेटीव्ह) असतात जे तुमच्या अन्नामध्ये बेमालूमपणे मिसळलेले असू शकतात आणि त्यामुळे जर चैतन्यपूर्ण हिरो असाल, तर या पदार्थांमुळे तुमची ऊर्जा नष्ट पावून तुम्ही निष्क्रिय व्हाल. उदाहरणार्थ, टोमॅटो केचप, चिप्स, बिस्किटे, फळांचा पॅकबंद रस इ. 

अन्नावर लक्ष ठेवणे, तुमचे अन्न ताजे आणि भरपूर पोषक तत्वे असल्याची खात्री करणे आणि तुमच्या आतड्यांना आनंदी ठेवणे सुज्ञपणाचे आहे. उदाहरणार्थ कोशिंबीर, ताज्या भाज्या/फळांचा रस, सूप, भाजीपाला, तृणधान्ये इ.

नेहमी आळशी किंवा निरुत्साही वाटणे यांचा संबंध जीवनसत्त्वे बी आणि डी यांच्या कमतरतेसोबत देखील असू शकते.

तसेच, तुम्ही दररोज पुरेसे पाणी पीत आहात का याची खात्री करा. तुम्ही निर्जलीकरणाच्या सौम्य अवस्थेत फिरत असाल आणि हे लक्षात येत नसेल. निर्जलीकरणामुळे थकवा आणि आळस येणे शक्य आहे.

केवळ अन्न आणि पाणी याकडे लक्ष देऊन ऊर्जेच्या पातळीत होणारा बदल पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

सारांश

आळशीपणावर मात कशी करावी याबद्दल तुम्हाला तुमची उत्तरे सापडली आहेत का? आळशीपणावर मात करणे कठीण आहे का? आता नाही.

शेवटी निष्कर्ष हाच निघतो की, आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेऊन, आपली मानसिकता बदलून आणि छोट्या प्रमाणात सुरुवात करून आपल्याला आळशीपणावर मात करता येते. या व्यावहारिक सूचना अंमलात आणून, तुम्ही तुमची उर्जा पातळी वाढवू शकता, आत्मविश्वासाला उभारी देऊ शकता आणि आळशीपणा आणि सुस्तपणापासून मुक्त होऊन तुमचे ध्येय साध्य करू शकता.

गुरुदेव श्री श्री रविशंकर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फॅकल्टी सदस्य डॉ. प्रेमा शेषाद्री यांनी पुरवलेल्या माहितीवरून लिहिलेला आहे.

World Meditation Day

● Live with Gurudev Sri Sri Ravi Shankar

● Live at 8:00 pm IST on 21st December

Join Live Webcast!