हिवाळा हा ऋतु वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगला आणि सोपा ऋतु आहे हे तुम्हांला माहीत आहे कां ? पण प्रत्यक्षात हा ऋतु आपल्याला वजन कमी करण्यासाठी कोणतीही प्रेरणा न देता घरबैठे बनवतो. हिवाळ्यात आपल्या शरीरात काय होते आणि तुम्ही वजन कमी करून ह्या खास हिवाळी ऋतूत कसे चांगले बनवू शकता ह्याबद्दल आपण जाणून घेऊया.
वजन घटवण्यासाठी हिवाळा उत्कृष्ट का आहे ?
1. शरीराला आधार देणारे वातावरण.
समस्थिती (Homeostasis) च्या माध्यमातून आपले शरीर नैसर्गिकपणे वजन कमी करण्यास मदत करते. समस्थिती म्हणजे शरीराचे अंतर्गत पर्यावरण समतोल राखण्याची शरीराची वृत्ती होय. हिवाळ्यामध्ये शरीराचे तापमान योग्य ठेवण्यासाठी जास्त कार्य करावे लागते. त्यामुळे शरीराद्वारे जास्त उष्मांक (कॅलरी) खर्च केले जातात.
2. गुणवत्तापूर्ण झोप
सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे आपल्यातील बरेचजण हिवाळ्यात जास्त वेळ झोपतात. इतर ऋतुंमध्ये जर तुम्हांला ८ तासांची गाढ झोप मिळत नसेल, तर ही चांगली बाब आहे. झोपेच्या कमतरतेमुळे चयापचय क्रिया मंदावते आणि मेंदूमधून जास्त प्रमाणात कॉर्टिसॉल (cortisol) स्त्रवले जाते. ज्यामुळे वजन वाढते. म्हणूनच हिवाळ्यात गुणवत्तापूर्ण झोप मिळेल याकडे लक्ष द्या. परंतु जास्त झोपू नका कारण त्यामुळे वजन वाढते.
हिवाळ्यात वजन कमी करणे कठीण केव्हा वाटते?
बऱ्याच लोकांना हिवाळ्यात वजन कमी करणे कठीण का वाटते ? कारण वजन कमी करणारी देवता प्रत्येकवेळी तुम्हांला ऐकते जेव्हा तुम्ही म्हणत असता :
1. ‘अजून फक्त पाचच मिनिटे !!’
हिवाळ्यात तुम्ही घड्याळयाच्या गजराचे उत्कृष्ट प्रतिरोधक बनता का ? ह्या ऋतुत तुम्ही घरकोंबडे बनून त्याचा गुप्तपणे आनंद घेता कां ?
असे असेल तर तुम्हाला मोसमी आजार एस ए डी (SAD- seasonal Affective Disorder) चा त्रास होऊ शकतो. अतिझोप, गोड खाण्याची इच्छा, वजनात वाढ आणि थकवा ही त्याची लक्षणे आहेत. हिवाळ्यात असलेल्या सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे हा त्रास होतो. सूर्यप्रकाश आपली मनास्थिती आणि सर्वांगीण स्वास्थ्यावर मोठा प्रभाव पाडतो. सकाळी लवकर उठणे हा त्यासाठी उपाय आहे. जर लक्षणे जास्त काळ राहिली तर तुम्ही वैदयकीय सल्ला घेऊ शकता.
टीप : लवकर झोपा. त्यामुळे तुम्ही लवकर ऊठू शकाल. हिवाळ्यातल्या थंड रात्री, एखादे पुस्तक वाचण्यासाठी आणि झोपण्यापूर्वी औषधी चहा पिण्यासाठी उत्तम असतात. काही स्वादिष्ट आयुर्वेदिक चहाच्या पाककृती तुम्हांला खालील विडिओ मध्ये सापडतील. तसेच तुमच्या दिवसाची सुरुवात योग आणि ध्यानाने करा. त्यामुळे तुम्हांला संपूर्ण दिवस ऊर्जावान वाटत राहील.
2. ‘अजून एक चिप्सचे पाकिट मिळेल कां ?’
थंडीमध्ये चयापचयाचा वेग वाढल्यामुळे आपले शरीर जास्त उष्मांक जाळते. कृती आणि विश्रामात देखील उष्मांक जाळले जातात. त्यामुळे तुमची भूक आणि खाण्याची तल्लफ वाढते. आपण आरामदायी आणि नाश्त्याला खाण्यासारखे पदार्थ खातो.
टीप : तेलात तळलेले आणि खूप जास्त तेल असलेले पदार्थ खाण्याऐवजी भूक लागल्यावर घरगुती आरोग्यपूर्ण पदार्थ खा. निरअपराधीपणे खाण्याचा आनंद घेण्यासाठी खालील विडिओमधील पाककृतींचा अवलंब करा.
3. ‘पाणी प्यावेसे वाटत नाही.’
थंड वातावरणात शरीराची तहानेची संवेदना लक्षणीयरित्या कमी होते. शरीराचे निर्जलीकरण होत असेल तरीही ४० % पर्यंत संवेदना कमी होते. पाण्याचे प्रमाण व्यवस्थित असल्याबद्दल नेहमी शरीराला मूर्ख बनवले जाते. निर्जलीकरण सुरु राहिल्याने शरीरातील उती (Tissue) कोरड्या पडण्यास सुरुवात होते. मेंदूकडून आलेले तहानेचे संकेत भुकेचे समजून जास्त अन्न खाण्यास तुम्हांला भाग पाडले जाते.
टीप : हिवाळ्यात दररोज ८ ते १० कप पाणी प्यावे. पाण्यामुळे शरीरातील मेदाचे विभाजन होण्यास तसेच उष्मांक जाळण्यास मदत मिळते. शक्य झाल्यास गरम पाणी प्या. त्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. आयुर्वेदामध्ये गरम पाण्याला अमृत म्हटले आहे.
4. ‘कामाच्या व्यापात सूर्यस्नानासाठी वेळच नाही.’
तुम्हाला माहिती आहे का सूर्यस्नान तुम्हाला योग्य वजन नियंत्रित करायला मदत करते? ड जीवनसत्वाच्या अभावामुळे वजन वाढते आणि घटवण्यास त्रासदायक ठरते.
टीप : इन्स्टाग्राम सोडा; कार्यालय आणि कामाच्या मधल्या सुट्टीमध्ये हिवाळ्यातील उन्हात फेरफटका मारा. तुम्हाला सूर्यस्नान करण्यासाठी साजेश्या वेळा निश्चित करा. दररोज किमान ३० मिनिटे सूर्यस्नान घ्या.
5. `वजन कमी करण्यासाठीचे आहार नियंत्रण कंटाळवाणे वाटते.’
प्रत्येक व्यक्ती वेगळा असल्याने त्याचे वजन कमी करण्याचे आहार नियम वेगळे असतात. तुम्हांला मोठ्या आहार योजना पाळायच्या नसतील तर काही टिपा आहेत.
- मोसमी फळे खा : हिवाळ्यात मोसमी फळे खाल्ल्यामुळे चयापचयाचा वेग वाढतो तसेच शरीराला ताकद मिळते.
- स्वादिष्ट अन्न खा : आयुर्वेद चवीनुसार अन्नाचे सहा वर्गात वर्गीकरण करतो- गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट. सर्व चवींचा आहारात समावेश केल्यामुळे शरीरातील मूलद्रव्यांचा समतोल होऊन वजन वाढण्यास अटकाव होतो. जास्त गोड आणि खारट पदार्थामुळे वजन वाढते.
- औषधींच्या शक्तीचा वापर करा : हळद, आले, अश्वगंधा, गुग्गुळ आणि त्रिफळा सारख्या औषधींचा आहारात समावेश करा. दररोज त्यांचा जेवणात उपयोग केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
6. ‘योगाभ्यास आणि ध्यानामुळे वजन कमी होत नाही.’
हिवाळ्यात वजन कमी करण्याच्या प्रवासात योगाभ्यास आणि ध्यान मुख्य भूमिका बजावू शकतात. त्याच्यामुळे एस ए डी (SAD – Seasonal Affective Disorder) वर मात करणे, चांगली झोप लागणे आणि खाण्याच्या चांगल्या सवयी लावून घेण्यास मदत होते. खरेतर अशी अनेक विशिष्ट योगासने आहेत ,ज्यामुळे वजन कमी होते.
सदर लेख ईला पुळेकर यांच्या मदतीने लिहिला आहे. त्या निरोगी जीवन प्रशिक्षक (Wellness coach), सी एस टी व्यवसायी (Cranio-sacral Therapy) , मेरु आणि मर्म चिकित्सक, श्री श्री योग आणि आनंद अनुभूती शिबीर (हॅपिनेस कोर्स ) प्रशिक्षक आहेत.