मी केव्हा झोपावे ?
झोप हा नैसर्गिक धर्म आहे. शरीराचा स्वतःचा असा धर्म आहे. जर शरीराला झोपायचे असेल तर तुम्ही त्याला विश्रांती द्यायला हवी. परंतु जेव्हा शरीराला झोपायचे असते तेव्हा आपण काय करतो? आपण एखादा मनोरंजक चित्रपट पहाण्यासाठी दूरदर्शन चालू करतो. आपण आपल्या शरीराच्या विरोधात जातो. शरीराच्या स्वतःच्या अशा काही मागण्या असतात. आपण शरीराकडे लक्ष द्यायला हवे.
मी किती झोप घ्यावी ?
ऊर्जेचे चार स्रोत :
-
अन्न : प्राचीन भारतामध्ये जर एखादी व्यक्ती चमत्कारिक वागत असेल तर ‘तू असे का वागतो आहेस?’ असे विचारण्याऐवजी लोक विचारत की ‘याला काय खाऊ घातले आहे?’ किंवा ‘तू काय खाल्ले आहेस?’ काहीअंशी हे खरे आहे! कारण अन्न हा ऊर्जेचा पहिला स्त्रोत आहे.
-
झोप: कोणत्याही शहाण्या व्यक्तीला तुम्ही दोन दिवस झोपू दिले नाही तर ती विचित्र वागायला लागेल.त्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये आमूलाग्र बदल दिसतील. म्हणूनच झोप किंवा उचित विश्रांती महत्त्वाची आहे.
-
श्वास : श्वास हा ऊर्जेचा तिसरा स्त्रोत आहे. काही मिनिटे योग व प्राणायाम केल्यामुळे शरीरात व मनात ऊर्जा वाढते व चैतन्य निर्माण होते.
-
आनंदी मन : सुखी मन हे जास्त शांत आणि अविचल असते. काही मिनिटे ध्यान केल्याने मनाला आराम मिळतो, मन आनंदी होते.
तुम्हाला किमान सहा ते आठ तासाच्या चांगल्या झोपेची गरज आहे. जेव्हा तुम्हाला एकाद्या गोष्टीचे वेड असेल किंवा आयुष्यात एकादे ध्येय असेल तेव्हा बाकी कोणत्याही गोष्टीला महत्व उरत नाही. तुम्हाला माहीत असते की तुम्हाला आतून ऊर्जा मिळणार आहे. पण तरीसुद्धा तुम्ही झोपेसाठी, विश्रांतीसाठी वेळ काढा. झोप अतिशय महत्वाची आहे.
झोपेची तयारी कशी करावी ?
नेहमी आपण झोपायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याकडे नसलेल्या गोष्टी किंवा ज्यामध्ये आपल्याला अपयश आले आहे अशा बाबींचा विचार करतो. झोप लागण्यापूर्वी जर तुम्ही फक्त तुमचे अपयश, निराशा किंवा कोण तुम्हाला काय बोलले हेच आठवत राहिलात तर ह्या सर्व गोष्टी तुमच्या सुप्त मनात प्रवेश करतात. आपण झोपण्यापूर्वी ह्या विचारांची (मनात) पेरणी करतो आणि झोपतो. मग सकाळी उठल्यानंतर तुम्हाला थकवा येतो, शक्ती नसल्यासारखे, नकारात्मक आणि वैफल्यग्रस्त वाटते.
रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमचे लक्ष आपले कर्तृत्व, यश किंवा आयुष्यातल्या सकारात्मक बाजूंवर ठेवा. चांगले विचार आणि चांगल्या इच्छांचा विचार करा. आयुष्यातील चांगल्या क्षणांचा विचार करा आणि झोपी जा. किंवा प्रार्थना करा. प्रार्थना म्हणजे ‘मी माझ्या आयुष्याबद्दल धन्यभागी व कृतज्ञ आहे’ असा विचार करणे!
अशाप्रकारचे विचार करा.ते विचार वातावरणात सोडा. त्यानंतर तुम्ही विश्राम करा आणि झोपी जा. जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुम्हाला खूप प्रसन्न आणि ताजेतवाने वाटेल. जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी सकारात्मक विचारांची पेरणी करता तेव्हा उठल्यानंतर तुम्हाला खूप ताजेतवाने वाटते.
ही सवय आत्मसात करण्यासाठी सजगपणे प्रयत्न करा. यशस्वी आयुष्याकडे तुम्ही अशाप्रकारे वाटचाल करु शकता. “सकारात्मक बीजांची वातावरणात पेरणी करणे” हे खरे गुपित आहे !आणि हे तुम्ही कसे करु शकता ? प्राणायाम आणि ध्यानाने !! त्यामुळे हे सर्व साध्य होते.
पटकन झोप लागण्यासाठी 10 सोप्या युक्त्या
-
‘पटकन’ सोडून द्या ! : मला ‘पटकन’ झोप लागायला हवी, ही चिंता हाच सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळे आपण जागत राहतो. हे जे काही “पटकन” आहे, ते सोडून द्या ! नंतरच तुम्हाला झोप लागेल.
-
उशीरा जेवू नका : दुसरे कारण म्हणजे उशीरा जेवणे किंवा चयापचयाचा दर जास्त असणे. योग्य प्रमाणात अन्न घेणे ठीक असते. खूप जास्तही नको किंवा खूप कमीही नको.
-
प्राणायाम करा : काही श्वसनाचे प्रकार आणि प्राणायाम यांचा नक्की उपयोग होतो. तसेच दीर्घ श्वसन फायदेशीर ठरते. किंवा काही योगप्रकार करण्याने देखील उपयोग होतो.
-
ध्यान : अर्थातच ध्यानाचा निश्चित उपयोग होतो. अधिक ध्यान करा. अनेकदा ध्यान करा. (ध्यान कसे करावे हे शिकण्यासाठी येथे क्लिक करा)
-
भूतकाळ आणि भविष्यकाळ सोडून द्या : काळजी करणे सोडून द्या, तुम्हांला उद्याची चिंता आणि भूतकाळातील घटनांचा त्रास होत असतो. भूतकाळातील घटनांच्या आठवणी किंवा भविष्याची चिंता ही झोप न येण्याची मूळ कारणे आहेत.
-
योग निद्रा : जर तुम्हांला झोप लागत नसेल तर योग निद्रा करा. आडवे व्हा आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ऍप वरील किंवा गुरुदेवांच्या (युट्यूब) चॅनेल वरील योग निद्रा चालू करा. तुमचे लक्ष शरीराच्या विविध भागांकडे घेऊन जा. यामुळे तुम्हाला झोप लागण्यास मदत होईल.
-
सुगम संगीत ऐका : शब्द नसलेले संगीत किंवा फक्त वाद्य संगीत लावा, त्याचा उपयोग होईल. तुमच्या संपूर्ण शरीरातून संगीत वाहत असल्याचा अनुभव घ्या. फक्त आडवे पडून तुम्हाला फारसे परिचित नसलेले वाद्यसंगीत ऐका. जर तुम्ही परिचित संगीत ऐकले तर तुम्ही त्यासोबत गुणगुणायला किंवा गायला सुरुवात कराल. पण तुम्ही अपरिचित सुगम संगीत ऐकले तर त्याने सुद्धा तुम्हाला झोप लागेल.
-
दूध प्या : झोपण्यापूर्वी कोमट किंवा थंड दूध पिण्याने देखील अनेकांना फायदा होतो.
-
इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा : झोपण्यापूर्वी किमान एक तास तुमची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा. झोपण्यापूर्वी एक तास आणि सकाळी उठल्यानंतर एक तास फोनबंदी लागू करा.
-
परिश्रम करा : पूर्ण दिवस काम करून थकलेल्या व्यक्तीला डास असले तरी झोप येते. डासांचं सोडा, जरी उंदीर चावला तरी झोपमोड होत नाही!! पण जर तुम्ही दिवसा कष्ट न करता वेळ वाया घालवला तर तुमच्याकडे कितीही मऊ, आरामदायक बिछाना असला तरी तुम्हाला झोप लागत नाही. तुम्ही कूस बदलत राहता. एका डासाच्या गुणगुणण्यामुळे तुम्ही जागत राहता. तुम्हाला झोप न येण्यासाठी डास कारणीभूत नाही! तुमचा आळशीपणा तुम्हाला झोपू देत नाही. जर तुम्ही सकाळपासून बिछान्यात लोळत असाल, तर तुम्हाला रात्री झोप कशी येणार? जे लोक जास्त झोपतात ते झोपेचा आनंद घेऊ शकत नाहीत. परंतु जे खूप कष्ट करतात, शेतात काम करुन थकतात, ते जेव्हा झोपी जातात तेव्हा त्यांना झोपेचे समाधान मिळते.
स्वतःला विश्राम देण्यासाठी आणि चांगल्या झोपेसाठी प्रभावशाली तंत्रे शिकून घ्या ! आर्ट ऑफ लिव्हिंगच्या “The Art of Living Workshop to Get Rid of Anxiety & Sleep Disorder या कार्यक्रमात सहभागी व्हा.”
बोनस : निद्रा आणि इच्छापूर्ती
समजा रात्री तुमच्या मनात एखादी इच्छा आली आहे. तुम्हाला चहा किंवा पाणी किंवा रस प्यायचा आहे. आणि तुम्ही ती इच्छा पूर्ण न करता झोपी गेलात. रात्री काय होते? एकतर तुम्ही स्वप्नात ती गोष्ट पित असता किंवा तुम्हाला शांत झोप लागत नाही.
चांगल्या झोपेसाठी तुम्ही काय करायला हवे? गोष्टी मानसिकदृष्ट्या सोडून द्या. जेव्हा तुम्ही “सोडून देता”, तेव्हा तुमची इच्छा पूर्ण होते. हेच खरे गुपित आहे.
जर तुम्ही इच्छा धरुन ठेवली तर ती पूर्ण होत नाही. तुम्ही काय करायला हवे? तुमच्याकडे इच्छा आहे. तुमच्या गुरुला किंवा उच्च शक्तीला ती देऊन टाका आणि विश्राम करा. जेव्हा तुम्ही “सोडून देता” तेव्हाच तुम्ही विश्राम करु शकता! तुम्ही तुमच्या मूळ स्वभावात येऊ शकता.