आपल्यापैकी बहुतेकांना एकतर सकाळी उठण्यासाठी किंवा आपल्या नियोजित कामाची आठवण करुन देण्यासाठी घड्याळाच्या गजराचा वापर करावा लागतो. अशी ध्वनी सूचना आपले काम वेळेत चालू ठेवण्यासाठी चांगली आहे असे आपल्याला वाटते पण यामुळे आपण सक्तीचे वेळापत्रक आखायला लागतो. मला असे म्हणायचे आहे की गजरावर असणारे अवलंबित्व दर्शविते की तुम्हाला दररोज रात्री चांगली झोप येत नाही! स्वतः पूर्ण दिवस कामाच्या ओझ्याखाली पिचून जाता, आणि निद्रानाश, तणाव आणि चिंता या गोष्टींना सामोरे जावे लागते. आपण निश्चितच अस्वस्थ होतो.
तुमचा दिवस सुरु करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतः नैसर्गिकरित्या कसे जागे व्हायचे हे जाणून घेणे. अर्थात तुम्ही लगेच ही प्रक्रिया सुरु करु शकत नाही कारण त्यासाठी जीवनशैलीत काही बदल आवश्यक आहेत. खाली दिलेल्या टिप्स झोपेची काही रहस्ये सांगतील आणि तुम्हाला गजराशिवाय जागे होण्यास मदत करतील.
गजराशिवाय जागे होण्यासाठीच्या १० अद्भुत टिप्स
निर्मितीक्षम कार्य करणे
जर तुम्ही तुमच्या पूर्वजांचे वेळापत्रक पहाल (जेव्हा घड्याळ/गजर नव्हते), तर त्यांचे जीवन किती शिस्तबद्ध होते हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सोयी सुविधा नव्हत्या तरी त्यांच्या शिस्तबद्ध वेळापत्रकांप्रती असलेल्या समर्पणा मुळेही त्यांचे जीवन सुकर झाले होते. ते नेहमी पहाट होण्याच्या खूप आधी उठायचे आणि सूर्यास्तानंतर झोपायला जायचे. तुम्ही दिवसभर काम करुन थकला असाल तर तुम्हाला चांगली झोप येईल, पण जर तुमचा दिवस आरामदायी गेला असेल, तर एवढी चांगली झोप लागत नाही. म्हणूनच, चांगली झोप होण्यासाठी तुमचे मन आणि शरीर थकणे आवश्यक आहे.
मन प्रसन्न राहिल्याने काम विनासायास होते. हे उत्पादकतेचे कौशल्य आहे !
~ गुरुदेव श्री श्री रवि शंकर
किती तास झोप झाली ते पहा
प्रत्येकाचे शरीर वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करत असल्याने हा चर्चेचा मुद्दा असू शकतो, तरीही तुमच्या झोपण्याच्या तासांची गणना करणे चांगले आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की रात्री किमान ७ तास झोपले पाहिजे, परंतु प्रत्येक व्यक्तीसाठी हा काळ भिन्न असू शकतो. हे प्रामुख्याने झोपेच्या टप्प्यांवर अवलंबून असते, ज्यामध्ये REM (रॅपिड आय मूव्हमेंट) स्टेजचा समावेश असतो. काहींना फक्त ४ तासांच्या शांत झोपेने ताजेतवाने आणि उत्साही वाटते, तर काहींना असे बरे वाटायला ९ तास लागू शकतात. म्हणूनच, तुमच्या शरीराला अनुकूल असा कालावधी जाणून घेणे आणि वेळापत्रकाचे पालन करणे महत्त्वाचे आहे. म्हणजे तुम्हाला यापुढे उठण्यासाठी गजर लावावा लागणार नाही.
व्यायाम करण्याचा आनंद घ्या
व्यायाम केल्यामुळे शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्ताभिसरण होण्यास मदत होते. तुम्ही शरीराला ताण देता किंवा धावता, स्नायूंना व्यायाम होतो आणि तुम्हाला थकवा येतो. हे उत्तेजन तुमची झोप चांगली होण्यास मदत करते, घामाच्या ग्रंथी चांगले कार्य करतात, मन व्यस्त राहते आणि तणाव आणि चिंतांपासून मुक्त होते. म्हणून, तुमच्या आवडीचा खेळ निवडा आणि तो नियमितपणे खेळत राहा. जेव्हा आपण व्यायामांचा आनंद घेण्यास प्रारंभ करतो, तेव्हा आपण तो नियमितपणे करण्यासाठी अधीर होतो. गजर न लावता उठण्यासाठी हा एक छान उपाय आहे.
मन व्यस्त ठेवा
दररोज काहीतरी सर्जनशील करण्यावर आपले लक्ष केंद्रित करा. नवीन अभिरुचीमुळे तुमच्या मेंदूच्या पेशी सक्रिय राहतील, आणि तुम्ही उठाल तेव्हा तुम्हाला काहीतरी भरीव कार्य करण्यामध्ये गुंतून रहावे असे वाटेल. जेव्हा तुमच्याकडे काही मनोवेधक गोष्ट करण्यासाठी असते, तेव्हा तुम्ही गजराशिवाय जागे होऊ शकता.
जीवनात गोंधळ आहे आणि जीवनाला शिस्त हवी आहे. आपण दोन्हीचाही सन्मान केला पाहिजे. गोंधळामुळे आनंद मिळतो आणि शिस्तीमुळे समाधान लाभते!
~ गुरुदेव श्री श्री रवि शंकर
चालू क्षणात रहा
ध्यान आणि दीर्घ श्वासाद्वारे चालू क्षणात राहण्याचा सराव करता येतो. याचा तुम्हाला क्लेशदायक काळात शांत होण्यासाठी उपयोग होतो आणि तुमच्या समस्यांवर आतून उपाय सापडणे सोपे होते. वर्तमान क्षणात राहण्याने तुम्ही तुमची प्रत्येक भावना, परिस्थिती आणि कृती या बद्दल जागरुक राहता. दिवसाची सुरुवात काही नाविन्यपूर्ण दृष्टीने करायची आहे, असे जेव्हा स्वतःला जाणीवपूर्वक सांगत रहाल तेव्हा तुम्ही गजराशिवाय उठू शकाल.
निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा
आपण जे काही करतो ते निसर्गातून निर्माण होते आणि म्हणून आपण निसर्गाच्या चक्रावर विश्वास ठेवला पाहिजे. निसर्गावर विश्वास ठेवल्याने तुम्हाला त्याच्याशी जवळीक वाटते. तुम्ही उठताच तुमचा दिवस सुरु करण्यास प्रवृत्त होता. जर तुम्ही हे आधी कधीच अनुभवले नसेल, तर तुम्ही दररोज किमान अर्धा तास निसर्गाच्या सान्निध्यात घालवायला सुरुवात केली पाहिजे आणि पानांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल, फुलणारी फुले, रातकिड्यांची किरकिर इत्यादी गोष्टी मन लावून पाहून निसर्गाची जादू अनुभवली पाहिजे.
नीटनेटका आहार घ्या
सध्याच्या काळात अन्नात भेसळ असणे ही खूप सामान्य बाब आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या पोटात काय टाकता याची सखोल तपासणी करा. जर तुम्ही आरोग्यास अपायकारक अन्न खाल्ले, जास्त उष्मांक व कमी पोषणमूल्ये असणारे अन्न (जंक फूड) घेतले तर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात आणि तुम्हाला नेहमी आळसटलेले वाटू शकते, दिवसा झोपही येऊ शकते. तर ताजी फळे, भाजीपाला आणि घरी शिजवलेले अन्न याची तुम्हाला पोषक तत्वे मिळण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. छान झोप झाल्यामुळे गजराशिवाय कसे जागे व्हावे याबद्दल आपल्याला काळजी करण्याची गरज रहात नाही!
![Clean Up Your Diet](https://www.artofliving.org/in-en/app/uploads/2024/04/clean-your-diet.jpg)
स्वतः आपल्या जीवनाची जबाबदारी घ्या
जेव्हा तुम्ही स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घेता आणि आपल्या जीवनासाठी स्वतःला जबाबदार धरता, तेव्हा तुम्ही तुमचे जीवन सर्वोत्तम मार्गाने जगण्यासाठी प्रेरित होता. स्वतःला चांगली प्रेरणा देणारे तुम्ही स्वतःच आहात! दुसरे कोणी नाही. व्यायाम करा, एकादे पुस्तक वाचा, थंड शॉवर घ्या, एकादे वाद्य वाजवा किंवा मित्राबरोबर वेळ घालवा आणि तुमचा दिवस तुम्हाला हवा तसा साजरा करा. अशा या उत्साहपूर्ण जीवन व्यतीत करण्याच्या ऊर्मीमुळे, तुम्हाला झोपेतून जागे करण्यासाठी गजराची कधीही गरज भासणार नाही.
जीवन हे नियती आणि इच्छा स्वातंत्र्य यांचा मिलाफ आहे. पाऊस पडणे हा नशिबाचा भाग आहे. तुम्ही भिजून ओले व्हायचे की नाही हे इच्छा स्वातंत्र्य आहे.
~ गुरुदेव श्री श्री रवि शंकर
झोपण्याच्या वेळेचे पालन करा
रात्री झोपेच्या आधीन होण्यापूर्वी तणावमुक्तीसाठी काही विशेष गोष्टी केल्या तर तुम्हाला शांत वाटेल आणि सकाळी उठताना तुम्हाला उत्साही वाटू शकते. सुसंगत वेळापत्रकाचे पालन करा, स्वत: ची काळजी घ्या, हलके जेवण घ्या, गरम पाण्याने आंघोळ करा, मनन करा किंवा शांत झोपण्यासाठी दिवे बंद करण्यापूर्वी एकादे पुस्तक वाचा. जेव्हा तुम्ही नियमितपणे वेळापत्रक पाळता, तेव्हा तुम्ही स्वतःला झोपण्याच्या वेळेची सवय करता, ज्यामुळे तुम्हाला पुरेशी विश्रांती मिळते आणि उठताना तुम्ही ताजेतवाने आणि उत्साही असता.
मंद प्रकाश ठेवा
अबाधित झोप घेण्यासाठी तुम्ही झोपेच्या वेळी दिवे मंद ठेवावे. झोपण्याच्या एक तास आधी तुमचे फोन आणि टॅब्लेट वापरणे थांबवणे ही एक चांगली सवय आहे, कारण या उपकरणांमधील किरणोत्सर्जना मुळे ((रेडिएशन्स) तुम्ही जागे राहता. तसेच, तुम्ही जागे होताच लगेच ही उपकरणे वापरणे टाळा. यामुळे तुमचा दिवसातील उत्साह संपुष्टात येऊ शकतो आणि ही उपकरणे बघण्यास केवळ काही मिनिटे लागतील असे वाटते परंतु यात अंथरुणावर तासंतास कसे जातात कळत नाही. जागे झाल्यानंतर पहिले काही तास उत्पादनक्षमतेने घालविल्यामुळे तुम्हाला भावनिक स्फूर्ती मिळू शकते आणि पुढचा दिवस चांगला जातो. गजराशिवाय जागे होण्यासाठी थोडी सवय करावी लागते. परंतु एकदा का तुम्हाला या प्रक्रियेची सवय झाली की तुम्हाला कधीही गजराची गरज भासणार नाही.
मूल्यमापन ही गुरुकिल्ली आहे
कृत्रिम गोष्टींवर अवलंबून राहण्याची सवय लावणाऱ्या या दिखाऊ जगात, बाह्य घटकांचा प्रभाव न पडता निसर्गाच्या लयीचे पालन करणे सोपे नाही. तथापि, येथे स्वतःचे मूल्यमापन ही मुख्य गोष्ट आहे, जी तुम्हाला प्रत्येक क्षणी सुधारण्यास मदत करते. गजराशिवाय जागे कसे व्हायचे हा प्रश्न नाही; मुख्य चिंता ही आहे की बाह्य वातावरणाच्या प्रभावाखाली न येता नैसर्गिकरित्या काहीही कसे करावे याची! आपण कोणत्या प्रभावाखाली असावे हे तुम्हीच ठरवायचे आहे, कारण तुम्ही ज्याची निवड करता त्यावरुनच तुमचे जीवन कसे असेल हे ठरणार असते!