पाठीच्या दुखण्या सोबत जगणे सोपे नाही. आपण सहजपणे बसू शकत नाही,उभे राहू शकत नाही, की चालू शकत नाही. सामाजिक कार्यक्रमात तुम्ही अचानकपणे जाण्याचे टाळू लागता आणि शेवटच्या क्षणाला एखादे काम आल्यास त्याबाबत कुरकुर करता. पाठीचे दुखणे म्हणजे एक डोकेदुखीच असते. तरीही आपल्यापैकी बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.
पाठदुखी म्हणजे शरीर आपल्याला सूचना देते कुठेतरी काही बिघाड आहे आणि तो नीट करावा लागेल. जर तुम्ही आता तुमच्या पाठदुखी कडे लक्ष दिले तर पुढे येणारा आणि तुम्हाला माहित नसलेला एखादा असाध्य आजार टाळू शकता किंवा त्याचा परिणाम कमी करू शकता.तुमच्या पाठदुखी मागे काय काय करणे असू शकतात ते पाहूया.
पाठदुखी मागची सहा छुपी कारणे
तीव्र बद्धकोष्ठता
तुमच्या आतड्यांमध्ये साठलेला मल तुमच्या पाठदुखीचे कारण असू शकते. तुम्हाला संडासला त्रास होत असेल, कडक संडास होत असेल किंवा खडे होत असतील तर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. तीव्र बद्धकोष्ठता, मूळव्याध, भगांदर/फिश्र्चुला, मानसिक स्थिती खालावणे ही कारणे तुमच्या पाठदुखी मागे असतील तर त्यासाठी काही घरगुती उपाय करा किंवा निवारण करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्या.
मूतखडा
सहसा गंभीर पाठीचे दुखणे बरगड्यांच्या खाली असेल तर ते मुतखडा तयार होत असल्याचे लक्षण आहे. लघवी करताना वेदना होणे, अडथळा असणे किंवा मूत्राशयाच्या संसर्ग ही कारणे पण मुतखडयासोबत असू शकतात. पुरेसे पाणी न पिणे हे मुतखड्याचे कारण असू शकते. तज्ञ डॉक्टर कडे जाऊन मूतखडा आहे की नाही याची खात्री करून घ्या.
ऑस्टिओपरोसिस
ऑस्टिओपरोसिस मध्ये हाडे ठिसूळ व अशक्त होतात. अशा लोकांना अचानक गंभीर पाठदुखीचा अनुभव येऊ शकतो. जेव्हा ते उभे असतात तेव्हा जास्तच पाठदुखी संभवते. महिलांमध्ये रजोनिवृत्ती नंतर ह्या परिस्थितीत जास्त वाढ होऊ शकते.
स्पॉन्डिलायटिस
स्पाॅन्डिलायसिस हा दाहक संधिवाताचा प्रकार आहे. त्याचा आपल्या पाठीच्या कण्यावर आणि मोठ्या सांध्यावर परिणाम होतो. पाठीच्या खालच्या भागात वेदना आणि ताठरपणा असणे हे याचे लक्षण आहे. हा अनुवांशिक आजार असू शकतो. असे पाठीचे दुखणे नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य काळजी आणि वैद्याचा सल्ला आवश्यक आहे.
मणक्याची झीज
पाठीचा कणा ३३ वेगळ्या मणक्यांनी बनलेला असतो. आणि ही लहान हाडे एकमेकांना जोडलेले असतात.ह्या मणक्यातील हाडांची झीज झाली तरी सुध्दा पाठदुखी उद्भवू शकते. त्यामुळे हातापायामध्ये बधिरपणा येतो व मणक्यापासून सुरू होणाऱ्या वेदना हातापायात पसरतात. चुकीची आसन स्थिती, पाठीचे कमकुवत सांधे आणि योग्य हायड्रेशन (शरीरातील पाण्याचे प्रमाण) नसणे ही काही कारणे मणक्याला झीज होण्यासाठी असू शकतात.
पाठीचे अशक्त स्नायू
बैठ्या जीवनशैलीमुळे पाठीचे स्नायू कमकुवत बनतात व पाठदुखी तसेच इजा होण्याची शक्यता वाढते.पाठीचे कमकुवत स्नायू योगासने करून आणि काही ठराविक कालवधीनंतर विश्राम घेतल्याने चांगले होऊ शकतात.
पाठीच्या जुनाट दुखण्याने होणारे परिणाम
काही गंभीर नसले तरीही जुनाट पाठदुखी वर योग्य उपचार केले नाही तर त्यातून गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. झोप, मानसिक स्वास्थ्य व चयापचय संबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. कार्यक्षमता कमी होते. एकंदर जीवनाची गुणवत्ता खालावते. काही तथ्ये:
- ज्या लोकांना पाठदुखी आहे , त्यांचा नैराश्यात जाण्याचा धोका तिपटीने वाढतो.
- जे लोक नैराश्यात आहेत त्यातल्या ६० % लोकांना खालची पाठदुखी असू शकते.
- बसण्याच्या अयोग्य पद्धतीने पाठदुखी होते आणि पचनासंबधीचे अवयव संकुचित होऊन दाबली जातात.
- पाठदुखी असणाऱ्या दोन व्यक्ती पैकी एकाला निद्रानाश असू शकतो.
जास्त उशीर होण्याआधी पाठदुखी वर योग्य उपचार करणे हयात सुज्ञपणा आहे. एखाद्या गंभीर आजाराचे निदान होण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. पाठदुखी साठी काही विशिष्ट योगासने शिकून घ्या. चांगल्या सवयी आत्मसात करा. जेणेकरून पुढच्या कालावधी साठी त्याचा चांगला फायदा होईल.
पाठीच्या अशक्त स्नायूमुळे पाठीला इजा होण्याची शक्यता वाढते का?
हो,जेव्हा तुमचे पाठीचे स्नायू अशक्त असतात तेव्हा तुमची पाठ जास्त नाजूक बनते. वजन उचलणे,खाली वाकणे याने पाठीला इजा होऊ शकते.
पाठीचा ताण आणि उसण भरणे यात काय फरक आहे?
पाठीचा ताण म्हणजे पाठीच्या स्नायूंना इजा होणे आणि उसण म्हणजे लीगामेंटस- हाडांना जोडणाऱ्या उती, ताणले जातात किंवा फाटतात.
पाठीचे स्नायू अशक्त कशामुळे होतात?
बैठी जीवनशैली आणि बसण्याची चुकीची अवस्था ह्या मुख्य कारणांनी पाठीचे स्नायू अशक्त किंवा कमकुवत होतात.
हा लेख श्री श्री योगा फॅकल्टी, वेणु गोपाल यांच्या मतांवर आधारित
लेखन : वंदिता कोठारी