आपण मन:शांती, आनंद, आरोग्य, अधिक शक्ती, सुधारित नातेसंबंध, आणि परिपूर्ण जीवनाच्या शोधात आहात का? तुम्हाला तणाव मुक्त आणि चिंतामुक्त व्हायचे आहे का?
ध्यान केल्याने तुम्हाला हे सर्व फायदे आणि बरंच काही मिळू शकते. तुमच्या शरीरासाठी, मनासाठी आणि आत्म्यासाठी ध्यानाचे असंख्य फायदे आहेत. ध्यानामुळे मिळणारा आराम हा गाढ झोपेमुळे मिळणाऱ्या आरामापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आराम जितका जास्त गहन, तुमचे काम तितकेच जास्त गतिशील.
ध्यानामुळे तणावमुक्ती
ध्यानाचे दोन महत्वपूर्ण फायदे आहेत :
- तणावाला आपल्या शरीर-मन प्रणालीमध्ये येण्यापासून प्रतिरोध आणि
- आपल्या शरीर-मन प्रणालीमध्ये असलेला तणाव बाहेर काढून टाकायला मदत
हे दोन्ही फायदे आपल्याला एकाच वेळी मिळतात व ते आपल्याला टवटवीत आणि आनंदी ठेवतात.
ध्यानाचे शारीरिक फायदे
ध्यानामुळे आपल्या शरीर प्रणालीमध्ये बदल घडतात आणि शरीराच्या प्रत्येक कणात अधिक प्राणशक्ती भरली जाते. ह्याचाच परिणाम म्हणजे आपल्याला अधिक आनंद व शांती मिळते आणि उत्साह वाढतो.
ध्यानामुळे शारीरक स्तरावर होणारे फायदे
- उच्च रक्तदाब कमी होतो.
- रक्तातील लॅक्टिक अॅसिडची मात्रा कमी होते, ज्यामुळे उगीचच भीती वाटणे कमी होते.
- मानसिक तणावाशी संबंधित तक्रारी (जसे डोकेदुखी, व्रण, निद्रानाश, स्नायू व सांधे संबंधित तक्रारी) कमी होतात.
- सेरोटोनीन निर्मिती वाढते, ज्यामुळे आपला मूड आणि वर्तन सुधारण्यास सहाय्य होते.
- रोगप्रतिकार शक्ती वाढते.
- एक आंतरिक शक्ती स्त्रोत मिळतो.
ध्यानामुळे मानसिक स्तरावर होणारे फायदे
ध्यानामुळे मेंदू लहरी “अल्फा स्थितीत” येतात ज्यामुळे रोग-निवारणाची नैसर्गिक प्रक्रिया सुलभपणे होते. मन ताजे, मृदू आणि सुंदर होते. नियमित ध्यान केल्याने :
- अनामिक भीती कमी होते.
- भावनात्मक स्थिरता वाढते.
- सृजनात्मकता वाढते.
- आनंद वाढतो.
- अंतर्ज्ञान (तात्कालिक ज्ञान) विकसित होते.
- परिस्थितीचे स्पष्टपणे आकलन करण्याची क्षमता वाढते आणि मानसिक शांती मिळते.
- समस्या छोट्या वाटू लागतात.
- एकाग्रता वाढल्यामुळे मन कुशाग्र होते आणि विश्रांतीमुळे मनाचा विस्तार होतो.
- कुशाग्र मनाचा विस्तार न झाल्यास तणाव, राग आणि निराशा वाढते.
- विस्तारित चेतना जर कुशाग्र नसेल तर क्रियाशीलता अथवा प्रगती होणे शक्य नाही.
- तीक्ष्ण मन आणि विस्तारित चेतना यांचा समतोल असेल तर परिपूर्णता येण्यास मदत होते.
आपल्यातील वृत्तींमुळेच आपण आनंदी किंवा दु:खी होतो हे ध्यान केल्याने लक्षात येते.
ध्यानाचे इतर फायदे
भावनिक स्थिरता आणि सुसंवाद: ध्यान केल्याने आंतरिक शुद्धी होते आणि मानसिक स्तरावर पोषण मिळते. ज्या ज्या वेळी आपल्या भावना उफाळून येतात, आपल्याला मानसिक अस्थिरता वाटते, भावनांचा अतिरेक होतो, त्या त्या वेळी मन शांत करण्यास ध्यान मदत करते.
समस्त सृष्टीशी सुसंगती: जेव्हा तुम्ही ध्यान करता त्यावेळी तुमचे मन आकाशाची विशालता, शांतता आणि आनंदाने भरून जाते आणि ह्याच गोष्टी तुम्ही वातावरणात पसरवता व सृष्टीमध्ये सुसंगती निर्माण करता.
आत्मविकास: रोजच्या आयुष्यात जर आपण ध्यानाला जागा दिली तर आत्म्याचा विकास होते, व हळूहळू विकसित आणि शुद्ध चेतना म्हणजे काय याचा अनुभव होतो.
जेव्हा आत्मा विकसीत आणि विशाल होते त्यावेळी आयुष्यातील क्षोभ अगदी नगण्य होऊन जातो. राग आणि निराशा ह्या भावना क्षणिक होऊन जातात. तुम्ही वर्तमानात जगायला सुरुवात करता आणि भूतकाळातल्या गोष्टींना "झालं ते गेलं" च्या नजरेने पाहता.
वैयक्तिक परिवर्तन: ध्यान हे तुमच्यात खरेखुरे वैयक्तिक परिवर्तन आणू शकते. स्वत: विषयी ज्यावेळी तुम्हाला अधिक समजायला लागते त्यावेळी स्वाभाविकपणे आयुष्याचे रहस्य, विश्वाचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. आणि मग "आयुष्याचा अर्थ काय? आयुष्याचा हेतू काय? विश्व म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? वगैरे वगैरे असे प्रश्न स्वाभाविकपणे मनात येतात.
ज्यावेळी हे प्रश्न तुमच्या मनात यायला लागतील त्यावेळी हे नक्की समजा की तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. हे प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. ह्या प्रश्नांची उत्तरे एखाद्या पुस्तकात वगैरे मिळणार नाहीत. ह्या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता तुमचे जीवन एका उच्च स्तरावर गेलेले पहाल.
तुमच्यात वैश्विक चेतनेचा उदय होतो:
दररोज ध्यान केल्याने चेतनेची पाचवी स्थिती म्हणजेच वैश्विक चेतना आपण अनुभवू लागतो. वैश्विक चेतना म्हणजेच संपूर्ण विश्व हे आपलाच एक भाग असल्याची जाणीव होणे.
ज्यावेळी संपूर्ण विश्व हे आपलाच एक भाग असल्याची जाणीव होते त्यावेळी तुम्ही आणि विश्व हे प्रेमाच्या धाग्यात अगदी घट्ट बांधले जातात. आणि ह्याच प्रेमामुळे तुम्हाला जीवनातील अशांती आणि विरोधी तत्त्वांच्या पलीकडे जाण्याची क्षमता येते. राग आणि निराशा ह्या "आली रे आली की गेली" अशा क्षणभंगूर भावना होऊन जातात. तुम्ही वर्तमानात जगायला सुरुवात करता आणि भूतकाळातल्या गोष्टींना "झालं ते गेलं" च्या नजरेने पाहता.
ज्ञान आणि ध्यान याचं संगम आयुष्य परिपूर्ण करते. जेंव्हा तुम्ही वैश्विक चेतनेची पातळी गाठता, तेंव्हा तुम्ही सुंदर तरीही सशक्त बनता. जीवनाची वेगवेगळी मुल्ये विनाशर्त सामावून घेणारं एक मृदू, नाजूक आणि सुंदर व्यक्तिमत्व बनता.
ध्यानाचे फायदे कसे घ्यावेत
ध्यानाचे फायदे अनुभवण्यासाठी नियमित सराव करत राहणे जरुरी आहे, आणि तो पण फक्त रोजची काही मिनिटे. एकदा का ते तुमच्या रोजच्या व्यवहातर समाविष्ट झाले की ध्यान हे तुमच्या दिवसाचा सर्वोत्तम भाग बनून जाईल.
ध्यान हे एका बीजा प्रमाणे आहे. ते जेव्हा प्रेमाने पेरले जाते ते अधिकाधिक फुलते. त्याचप्रमाणे आत्मा विकासाच्या रोपट्याचं खतपाणी म्हणजे ध्यान. काही ताडाची झाडे तीन वर्षात फळे द्यायला लागतात तर काहींना दहा वर्षे पण लागतात. आणि ज्या झाडांना खत पाणी मिळत नाही, ज्यांची काही काळजी घेतली जात नाही, त्यांना कधीच फळे लागत नाहीत. ती फक्त जगतात.
सर्व कार्यक्षेत्रातील व्यस्त लोक रोज काही मिनिटे ध्यानाचा आनंद लुटायला मिळतो म्हणून कृतज्ञता व्यक्त करतात. आत्म्यात खोल डुबकी मारा आणि आपल्या आयुष्याला अधिक समृद्ध बनवा.