ध्यान

जे आपल्याला गहिरी विश्रांती देते ते ध्यान

ध्यान म्हणजे काय?

सखोल विश्रांती आणि जागरुकता एकाच वेळी अनुभवण्यासाठी ध्यान हा एक मार्ग आहे. ध्यान करणे ही एक कला आहे, जी अंतर्मुख करुन आनंद देते आणि मन शांत करण्यास मदत करते. ध्यान करणे म्हणजे काहीच न करण्याची कला आणि सर्व प्रकारचे प्रयत्न सोडून देणे ! असे केल्याने आपल्याला आपल्या खऱ्या स्वभावाचा म्हणजेच प्रेम, आनंद, शांती यांचा अनुभव मिळतो. ध्यान केल्याने सखोल विश्रांती मिळते. आपल्या मनावरचा ताण कमी करणे आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवणे हे फार गरजेचे आहे.

ध्यान ही एक यात्रा आहे जी आपल्याला आवाजाकडून शांततेकडे, चंचलतेकडून स्थिरतेकडे घेऊन जाते. ध्यान हे आपल्या आत्म्याचे खाद्य आहे.

- गुरुदेव श्री श्री रविशंकर

ध्यान करण्याचे फायदे

ध्यान करण्याचे अनेक फायदे आहेत. मन शांत होते, लक्ष स्थिर रहाते, चांगली एकाग्रता, मनाची स्पष्टता, भावनांचे संतुलन, परस्परातील चांगले संवाद, नव-नवीन कौशल्ये निर्माण होणे, उपचार म्हणून, पूर्ण विश्रांती मिळणे, नवीन जोम निर्माण होणे, याशिवाय चांगल्या नशिबाची साथ मिळवण्याची क्षमता निर्माण होणे.

icon

वातावरणात जैविक शक्ती वाढते.

ध्यान केल्याने आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा वाढते.

icon

आरोग्य सुधारते

ध्यान केल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदय विकार, त्वचेचे रोग, मज्जा संस्थेचे विकार आणि असे अनेक आजार बरे होण्यास मदत होते.

icon

उत्साह वाढतो

ध्यान केल्याने आपण आनंदी व उत्साही रहातो. त्याने अनेक संभाव्य मानसिक आणि शारीरिक आजारानपासून आपण लांब रहातो.

ध्यान - नवीन शिकणाऱ्यांसाठी

ध्यान करणे हे श्वास घेणे व सोडणे या इतके साधे आणि सोपे आहे. ध्यान करण्यासाठी हिमालयात जाण्याची किंवा स्वतःबंधनात रहाण्याची काहीच गरज नाही. ध्यान आपण आपल्या दैनंदिन जीवनात आरामात करु शकतो. ध्यान करण्याच्या अनेक पद्धती आहेत, ज्या आपल्या मनाला वर्तमान क्षणात घेऊन येतात. आपण त्यातली कोणतीही पद्धत आत्मसात करू शकतो.

खरेतर ध्यानाच्या पहिल्याच बैठकीत लोकांना इतके चांगले अनुभव येतात की ते अनुभव लोक शब्दात व्यक्त करु शकत नाहीत. जसजसे आपण दररोज न चुकता ध्यान करायला लागतो, दिवसातून एकदा, खरं म्हणजे दोनदा, तसतसे आपल्याला अंतर्बाह्य बदल जाणवू लागतो. आपल्या सहवासात येणाऱ्या लोकांनाही आपल्यातील सकारात्मक आंतरिक शक्तीची जाणीव होते. म्हणून प्रत्येकाने दिवसातून किमान काही मिनिटे तरी ध्यान केले पाहिजे, जेणेकरून आपले जीवन तणावमुक्त आणि आनंदी राहील.

मला ध्यान करायचे आहे परंतु...

माझे मन सर्वत्र भटकते, ध्यान कसे करायचे?

गुरुदेव श्री श्री रविशंकर : एक काठी घ्या आणि मनाचा पाठलाग करा. बघा कुठे जाते ते. पाठलाग करत रहा, करत रहा आणि मग तुम्हाला दिसेल की तुमचं मन इतकं थकलेलं आहे की ते तुमच्या पायाशी येऊन पडलं आहे. महर्षी पातंजली म्हणतात की, प्रत्येक गोष्टीवर ध्यान करा, विविध घटकांवर ध्यान करा, कसलीही आसक्ती नसलेल्या ऋषींवर ध्यान करा. जेव्हा तुम्ही एखाद्या निरसक्त ऋषींचे मनन करता, तेव्हा तुमचे ध्यान लागते. सत्संगामध्ये बसल्यावर सुद्धा तुम्हाला ध्यान लागते. पण जर तुम्ही सत्संग मध्ये १००% सहभागी नसलात तर तुम्ही छताकडे किंवा इकडे तिकडे बघत बसता. तुम्हाला स्वत: हूनच यामध्ये रुचि निर्माण करावी लागेल, त्यात रस आणावा लागेल. ती आवड आधीपासून आहेच, या सर्वांच्या पलिकडे जो आहे त्याच्याकडे बघा. तो, जो प्रत्येक गोष्टीमध्ये रस निर्माण करतो. मी सांगतो, तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही, ते सर्व तुमच्यासाठी प्रज्वलित आहेच, तुम्हाला काहीही करण्याची गरज नाहि. जेव्हा तुम्ही गंगेत डुबकी मारत असता, तेव्हा नळ सुरू करण्याची आणि शॉवर घेण्याची काय गरज आहे? सहज व्हा. फक्त हे लक्षात ठेवा की मी कुणीच नाही आणि मला काहीही नको आहे. पण याबद्दलही सारखा विचार करत बसू नका, हीसुद्धा मायाच आहे. म्हणूनच आदि शंकराचार्य म्हणतात की मी शून्य आहे असे समजणेही मूर्खपणाचे आहे.

विचार कां येतात आणि त्यांचा उगम कुठून होतो? विचार आपल्यावर राज्य का करतात?

गुरुदेव श्री श्री रविशंकर : विचार कुठून येतात, मनातून की शरीरातून? डोळे मिटून यावर विचार करा. तेच ध्यान बनते. मग तुम्ही तुमच्यातल्या त्या बिंदूवर किंवा त्या ठिकाणी पोहोचाल जिथून सर्व विचार येतात. आणि ते विलक्षण आहे.

आपण आपल्या ध्यानाचा अनुभव कसा सुधारु शकतो?

गुरुदेव श्री श्री रविशंकर : जर तुम्हाला ध्यानाचा चांगला अनुभव येत नसेल तर अधिक सेवा करा, तुम्हाला पुण्यही मिळेल आणि तुमचे ध्यान अधिक सखोल होईल. जेव्हा तुम्ही एखाद्याची सेवा करून त्याला दिलासा देता किंवा मुक्त करता तेव्हा तुम्हाला सद्भावना आणि आशीर्वाद मिळतात. सेवेमुळे पुण्य मिळते; आणि त्या पुण्याईमुळे तुम्ही खोल ध्यानाचा अनुभव घेऊ शकता. ध्यानामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य परत येते आणि तुम्ही ध्यानाचे सर्वोत्तम परिणाम अनुभवू शकता.

मी नेहमी ध्यान करताना झोपी जातो. प्रत्येकाच्या बाबतीत असं घडतं का? त्यांचा काय अनुभव आहे ? यावर उपाय काय?

गुरुदेव श्री श्री रविशंकर : इतरांच्या अनुभवा बद्दल चिंता करू नका. स्वत:च्या अनुभवासोबत राहा आणि अनुभव वेळोवेळी बदलत असतात. त्यामुळे काळजी करू नका. ध्यान करण्याने उत्तम शारीरिक विश्रांती मिळण्यास मदत होते.

झोप आणि ध्यान यात काय फरक आहे?

गुरुदेव श्री श्री रविशंकर : एक उभे आहे तर दुसरे आडवे आहे. तूर्तास तरी एवढेच लक्षात ठेवा. पण उद्या जेव्हा तुम्ही ध्यान करायला बसाल तेव्हा याबद्दल विचार करू नका. तुम्ही ना तर ध्यान करू शकाल ना झोपू शकाल. आत्ता याची वेळ आहे.

ध्यान करायला बसल्यावर जुन्या स्मृति (आठवणी) मला त्रास का देतात?

गुरुदेव श्री श्री रविशंकर : त्याने काही फरक पडत नाही ! हिंमत गमावू नका ! त्यांना येऊ द्या ! त्यांना म्हणा, "चला, माझ्यासोबत बसा, पाच वर्षापूर्वीच्या, की दहा वर्षांपूर्वीच्या किंवा वीस वर्षांपूर्वीच्या आठवणीं या ! माझ्यासोबत बसा." आपण त्यांच्यापासून जितके पळून जाऊ इच्छिता तितक्या त्या आपल्याला त्रास देतील.

माझ्याकडे योग आणि ध्यानासाठी वेळ नाही. मी काय करू शकतो?

गुरुदेव श्री श्री रविशंकर: सत्य हे आहे की योग आणि ध्यानामुळे तुम्हाला अधिक वेळ मिळतो! जर तुमच्याकडे यासाठी वेळ नसेल तर तुम्ही हॉस्पिटल किंवा डॉक्टरकडे जावे! काही शारीरिक व्यायाम, योगासने, प्राणायाम आणि नंतर थोडा वेळ ध्यान करणे फायदेशीर ठरते.

दररोज किती वेळ ध्यान करावे? कधी कधी खूप जास्त ध्यान असते का?

आपले शरीर एका प्रणालीप्रमाणे कार्य करते जेथे, एका विशिष्ट बिंदूनंतर, आपण नैसर्गिकरित्या ध्यानातून बाहेर पडतो, जसे की आपण पुरेशा झोपेनंतर कसे जागे होतो. तुम्ही दिवसाचे पंधरा तास झोपू शकत नाही. तुम्ही सहा तास झोपता आणि शेवटी, तुम्हाला पुरेशी विश्रांती मिळाल्यावर तुम्ही जागे होतात. त्याचप्रमाणे, आपल्यामध्ये एक जैविक घड्याळ आहे जे आपल्याला बाहेर आणते, म्हणून आपण मध्यस्थी करण्यास भाग पाडू नये. म्हणून मी शिफारस करतो की दिवसातून वीस मिनिटे, पंचवीस मिनिटे पुरेशी असावीत. आपण दिवसात दोन, तीन ध्यान वेळा करू शकता, परंतु थोडा थोडा वेळ. वीस मिनिटे, दोनदा, तीनदा ध्यान करत असाल - तर ते तुम्हाला फायद्याचे ठरेल.

ध्यान केल्याने वाईट कर्म दूर होतात का?

गुरुदेव श्री श्री रवि शंकर : होय!
 

ध्यानात, ‘प्रतीक्षा’ चे महत्त्व काय आहे?

गुरुदेव श्री श्री रविशंकर: तुम्ही वाट पाहत असताना तुमच्या मनात काय चालले आहे? सध्या, तुमच्या मनात सध्या काय चालले आहे? तुम्हाला टाइमपास वाटत आहे का? हीच प्रतीक्षा तुम्हाला खोल ध्यानात घेऊन जाते. जेव्हा तुम्ही वाट पाहत असता तेव्हा तुम्ही निराश होऊ शकता किंवा ध्यान करू शकता. ध्यानाचा अर्थ "वेळ अनुभवणे" असा आहे.

आनंद मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे?

गुरुदेव श्री श्री रवि शंकर : एक, ध्यान करून, आणि दुसरे म्हणजे, तुमच्या सभोवतालच्या लोकांची सेवा करणे - काही सेवा कार्यात सहभागी होणे. आपल्या आत देव पाहणे म्हणजे ध्यान. आपल्या सभोवतालच्या लोकांमध्ये देव पाहणे म्हणजे प्रेम किंवा सेवा. ते दोघे हातात हात घालून जातात.