ध्यान कसे करावे असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? नवीन लोकांनी ध्यान कसे करावे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का?
होय, ध्यानात गहन अनुभूती यावी असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे, विशेषत: जेव्हा आपण नुकतेच ध्यान करण्यास सुरवात केली आहे. तणावमुक्त होण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी ध्यान करणे हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. ध्यान सुरू करण्यापूर्वी काही सोप्या गोष्टींकडे लक्षं देऊन तुम्ही ध्यानाचा चांगला अनुभव घेऊ शकता. ‘ध्यान कसे करावे’ किंवा ‘घरी ध्यान कसे सुरू करावे’, विद्यार्थ्यांना असे प्रश्न नेहमीच पडतात.
नवशिक्यांना प्रारंभ करण्यात मदत करण्यासाठी ध्यानाची आठ सूत्रे
-
सोयीस्कर वेळ निवडा
ध्यान म्हणजे विश्रांती. जर तुमचा उद्देश छान ध्यान लागावे असा असेल तर, तुम्ही ते पूर्णपणे तुमच्या सोयीनुसार करायला हवे. अशी वेळ निवडा जेव्हा आपल्याला माहित असेल की आपल्याला व्यत्यय येण्याची शक्यता नाही आणि विश्रांती घेण्याचे आणि आंतरिक आनंद घेण्याचे स्वातंत्र्य आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ देखील ध्यानासाठी आदर्श वेळ मानली जाते. ही वेळ अशी असते जेव्हा निसर्गामध्येही एक निश्चल शांतता असते, ज्यामुळे आपल्याला सहजपणे ध्यान करण्यास मदत होते.
-
एक शांत जागा निवडा
सोयीस्कर वेळेप्रमाणेच, जेथे आपण विचलित न होता ध्यान करू शकू अशी शांत आणि प्रसन्न वातावरण असलेली जागा निवडणे हेही तितकेच महत्वाचे आहे. ही जागा म्हणजे आपल्या घरातील शांत खोली, निसर्गातील तुमच्या आवडीची छान जागा किंवा ध्यान केंद्र देखील असू शकते. अशी जागा नवशिक्यांसाठी ध्यान अधिक आनंददायक आणि आरामदायक बनवू शकते.
-
सुखदायी आसनात बसा
ध्यानासाठी तुम्ही कसे बसता हे सुद्धा महत्वाचे आहे. तुमच्यासाठी अनुरूप अशी आरामदायक व सुखदायक बसण्याची स्थिती निवडा. खुर्चीवर किंवा जमिनीवर उशी घेऊन बसू शकता. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवून आपला पाठीचा कणा सरळ आणि आरामदायक अशा स्थितीत ठेवा. शक्य तितके स्थिर रहा आणि विश्राम करा. आपला पाठीचा कणा सरळ ठेवून बसताना आपले खांदे आणि मान शिथिल असू द्या आणि संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आपले डोळे बंद ठेवा.
लक्षात ठेवा : ध्यान करण्यासाठी पद्मासनातच बसावे लागते हे एक मिथ्य आहे.
-
ध्यानाला बसताना आपले पोट हलके असू द्या
घरी किंवा कार्यालयात ध्यान करताना तुलनेने रिकाम्या पोटी ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. जेवणापूर्वी ध्यान करण्याचे कारण सोपे आहे – जेवणानंतर ध्यानाला बसल्यास मध्येच आपल्याला डुलकी लागू शकते. कधीकधी भरल्या भरल्या पोटी ध्यान करताना अस्वस्थही वाटू शकते.
जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा भूकेने पोटात गोळे येऊन आपण ध्यान करण्यापासून विचलित होऊ शकतो. तुमच्या मनात ही पूर्ण वेळ खाण्यापिण्याचेच विचार येत राहतील! त्यामुळे शक्यतो जेवणानंतर दोन तासांनी (जेव्हा पोट हलके असते व खूप भूक ही लागलेली नसते अशा वेळी), ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो.
लक्षात ठेवा: भूक लागलेली असताना बळजबरीने ध्यान करण्यास बसू नका
-
काही हलक्या व्यायामाने सुरुवात करा
ध्यानापूर्वी काही हलके व्यायाम किंवा वॉर्म-अप करण्याचा उद्देश आपले लक्ष वर्तमान क्षणात आणणे व आपले शरीर आणि मन ध्यानासाठी तयार करणे हा आहे. जर आपण ध्यान कसे सुरू करावे असा विचार करत असाल तर ध्यान करण्यापूर्वी काही वॉर्म-अप किंवा सुक्ष्मयोग रक्ताभिसरण सुधारण्यास, जडपणा आणि अस्वस्थता दूर करण्यास आणि शरीराला हलके वाटण्यास मदत करतात. ध्यान कसे करावे हे शिकण्यासाठी ही एक आवश्यक पायरी आहे, ज्यामुळे आपण बराच वेळ स्थिर बसू शकता.
-
काही दीर्घ खोल श्वास घ्या
ध्यान प्रारंभ करण्यापूर्वी काही दीर्घ श्वास घेणे ही आणखी एक आवश्यक टीप आहे. ध्यान सुरू करण्यापूर्वी खोल श्वास घेणे किंवा नाडी शोधन प्राणायाम करणे ही चांगली कल्पना आहे. याने श्वासाची लय स्थिर होण्यास मदत होते आणि मन शांत ध्यानस्थितीत जाते. श्वास घेताना आणि श्वास सोडताना आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. जर आपल्या श्वासांची गणना करुन ध्यानात मदत होत असेल तर तुम्ही ते ही करू शकता. जेव्हा आपले मन भटकते तेव्हा हळुवारपणे आपले लक्ष आपल्या श्वासाकडे आणा.
-
चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा
संपूर्ण प्रक्रियेदरम्यान चेहर्यावर स्मित हास्य ठेवणे हे तर अगदी महत्वाचे आणि तडजोड न करता येण्यासारखेच आहे! स्मित हास्य आपल्याला शांत व प्रसन्न ठेवण्यास तसेच ध्यानाचा आणखी चांगला अनुभव मिळण्यास मदत करते. स्वत: अनुभव करून बघा!
-
सावकाश आणि हळुवारपणे आपले डोळे उघडा
ध्यान संपत आल्यावर डोळे उघडण्याची किंवा ताबडतोब शरीर हलवण्याची घाई करू नका. त्याऐवजी, स्वत:बद्दल आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणाबद्दल सजग व्हा आणि हळूहळू आपले डोळे उघडा. मग हळूहळू आपल्या शरीराची हालचाल करा, आणि आपण परिपूर्ण दिवसासाठी तयार आहात!
ध्यान साधना सुरू करणे कठीण वाटू शकते, परंतु कोणीही थोडे प्रयत्न आणि संयमाने ते करू शकते. जर तुम्हाला नेहमी असा प्रश्न पडत असेल की योग्य प्रकारे ध्यान कसे करावे तर वरील गोष्टींचे अनुसरण करा आणि स्वत:ला एक शांत आणि एकाग्र मनाची भेट द्या.
नवशिक्यांसाठी गुरूदेव यांचे मराठीत मार्गदर्शन केलेले हे ध्यान करून पहा
ध्यान केल्यामुळे ताणतणावाशी संबंधित समस्या दूर होतात, मनाला गहन विश्रांती मिळते आणि आपली सर्व मन शरीर प्रणाली पुनरुज्जीवित होते. ध्यानाच्या या विश्वात पाऊल कसे टाकावे याबाबत आपल्याला अजूनही खात्री नसल्यास, आपण नवशिक्यांसाठी ध्यानाच्या विनामूल्य परिचयसत्रासाठी नोंदणी (साइन अप) करू शकता. या ६० मिनिटांच्या सत्रामध्ये आम्ही योग, श्वास आणि ध्यानाबद्दल परिचय करून देतो, ज्यामुळे आपल्याला ध्यान विश्वाच्या अंतरंगाबद्दल एक कल्पना मिळते.
आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे सहज समाधी मेडिटेशन हे एक खास तयार केलेले शिबीर आहे जे आपल्याला आपल्या चेतनेच्या सखोलतेचा अनुभव देते व आपल्या अमर्याद क्षमतेचा वापर करण्यास मदत करते.