सरतं वर्ष सगळ्या जगासाठी खूपच कठीण गेलं. पुढची पिढी खचितच याची ग्वाही देईल. कोरोना महामारीच्या काळात परिक्षा रद्द झाल्या.शाळा कॉलेजना नेहमीपेक्षा लवकर सुट्टी दिली गेली. बहुतांश विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे शुभसंकेत होते. पण जसजसा काळ पुढे जाऊ लागला , तसतसा मुलांना घरातच अडकून पडावं लागलं. आपण समाजापासून, नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्यापासून दूर, वेगळे, एकटे पडलो आहोत हे त्यांना जाणवू लागले.
या परिस्थितीत पालकांना मुलांच्या लहरी आणि हट्टी स्वभावापुढे नमते घ्यावे लागले – मुलांना ज्या परिस्थितीतून जावं लागतं होतं, त्या बद्दल पालकांना वाईट पण वाटत होतं आणि या कंटाळवाण्या परिस्थितीचे काय दुष्परिणाम होतील याबद्दल धाकधूक पण होती. या सगळ्यामुळे मुलांना मनसोक्तपणे स्क्रीन टाईम बहाल केला गेला – मुलांनी तासनतास यु-ट्यूब व्हिडिओ बघितले, त्याना हवे ते कॉम्पुटर गेम्स डाउनलोड केले, एका पाठोपाठ एक असा टीव्ही वरच्या मालिका बघण्याचा सपाटा लावला. रात्ररात्र जागून चित्रपट बघितले. कधीही न शमणारी उत्कंठा शमवण्याचा त्यांनी प्रत्येक क्षणी प्रयत्न केला.
‘हे सगळे करून शेवटी त्यांना आनंद मिळाला का?’ हा प्रश्न उरतोच.
कदाचित त्यांना क्षणिक आनंद मिळाला असेलही पण मुख्यत: याचं परिवर्तन अस्थिरतेत, चिडखोरपणा वाढण्यात झालं. मुले लॉकडाऊनच्या आधीच्या काळापेक्षा अधिक अस्वस्थ, आक्रमक आणि आग्रही बनली.
या अशा महामारीच्या काळात मुलांना शांत करण्यासाठी आणि त्यांना खरा आनंद मिळवून देण्यासाठी कशाचा उपयोग होईल? थोडा निवांत आणि आत्मपरीक्षण करण्यासाठीचा वेळ – या महामारीच्या काळात सुद्धा ध्यान केल्यामुळे मुलांना शांत आणि स्थिर व्हायला मदत होईल.
मुलांच्या मनात ध्यानाबद्दल ज्या कल्पना आहेत त्याला कशाप्रकारे हाताळायचे :
-
म्हातारे-कोतारे लोक ध्यान करतात आई ! मी खूपच लहान आहे यासाठी.
आपल्या पूर्वीच्या कल्पनेनुसार ‘ध्यान म्हणजे ऋषीमुनी दूर निबीड अरण्यात एकांतात बसून जपजाप्य करतात ते’ .पण आता जगभरातल्या तरुणाईने ध्यानाचा स्वीकार केला आहे. उदाहरण द्यायचे झाले तर आजकाल ध्यान करणे हे खेळांच्या व्यायामाचा एक अविभाज्य भाग बनले आहे.
“खूप थकवणाऱ्या व्यायामाच्या खडतर सरावानंतर माझ्या मुलाचे प्रशिक्षक त्याला योगासने आणि ध्यान करायला लावतात, ” असे आठ वर्षाच्या ईशानची आई आदिती (नावे बदलली आहेत) सांगत होती. अगदी अटळ अशा अटीतटीच्या सामन्यात शांत रहायला ध्यानाच्या सरावामुळे कशी मदत झाली,याबद्दल जगतविख्यात खेळाडू नेहमीच सांगतात. ख्यातनाम गायक आणि वादक सुद्धा त्यांच्या महत्वाच्या सादरीकरणाच्या आधी काही वेळ ध्यानासाठी देतात.
ध्यानाविषयीच्या या १० दतंकथा जाणून घ्या, ज्या खऱ्या नाहीत.
-
ध्यान करण्यात खूप वेळ खर्च होतो
निर्देशिक ध्यान हे फक्त वीस मिनिटांचे असते. हे जर खूप जास्त वेळ आहे असं वाटत असेल तर अगदी पाच मिनिटाच्या ध्यानापासून मुले सुरुवात करू शकतात. मुलांनी मान्य करो वा ना करो या धकाधकीच्या आयुष्यात त्यांच्या थकलेल्या मनाला शांत व्हायला थोडा वेळ आणि मोकळीक हवी असते.
मुलं आणि ध्यान यांच्याबद्दल काही गोष्टी
- ज्यांना ध्यान करण्याची सर्वाधिक गरज आहे, (अतिशांत किंवा अतिक्रियाशील मुलं) तीच मुलं ध्यान करायला नकार देण्याची सर्वाधिक शक्यता असते.
- मुलं सवयीचे गुलाम असतात.सुरुवातीच्या या अडथळ्यातून त्यांना बाहेर पडायला तुम्ही मदत केली तर कालांतराने ते स्वतःहून ध्यान करतील.
- मुलांना त्यांच्या भावना नेमक्या शब्दात मांडता येत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जे मुलांनी सांगावं असं वाटतं आहे, ते मुलं शब्दात मांडू शकली नाहीत तर नाराज होऊ नका. ध्यानामुळे ते त्यांच्या भावना व्यक्त करायला शिकतील, संवाद कौशल्य आत्मसात करतील.
- जसजशी मुलं मोठी होतील, तसतसे तुमचे सल्ले, तुम्ही ध्यान करण्याबद्दल जे सांगता ते, या सगळ्या गोष्टीकडे कानाडोळा करतील. त्यांना सतत सूचना देण्यापेक्षा ते काय सांगत आहेत ते मन:पूर्वक ऐका. त्यांच्याकडूनही काही गोष्टी शिका. त्यांच्याकडे असलेली प्रतिभा बघून, त्यांच्या भन्नाट कल्पना ऐकून तुम्ही हरखून जाल. जेंव्हा तुम्ही त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करताय हे त्यांना जाणवेल, तेंव्हा त्यांना तुमच्या बद्दल आपलेपणा वाटेल, तुमचे प्रेमाचे बंध घट्ट होतील आणि तुम्हाला ध्यानाविषयी त्यांच्याशी बोलण्याचा मार्ग खुला होईल.
-
ध्यान फार कंटाळवाणे असते.
असे म्हणणे म्हणजे तुमचे मूल स्वतः बरोबर वेळ घालवण्यात, स्वतः मध्ये रमण्यात असमर्थ आहे. मुलांना कायम काहीतरी बाह्य उत्तेजना, जसं की कॉम्प्युटर गेम्स, टीव्ही बघण्याची सवय झाली आहे. त्यांना स्वत:चेच विचार अवास्तव किंवा निरर्थक वाटतात. म्हणून त्यांना ध्यान करणे कंटाळवाणे वाटते. अगदी छोट्या कालावधीपासून सुरुवात करा. हळूहळू त्यांना सवय झाली की ध्यानात फार वेळ जातोय असं त्यांना वाटणार नाही.
“माझ्या मुलाला ध्यान केल्यावर अगदी निर्विचार वाटते”. नऊ वर्षाच्या मुलाची आई श्रुती (नाव बदलले आहे) काळजीने म्हणाली. खरं तर ही ध्यानाच्या सुरुवातीच्या पायऱ्यापैकी एक आहे. श्रुतीला हे लक्षात येतं नाहिये की निर्विचार होणे म्हणजे मन रिते होणे,मन शांत होणे ही ध्यानाची पहिली पायरी आहे.
-
मला ध्यानाचे काहीच फायदे जाणवत नाहीत.
मुलांसाठी ध्यानाचे बहुआयामी फायदे आहेत. ते जरी अगदी तत्क्षणी जाणवले नाहीत, तरी ध्यानामुळे तुमच्या मुलांच्या जडणघडणीत मोठाच फरक पडतो यात शंकाच नाही.
मुले वाढीच्या वयात असतात. त्या प्रत्येक टप्प्यावर नवे अनुभव, नवी आव्हाने पेलत असतात. जेंव्हा ते पौगंडास्थेतून जात असतात, त्यांच्यापुढे त्यांच्या आयुष्यातील निर्णायक क्षण उभे राहतात. त्यावेळी त्यांचे आवेग उफाळून बाहेर पडतात. ते इतके भावनाप्रधान होतात, लहरी, अस्थिर होतात, की त्यांना सांभाळणे कठीण होऊन बसते. ध्यानामुळे तणावमुक्त आणि शांत व्हायला मदत होते.विशेषत: आत्ता अचानक उद्भवलेल्या महामारीच्या काळात तर ते फारच उपयोगी आहे.
लॉक डाऊन नंतर मुलांना ध्यानामुळे झालेले फायदे
- मनाची निश्चिंती : मुलांना अशी भीती आहे की ते स्वतः किंवा त्यांचे आई वडील कोरोनाच्या साथीत बळी पडतील. सततची अनिश्चितता आणि टाळता न येणारी भिती त्यांच्या मनात व्यापून राहिली आहे. ध्यान त्यांना निर्भय व्हायला मदत करेल.
- मुले जास्त विचारी आणि समंजस बनतात : ध्यान मुलांना अती दुर्बल घटकातील लोकांच्या आयुष्याची जाणीव करून देते, ज्यांना साधं साथीपासून बचाव करण्यासाठी वारंवार हात धुणे पण अशक्यप्राय गोष्ट आहे.
- आत्मविश्वास आणि आत्मबलात वाढ : मुलांना कित्येक महिने त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या गोष्टी करण्यापासून दूर रहावं लागलं आहे, पण ध्यान केल्यामुळे ते नव्या गोष्टींशी जुळवून घेऊ शकतील.
- वाईट वागणे आणि आक्रमकता यांना पायबंध : आत्ता चालू असलेल्या महामारीमुळे ताण येऊन मुलं वाईट सवयींचा आहारी जाऊ शकतात. ध्यान त्यांना निर्मळ आणि सुरक्षित जगाकडे वळवेल.
- सलग लक्ष देण्याचा कालावधी आणि स्मरण शक्ती वाढेल : ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे मुले फार आत्मकेंद्री झाली आहेत. त्यांना पूर्वी पेक्षा जास्त अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याची निकड निर्माण झाली आहे.
- इतरांशी संपर्क साधण्याची कला : बरेच महिने घरात अडकून राहिल्याने मुलांना बाहेरच्या लोकांशी पुन्हा एकदा संवाद प्रस्थापित करणं कठीण होतं. ध्यान केल्यामुळे त्यांना आपल्यापेक्षा छोट्यांशी, समवयस्कांशी, मोठ्यांशी संवाद साधणे सोपे होईल.
मुलांना ध्यान कसे शिकवायचे
-
नो युवर चाइल्ड
तुमच्या मुलांना जाणून घ्या. तुमच्या मुलांचा स्वभाव कसा आहे, ते नीट अभ्यासा. हे अगदी अवघड काम आहे खरे, पण तुमच्या मुलांना तुमच्या पेक्षा जास्त चांगलं कोण ओळखू शकेल! तुम्ही तुमच्या आठ वर्षाच्या चुळबुळ्या मुलाला ‘हालचाल न करता २० मिनिटे ध्यानासाठी बस’ हे सांगूच शकणार नाही. असे सांगून तुम्ही स्वतःच निराशा ओढवून घ्याल.
तुमचं मूल जर शांतता प्रिय असेल तर, ध्यानाचा अनुभव शांततामय असू देत. जर तुमच्या मूल बोलकं असेल, त्याला वाचन आवडत असेल तर मग गुरुदेवांची निर्देशित ध्यान लावून देऊ शकता. गुरुदेवांच्या मृदू आणि स्निग्ध आवाजात तुमच्या मुलाला रमून जाऊ देत.
मुलांसाठी ध्यान घेताना तुम्ही त्यात थोडं संगीत, सहज सोपे श्वासाचे व्यायाम, किंवा नुसती शांतता ठेवलीत, तर तुम्ही तुमच्या मुलांच्या आयुष्यात ध्यानाला स्थान देण्यात यशस्वी होण्याची खूप शक्यता आहे.
-
ध्यानाचा कालावधी छोटासा ठेवा
जेंव्हा तुम्ही तुम्ही मुलांना पहिल्यांदाच ध्यान करायला सांगता आहात, तेंव्हा तर हे फारच महत्वाचे आहे.
- सुरुवातीला पाचच मिनिटांचे ध्यान घ्या.
- त्यांना सारख्या सूचना नका देत बसू. आणि सारखं ते बरोबर करतायेत ना याची तपासणी पण नको.
- आता पुढची पाच मिनिटे तुमच्या मनात काहीही विचार येऊ देऊ नका, अशा सूचना देणं टाळा.
-
सकाळी लवकर सुरू करा.
सकाळी जेंव्हा मुलं ताजीतवानी आणि उत्साही असतात, ती वेळ ध्यान करण्यासाठी उत्तम. तेंव्हाच तुम्ही त्यांचे लक्षही वेधून घेऊ शकता,कारण जसजसा दिवस पुढे जातो तसतसा अनेक गोष्टींमुळे मुलांचे लक्ष विचलीत होत रहाते. खरे तर लॉक डाऊन मुळे आपल्याला मुलांसोबत वेळ व्यतीत करण्याची सुसंधीच मिळाली आहे. आणि आता जरी हळूहळू सगळं पूर्वपदावर येत असलं तरी आहे तो वेळ मुलांसोबत ध्यान करण्यासाठी वापरता येईल.
-
मुलांना ‘काय करा’ ते सांगा, ‘काय करू नका’ हे नको.
मुलांना, हे करू नका, ते करू नका , असा नानाचा पाढा वाचण्याऐवजी काय करणं योग्य आहे, ते सांगा. मुलांना सारखं त्यांच्या चुका दाखवण्याऐवजी त्यांना योग्य मार्ग दाखवा. त्यांच्यासाठी ते सोपं पडेल. उदा. श्वासावर लक्ष केंद्रीत करा, दीर्घ श्वास घ्या आणि सोडा, सावकाश श्वास घ्या, असं सांगता येईल. तुम्ही त्यांना अशाप्रकारे सांगितलंत तर ते यात मनापासून सहभागी होतील. तुम्ही मुलांना शारीरिक आणि मानसिक पणे गुंतवू शकलात तर तुम्ही ही पहिली लढाई जिंकलातच म्हणून समजा
-
त्यांचे ध्यान सोबती बना.
हल्ली खूप गोष्टी मुलांवर सोडल्या जातात. पालक असूनही त्यांच्या कार्य व्यग्रतेमुळे ते मुलांना वेळ देऊ शकत नाहीत. ना शिक्षक,ना मित्र, ना काही छंद, ना शाळा. मुलांना संपर्कात रहाण्यासारखं कुणीच नाही. काही नशीबवान मुलं आहेत, ज्यांना सोबत वेळ घालवायला त्यांची सख्खी भावंडं तरी आहेत. तुम्ही तुमचा वेळ दिलात, तर मुलं निश्चिंत होतील.
तुम्ही मुलांसोबतच ध्यान करा. त्यांच्या बरोबर व्यतीत केलेला हा बहुमोल वेळ असेल. त्यांना तुमचे अनुभव सांगा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठले संघर्ष करायला लागेल, कुठल्या अडचणी आल्या, तुम्ही ध्यानाकडे कसे वळलात , त्याचा तुम्हाला कसा फायदा झाला हे सांगा. हे सगळं ऐकून ते सुध्दा त्यांचे अनुभव तुम्हाला सांगायला उद्युक्त होतील.
-
तुमच्या मुलांच्या मित्रांनाही सामील करून घ्या.
मुले मुख्यत्वे त्यांच्या मित्रांच्या प्रभावाखाली असतात. त्यांच्या सगळ्या मित्रांना जमवा आणि ऑनलाईन गट तयार करून एक ध्यानाचं सत्र घ्या. तुम्ही जर छान खेळीमेळीचे आणि मैत्रीपूर्ण वातावरण ठेवलं तर मुलांवर त्याचा प्रभाव पडेल. गुरुदेव जी उदाहरणे देतात, ती पण बघा म्हणजे तुमच्या मुलांवर कशी छाप पाडता येईल याचे उपाय समजतील.
ध्यानाचा सराव करावा लागतो. आणि जसं इतर गोष्टींचं आहे, त्याच प्रमाणे ध्यानाचा पण जितका तुम्ही नियमित सराव कराल, तसतसे निष्णात बनाल आणि त्याचे फायदे तुम्हाला लवकर मिळतील.
ध्यान करण्याचा वेळ मौज मस्तीचा आणि आरामाचा बनवा. तो वेळ म्हणजे अगदी कडक शिस्तीचा किंवा तुम्ही खूष होण्यासाठी मुलांनी केलेला आटापिटा असा नको. त्यांना ध्यान करण्याचा ताण यायला नको. तुमचा संयम आणि तुमचं असणं पण त्यांना दिलासा देणारं ठरेल.
खास करून जी लहान मुलांसाठीची मार्गदर्शित ध्यान आहेत त्याने सुरुवात करा. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी निर्देशित केलेली ‘योगनिद्रा’ ही खूप गहिरा विश्राम मिळवून देते, मुलांना आणि मोठ्या लोकांना पण. योगनिद्रा आडवं झोपून करायची असल्यामुळे मुलांना फारसा आटापिटा न करता ते करणं सहज जमतं.
पालक म्हणून तुम्ही सुद्धा आराम मिळण्यासाठी श्वासोच्छ्वासाचे तंत्र शिकून घेतलेत तर फारच उत्तम.
योगासनांसोबतच श्वासोच्छ्वासाचे तंत्र आणि ध्यान हे सर्व मुले ऑनलाईन उत्कर्ष योग कोर्स मध्ये सहभागी होऊन शिकू शकतात.
लिखाण आर्ट ऑफ लिव्हिंग च्या शिक्षिका प्राजक्ती देशमुख यांनी दिलेल्या माहिती वरून संकलित केले आहे.
तुम्हाला कसे वाटले ते ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.