सुमारे चाळीस वर्षांपूर्वी, जेव्हा गुरुदेव ध्यानाबद्दल बोलत असत, तेव्हा लोकांना वाटायचे की ते तरुण लोकांसाठी नाही, ज्यांची वार्धक्याकडे वाटचाल सुरू झाली किंवा ज्यांना काहीही करायचे नाही, त्यांच्यासाठी आहे. परंतु आज, निखालसपणे हे सिद्ध झाले आहे की ध्यान प्रत्येकाला कोणत्याही वयात मदत करू शकते.
वैकल्पिक सुरुवात: तुम्ही ध्यान का करावे असा विचार करत आहात? चला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारू या, तुम्ही का झोप घेतली पाहिजे? तुम्ही अभ्यास का करायला हवा? तुम्हाला मनोरंजन का बरे हवे असते? तुम्हाला निरोगी का व्हायचे आहे? माणूस तर कसाही जगू शकतो, याचा विचार केला आहे का? तुम्हाला आनंदी का व्हायचे आहे? आपण आनंदी किंवा दुःखी असलो तरीही आपले अस्तित्व तर आहेच.
तुमच्या दिवसभरासाठी अधिक वेळ आणि तुमच्या शरीरासाठी अधिक ऊर्जा वाढवा
आताच्या समाजात, आजच्या आपल्या जीवनात ध्यानाची अशी काय गरज आहे? ध्यान केल्याने आपल्या जीवनात होणारे फायदे बघितल्यास, आपल्याला वाटेल की ते अधिक समर्पक आणि अधिक आवश्यक आहे. प्राचीन काळी, ध्यानाचा उपयोग आत्मज्ञानासाठी, स्वतःचा शोध घेण्यासाठी केला जात असे. आणि ध्यान हा दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. तुम्हाला दुःखावर मात करण्यासाठी, समस्यांवर मात करण्यासाठी. एकदा आत्मज्ञान बाजूला ठेवू या, पण ध्यान हा व्यक्तीच्या क्षमता सुधारण्याचा मार्ग आहे, आजचे सामाजिक आजार आणि ताणतणाव पाहिल्यास ध्यान करणे आवश्यक आहे हे लक्षात येते.
अधिक व्यस्त? अधिक ध्यान!
तुमच्या जीवनात तुमच्यावर जितकी जास्त जबाबदारी असेल तितकी तुम्हाला ध्यानाची जास्त गरज आहे. जर तुम्हाला काही करायचे नसेल तर तुम्हाला ध्यानाची इतकी गरज भासणार नाही, कारण तुम्हाला काही करायचे नाही. तुम्ही जितके व्यस्त असाल, तुमच्याकडे कमी वेळ असेल, तुमच्याकडे जास्त काम असेल, आणि तुमच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षा जास्त असतील, तितकेच तुम्हाला ध्यान करण्याची अधिक गरज आहे, कारण ध्यान केल्याने तुम्हाला केवळ ताणतणावांपासून मुक्ती मिळते असे नाही तर ते तुमची आव्हानांना सामोरे जाण्याची आणि आपले ध्येय साध्य करण्याची क्षमता सुद्धा वाढवते.
आपले नातेसंबंध सुधारा
ध्यानामुळे तुमचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होते. हे तुमच्या गोष्टी, परिस्थिती समजून घेण्याच्या पद्धतीत सुधारणा करते. त्यातून मनात स्पष्टता येते. ध्यानाने आजूबाजूच्या लोकांशी आपला परस्परसंवाद सुधारतो – तुम्ही काय बोलता, तुमची प्रतिक्रिया कशी असते आणि वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये तुम्ही कसे वागता याबाबत तुम्ही अधिक जागरूक होता.
अधिक मोहक व्हा
ध्यानाचा एक सूक्ष्म फायदा म्हणजे आपल्या शरीरात, आपल्या प्रणालीमध्ये जैव-ऊर्जा वाढीस लागते. तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की, कधी कधी तुम्ही एखाद्याला भेटता आणि विनाकारण तुम्हाला त्यांच्याशी बोलावेसे वाटत नसते? तर इतर काही लोक ज्यांना तुम्ही कधी भेटलेही नाही, तरीही तुम्हाला त्यांच्याशी एक प्रकारची जवळीक वाटते आणि त्यांच्यासोबत सहजपणे वागता. हे सकारात्मक उर्जेमुळे आहे. ध्यान केल्याने आपल्या आजूबाजूला सकारात्मक आणि सुसंवादी ऊर्जा निर्माण होते.
उत्तम आरोग्य
एक अनुभवसिद्ध फायदा म्हणजे ध्यान केल्याने आरोग्य सुधारते. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाच्या समस्या, त्वचेच्या समस्या, मज्जासंस्थेच्या समस्या आणि इतर अनेक समस्यांवर ध्यान कसे मदत करते यावर आता बरेच संशोधन झाले आहे.
नादाकडून मौनाकडे, अस्थिरतेकडून स्थिरतेकडे
आरोग्यविषयक फायद्यांव्यतिरिक्त, ध्यान एकाग्रता सुधारते. हे आपल्याला वर्तमान क्षणात राहण्यास मदत करते. मन भूतकाळ आणि भविष्यकाळात फिरत असते. आपण नेहमीच एकतर भूतकाळाबद्दल क्रोधित असतो किंवा भविष्याबद्दल चिंतित असतो. तर ध्यानामुळे आपले मन भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यात झोके घेण्याऐवजी वर्तमानात अधिक स्थिर राहण्यास मदतीचे ठरते.
आपल्या भावनांचे संवर्धन करा
भावनिकदृष्ट्या, तुम्हाला हलकेफुलके, तरल आणि शुद्ध वाटू लागते. आपण भूतकाळातील सर्व कटू अनुभव सोडून देऊ लागता. यामुळे तुमच्या भोवताली सकारात्मक स्पंदने निर्माण होतात, तुमच्या इतरांसोबतच्या वर्तनावर आणि तुमच्यासोबतच्या इतरांच्या वर्तनावर सकारात्मक परिणाम होतो. ध्यान केल्याने कमीत कमी वेळेत गहिरी विश्रांती मिळते.
आत्म्यासाठी अन्न
ध्यान हे आत्म्याचे अन्न आहे; ते तुमच्या अस्तित्वाच्या गाभ्याचे पोषण करते. संगीत हे भावनांचे अन्न आहे; ज्ञान हे बुद्धीचे अन्न आहे; मनोरंजन हे मनाचे अन्न आहे आणि ध्यान हे आपल्या आत्म्याचे अन्न आहे.
सारांश
तर ध्यानाचे असे अनेक फायदे आहेत. जर तुम्हाला आनंदी आणि निरोगी व्हायचे असेल तर तुम्हाला ध्यान करणे आवश्यक आहे, असे तुम्ही म्हणू शकता. हे इतके सोपे आहे.
आपले आरोग्य आणि आनंद साध्य करण्याचा प्रवास आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ‘सहज समाधी ध्यान’ कार्यक्रमाने सुरू करा.