आपल्या अस्तित्वाचे सात स्तर आहेत, ते म्हणजे शरीर, श्वास, मन, बुद्धी, स्मृती, अहंकार आणि आत्मा. परंतु बऱ्याचदा, या प्रत्येक स्तराचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो याची आपल्याला जाणीव नसते. श्वास शरीराला नियंत्रित करतो; आपण घेतलेल्या निर्णयांचा परिणाम आपल्या प्रतिक्रियांवर होतो; अहंकार आपल्या वर्तनावर परिणाम करतो; स्मृती आपल्या आयुष्यात घडलेल्या घटना जतन करते; आणि आत्मा आपल्याला शुद्ध करतो. आरोग्य हे आपल्या शारीरिक अस्तित्वापुरते मर्यादित नाही तर त्यापलिकडेही आहे. मन-शरीर यांच्यातील समन्वय अधिक जाणून घेण्यासाठी, खालील उदाहरणाचा विचार करा.
तुम्ही तुमच्या स्वप्नवत नोकरीसाठी दररोज दिलेल्या मुदतीत काम संपवण्यासाठी धडपड करत आहात, तुमचे सुंदर कुटुंब आहे, प्रिय मित्र आहेत, परंतु तणावामुळे तुम्हाला पाठदुखीचा त्रास झाला आहे. आता या शारीरिक त्रासाचा परिणाम, तुमच्या रोजच्या कामगिरीतही दिसू लागेल व कामाचा खोळंबा होऊन जाईल. अशा प्रकारे आपण मन-शरीर समन्वयाचा प्रभाव समजू शकतो. शरीर तंदुरुस्त असले की मनही शांत आणि प्रसन्न राहते व मन प्रसन्न असले की शरीर ही स्वस्थ होते.
मन-शरीर समन्वय साधण्याचे ४ फायदे
- मानसिक आरोग्य सुधारते
आपल्या शारीरिक स्वास्थ्याचा परिणाम आपल्या मानसिक स्थितीवर होतो. तुमच्या लक्षात आले असेल की, मानसिक आरोग्याच्या रुग्णांमध्ये नैराश्य, चिंता, स्वतःबद्दल असुरक्षित वाटणे इत्यादी विकार त्यांना दुर्बल आणि निस्तेज बनवतात. दीर्घकालीन वेदना व्यक्तीला संपूर्ण काळ वाईट मनःस्थितीत ठेवते. त्यामुळे, मन व शरीराच्या संबंधामध्ये अधिक सुसूत्रता आणणाऱ्या उपायांचा अवलंब केल्याने खूप मदत होते.
- व्यसनमुक्तीसाठी फायदेशीर
शरीर मनाला अनेक प्रकारे प्रभावित करते. हे समजून घेतल्याने तुम्हाला मन-शरीरावरील समन्वयाचा वापर करून व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी योजना तयार करण्यास मदत होऊ शकते. हे करताना स्वतःशी सकारात्मक गोष्टींबाबत चर्चा करत राहणे खूप महत्वाचे आहे. व्यसनातून बाहेर पडताना सकारात्मक आत्म-चर्चा खूप महत्वाची असते. तुम्ही यापुढे व्यसनाधीन राहणार नाही हे ठरवले तर तुम्ही त्याच पद्धतीने वागाल, परंतु याउलट तुम्ही व्यसनांचाच विचार करत राहिलात तर तसेच वागत राहाल.
- तणावाचे व्यवस्थापन करण्यास मदत होते
मन आणि शरीरामधील समन्वय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतल्याने तणावपुर्ण परिस्थितींना तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊ शकता. तुम्हाला प्रत्येक गोष्टीला त्वरित प्रतिक्रिया देण्याची गरज वाटत नाही , तुम्ही भावनिक स्तरावर अधिक लवचिक व मजबूत बनता , ज्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत ही तुम्ही तुमच्या मुळ शांतिपूर्ण स्वभावात परत यायला शिकता.
- दीर्घ आणि निरोगी आयुष्याकडे नेते
जीवनातील विविध आव्हाने, शारीरिक किंवा मानसिक धक्के, जसे की शस्त्रक्रिया, प्रेमभंग इत्यादींशी लढण्यासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी, मन आणि शरीरामधील समन्वय सुधारणे आवश्यक आहे.
शरीर-मन समन्वय सुधारण्याचे ५ मार्ग
योग आणि ध्यान हे मनातील जागरूकता वाढवतात आणि शरीराची लवचिकता वाढवतात. जेव्हा आपण आत्मविश्वास अनुभवू लागतो आणि आपल्या भावनांवर ताबा येतो, तेव्हा त्याचा आपल्या एकूण दृष्टिकोनावर परिणाम होतो.
- सुदर्शन क्रिया
आपल्या श्वासोच्छवासाची शैली बहुतेक वेळा आपल्याला मानसिक अथवा भावनिक स्तरावर कसे वाटते हे प्रतिबिंबित करत असते . जसे की, जेव्हा आपण तणावाखाली असतो, तेव्हा आपला श्वास उथळ असतो आणि याउलट आपण आनंदी असतो तेव्हा आपला श्वास खोल असतो. सुदर्शन क्रिया ही एक लयबद्ध श्वासोच्छवासाची प्रक्रिया आहे , जी आपल्या मनात स्थैर्य आणते आणि आपल्याला पूर्वकल्पित धारणांपासून मुक्त करते. क्रियेच्या नियमित सरावाने आपण आपले दैनंदिन जीवन सहजसोप्या मार्गाने अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकतो.
- खोल श्वास घेणे
खोल श्वास घेण्याच्या काही प्रक्रियांमुळे आपली सजगता वाढते ज्यामुळे आपण आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करू शकतो. यामुळे आपल्या मेंदूचे कार्य सुधारते आणि हे तंत्र आपल्याला दीर्घकालीन वेदनांशी लढण्यास सक्षम करते.
- मार्गदर्शित प्रतिमा
कोणाचे तरी एखाद्या सुट्टीत, डोंगरावर चढाई करतानाचे फोटो पाहून तुम्हाला आनंद झाला आहे कां ? त्याचप्रमाणे, एखाद्या दिवशी एखादी निराशाजनक बातमी ऐकून तुम्हाला तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत असे घडले तर? याची भीती वाटली आहे कां ? हा सर्व मनात कल्पना केलेल्या प्रतिमांचा प्रभाव आहे. सकारात्मकपणे मार्गदर्शित प्रतिमांचा विचार करण्याचा सराव केल्याने मन-शरीर समन्वय सुधारतो. त्यामुळे आपण उल्हसित होतो आणि आपली ऊर्जा पातळी वाढते.
- योग्य पोषण
पौष्टिक अन्नामुळे तुमचे शरीर क्रियाशील होते आणि त्यामुळे तुमचे मन नियंत्रणात राहते आणि पचनक्रिया अधिक कार्यक्षम होते. आपण सकस आहार घेतल्यास मानसिक आरोग्य सुधारते, तसेच कोणत्याही प्रकारच्या व्यसनाधीनतेमधून बाहेर पडणे सुलभ होते.
निष्कर्ष
मन आणि शरीर हे आपल्याजवळ असलेल्या खजिन्यासारखे आहेत आणि मन-शरीर समन्वयाबाबत समग्र दृष्टिकोन ठेवल्याने वेदनारहित आणि परिपूर्ण जीवनाची हमी मिळते. मन-शरीर समन्वयाला तुम्ही किती व्यवस्थितरित्या समजून स्वतःच्या जीवनात लागू करू शकता हा निर्णय तुम्ही आजच घेतला पाहिजे आणि त्यावर कृती केली पाहिजे. कारण सकारात्मक मानसशास्त्र हे भविष्यात अनेक उपचारांसाठी मार्ग उघडू शकते.