कंपनांची कला
काहीवेळा विनाकारण तुम्हाला काही लोकांशी बोलावेसे वाटते आणि काहीवेळा विनाकारण काही लोकांना टाळावेसे वाटते,खरं आहे ना? तुम्ही हे नक्की अनुभवले असेल. एक छोटे बाळ किंवा पाळीव कुत्रा प्रेमाची जशी स्पंदने व्यक्त करतात तशी कोणीही बोलण्यातून व्यक्त करु शकत नाही. इथली प्रत्येक गोष्ट कंपने उत्सर्जित करते आणि त्या कंपनांमुळे तुमच्या सभोवतालच्या गोष्टी घडतात. खरा संवाद कंपनातून होतो. खरं तर आपण जवळजवळ सर्व विचार आपल्या उपस्थितीद्वारे व्यक्त करत असतो आणि शब्दांद्वारे फारच कमी व्यक्त करत असतो.
हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेला पहिला अणुबॉम्ब तयार करणाऱ्या संघातील एक महान भौतिकशास्त्रज्ञ म्हणतात, ‘भौतिक वस्तु (मॅटर)अस्तित्वात नाही हे शोधण्यासाठी मी ३५ वर्षे अभ्यास केला! जे अस्तित्वात आहे ती केवळ कंपने आहेत. आपल्यापैकी प्रत्येकजण कंपने उत्सर्जित करत असतो आणि शोषत असतो. नामजप करुन आणि गाणे म्हणून अशी सकारात्मक स्पंदने निर्माण होतात, तुम्ही ऊर्जेचा एक स्त्रोत बनता. पेटलेला बल्ब आणि बंद असलेला बल्ब यात काय फरक आहे? पेटलेला ऊर्जा उत्सर्जित करत आहे आणि बंद बल्बमध्ये ऊर्जेची कसलीही हालचाल नाही. गाणे म्हणणे ,जप करणे आणि ध्यान करणे हे सर्व म्हणजे बल्ब प्रज्वलित करण्यासारखे आहे.
श्वासोच्छवासाची तंत्रे, ध्यान आणि मंत्रांद्वारे आपण आपल्या आत आणि आजूबाजूला सकारात्मक स्पंदने पुन्हा जागृत करु शकतो. विविध अध्यात्मिक पद्धती आणि ध्यान यामुळे आपण वैश्विक चैतन्याशी जोडले जातो.
ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत
ऊर्जेचे चार प्रमुख स्त्रोत आहेत:
१. अन्न
प्राचीन काळी आपल्याकडे, जर कोणी विचित्र वागत असेल तर ‘तुम्ही असे का वागताय ?’ असे विचारण्या ऐवजी ‘ याला काय खायला दिले?’ किंवा ‘याने काय खाल्ले?’ अशी विचारणा लोक करत असत! एका अर्थाने हे खरेही आहे! अन्नाकडे योग्य लक्ष दिले पाहिजे.अन्न हा ऊर्जेचा पहिला स्त्रोत आहे.
२. झोप
एकाद्या सर्वसामान्य माणसाला जर दोन दिवस झोपू दिले नाही तर तो सामान्य राहणार नाही,विचित्र बनेल.त्याच्या वागण्यात आमूलाग्र बदल होईल. म्हणून झोप किंवा योग्य विश्रांती महत्त्वाची आहे.
३. श्वास
हा ऊर्जेचा तिसरा स्त्रोत आहे. काही मिनिटे श्वासोच्छ्वास आणि काही योगासने यामुळे शरीर आणि मनाला ऊर्जा मिळते आणि चेतनेचा स्तर वाढतो .
४. आनंदी मन
सुखदायक मन जास्त शांत आणि एकाग्र असते. काही मिनिटे ध्यान केल्याने मन प्रसन्न आणि आरामदायक होते.
हे झाले ऊर्जेचे चार स्त्रोत.यापैकी पहिले दोन (अन्न व झोप) लोकांना काही प्रमाणात माहीत आहेत, तरीही त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. इतर दोन स्त्रोतांबद्दल (श्वास व आनंदी मन) लोकांना ठाऊक असणे किंवा सांगणे आवश्यक आहे. हा आपल्या शिक्षण व्यवस्थेचा एक भाग असायला पाहिजे.
ऊर्जेचा खेळ
जेव्हा ऊर्जा जास्त असते, तेव्हा तुम्हाला आनंदी वाटते आणि ऊर्जा त्याहूनही जास्त असते, तेव्हा तुम्हाला उत्साही वाटते. जेव्हा तुम्ही पूर्ण ऊर्जावान होता तेव्हा तुम्हाला अत्यानंद होतो. जेव्हा ऊर्जा प्रमाणात असते तेव्हा तुम्हाला सामान्य वाटते. ही ऊर्जा काही प्रमाणात कमी झाली की आपल्याला शंका येतात,आपण प्रत्येक गोष्टीवर संशय घेऊ लागतो.आपण स्वतःवर संशय घेतो,इतरांवर संशय घेतो,आपण सर्व जगावर संशय घेतो. संशय हे प्राण ऊर्जा कमी असल्याचे लक्षण आहे. जेव्हा ऊर्जा वाढते तेव्हा हे बदलते,वाढीव ऊर्जा विश्वास आणते, उत्साह आणते.
जेव्हा ऊर्जा कमी असते, तेव्हाच नैराश्य येते. जेव्हा ऊर्जेचा पारा खाली येतो तेव्हा तुम्हाला कशातही उत्साह वाटत नाही,उदास वाटते. जेव्हा तो आणखी खाली जातो, तेव्हा तुमची जगण्याची इच्छा नाहीशी होते. तर अशा वेळी तुम्ही काय केले पाहिजे? समजा,तुम्ही कुणाला औषध देता. ते काही काळ काम करते.नंतर त्याचा प्रभाव पडत नाही.औषधोपचार हा उपाय नाही. मग तुम्ही आणखी काय करु शकता? तुम्हाला व्यायाम, योग्य आहार,ध्यान, श्वास, सुदर्शन क्रिया या आणि अशा सर्व प्रक्रियांद्वारे तुमच्यातील प्राण वाढवावा लागेल.त्यामुळे ऊर्जेची पातळी वाढेल. म्हणूनच ध्यान करणे खूप महत्वाचे आहे.
प्राण – जीवन ऊर्जा
आपल्या शरीरातील प्राणाच्या किंवाऊर्जेच्या हालचालीमुळे आपल्याला अतिशय उत्साह,आत्मविश्वास अशा भावना निर्माण होत असतात. जर आपल्याला आपल्या प्राणाचे, आपल्या ऊर्जेचे नियमन कसे करावे हे ठाऊक असेल, तर “अरे! मला आज खूप वाईट वाटतंय. मी दुःखी आहे!”, असं म्हणण्याची वेळ येणार नाही…
आपल्या शरीरात १,७२,००० ऊर्जेच्या वाहिन्या असतात. एक लाख बहात्तर हजार ऊर्जा वाहिन्या, त्यांना नाडी असे म्हणतात. या ऊर्जेच्या वाहिन्या आहेत, प्राणाच्या वाहिन्या आहेत. वेगवेगळ्या नाड्या कार्यान्वित झाल्या की वेगवेगळे अनुभव येतात. कधी कधी तुम्हाला खूप सर्जनशील वाटते हे तुमच्या लक्षात आले आहे का? तुम्हाला एखादे गीत लिहायचे असेल किंवा काहीतरी नवीन रचनात्मक करायचे असेल,त्यावेळी खूप सर्जनशील वाटते.असे कधीतरीच घडते.जेव्हा ते घडते तेव्हा तुमच्या मेंदूत काहीतरी होत असते,एक नाडी उघडते. कधी नाडी बंद पडते, मग डोक्यात चिंता घर करतात. तुम्हाला माहिती आहे, काळजी करणे व्यर्थ आहे परंतु एखादी विशिष्ट नाडी कार्यरत असल्यामुळे किंवा ती नाडी खुली असल्याने तुम्ही फक्त काळजी करत बसता.
तुमची ऊर्जा जास्तीत जास्त प्रमाणात राखण्याचे ५ मार्ग
- तणावापासून मुक्त व्हा.
- मन मोकळे ठेवा.
- इतरांबरोबर वाटून घेण्यात आनंद आहे याचा अनुभव घ्या. देण्यात आनंद आहे. हे जाणून घ्या.
- आयुष्याकडे एका व्यापक दृष्टीने पहा. आपण इथे कायमचे राहणार नाही आहोत. हे सारे काही संपणार आहे. असा विचार, अशा विचाराची एक झलक…. यामुळे खूप फरक पडू शकतो!
- ध्यान करा. ध्यान ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही दररोज केली पाहिजे. हे आपले स्वतःशी असलेले नाते अधिक मजबूत करते.
कंपनांची कला
आपले मन इतके संवेदनशील आहे की ते आपल्या सभोवतालच्या इतरांच्या विचार लहरी आणि कंपनांना पकडू शकते. जर तुम्ही फक्त १० मिनिटे रागावलेल्या, नाराज किंवा नकारात्मक असलेल्या व्यक्ती जवळ बसलात आणि नंतर दूर गेलात तर तुम्ही दूर गेल्यावर, तुम्ही त्या व्यक्तीकडील निराशाही तुमच्या बरोबर घेऊन जाता. जेव्हा तुम्ही आनंदी लोकांच्या सहवासात थोडा वेळ घालवता, उदाहरणार्थ लहान मुलांबरोबर,आणि जेव्हा तुम्ही तिथून निघता तेव्हा तुम्ही त्यांच्याकडच्या आनंद आपल्या बरोबर घेऊन येता.
आपले शरीर सतत ऊर्जा आणि कंपने उत्सर्जित करत असते. आपण सदा सर्व काळ ऊर्जा उत्सर्जित करत असतो.आपण केवळ भौतिकदृष्ट्याच पर्यावरण प्रदूषित करत नाही तर मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही पर्यावरण प्रदूषित करत असतो.जेव्हा आपण तणावग्रस्त आणि दुःखी असतो तेव्हा आपण वातावरण अधिक प्रदूषित करतो. आनंद म्हणजे आपल्या आतून येणारी शुद्ध स्पंदने. आपण सर्वजण आनंदी जन्माला आलो आहोत, प्रत्येक मूल आनंदी जन्माला येते आणि आपण आनंद उत्सर्जित करतो, पण आपण मोठे होत जातो, शिकतो,आजूबाजूच्या लोकांशी व्यवहार करतो ,अशावेळी कुठेतरी आपण सर्वजण लहानपणीची शुद्धता आणि निर्मळता गमावून बसतो. निरागसता, साधेपणा, प्रामाणिकपणा या आपल्या खऱ्या स्वभावाकडे परत जाण्याची गरज आहे.तसे झाल्यावरच आपण आजूबाजूचे वातावरण आनंदी ठेवू शकतो.
एका शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे की आपल्या मेंदूमध्ये विविध प्रकारचे न्यूरॉन्स असतात आणि काही न्यूरॉन्स असे असतात की जे अडथळे निर्माण करतात. जेव्हा तुमच्या समोरची एखादी व्यक्ती दुसऱ्याला स्पर्श करते तेव्हा आपल्या मेंदूला वाटते ‘तुला स्पर्श केला जात आहे’, परंतु हातात काही न्यूरॉन्स असतात जे मेंदूला सिग्नल पाठवतात की ‘तुला स्पर्श होत नाही’. जर तुमच्या हाताला भूल दिली आणि नंतर कोणी दुसऱ्याला स्पर्श केला तर तुम्हालाही तो स्पर्श जाणवेल. तो (शास्त्रज्ञ) म्हणतो, आपण काही आगळेवेगळे नसून केवळ न्यूरॉन्स आहोत, आपण सर्व जोडलेले आहोत, प्रत्येक जण जोडलेला आहे. आपण सूक्ष्मात जातो तेव्हा आपल्याला आढळते की तेथे फक्त कंपने आहेत आणि तेथे कोणतेही न्यूट्रॉन, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन नाहीत;परंतु जे अस्तित्वात आहे ती आहेत – फक्त कंपने!
ध्यानामुळे आपली ऊर्जा कशी वाढते?
ध्यानामुळे नकारात्मक स्पंदनांचे सकारात्मक स्पंदनात, द्वेषाचे प्रेमात,विफलतेचे आत्मविश्वासात, निराशेचे आशेत आणि अज्ञानाचे अंतर्ज्ञानात परिवर्तन घडून येते.
१. तणाव दूर होतो
आज जगात ताण तणावामुळे दर दोन सेकंदाला ७ लोक जीव गमावत आहेत. तणाव दूर करण्याचा मार्ग म्हणजे सखोल ध्यान.
आजच्या जगात काय घडत आहे पहा.. जेव्हा लोक तणावग्रस्त असतात, एकतर ते स्वतः दुःखी असतात किंवा ते बाकीच्यांना दुःखी करतात. स्वतःबद्दल आठवा, जेव्हा तुम्ही खूप तणावात असता तेव्हा तुम्ही लोकांवर संतापत असता आणि त्यामुळे इतरांना त्रास होतो. हा अनुभव तुम्हाला नक्कीच आलेला असेल. जेव्हा आपण नेहमीसारखे सामान्य नसतो,आपल्या जाणीवेत नसतो, तेव्हा आपण अशा गोष्टी करतो ज्याने आपल्या आवडत्या आणि जवळच्या व्यक्तींना त्रास होतो. असे घडते ना ?
सगळीकडे आनंद पसरविणे हा आपल्या जीवनाचा उद्देश आहे. आनंदाच्या लाटा निर्माण करणे, हो ना ? होय. तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही करता, ते कशासाठी करता? अधिक आनंद आणि अधिक आनंद, आणि अधिकाधिक आनंद. बरोबर? आणि आनंद तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण तणावमुक्त असतो आणि जगाकडे व्यापक दृष्टीकोनातून पाहण्याचे पुरेसे शहाणपण आपल्याकडे असते.ताणतणाव टाळण्यासाठी जीवनात ज्ञानाची गरज असते किंवा जेव्हा तणाव सहन करावा लागतो तेव्हा तणाव टाळण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? बुद्धी, एक व्यापक दृष्टी. जे तणाव आधीपासूनच आहेत, त्यापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला तंत्राची गरज आहे.
आपल्यापैकी प्रत्येकजण कंपने उत्सर्जित करत असतो आणि जेव्हा आपण तणावग्रस्त, रागावलेले, अस्वस्थ आणि निराश असतो तेव्हा ही कंपने प्रदूषित होतात. आपले अस्तित्व आणि आपली स्पंदने शुद्ध करण्याचा मार्ग म्हणजे ध्यान.
२. मन शांत करा
मनाला शांती मिळवून देण्यासाठी ध्यानाहून श्रेष्ठ दुसरे काहीही नाही.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
ध्यान हे आपले मन शांत करण्याचे आणि आपल्यातील ऊर्जेचा विपुल स्त्रोत ओळखण्याचे कौशल्य आहे. दररोज ध्यान केल्याने आपल्याला आंतरिक ऊर्जेचा वापर करण्यास मदत होते,अशी ऊर्जा जी अस्तित्वात आहे हे आपल्याला आधी कधीच माहिती नव्हते. जेव्हा आपण एकाग्र आणि शांत असतो आणि आपल्यातील शांततेचा अनुभव घेतो, तेव्हा आपणास सर्वकाही ठीकठाक आहे हे जाणवते.
३. आंतरिक शांती स्थापित करा
ध्यानामुळे आंतरिक शांतीची शाश्वती मिळते. जेव्हा आंतरिक शांती असते तेव्हा तुम्ही बाहेरही शांतता मिळवू शकता. जर तुम्ही चिडलेले असाल, निराश असाल तर तुम्ही बाहेर शांतता निर्माण करु शकत नाही. ‘दानाची सुरुवात घरातूनच होते.’ शांतता देण्यासाठी तुमच्या आत शांतता असली पाहिजे.
शांती म्हणजे केवळ शांतता व्यक्त करणारे शब्द नाहीत. शांतता एक स्पंदन आहे. जेव्हा आपल्याला स्वतःमध्ये शांती मिळते तेव्हा आपण शांतता पसरवतो.
४. वर्तमान क्षणातील परमानंद
वर्तमान क्षणात असलेले मन म्हणजे ध्यान.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
प्रत्येक क्षणी तुमच्या मनात काय चालले आहे याचे तुम्ही निरीक्षण केले आहे का? ते भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यात दोलायमान असते. मन हे एकतर भूतकाळात जे घडले त्यामध्ये व्यस्त असते किंवा भविष्यात आपल्याला काय करायचे आहे याचा विचार करत असते. ज्ञान म्हणजे मनात घडणाऱ्या या गोष्टीची जाणीव असणे — तुम्ही हा लेख वाचत असताना तुमच्या मनात सध्या काय घडत आहे?
पुस्तके वाचून किंवा इंटरनेटवरुन माहिती मिळवता येते. वजन कसे कमी करावे, मुलाखतीची तयारी कशी करावी, हमखास यश मिळविण्याचे १०१ उपाय वगैरे. कोणत्याही विषयावर तुम्ही पुस्तक उघडून वाचू शकता. असंख्य विषयांवर असंख्य खंड उपलब्ध आहेत, पण स्वतःच्या मनाबद्दल जागरुक असणे हे पुस्तकातून शिकता येत नाही.
आनंद, उल्हास,उत्साह, कार्यक्षमता आणि परिणामकारकता हे सर्व वर्तमानात आहे. ध्यान केल्याने, तुम्ही वर्तमान क्षणात जगण्याची क्षमता प्राप्त करता आणि भूतकाळ सोडण्यास सक्षम होता.
५. सकारात्मक ऊर्जा बाहेर सोडा
मनाची आणखी एक प्रवृत्ती आहे – ते नकारात्मकतेला चिकटून राहते. १० सकारात्मक घटना घडल्यानंतर जर एक नकारात्मक घटना घडली तर मन नकारात्मकतेला चिकटून राहते. ते १० सकारात्मक गोष्टी साफ विसरुन जाईल. जेव्हा कोणी तुमच्याबद्दल काही नकारात्मक बोलतो तेव्हा किंवा तुमच्या जवळच्या मित्राला खूप उदास वाटत असते,तेव्हा अचानक तुम्हालाही तसेच वाटू लागते, तुमची संपूर्ण ऊर्जा कमी होते. जर तुमचा कामाच्या ठिकाणी एखाद्या मित्राबद्दल किंवा सहकाऱ्याबद्दल गैरसमज झाला असेल तर तुम्ही आतून ताठर होऊ शकता आणि यामुळे तुमच्या भावना बदलू शकतात. त्यामुळे नकारात्मकता येते आणि जिथे कुठे तुम्ही जाता, तुम्ही ही नकारात्मकता आपल्या बरोबर घेऊन जाता. तथापि, जेव्हा तुमचे मन ध्यानाने सुसंस्कृत होते तेव्हा नकारात्मक भावनांना धरुन ठेवण्याची मनाची प्रवृत्ती नाहीशी होते.
जेव्हा तुम्हाला समजेल की आपल्या कंपनांमुळे जगात गोष्टी घडून येतात, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सर्वकाही आपल्या नियंत्रणात आहे.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
जेव्हा आपण विचार करतो की नकारात्मक गोष्टी होणार आहेत, तेव्हा तेच बीज आपण विश्वात पेरत असतो आणि तसेच होते! आपल्या सकारात्मक विचारांनी, सकारात्मक कल्पनांनी, सकारात्मक संकल्पाने सकारात्मकच घडते. असे म्हणतात की, तुमच्यातून सकारात्मक स्पंदने बाहेर येऊ द्या. तुमच्यात नकारात्मक विचार येतात, तरीही तुम्ही सांगा, सर्व काही सकारात्मक आहे. आणि ते कसे घडते? नुसता विचार करुन नाही तर विश्राम करुन. दुसऱ्या विचाराने पहिला विचार तोडणे हे केवळ वरवरचे आहे. परंतु शांततेने (ध्यानाने), सोडून देऊन, भक्तीने, श्रद्धेने, देवाला शरण जाऊन विचार तोडणे अधिक सखोल आहे.
एखाद्या ठिकाणी प्रवेश केल्याने आपल्याला ताजेतवाने;उत्साही वाटते. हे तुमच्यापैकी किती जणांनी अनुभवले आहे? का बरे असे वेगळे वाटते? तुम्हाला माहीत आहे, असे का होते? कारण इथे लोक ध्यान करतात. ध्यान केल्याने संपूर्ण परिसरातील ऊर्जा उच्च राहते. हा ध्यान, ज्ञान आणि भक्तीचा परिणाम आहे.
सारांश
आपणच संसारात रंग भरत असतो; विरुद्ध मूल्ये पूरक आहेत. पुढे जात राहा. तुम्ही जसे आहात तसे राहा आणि आरशात बघून स्वतःला म्हणा, “मी तुझा स्वीकार करतो!” जर तुम्ही ज्ञान आत्मसात केले असेल, तर तुम्ही दुःखी होऊ शकत नाही. आनंददायी दिवस असणार आहेत आणि अप्रिय दिवस असणार आहेत. चांगले लोक असतील, आणि वाईट लोक असतील. कधी तुमचे मित्र तुमच्या शत्रू सारखे वागतील तर कधी तुमचे शत्रू तुमचे चांगले मित्र बनतील. हे सर्व जगण्याच्या पद्धतीचा भाग आहे, या गोष्टी घडतात. त्या तुम्हाला केंद्रित आणि मजबूत बनण्यास मदत करतात. मग, कोणतेही वादळ तुम्हाला डगमगवू शकत नाही.हे ओळखण्यात खरा शहाणपणा आहे! माझे इतर सर्व बोलणे जरी तुम्ही विसरलात तरी, मी सांगितलेले हे पाच मुद्दे जर तुमच्या लक्षात राहिले तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही गड सर केला! तुम्ही जिंकलात! म्हणूनच त्याला माया म्हणतात. हे सर्व विचार आणि भावना, जे आपल्याला वास्तविक वाटतात, ते अवास्तव आहेत, एक भ्रम आहे. इतरांबद्दलच्या, आपल्याबद्दलच्या आपल्या संकल्पना,या सगळ्या अवास्तव आहेत. त्या सर्व सोडून द्या आणि जागे व्हा! तुम्हाला दिसेल, तुम्ही फक्त ओसंडून वाहणारी उर्जा,सळसळता उत्साह आहात! तुम्ही प्रेमाचे कारंजे आहात!!
प्रथम आरशात पहा आणि चेहऱ्यावर छानसे स्मितहास्य आणा.नंतर थोडा दीर्घ श्वास घ्या, थोडा योगाभ्यास आणि ध्यान करा. दररोज स्वत:साठी थोडा वेळ द्या आणि तुम्ही अधिक उत्साही आणि सुंदर व्हा!!
आपल्यापैकी प्रत्येकजण ऊर्जा, प्रेम आणि शांतीचा स्त्रोत आहे. जर आपण आपल्या अंतर्मनात प्रवेश केला आणि शक्ती प्राप्त केली तर आपण कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकतो.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
दिवसभर शांतता, ऊर्जा आणि विस्तारित जागरुकता आणण्यासाठी मज्जासंस्थेचे संवर्धन करुन ध्यान तुमच्या जीवनाची गुणवत्ता बदलू शकते. तुम्ही कोणत्याही अटीशिवाय जीवनातील विविध आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम होता.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
निर्दोषपणे ध्यान कसे करावे ते आजच शिका – सहज समाधी ध्यान!
काय म्हणता ? तुम्हाला वाईट वाटते आहे? चला, जागे व्हा. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमच्या भावनांचे मालक आहात! तुम्ही तुमच्या भावनांचे गुलाम आहात असे वाटून घेऊ नका! आपल्याला असे वाटते की आपल्या हातात बेड्या ठोकल्या आहेत, आपण आपल्या स्वतःच्या भावनांच्या पिंजऱ्यात आहोत. पण हे ज्ञान किंवा हे व्यायाम, हे ध्यान आपल्याला खंबीर होण्यास,आपला आत्मा स्वतःहून उन्नत करण्यास, आपले चैतन्य उच्च ठेवण्यास, आपला उत्साह, आपल्या ऊर्जेची पातळी उच्च ठेवण्यास मदत करते. जेव्हा आपली ऊर्जा जास्त असते, तेव्हा तुम्ही एक सुंदर व्यक्ती असता. जेव्हा तुमची ऊर्जा कमी असते, तुम्हाला माहिती आहे, तेव्हा तुम्हाला असे वाटते की, आपले केवढे ओझे स्वतःवर आणि इतरांवर आहे!! तुमची ऊर्जा वाढवणे तुमच्या हातात आहे.त्यासाठी आपण आतापर्यंत अनेक तंत्रे समजून घेतली आहेत.