लक्ष विचलित होण्यावर मात करा
तुम्ही इथे आहात आणि तुम्हाला एकाग्रता साधण्याची इच्छा आहे. हे मुळात चांगले आहे की, तुम्ही यासाठी आधीच लक्ष केंद्रित केले आहे. तुम्हाला याची जाणीव आहे की तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे आहे आणि तुम्हाला समजत आहे की तुम्ही विचलित होत आहात, याचा अर्थ तुम्ही केंद्रित होत आहात.
एकाग्रता म्हणजे – मनाला त्याच्या स्वभावाविरुद्ध एका बिंदूवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करणे. तुम्ही तुमचे मन एका जागी केंद्रित करण्याचा प्रयत्न करता, जो मनाचा स्वभाव नाही. मन एका गोष्टीवरुन दुस-या गोष्टीकडे उड्या मारत असते आणि जे मोहक आहे त्याहून अधिक मोहक असलेल्या गोष्टीकडे जाते.
तर आपण आपल्या मनावर जबरदस्ती करत असतो. मुले खूप ताणतणावाखाली असतात कारण त्यांचे मन त्यांच्या नैसर्गिक आवडीनुसार नसलेल्या गोष्टीकडे बळजबरीने नेले जाते. त्यांना अशा विषयांचा अभ्यास करण्यास भाग पाडले जाते ज्याकडे त्यांचा कल कमी असतो. मग, त्यामुळे खूप ताण येतो.
लक्ष विचलित होणे : न बोलवता येणारे पाहुणे
तुम्ही अनुभवले असेल की डोळे बंद करताच आपण आपल्याच विचारात, आपल्या स्वप्नात हरवून जातो. डोळे उघडे असले की, आपण इथे बाहेरच्या जगात हरवून जातो. डोळे उघडे असले की, आपण एका परिमाणात हरवून जातो आणि डोळे मिटले की थोडे दूर वाहून जात दुसऱ्या परिमाणात हरवून जातो.
मन एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीकडे झेपावते म्हणून विचलित होत जाते. मन नेहमी आणखी मोहक असलेल्या गोष्टीकडे वाहत जाते. जेव्हा तुम्ही खूप चांगले जेवण घेत असाल तेव्हा तुम्ही जेवणाकडे लक्ष देता. मात्र, जेव्हा टेलिव्हिजनवर एकादा चांगला कार्यक्रम लागतो किंवा सुंदर दृश्ये येतात, तेव्हा तुम्ही जेवण विसरुन ती दृश्ये बघू लागता. तुमचे मन इकडून तिकडे जाते. तुमचे मन नेहमी एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीकडे जाते आणि ते नेहमी अधिक आनंददायी असलेल्या गोष्टीकडे जाते. मनाला कमीतकमी हे समजते की काहीतरी अधिक आनंददायी आहे. ’ते काहीतरी’ म्हणजे खरोखर आनंदाचा स्रोत असेलच असे नाही. खरं तर, नसतोच!
त्यांना समजून घ्या
तुम्हाला काय विचलित करत आहे ते पहा. इंद्रिये सातत्याने उत्तेजित झाल्यास जडत्व येऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्ही खूप चित्रपट पहात आहात. जेव्हा तुम्ही बरेच चित्रपट पाहता तेव्हा मनावर अनेक संस्कारांचा भडिमार होतो आणि त्यामुळे मन खूप गोंधळून जाते. तुम्हाला सिनेमे पाहण्याची सवय झालेली असते. म्हणून एका आठवड्यासाठी चित्रपट कमी करा.
आपण थेट मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही, हे लक्षात घ्या. ते शक्य नाही. सराव आणि अनुभवाने मन स्थिर होईल.
निमंत्रित व्यत्यय चांगले आहेत!
तुम्ही जे काही करत आहात ते सोडून द्या आणि पूर्णपणे असंबद्ध असे काहीतरी करा, उदा. तुमच्या घराच्या सजावटीचे काम चालू असेल तर मध्येच गवत कापण्यासाठी थोडा वेळ काढा किंवा खरेदीसाठी बाहेर जा! जेव्हा तुम्ही खूप महत्त्वाचं काम करत असाल, तेव्हा त्यापेक्षा वेगळे आणि क्षुल्लक काम करण्यासाठी थोडा वेळ काढा. यामुळे तुमची सर्जनशीलता वाढते. संबंधित कृती तुम्हाला त्या कृतीत अडकवून ठेवते. असंबद्ध कृती आयुष्यात गंमत आणते!
एकाग्रतेचे मित्र
प्रेम :
जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल तर तुम्हाला तिथे लक्ष केंद्रित करण्याची गरज पडत नाही. तिथे एकाग्रता असतेच. प्रेम आपल्या बरोबर एकाग्रता सुद्धा आणते. समजा तुम्हाला एखादी डिश आवडली, किंवा तुम्हाला एखादा चित्रपट आवडला, तर दोन-तीन तास तुमचे लक्ष तिथे खरोखरच केंद्रित असते. तुमचे लक्ष टेलिव्हिजनवर, स्क्रीनवर राहते कारण तुम्हाला ती गोष्ट आवडते. ज्या गोष्टीची आवड असेल तिथे मन एकाग्र होते.
लोभ आणि भीती :
लोभ तुम्हाला आवडत नसलेल्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात मदत करु शकतो. म्हणून, इच्छित परिणाम मिळविण्यासाठी कोणी लोभी असू शकते, परंतु पराकोटीला जाऊन नव्हे. उदाहरणार्थ, ज्ञानाचा थोडासा लोभ ठीक आहे, परंतु जेव्हा तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असते, तुम्हाला शिकायचे असते, तुम्हाला त्वरित सर्वोच्च पायरी गाठायची असते,तेव्हा तुम्हाला चालना मिळते (एकाग्रता आणण्यास मदत होते ), पण लोभ जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर ते काम आपण बिघडवतोय हे लक्षात घ्यायला हवे.
पण जेव्हा लोभ असतो तेव्हा त्याबरोबर भय आपोआप येते. अपयशाचे भय तुम्हाला अधिक तीक्ष्ण आणि गतिमान बनवते. भीती तुम्हाला योग्य मार्गावर ठेवते. कारण भीती ही प्रेमाचेच उलटे रूप आहे. प्रेमाने ज्या गोष्टीचा अर्थ लावला जाऊ शकतो त्या गोष्टीचा अर्थ भीतीने देखील लावला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, लहान मुलामध्ये किंचित भीती असते, म्हणून ते मूल चालताना सावध आणि सजग (केंदित) असते.
वैराग्य :
वैराग्य एकाग्रता आणू शकते. ‘मी वैराग्य आचरणात आणणार आहे’ असे म्हणणे किंवा त्याचा बळेबळेच सराव करणे असे होत नाही. मन म्हणते, ‘आपल्याला हे करायचे आहे’ आणि तुम्ही म्हणता, ‘नाही, मला वैराग्य हवे आहे’. ही बौद्धिक कसरत नसून एक आचरण आहे.
मनाची तळमळ, लालसा तुम्हाला वर्तमान क्षणात राहण्यापासून रोखू शकते. वैराग्य तुम्हाला वर्तमान क्षणाशी इतके पूर्णपणे जोडते की तुम्ही जे काही करता त्यात तुम्ही शंभर टक्के रममाण असू शकता. वैराग्य तुम्हाला आनंद, समाधान आणि शक्ती प्रदान करते.
श्वास :
श्वासाच्या साहाय्याने तुमचे मन एकाग्र होऊ शकते. श्वासाचा तुमच्या मेंदूवर आणि मनावर परिणाम होत असतो. रागावलेले असताना किंवा उत्साही असताना,दुःखी असताना किंवा खूप निवांत असताना तुम्ही श्वास कसा घेता हे तुमच्या लक्षात आले आहे का? तुम्ही वाचत असताना, तुम्ही कसे श्वास घेत आहात ते पहा. आपल्या श्वासाला एक विशिष्ट लय असते. आणि जर एकाद्याला आपल्या मनावर थेट नियंत्रण मिळवता येत नसेल तर श्वासाद्वारे तो हे शक्य करु शकतो. योग, प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया यामुळे हे काम खूप सोपे आणि मजेदार बनते!
जर तुम्ही तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवू शकत असाल तर तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवू शकता हे जाणून घ्या.
~ गुरुदेव श्री श्री रवि शंकर
आपण कधी विचार केला आहे का की, आपल्याला दोन नाकपुड्या का आहेत? त्या ऐवजी आपल्याला एकच मोठे छिद्र दिले असते! त्यामागे एक कारण आहे! जेव्हा तुम्ही तुमच्या डाव्या नाकपुडीने श्वास घेता तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या मेंदूच्या उजव्या भागावर होतो आणि जेव्हा तुम्ही उजव्या नाकपुडीने श्वास घेता तेव्हा त्याचा परिणाम मेंदूच्या डाव्या भागावर होतो. शास्त्रज्ञांना अलीकडे असे आढळून आले आहे की जेव्हा तुम्ही उजव्या नाकपुडीतून श्वास घेता तेव्हा तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया डाव्या नाकपुडीतून श्वास घेतानाच्या पेक्षा दुप्पट होते.
एकाग्रतेचा खरा सोबती: ध्यान
एकाग्रतेसाठी खूप प्रयत्न करावे लागतात. ध्यान हे प्रयत्नरहित आहे!
एकाग्रता हा ध्यानाचा परिणाम आहे – एकाग्रता म्हणजे ध्यान नव्हे. कसे?
जेव्हा मनाला गहन विश्रांती मिळते तेव्हा ते खूप ताजेतवाने आणि चैतन्यमय होते. आणि त्या गहिऱ्या विश्रांतीनंतर तुमची एकाग्रता उत्स्फूर्त असते. ते स्वाभाविक आहे. एकाग्रता सहज होते, कसलाही ताण न येता.
दुर्दैवाने ध्यान हे जगाच्या अनेक भागांमध्ये एक वेगळी एकाग्रता किंवा चिंतन समजले जाते. पण तसे नाही. ध्यान म्हणजे काहीही न करण्याची कला! हे एक कौशल्य आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचे मन शांत करता आणि काहीही न करता या अवकाशाच्या विशालतेचा अनुभव घेता. तर,अप्रयास ही ध्यानाची गुरुकिल्ली आहे. आणि जर आपण काही मिनिटांचे ध्यान करु शकलात, तर तुम्हाला दिसेल की आपली एकाग्रता सुधारली आहे आणि आपली बौद्धिक क्षमता वाढली आहे.
ध्यान एकाग्रतेद्वारे मनाला तीक्ष्ण करते आणि विश्रांतीद्वारे मनाला विस्तारित करते.
~ गुरुदेव श्री श्री रवि शंकर
तुम्ही ध्यानासाठी बसत असताना तुम्हाला जग जसे आहे तसे राहू द्यावे लागेल. ध्यानाचा सराव म्हणजे इच्छेनुसार आपल्या प्रणालीला क्रियाकलाप थांबवण्यास आणि सुरु करण्यास सक्षम होण्यासाठी सवय लावणे. असे जाणीवपूर्वक करण्याची क्षमता निर्माण होणे हे एक अतिशय मौल्यवान कौशल्य आहे.
लक्ष केंद्रित करण्यासाठी गुरुदेवांनी मार्गदर्शित केलेले ध्यान
तसे पाहता, पूर्वीच्या पिढीकडे जास्त वेळ होता त्यामुळे ते बसून मार्गदर्शित ध्यान आणि इतर सर्व दीर्घकालीन ध्यान करु शकत होते, तास न तास ध्यान करु शकत होते. पण सध्याच्या पिढीमध्ये,ज्या काळात खूप आकर्षणे आहेत, तिथे तुम्हाला श्वासावर अधिक काम करावे लागेल आणि ते अधिक प्रभावी आहे.
एकाग्रता ही ध्यानाची फलश्रुती आहे. तुम्ही थेट एकाग्रता साधू शकत नाही, पण जर तुम्ही काही मिनिटे ध्यान केले तर तुमचे मन खूप केंद्रित होईल आणि तुम्ही एकाग्रता अनुभवू शकाल.
प्राणायाम आणि श्वासोच्छवासाचे चैतन्यदायी व सर्वात प्रभावी तंत्र – “सुदर्शन क्रिया” शिकून आपल्या विचलितपणावर मात करा आणि एकाग्रता वाढवा.