आपण पदार्थ आणि आत्मा या दोन्ही पासून बनलेले आहोत. याचाच अर्थ असा की आपली त्वचा ही केवळ दृश्यमान बाह्य थर नसून क्रिया कलापानी भरलेली आहे. शरीराच्या इतर भागांप्रमाणेच हा एक अवयव आहे आणि त्याला निरोगी ठेवणे आणि पोषण देणे आवश्यक आहे.
तथापि सौंदर्य ही एक आंतरिक इंद्रियगोचर बाब आहे. प्रचलित म्हणीप्रमाणे, सौंदर्य हे प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात असते आणि ते नैसर्गिक रित्या एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तेज म्हणून प्रतिबिंबित होते. सौंदर्याची व्याख्या ही त्वचेच्या पलीकडे जाते मात्र त्वचा ही सौंदर्याची सर्वात दृश्यमान अभिव्यक्ती आहे.
आधुनिक काळातील सौंदर्योपचार शारीरिक गरजा पूर्ण करतात , परंतु आपण आपल्या त्वचेच्या प्रत्येक पेशीला कसे चमकवू शकतो, ऊर्जा आणि तेजाने कसे प्रफुल्लित करू शकतो हे सांगत नाहीत.
वय, ताणतणाव ,धूम्रपान अंमली पदार्थांचे व्यसन, चुकीच्या आहाराच्या सवयी, संप्रेरकीय बदल व अयोग्य पचन,अस्वास्थ्यकर जीवनशैली ही त्वचेच्या समस्येची सामान्य कारणे आहेत. तेजस्वी त्वचेसाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी अनेक उपाय आहेत.त्यामुळे त्वचा नितळ आणि तजेलदार होण्यास मदत होते.
त्वचा निसर्गतः तेजस्वी होण्यासाठी १२ युक्त्या
-
चमकदार त्वचेसाठी घरगुती उपचार
आयुर्वेदामध्ये सौंदर्य टिकविण्यासाठी अनेक उपाय आहेत. आयुर्वेदिक उटणे किंवा स्क्रब त्वचेला हळुवारपणे पोषण देतात आणि हवा खेळती राहते. आणि महत्त्वाचे म्हणजे स्वयंपाक घरात यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध असतात.
-
निरोगी त्वचेसाठी घाम गाळा
धावणे, सूर्यनमस्कार तुमच्या शरीराला आवश्यक रक्ताभिसरण देईल. घाम येणे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी चांगले मानले जाते. व्यायामानंतर थंड पाण्याने स्नान करा त्यामुळे तुमची त्वचा देखील स्वच्छ होईल.
-
तजेलदार त्वचेसाठी योगाभ्यास करा
अधोमुख श्वानासनाचा सराव करताना तुमच्या लक्षात आले असेल की आपले लक्ष हळुवारपणे श्वासाकडे जाते. योगाभ्यासाचे सौंदर्य म्हणजे जसे ताणले जाते तसे आपले लक्ष शरीरावर व श्वासावर जाते. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकता. योग आणि जाणीवपूर्वक श्वास घेण्याची प्रक्रिया शरीरातील शुद्धीकरणास गती देते ज्यामुळे त्वचा ताजीतवानी आणि प्रफुल्लित होते. यामुळे तेज टिकवून ठेवण्यास मदत होते.
-
आपण कोण आहोत हे जाणून घ्या
काही दिवस असे असतात की जेव्हा तुम्ही कितीही मलम लावले तरीही तुमची त्वचा कोरडीच असते? कधी तुम्ही आणि तुमची मैत्रीण (किंवा मित्र) एकच उत्पादन वापरता मात्र त्याचा परिणाम तुमच्यासाठी वेगळा असतो? प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते म्हणून असे होते. आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्ती वात, पित्त आणि कफ यापैकी दोन किंवा अधिक घटकांचे संयोजन आहे.
विशेष म्हणजे या प्रत्येक घटकांमध्ये विशिष्ट गुणधर्म असतात जे तुमचे शरीर आणि व्यक्तिमत्त्वाचा प्रकार व त्वचेचा प्रकार ठरवतात. तुमची त्वचा कोरडी असल्यास तुमच्यात वात प्रबळ असण्याची शक्यता आहे. पित्त शरीराच्या प्रकारात त्वचा सामान्य असेल तर कफ प्रकृती असलेल्यांची तेलकट असते. तुम्ही कोणत्या प्रकृतीचे आहात हे जाणून घेतल्यास तुम्हाला कोणत्या प्रकारचे अन्न घ्यावे व कोणते टाळावे हे समजण्यास मदत होईल.
-
चेहरा तजेलदार होण्यासाठी नैसर्गिक आहाराचे पालन करा
आपण जसे अन्न खातो तसेच आपण बनतो. त्यामुळे साहजिकच ताजे, स्वच्छ आणि रसाळ पदार्थ खाल्ल्याने आपली त्वचा देखील चैतन्यमय होते. पुरेशी प्रथिने, जीवनसत्वे असलेली फळे आणि पालेभाज्या यांचा समतोल आहार योग्य वेळी योग्य प्रमाणात घ्या.
-
साप्ताहिक नियम (पथ्ये) पाळा
तेलाने चेहऱ्याची हलकीशी मालिश केल्यास आश्चर्यकारक बदल होतात. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही क्षीरबला किंवा नारायण तेल यापैकी एक निवडू शकता. मोहरी, बदाम किंवा कुंकूमादी तेल हे चमकदार त्वचेसाठी उत्कृष्ट पौष्टिक घटक आहेत.
-
सुदर्शन क्रिया हा तुमचा सौंदर्य मंत्र होऊ द्या
योग्य प्रकारे श्वास घेतल्याने डाग आणि मुरमांपासून सुटका होऊ शकते असे तुम्हाला वाटते कां ? होय, हे नक्कीच शक्य आहे. जेव्हा आपण आरामशीर असतो तेव्हा मुरूम आणि पुरळ यांसारखी तणावाची बाह्य प्रकटीकरणे कमी होतात. सुदर्शन क्रिया श्वासोच्छ्वासाचे तंत्र, शरीर आणि मन या दोन्ही मधून जमा झालेले ताण नाहीसे करते. आराम मिळतो व आपल्या शरीरात सुसंवाद आणि संतुलन पुनरसंचयित होते.
-
दररोज ध्यान करा
मेणबत्ती फक्त प्रकाश पसरवू शकते. तुमची अंतर ज्योति किती तेजस्वी आहे यावर ध्यानाचा प्रभाव पडतो. तुम्ही जितके जास्त ध्यान कराल तितके तुम्ही प्रकाशित व्हाल. आपण एखाद्या कलाकारांनी काढलेली ध्यानस्थ व्यक्तींची चित्रे किंवा मूर्ती पाहिल्या असतील आणि त्यांच्या भोवती आभा मंडल दाखवले जाते. हे केवळ कल्पनाचित्र नाही हे अगदी खरे आहे. ध्यानकर्ते कोणत्याही बाह्यशृंगाराशिवाय आतून आणि बाहेरून चमकतात.
-
मौन म्हणजेच सोने
तुम्ही खूप वेळ आणि खूप बोलत राहता तेव्हा तुम्हाला कसे वाटते? बऱ्याचदा थकल्यासारखे? सतत बोलणे मजेदार असू शकते परंतु आपल्या शरीरावर आणि मनावर या क्षुल्लक गोष्टींचा ताण येत असतो. शांतता प्रचंड प्रमाणात ऊर्जा वाचवते. तुम्हाला काही अनुभव घ्यायचा असेल तर आर्ट ऑफ लिव्हिंग भाग २ कार्यक्रम करून पहा. सखोल ध्यान व शांती मिळेल व त्यामुळे तुमची त्वचाही तजेलदार होईल.
-
काहीही होवो, आपले मन सांभाळा
जर तुम्ही दुःखी, रागावलेले किंवा निराश असाल तर तुमचा चेहरा सुंदर दिसू शकणार नाही. म्हणून तुम्हाला मन:शांती आणि अविचल आनंद मिळेल याची खात्री करा. यासाठी ध्यान हाच एकमेव मार्ग आहे. ही आता चैनीची वस्तू राहिली नसून एक आवश्यक गरज झाली आहे.
-
अजूनही १८ वर्षांचे वाटताय? का नाही वाटणार?
जीवनाच्या प्रवासात वयानुसार सुरकुत्या पडणे,केस पांढरे होणे हे अपरिहार्य आहे. साधारणपणे सुंदर दिसणे म्हणजे तरुण दिसणे आणि गोष्टींकडे नवीन दृष्टीने पाहणे. पण खरे रहस्य हे आहे की जर तुम्हाला तरुण वाटत असेल तर तुम्ही फक्त तरुणच दिसता. ध्यानामुळे ही वृद्धत्वाची प्रक्रिया नैसर्गिक रित्या मंदावते आणि ताजेपणा टिकवून ठेवते. म्हणून पुढे जा चला, मनातून १८ वर्षांचे रहा !!
-
चेहऱ्याचे स्नायू लवचिक राहूद्यात !
आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही कितीही खर्च केलात तरीही सुंदर दिसण्याची युक्ती म्हणजे तुमचे स्मित. आपल्या शरीराचा आणि सौंदर्याचा सन्मान करण्यासाठी आपण बराच वेळ आणि पैसा खर्च करतो पण आपला आंतरिक आनंद व्यक्त करण्यास विसरतो. आणि हे किती सोपे आहे फक्त फक्त ओठांना ताण द्या. हसा आणि स्वतःचे तसेच जगाचे ही सौंदर्य वाढवा.
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ज्ञान प्रवचनातून प्रेरित
भारती हरीश (ध्यान प्रशिक्षक) व डॉ निशा मणीकंठन (आयुर्वेद तज्ज्ञ) यांच्या विवेचनावर आधारित.