गुणांचे संतुलन कसे करावे
तीन गुण एकामागून एक आळीपाळीने येतात. प्रत्येकालाच हे तीन गुण वेळोवेळी नैसर्गिकपणे अनुभवास येत असतात. तथापि, या गुणांवर परिणाम करणारे इतर घटक देखील असतात आणि त्याप्रमाणे आपण जीवनशैली निवडत असतो. हा दुतर्फी मार्ग आहे. निरोगी जीवनशैली सत्वगुण वाढविण्यास मदत करते, ज्यामुळे रजस आणि तमस गुणांमुळे वृत्ती संतुलित होतात.
प्राणी हे निसर्गनियमांनुसार जगत असतात, त्यामुळे त्यांच्यात असंतुलन नसते. ते कधीही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करत नाहीत. ते कधीही जास्त काम करत नाहीत, जास्त खात नाहीत किंवा कामवासनेच्या जास्त आहारी जात नाहीत. त्यांना स्वातंत्र्य नसल्यामुळे ते कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू शकत नाहीत.
तर दुसरीकडे मानवाला स्वातंत्र्य लाभले आहे, किंवा आपण त्याला विवेकाची शक्ती म्हणू शकता (म्हणजे काय करावे, किती करावे, केव्हा करावे आणि करावे की करू नये). काही करण्याची किंवा न करण्याची विवेकबुद्धीची शक्ती मानवाला देण्यात आली आहे, कारण त्यांना स्वातंत्र्य आहे. आपण जास्त खाऊ शकतो आणि आजारी पडू शकतो. आपण जास्त झोपू शकतो आणि सुस्त वाटून घेऊ शकतो. आपण क्रियाकलापांमध्ये जास्त गुंतू शकतो आणि अस्वस्थ होऊ शकतो. किंवा इतर समस्या अनुभवू शकतो आणि या सर्वांमुळे गुणांमध्ये असंतुलन निर्माण होते ज्यामुळे आपल्या अस्तित्वाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
आपल्यातील गुणांचा समतोल कसा साधायचा?
आध्यात्मिक साधना, निरोगी जीवनशैली आणि सात्विक आहाराचे पालन करून गुण संतुलित केले जाऊ शकतात.
आध्यात्मिक साधना आपणास कशी मदत करू शकते?
सर्व अध्यात्मिक साधनांचा उद्देश आपल्यातील सत्वाचा स्तर वाढवणे हा आहे, ज्यामुळे आपल्या प्रकृतीत मूलभूत परिवर्तन घडून येते. सत्व अधिकाधिक झाले की आपली प्रकृती बदलते. आणि जेव्हा सत्व अधिकाधिक होत जाते, तेव्हा जीवनात ज्ञान, सजगता, जागरूकता आणि आनंद असतो. हे सर्व गुण सत्वासोबत येतात.
दु:ख आणि विपत्ती हे रजसच्या सोबत येतात. तसेच भ्रम आणि सुस्ती हे तमसच्या सोबत येतात. त्यामुळे नेहमी थोडा वेळ काढून अध्यात्मिक साधना करण्यात स्वतःला गुंतवणे फार महत्वाचे आहे.
आपल्यातील सत्वगुण वाढवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करू शकाल अशा काही आध्यात्मिक पद्धती येथे दिल्या आहेत:
योगासने शरीर आणि मनातील अस्वस्थता (रजस) दूर करण्याचा योग आसन हा एक उत्तम मार्ग आहे. दररोज सुमारे १५ ते २० मिनिटे योगासने केल्याने मज्जासंस्था शांत होण्यास मदत होते.
- प्राणायाम आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम प्राणायाम हे एक प्राचीन तंत्र आहे जे विशेषतः शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह वाढवण्यासाठी वापरले जाते. आपण जितका जास्त ऑक्सिजन श्वासातून आत घ्याल, तितके आपणास अधिक उर्जावान वाटेल.
- उपवास उपवास हे एक जुने तंत्र आहे जे अनेक दशकांपासून सांगितले गेले आहे. याचे कारण की उपवास हा शरीरातील विषारी तत्वे नाहीशी करण्याचा आणि सत्व वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे. आपल्या जीवनात नेहमी अधूनमधून उपवास करणे चांगले असते. जर आपणास उपवास करणे शक्य नसेल तर आपण आठवड्यातून एक दिवस आपल्या नेहमीच्या आहारापेक्षा कमी आहार घ्यावा किंवा जास्त सत्वगुण असलेले काही विशिष्ट पदार्थ खावेत.
- ध्यान ध्यान हा सत्वगुण वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आपण जितके जास्त ध्यान कराल, तितके आपले सत्व वाढते आणि आपले सत्व जितके जास्त असेल, तितके आपले ध्यान अधिक गहिरे होत जाईल.
निरोगी जीवनशैली जगणे महत्त्वाचे का आहे?
आपली सर्व कार्ये संयमाने केली जातात अशी निरोगी जीवनशैली ही आपल्यातील सत्वस्तर टिकवून ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. अन्न, झोप किंवा कोणत्याही कार्यात अतिभोग घेतल्याने शरीरातील रजस आणि तमस गुण वाढतात, ज्याचा परिणाम आपल्या भावनांवर होतो.
म्हणून, आपल्या आजींने आपल्याला शिकवलेल्या सर्व मूलभूत जीवनशैलीच्या सूचना खरोखर खूप मोलाच्या आहेत.
“लवकर झोपणे, लवकर उठणे, माणसाला निरोगी, धनवान आणि ज्ञानी बनवते.”
“संपत्ती मिळविण्यासाठी आपले सर्व आरोग्य गमावू नका आणि नंतर गमावलेले आरोग्य परत मिळविण्यासाठी आपली सर्व संपत्ती गमावू नका.”
“नाश्ता राजाप्रमाणे करा, दुपारचे जेवण राजकुमारासारखे आणि रात्रीचे जेवण गरीबांसारखे करा.”
या सूचनांचे पालन करणे ही खरेच चांगली कल्पना आहे, कारण त्यामुळे खरोखरच आपल्यातील सत्व टिकून राहते!
आपल्यातील सत्व टिकवून ठेवण्यासाठी अनुकूल अशी जीवनशैली जगण्यासाठी येथे काही सूचना आहेत:
- व्यायाम आठवड्यातून किमान तीन वेळा व्यायाम करणे खूप फायदेशीर आहे. सकाळी लवकर चालणे किंवा धावणे हा दिवसाची सुरुवात करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
- रात्री उशीरा झोपणे टाळा योग्य वेळी झोपी जा आणि सूर्योदयाचे वैभव न्याहाळण्यासाठी लवकर उठा.
- रात्रीचे जेवण लवकर घ्या सूर्य आकाशात असताना आपल्या दैनंदिन आहारातील बहुतांश सेवन करणे ही चांगली सवय असते, कारण सूर्याचा पचनसंस्थेवर मोठा प्रभाव पडतो.
- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा जास्त चित्रपट पाहू नका, खूप जास्त खाऊ नका, खूप झोपू नका किंवा जास्त काम करू नका. एक समग्र जीवनशैली ही अशी आहे ज्यामध्ये सर्वकाही संयमाने केले जाते. सामान्य, नम्र आणि अगदी साधे राहण्याचा प्रयत्न करा. जर आपण हे साध्य करू शकलात तर, ते विलक्षण असेल!
सात्विक आहाराने हा सर्व फरक कसा पडू शकतो?
अन्नाचे वर्गीकरण सात्विक, राजसिक आणि तामसिक असे करता येते. सात्विक दर्जाचे अन्न खाल्ल्याने आपल्यातील सत्वगुण वाढते आणि असेच इतर दोन गुणांबाबतीतही घडते. त्यामुळे सात्विक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे.
सात्विक आहार म्हणजे ताजी फळे, सर्व भाज्या (कांदा आणि लसूण वगळता), सुकामेवा, बिया, अख्खे धान्य, ताजे दूध आणि गोड मसाले जसे की दालचिनी, वेलची, आले, पुदिना, तुळस इ. सात्विक आहाराचे हे पदार्थ साधारणपणे पचायला हलके असतात आणि त्यामुळे शरीरात जडपणा किंवा सुस्ती येत नाही.
साखर, तेल किंवा मसाले जास्त प्रमाणात असलेले अन्न हे राजसिक पदार्थ आहेत. मांसाहार किंवा जास्त प्रमाणात कांदा आणि लसूण असलेले खाद्यपदार्थ हे तामसिक पदार्थ आहेत.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जेवढे आवश्यक आहे तेवढेच खाणे, जेणेकरून अन्न चांगले पचते. शरीर प्रत्येक वेळी हलके वाटले पाहिजे. त्यामुळे योग्य प्रमाणात अन्न आणि तेही कमी मसाले असलेले ताजे अन्न हे आपल्यातील सत्व स्तर वाढवत ठेवण्यासाठी उत्तम संयोजन आहे.