नवदुर्गा, दुर्गा देवीची सर्व नऊ रूपे नऊ भिन्न गुणांचे प्रतिनिधित्व करतात. शक्ती म्हणजे ऊर्जा आणि देवी शक्ती ही या सृष्टीचे पालन पोषण आणि रक्षण करणारी अदृश्य शक्ती आहे. नवरात्रीमध्ये मातेच्या नऊ वेगवेगळ्या पैलूंचा उत्सव आणि सन्मान केला जातो, ज्यांना नवदुर्गा असेही म्हणतात.

देवी शक्ती, किंवा स्त्री चैतन्य, स्वतःला अनेक रूपांमध्ये प्रकट करते. यात सामर्थ्य, परिवर्तन, राग, सौंदर्य, करुणा, भय आणि ताकद यासारख्या गुणांचा समावेश आहे आणि हे गुण एकमेकांना पूरक आहेत. हे गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये, वेगवेगळ्या घटनांमध्ये आणि संपूर्ण विश्वात व्यक्त होताना दिसून  येतात.

शैलपुत्री

दुर्गा देवीचे पहिले नाव शैलपुत्री आहे. शैल म्हणजे शिखर.

दुर्गा देवीला शिखराची कन्या का म्हणतात?

शास्त्रानुसार दुर्गा देवीला शिखराची कन्या म्हणण्यामागचे कारण

आपल्याला सहसा असे वाटते की याचा अर्थ देवी कैलास पर्वताची कन्या आहे, परंतु ही अत्यंत मूलभूत किंवा खालच्या पातळीची समज आहे. योगाच्या मार्गावर, याचा अर्थ सर्वोच्च शिखर किंवा चैतन्याची सर्वोच्च पातळी असा आहे.

हे खूप रंजक आहे – जेव्हा ऊर्जा शिखरावर असते, तेव्हाच तुम्ही ती लक्षात घेऊ शकता आणि ओळखू शकता. केवळ तेव्हाच तुम्ही शुद्ध चैतन्य – देवी समजून घेऊ शकता आणि अनुभवू शकता. ती त्या शिखरावर पोहोचण्यापूर्वी तुम्हाला ती समजू शकत नाही, कारण ती शिखरातून जन्माला येते.

येथे शिखर हे कोणत्याही अनुभवाचे, किंवा कोणत्याही तीव्र भावनांचे शिखर आहे. जर तुम्हाला १००% राग आला असेल तर तो राग तुमच्या संपूर्ण शरीराला कसा व्यापून टाकतो ते पहा. अनेकदा आपण आपला राग पूर्णपणे व्यक्त करत नाही. जरा बघा, जेव्हा तुम्ही १००% संतप्त असता, जेव्हा तुमचा क्रोध इतका अनावर होतो, तेव्हा तुम्ही लवकरच त्यातून बाहेर देखील पडता. जेंव्हा तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही बाबतीत १००% असता, तेव्हा देवी दुर्गा खरोखरच जन्म घेते. जेव्हा तुम्ही पूर्णपणे १००% क्रोधीत होता, तेव्हा तुम्हाला अशी उर्जेची लाट अनुभवता येईल आणि त्याच वेळी तुम्ही स्वतः त्या रागातून लगेचच बाहेर पडता असे दिसून येईल.

मुले कशी वागतात हे तुम्ही पाहिले आहे का? ते जे काही करतात ते १००% करतात. जर ते रागावले असतील तर त्या क्षणी ते १००% रागावतात आणि नंतर लगेचच काही मिनिटांनंतर ते राग सोडून देखील देतात. राग आला तरी ते दमत नाहीत. पण प्रौढ म्हणून जर तुम्हाला राग आला तर तो तुम्हाला थकवतो. असे का होते? कारण तुम्ही तुमचा राग १००% व्यक्त करत नाही. आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही सतत रागावलेले राहावे. तसे केले तर मग तुम्हाला रागामुळे येणाऱ्या त्रासालाही सामोरे जावे लागेल.

जेव्हा तुम्ही कोणत्याही अनुभवाच्या किंवा संवेदनशीलतेच्या शिखरावर पोहोचता तेव्हा तुम्हाला दैवी चेतनेचा उदय अनुभवता येतो, कारण ती नेहमी त्या शिखरावरून उचंबळून येते. शैलपुत्रीच्या मागे दडलेला हा अर्थ आहे.

१ ल्या दिवशी करावयाचे ध्यान

ब्रह्मचारिणी

मातेचे दुसरे नाव ब्रह्मचारिणी आहे.

ब्रम्हन म्हणजे काय?
ज्याला अंत नाही, किनारा नाही आणि सुरुवातही नाही; जे सर्वव्यापी आहे आणि ज्याच्या पलीकडे काहीही नाही; ते परम आणि सर्वव्यापी आहे.

जर तुम्ही डोळे बंद करून ध्यान केले तर तुम्हाला असा प्रत्यय येईल की जेव्हा तुमची उर्जा शिखरावर पोहोचते, तेव्हा ती दैवी मातेबरोबर एकरूप होते; ते दैवी मातेच्या ऊर्जेत चिंब भिजते. दिव्यत्व तुमच्या आत आहे, बाहेर कुठे नाही.

तुम्ही म्हणू शकत नाही, “मला ते माहित आहे”, कारण ते अमर्याद आहे. ज्या क्षणी तुम्हाला ते समजेल, त्याक्षणी ते मर्यादित होऊन जाईल. किंवा तुम्ही “मला ते माहित नाही” असे म्हणू शकत नाही, कारण ते निश्चितपणे आहे. तुम्हाला कसे कळत नाही? “मला माझा स्वतःचा हात माहित नाही” असे तुम्ही म्हणू शकता का? तुमचा हात तिथेच आहे. ते तिथे आहे म्हणून तुम्हाला ते माहित आहे, आणि ते अनंत आहे म्हणून तुम्हाला ते माहित नाही. या दोन्ही अनुभूती अनुषंगिक आहेत. तुम्ही पुरेसे गोंधळले गेले आहात?

जर तुम्हाला कोणी विचारले की, “तुम्ही दैवी मातेला ओळखता का”, तर तुम्ही फक्त गप्प बसू शकता, कारण जर तुम्ही म्हणाल, “मला माहित नाही”, तर ते खरे नाही, आणि जर तुम्ही म्हटले, “मला माहित आहे”, तर तुम्ही ते ‘जाणणे’ हे शब्द आणि मर्यादित बुद्धीने मर्यादित करत आहेत. ते अनंत आहे, आणि अनंत हे समजू शकल्या जाऊ शकत नाही किंवा ते अंतर्भूत असू शकत नाही.

“जाणणे” म्हणजे समाविष्ट करणे किंवा प्रतिबंधित करणे. तुमच्यात अनंतता असू शकते का? जर तुमच्यात अनंतता असेल तर ती यापुढे अनंत नाही. ब्रह्मचारिणी म्हणजे जी उपस्थित असते आणि अनंतात गतिमान असते. ती अशी ऊर्जा आहे जी कुंठीत किंवा निष्क्रिय नाही, परंतु अनंतात संचार करणारी आहे.

ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे – एक म्हणजे हालचाल आणि दुसरी उपस्थिती. हाच ब्रह्मचर्याचा अर्थ आहे. ब्रह्मचर्य म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत गुंतून न राहणे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून न पडता संपूर्ण गोष्टीत गुंतणे. ब्रह्मचर्याला समानार्थी शब्द म्हणून कौमार्यावस्था असे देखील म्हटले जाते कारण त्यामध्ये तुम्ही मर्यादित भागांसोबत नव्हे तर मोठ्या एकसंधते सोबत व्यवहार करत असता. वासना नेहमी भागांमध्ये असते, ती चैतन्याची स्थानिक चळवळ असते. तर, ब्रह्मचारिणी ही अशी चैतन्यता आहे जी सर्वव्यापी आहे.

२ ऱ्या दिवशी करावयाचे ध्यान

चंद्रघंटा

मातेचे तिसरे रूप म्हणजे चंद्रघंटा.

चंद्रघंटा या शब्दाचा अर्थ काय?

चंद्र म्हणजे मन. मनाचे चढ-उतार होत राहतात. सहसा आपण आपल्याच मनाशी भांडत असतो. मत्सर, द्वेष इत्यादी नकारात्मक विचार मनात येतात आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी धडपड सुरू होते, पण तसे होत नाही. तुम्ही तुमच्या मनापासून मुक्त होऊ शकत नाही. मनापासून दूर पळून काही फायदा होत नाही. मन हे तुमच्या सावलीसारखे आहे.

ज्या क्षणी आपले मन कोणत्याही नकारात्मक भावनेने ग्रासले जाते तेव्हा आपण उदास आणि अस्वस्थ होतो. आपण विविध तंत्रे करून या सर्व गोष्टी आपल्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करतो, परंतु याचा उपयोग केवळ थोड्या काळासाठीच होतो. थोड्या वेळाने मन परत जैसे थे होऊन जाते! त्यापासून मुक्त होण्यासाठी धडपड करू नका.

चंद्र विविध संवेदना किंवा भावना आणि विचारांच्या छटा देखील सूचित करतो (ज्याप्रमाणे चंद्राच्या कला वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वाढत जातात आणि कमी होत जातात).

म्हणजे घंटा ज्यातून एकच प्रकारचा आवाज निघतो. तुम्हाला कधी एका घंटेतून अनेक आवाज ऐकू आले आहेत का? तुम्ही ती कशीही वाजवली तरी घंटेमधून एकच आवाज येतो. त्याचप्रमाणे, विखुरलेले आणि विविध विचार आणि भावनांमध्ये अडकलेले मन जेव्हा एका बिंदूवर (परमात्म्यात) एकवटते आणि स्थापित होते, तेव्हा ते आपल्यामध्ये दैवी उर्जा उत्पन्न करते जी एकमुखी बनते आणि वर येते. हाच चंद्रघंटा याचा अर्थ आहे. तिच्या नावाचा शाब्दिक अर्थ आहे चंद्राची घंटा.

याचा अर्थ असा होतो की जिथे विखुरलेले मन एका गोष्टीकडे स्थिर आणि एकत्रित होते. मनापासून दूर पळू नका, कारण मन हे देखील मातेचे एक रूप आणि प्रकटीकरण आहे. दु:ख, शोक, भूक आणि शांती यांमध्येही दैवी माता उपस्थित असते. येथे अभिप्रेत असलेले सार म्हणजे सर्वकाही एकत्र घेणे – मग ते सलोख्याचे असो किंवा अप्रिय – सर्व विचार, भावना आणि आवाज एक नाद (ध्वनी) म्हणून एकत्रितपणे आणणे ज्याप्रमाणे घंटा किंवा मोठ्या थाळाचा आवाज करतात. देवीच्या चंद्रघंटा नावामागील हाच अर्थ आहे आणि नवरात्रीचा तिसरा दिवस दैवी मातेच्या या रूपाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.

३ ऱ्या दिवशी करावयाचे ध्यान

कुष्मांडा

मातेच्या चौथ्या रूपाला कुष्मांडा म्हणतात. कुष्मांडा या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये ‘कोहळा’ असाही आहे. आता जर तुम्ही गमतीने एखाद्याला ‘कोहळा’ म्हटले तर तो तुमचा अपमान करतील आणि तुमच्यावर तुटून पडतील!
कुष्मांडा या शब्दाचा नेमका अर्थ काय?
एक कोहळा गोल आहे. तर इथे, तो तुमच्या प्राणाचा (सूक्ष्म जीवनशक्ती उर्जा याचा) संदर्भ देतो आणि ते पण असा प्राण जो संपूर्ण आहे; गोलाप्रमाणे पूर्ण.

कोहळा फक्त ब्राह्मण, बुद्धीजीवी लोक यांनीच खाणे अशी भारतातील परंपरागत प्रथा होती. समाजात इतर कोणी कोहळा खात नसत. कोहळा माणसाचा प्राण, बुद्धिमत्ता आणि उर्जा वाढवणारा असतो. कोहळ्यामध्ये प्राण शोषून घेण्याचा आणि प्राण चमकवण्याचा अद्वितीय गुणधर्म असल्याचे म्हटले जाते. ही ग्रहावरील सर्वात प्राणिक भाज्यांपैकी एक आहे. ज्याप्रमाणे अश्वथ झाडाची पाने 24 तास ऑक्सिजन निर्माण करतात, त्याचप्रमाणे कोहळा देखील ऊर्जा शोषून घेतो आणि उत्सर्जित करतो.

ही संपूर्ण सृष्टी – प्रकट आणि अव्यक्त दोन्ही – एक प्रचंड गोल चेंडू किंवा कोहळ्यासारखी आहे. इथे लहानात लहान ते मोठ्यात मोठ्यापर्यंत सर्व प्रकारची विविधता आहे.

येथे “अंडा” चा अर्थ वैश्विक बीज किंवा विश्वव्यापी कक्षा असा आहे. “कु” म्हणजे लहान, “श” म्हणजे ऊर्जा. त्यामुळे या संपूर्ण विश्वामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत ऊर्जा व्याप्त आहे. लहानापासून ती मोठे होते आणि मोठ्यापासून ती लहान होते. लहान बीपासून ती मोठे फळ बनते आणि मोठ्या फळापासून तो पुन्हा बीज स्वरुपात येते.

आपल्या उर्जेमध्ये सर्वात लहानपेक्षा लहान आणि सर्वात मोठ्यापेक्षा मोठे असे बनण्याचा असा अद्वितीय गुण आहे. हे कुष्मांडाने स्पष्ट केले आहे आणि म्हणूनच दैवी मातेला कुष्मांडा असेही म्हणतात. याचा अर्थ असा की दैवी माता प्राणाच्या रूपात आपल्यातील उर्जा म्हणून प्रकट होते.

फक्त पाच सेकंद बसा आणि स्वतःला कोहळा समजा. येथे असा अर्थ अभिप्रेत आहे की स्वतः दैवी माता असलेल्या अशा सर्वोच्च बुद्धिमत्तेपर्यंत स्वतःला उन्नत करा. कोहळ्याप्रमाणे तुम्हालाही तुमच्या जीवनातील विपुलता आणि परिपूर्णता जाणवली पाहिजे आणि सृष्टीतील प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक कणात ‘प्राण’ जिवंत आहे असे पहा. जागृत बुद्धिमत्ता सृष्टीत सर्वत्र प्रकट होऊन व्याप्त झालेली पाहणे हाच कुष्मांडाचा अर्थ आहे.

४ थ्या दिवशी करावयाचे ध्यान

स्कंदमाता

ज्ञानाची माता: स्कंदमाता
मातेचे पाचवे रूप म्हणजे स्कंदमाता.

स्कंद हे भगवान कार्तिकेयचे दुसरे नाव आहे जे ज्ञान शक्ती आणि क्रिया शक्ती (नीतिपूर्ण कृतीची शक्ती) यांच्या एकत्र येण्याचे प्रतिनिधित्व करतात. स्कंद हा या दोघांचा मिलाफ आहे. स्कंदमाता हे देवत्वाचे ते रूप आहे जे व्यावहारिक शहाणपण आणि कृती एकत्र आणते.

शिव तत्व हे आनंददायी तत्व आहे, जे सदैव शांत आणि कृतीपासून मुक्त आहे. देवी तत्व (दैवी माता) ही सृष्टीतील क्रिया आणि क्रियाकलापांसाठी जबाबदार असलेली आदिम ऊर्जा आहे.

असे म्हटले जाते की देवी इच्छा शक्ती, ज्ञान शक्ती आणि क्रिया शक्ती (नीतिपूर्ण कृतीची शक्ती) यांच्या संगमाचे प्रतिनिधित्व करते. जेव्हा शिवतत्त्व या तीन शक्तींशी एकरूप होते, तेव्हा जे निर्माण होते ते स्कंद होय.

स्कंदमाता ज्ञान आणि क्रिया (कृती किंवा क्रियाकलापांचे तत्त्व) यांच्या उत्पत्तीचे प्रतिनिधित्व करते. हे क्रियामक ज्ञान (योग्य ज्ञानाने घडवलेली कृती किंवा कृतीचे ज्ञान) असे समजल्या जाऊ शकते.

बऱ्याच वेळा आपण पाहतो की ज्ञान आहे पण त्याचा काही उद्देश नाही किंवा त्याचा कोणत्याही कृतीत उपयोग करता येत नाही. परंतु (कृतीद्वारे प्राप्त) असे ज्ञान देखील आहे ज्याचा एक निश्चित अंत किंवा हेतू आहे. कॉलेजमध्ये तुम्ही भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यासारख्या विषयांचा सविस्तर अभ्यास करता, पण तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात त्याचा फारसा वापर करत नाही. जेव्हा तुम्ही वैद्यकशास्त्राचा अभ्यास करता तेव्हा तुम्ही ते ज्ञान दररोज वापरता. जेव्हा तुम्हाला टेलिव्हिजन कसा दुरुस्त करायचा हे समजते, तेव्हा तुम्ही ते ज्ञान आणि कौशल्य वापरून टीव्ही खराब झाल्यावर दुरुस्ती करू शकता. किंवा जसे मोटार कशी काम करते आणि ती कशी दुरुस्त करायची हे तुम्ही शिकता. हे अधिक व्यावहार-अभिमुख ज्ञान आहे. स्कंद म्हणजे आपल्या जीवनात ज्ञान आणि (नीतिपूर्ण) कृती एकत्र येणे होय. अशा प्रकारे स्कंद तत्व हे देवी तत्वाचा (दैवी मातेचा) विस्तार आहे.

ब्रम्हन सर्वत्र प्रकट आहे आणि सर्वव्यापी आहे असे आपण नेहमी म्हणतो; पण वर्तमानात तुमच्या जीवनातील कठीण परिस्थितीचा सामना करीत असताना तुम्ही काय करता? तेव्हा तुम्ही कोणते ज्ञान वापराल? समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्हाला कृती करणे अनिवार्य असताना, तुम्हाला ज्ञान कृतीत आणण्याची आवश्यकता असते. म्हणून जेव्हा तुम्ही अशी कृती करता जी ज्ञानाने मार्गदर्शित असते तेव्हा ते स्कंद तत्व प्रकट होते. आणि देवी दुर्गा ही स्कंद तत्वाची जननी मानली जाते.

५ व्या दिवशी करावयाचे ध्यान

कात्यायिनी

मातेचे सहावे रूप म्हणजे कात्यायनी.

जे काही घडते आणि आपल्यासमोर उलगडते, ज्याला प्रपंच म्हणतात, ते केवळ दृश्यापुरतेच मर्यादित नसते. जे अदृश्य आहे आणि इंद्रियांद्वारे जाणू शकत नाही ते आपल्या कल्पनेपेक्षा आणि समजुतीपेक्षा खूप मोठे आहे.

अदृश्य आणि अव्यक्त असलेल्या सूक्ष्म जगावर दैवी मातेचे – कात्यायनी या रूपाने राज्य असते. या रूपामध्ये ती अशा प्रत्येक गोष्टीचे प्रतिनिधित्व करते जे बघितले जाऊ शकत नाही किंवा ज्याचे आकलन केल्या जाऊ शकत नाही. कात्यायनी देवत्वाच्या गहन आणि सर्वात गुंतागुंतीच्या रहस्यांचे प्रतिनिधित्व करते.
दैवी मातेचे हे रूप कसे प्रकट झाले? कात्यायनीच्या रूपात मातेचे दिव्य प्रकट होण्यामागील कथा
एके काळी असे झाले की सर्व देवता खूप क्रोधित झाले. या रागातून निर्माण झालेल्या मातेचे रूप कात्यायनी म्हणून ओळखले गेले. सृष्टीत दैवी आणि आसुरी शक्ती आहेत. तसेच, राग ही सकारात्मक किंवा नकारात्मक शक्ती असू शकते.

क्रोध हा सकारात्मक किंवा दैवी गुण कसा असू शकतो आणि तो नकारात्मक किंवा आसुरी गुण कधी बनू शकतो? दोघांमध्ये खूप फरक आहे. क्रोध हा केवळ वाईट गुण आहे असे समजू नका. संताप देखील महत्वाचा आहे आणि त्याचे स्वतःचे असे एक स्थान आहे. चांगला राग ज्ञानाबरोबर संबंधित आहे, तर वाईट राग भावना आणि स्वार्थाशी निगडीत आहे. चांगला राग व्यापक दृष्टीच्या भावनेतून येतो. जेव्हा राग अन्याय आणि अज्ञानाकडे निर्देशित केला जातो तेव्हा तो योग्य असतो. सामान्यत: ज्याला राग येतो, तेव्हा तो असा विचार करतो की त्याचा राग न्याय्य आहे आणि केवळ अन्यायाकडे निर्देशित आहे! परंतु जर तुम्ही अस्तित्वाच्या अधिक सूक्ष्म स्तरांमध्ये खोलवर गेलात तर तुम्हाला असे दिसून येईल की असे नाही. अशा वेळी रागामुळे व्यक्तीसाठी बंधने निर्माण होतात. तर, धार्मिक कारणांमुळे उद्भवणारा आणि नकारात्मकता आणि अन्यायाकडे निर्देशित केलेला राग देवी कात्यायनीचे प्रतिनिधित्व करतो.

तुम्ही अनेक नैसर्गिक आपत्ती पाहिल्या असतील ज्यांना लोक निसर्गाचा सूड उगवणे म्हणतात. उदाहरणार्थ, अनेक ठिकाणी प्रचंड भूकंप किंवा भयंकर पूर येतात. या सर्व घडामोडींचे श्रेय देवी कात्यायनीला दिले जाते. देवी कात्यायनी त्या दैवी तत्त्वाचे आणि मातेचे स्वरूप दर्शवते जी अशा भयानक नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटना यांच्या मागे असते. देवी कात्यायनी धर्म आणि सत्याची तत्त्वे पुनर्संचयित करण्यासाठी आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी सृष्टीमध्ये उद्भवलेल्या रागाचे देखील प्रतिनिधित्व करते. कात्यायनी ही दैवी शक्ती किंवा अव्यक्त देवत्वाचे तत्त्व आहे जे नकारात्मकतेच्या विरोधात आणि धर्माच्या पुनःस्थापन करण्याच्या हेतूने सृष्टीच्या सूक्ष्म स्तरांमध्ये उद्भवते. असे म्हणतात की, ज्ञानी व्यक्तीच्या रागानेच अधिक चांगले घडते; तर अज्ञानी किंवा मूर्ख व्यक्तीचे प्रेम देखील अधिक त्रास देऊ शकते. म्हणूनच देवी कात्यायनी प्रत्यक्षात एक लाभदायक आणि उत्थान शक्तीचे प्रतिनिधित्व करते.

६ व्या दिवशी करावयाचे ध्यान

कालरात्री

मातेच्या सातव्या रूपाला कालरात्री असे म्हटले जाते.

हे दैवी मातेचे अत्यंत उग्र आणि भयानक रूप आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये यापेक्षा भयंकर स्वरूप दुसरे असू शकत नाही, परंतु या भयानक रूपाला देखील मातृत्वाचा पैलू आहे.

दैवी मातेचे कालरात्री स्वरूप हे ज्ञान आणि वैराग्य प्रदान करते असे म्हटले जाते.

७ व्या दिवशी करावयाचे ध्यान

महागौरी

सौंदर्याचे प्रतीक: महागौरी
मातेच्या आठव्या रूपाला महागौरी म्हणतात.

महागौरी म्हणजे ते रूप जे सुंदर आणि दैदीप्यमान आहे. तुम्ही कधी निरीक्षण केले तर तुम्हाला दिसून येईल की निसर्गाला दोन टोके आहेत. यापैकी एक प्रकार म्हणजे कालरात्री जे सर्वात भयंकर आणि विनाशकारी आहे आणि दुसरीकडे तुम्हाला महागौरी दिसते जी दैवी मातेचे सर्वात सुंदर आणि शांत रूप आहे.

महागौरी सौंदर्याचे प्रतीक आहे. महागौरी तुमच्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करते. देवी महागौरी तुम्हाला सर्व आशीर्वाद आणि वरदान देते जे तुम्ही भौतिक लाभासाठी शोधत असता, जेणेकरून तुम्ही आतून समाधानी होऊन जीवनात पुढे जाऊ शकता.

८ व्या दिवशी करावयाचे ध्यान

सिद्धिधात्री

नवव्या स्वरूपाला सिद्धिधात्री म्हणतात.

दैवी मातेचे सिद्धिधात्री रूप तुम्हाला सिद्धी (असाधारण क्षमता) देऊन आशीर्वादित करते. जेणेकरून तुम्ही सर्वकाही परिपूर्णतेने करू शकता. सिद्धी म्हणजे काय? सिद्धी म्हणजे इच्छा निर्माण होण्याआधीच तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळते. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला काम किंवा कृती करण्याची गरज नाही. त्याचा केवळ विचार केल्याने, त्यासाठी संघर्ष किंवा प्रयत्न न करता, तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही मिळवू शकता. याचाच अर्थ सिद्धी असा आहे.

९ व्या दिवशी करावयाचे ध्यान

तुम्ही जे काही बोलता ते सत्य बनते आणि प्रकट होते आणि आजूबाजूच्या प्रत्येकाच्या फायद्यासाठी असते. तुम्ही जे काही काम हाती घ्याल ते परिपूर्णपणे पूर्णत्वास येते. ही सिद्धी आहे. सिद्धी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात परिपूर्णता आणि संपूर्णता आणते. हे देवी सिद्धिधात्रीचे महत्त्व आहे.