या विश्वात ‘काहीही लक्षणीय नाही’ किंवा ‘सर्व काही लक्षणीय आहे,’ असे तुम्ही म्हणू शकता. विरोधाभासात पाहिल्यास दोन्हीचा अर्थ एकच आहे! आपला दृष्टीकोन आहे, जो बदलत असतो.

जीवनाचा उल्लेखनीय पैलू म्हणजे लहान आणि मोठ्या गोष्टी आपल्या जीवनाला अर्थ देतात. म्हणूनच एका लहान सुईची उपयुक्तता एक विमानाइतकीच असते. कारण आपण परिधान केलेले कपडे शिवण्यासाठी आपल्याला सुईची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे साडी नेसलेल्या कोणत्याही महिलेला लहान सेफ्टी पिनचे महत्त्व विचारा!

म्हणून एखाद्या गोष्टीचा आकार नाही तर त्या वस्तूचा उपयोग, जीवनातील त्या गोष्टींचे मोल आणि अर्थ ठरवते. आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या साधनांची, वस्तूंची आणि उपकरणांची ही कार्यक्षमता आणि उपयोग जाणणे म्हणजे आयुध पूजा.

आयुध पूजा म्हणजे काय?

आयुध पूजा हा असा दिवस आहे जेव्हा आपण आपल्या जीवनाला अर्थ देणाऱ्या सर्व साधनांचा सन्मान करतो आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.

ही पूजा टाचणी, चाकू, कात्री आणि पान्हा सारख्या छोट्या गोष्टी तसेच संगणक, यंत्रसामग्री, कार आणि बस यासारख्या मोठ्या उपकरण्यांच्या आदरार्थ केल्या जाते.

या पूजेला ऐतिहासिक संदर्भ आहे का?

प्राचीन काळी युद्धात वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांची पूजा केली जात असे , कारण ते शत्रूंचा पराभव करण्याचे साधन होते. उदाहरणार्थ, कर्नाटकात पार्वतीदेवीचा अवतार असलेल्या देवी चामुंडेश्वरीने महिषासुर या दानव राजाचा वध केल्याच्या स्मरणार्थ आयुध पूजेचा उत्सव साजरा केला जातो.

आदर आणि समाधान

जर तुम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल आदराने भारावलेले असाल, तर आयुष्य अतिशय परिपूर्ण होते.

~ गुरुदेव श्री श्री रवि शंकर

एखाद्या गोष्टीच्या मूल्याबद्दलची आपली जाणीव त्या गोष्टीला अमर्यादपणे अधिक उपयुक्त बनवते. आपल्यासाठी जीवन सुकर करणाऱ्या गोष्टींचा आपण आदर करतो तेव्हा आपल्याजवळ असलेल्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला समाधान मिळते. आपले मन इच्छा आणि जास्तीच्या लोभात अडकत नाही.

पण, एखाद्या वस्तूची उपासना करण्याच्या साध्या कृतीने अशी पूर्तता कशी प्राप्त होते?

गुरुदेव म्हणतात की अनेकदा आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबद्दलचा आदर गमावतो आणि हे नकळत घडते. प्रामुख्याने तुम्ही ज्याचा आदर करता ते तुमच्यापेक्षा मोठे होते. जेव्हा तुम्हाला संपूर्ण विश्वाबद्दल आदर असतो, तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर सुसंगत असता. मग तुम्हाला या विश्वातील काहीही नाकारण्याची किंवा त्याग करण्याची गरज नाही. मालकीचा आदर तुम्हाला लोभ आणि मत्सरपासून मुक्त करतो. म्हणून जीवनातील प्रत्येक क्षणाचा आदर करण्याचे कौशल्य जोपासावे.

आयुध पूजा ही फक्त तेच करण्याची वेळ आहे – आपल्या जीवनातील गोष्टींची उपयुक्तता ओळखणे आणि त्यांचा सन्मान करणे.

एकच देवत्व

जेव्हा आपण वस्तूंचा आदर करतो तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे त्या मनाची पूजा करतो ज्याने ती वस्तू कल्पिली. आणि आपले मन हे देवत्वाव्यतिरिक्त दुसरे काही नाही. विमान, कॅमेरा किंवा मायक्रोफोन तयार करण्याचे जे विचार मनात येतात ते सर्व ज्या एकाच स्रोतातून आले आहेत, ते म्हणजेच देवी.

नवरात्रीच्या आठव्या दिवशी केल्या जाणाऱ्या चंडी होमामध्ये आपण हाच जप करतो.

‘या देवी सर्व भूतेषु बुद्धी रुपेणा संस्थिता।’

सर्व प्राणिमात्रांमध्ये बुद्धीच्या रूपाने वास करणारी देवी, मी तुला नमन करतो.

हे संक्षिप्तपणे पण स्पष्टपणे वर्णन करते की हे एक देवत्व आहे जे सर्व प्राण्यांमध्ये बुद्धी म्हणून प्रकट होते. जेव्हा आपण त्या बुद्धीचा सन्मान करतो तेव्हा आपण देवीचा सन्मान करतो.

प्रत्येक उपकरणातील उपयुक्तता एक देवत्वाचा भाग म्हणून ओळखली जाते आणि सन्मानित केली जाते. जेव्हा आपल्याला कळते की सर्व काही देवत्वाचा भाग आहे, तेव्हा मनाला गहन विश्रांती मिळते.

या नवरात्रीत तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींची पूजा करून तुमच्या मनाला गहन तृप्ती आणि विश्रांती द्या. तुमच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील तुम्हाला आध्यात्मिकरित्या उन्नत करण्याची शक्ती असते

आयुध पूजा कधी साजरी केली जाते?

आयुध पूजा नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरी केली जाते.

आयुध पूजेत कोणते विधी केले जातात?

या दिवशी लहान-मोठी सर्व वाद्ये स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. लहान आणि मध्यम आकाराच्या गोष्टी एका बैठकीवर ठेवल्या जातात आणि फुलांनी सजवल्या जातात. पूजाविधीचा एक भाग म्हणून त्यांना कुंकूदेखील लावले जातो.

(प्राजक्ती देशमुख, अध्यापक, आर्ट ऑफ लिव्हिंग यांनी पुरविलेल्या माहितीसह)