दसरा किंवा विजयदशमी उत्सवातून काय सूचित केले जाते?
नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर, दहावा दिवस, जो दसरा किंवा विजयादशमी म्हणून साजरा केला जातो तो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो.
या दिवशी आपण क्षुद्रतेवर मोठेपणाचा, लहान मनावर मोठ्या मनाचा विजय साजरा करतो.
रामायणानुसार, विजयदशमी हा तो दिवस आहे ज्या दिवशी भगवान रामाने राक्षस राजा रावणाचा पराभव केला. नवरात्रीनंतरचा दहावा दिवस महिषासुर या राक्षसावर दुर्गा देवीचा विजय दर्शवतो.
सामान्यत: मनावर नकारात्मक प्रवृत्ती आल्यावर आपण त्याच्याशी लढत राहतो.अशा वेळी आपण दिव्यत्वाला शरण जात म्हणतो की “मी स्वतःच्या मनाशी लढू शकत नाही, म्हणून तुम्ही त्याची काळजी घ्या आणि तुम्हीच मला मार्ग दाखवा.”
आध्यात्मिक शक्तीचा म्हणजेच उच्चतम चेतनेचा क्षुद्रपणावर आणि छोट्या गोष्टींवर विजय हेच नवरात्रीच्या नऊ दिवसातून सूचित केले जाते.
अनेक प्रकारच्या परिस्थिती किंवा मनस्थिती असतात, परंतु सामान्यतः तुम्ही त्यांचे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण करू शकता:
- जेव्हा मनात, ऐहिक किंवा आध्यात्मिक अनुभवांची लालसा असते किंवा तळमळ असते.
- जेव्हा आळस असतो कसलीही तळमळ नाही आणि कशातही रस नाही. आपल्या मनात जडत्वाची भावना असते. जेव्हा तुम्ही फक्त जडत्व घेऊन पुढे जात राहता. ही परिस्थिती आता असली तर नंतर आयुष्य तसेच होऊ शकते.
- जेव्हा समाधान, आनंद आणि प्रसन्नता असते. या सर्व उत्सवाचा उद्देश जडत्वाकडून आनंदाकडे जाणे आणि तळमळ दूर करत तृप्ती लाभणे हा आहे.
काही लोक असेही आहेत की जे आपल्या मनाकडे ढुंकूनही पाहत नाहीत, ते फक्त काम करत राहतात. तसेच इतर काही असतात जे सतत स्वतःच्या मनाकडेच बघत राहतात. हे दोन्ही प्रकार चांगले नाहीत. मध्यम मार्ग अनुसरा. मनावर एखाद्या वेळी कटाक्ष टाका, पण सर्व वेळ तेच नको. मी काय म्हणतोय ते लक्षात आले कां ? नाहीतर तुम्ही आत्मकेंद्रित व्हाल, आणि ‘मला काय हवंय?’ किंवा ‘मला असं वाटतंय’ असाच विचार करत राहाल.
तुम्हाला कसे वाटते ते विसरून जा. भावना बदलत राहतात. एका मिनिटाला त्या चांगल्या असतात, दुसऱ्या मिनिटाला त्या चांगल्या नसतात, तर काय ! शौर्याने आणि धीराने वाटचाल करा. लहान मनावर विजय मिळवणे म्हणजे विजया दशमी.
लहान मनात कलह, आपले मत बनवणे आणि सर्व प्रकारचा गोंगाट चालू असतो. नवरात्र म्हणजे या प्रवृत्तींवर मात करून आपल्या स्त्रोताशी एकरूप होण्याची वेळ आहे.