रात्र ही आपल्याला शांती आणि विश्रांती देते. जसे आपण रोज रात्री शांत झोपतो तसेच वर्षातून दोनदा ध्यानस्थ होण्याची आणि आपल्या चेतनेला ताजेतवाने करण्याची परंपरा आपल्यात आहे. आणि हे नेहमी चैत्र आणि अश्विन या महिन्यांत करतात.
संक्रांती च्या दिवशी चंद्र एका बाजूला झुकलेला असतो, पण नवरात्री च्या दिवशी चंद्र मधोमध आणि कुठेही न झुकलेला असतो. आणि त्यामुळेच आपण या दिवसांत खूप गहिरे ध्यान करू शकतो आणि विश्राम करू शकतो. ( चंद्राचा आपल्या मानसिक स्थितीवर प्रभाव असतो ) हे मूळ सार आहे नवरात्रीचे. त्यामुळे सखोल विश्रांती साठी पूजा करणे, यज्ञ करणे, ध्यान व स्तोत्र पठण करणे, देवीची आराधना करणे अशी आपली परंपरा आहे.
वैयक्तिक केलेल्या ध्यान धारणेला अधिक फळ मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये यज्ञ करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की जेव्हा आपण समूहात एखादे अध्यात्मिक कार्य करतो तेव्हा त्याचे फळ लवकर व खूप पटीने जास्त मिळते. जेव्हा सगळे एकत्र येऊन ध्यान करतात तेव्हा त्याची ताकद आपल्याला खूप लवकर फळ देते. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसात सगळे एकत्र येतात आणि यज्ञ करतात.
यज्ञ म्हणजे काय?
यज्ञ हे एक पुरातन शास्त्र आहे जे वातावरणाला, लोकांना आणि सूक्ष्म स्तरावरील चेतनेला शुद्ध करते. तसेच नकारात्मकता दूर करते आणि सकारात्मक दृष्टिकोन जागृत करते.
देव म्हणजे दुसरे काही नसून एक ऊर्जा किंवा शक्ती आहे. खूप शुद्ध आणि तरंग निर्माण करणारी शक्ती.यज्ञामधून ही शक्ती ( खूप शुद्ध आणि सतत बदलणारी ) सूक्ष्म रूपातून स्थूल रूपात आणली जाते. त्यासाठी पंचमहाभुते, मंत्र आणि यंत्र ( आकृती ) यांचा उपयोग करतात. जेव्हा ही शुद्ध ऊर्जा पृथ्वी तत्वाला स्पर्श करते तेव्हा स्थूल वातावरण, सूक्ष्म वातावरण आणि यज्ञात बसलेल्या लोकांचे शुद्धीकरण होते.
कोणत्याही यज्ञाचे तीन पैलू असतात :
- देव पूजा : देवाच्या सर्व गुणांचा आदर करणे
- संगतीकरण ( एकत्र येणे ) : पंचमहाभूतांना ( पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ) एकत्र करुन उत्क्रांती ची गती वाढवणे.
- दान करणे : जे आपल्याला देवाच्या आशीर्वादाने मिळाले आहे ते लोकांमध्ये वाटणे.
हे तीन मिळून यज्ञ होतो.
चांगल्या आरोग्यासाठी, आनंदासाठी, प्रगतीसाठी, जीवनातील विघ्न दूर करण्यासाठी वेगवेगळे यज्ञ असतात. यज्ञामध्ये एखाद्या विशिष्ट परिणामासाठी वेगवेगळ्या गोष्टी खास योजलेल्या पद्धतीने करतात.
जेव्हा आपण सामूहामध्ये भजन करतो, ध्यान करतो, मंत्र उच्चरण करतो तेव्हा त्यालादेखील यज्ञ म्हणतात. एकत्र येऊन प्रार्थना केल्याने एक सकारात्मकतेचे वलय तयार होते जे यज्ञा इतकेच प्रभावी असते म्हणून आजकालच्या जगात हे खूप गरजेचे आहे.
यज्ञाच्या मागचे शास्त्र
जर तुम्ही ट्रान्झिस्टर उघडला तर त्याच्या आतमध्ये एका पत्र्यावर तुम्हाला गोलाकार आकृती दिसेल. आपल्या भ्रमणध्वनी मधे पण असेच सापडेल. अशाच प्रकारे एका ठराविक आकृतीतून जागतिक ऊर्जा फिरते. आपल्या पूर्वजांना हे माहित होते आणि त्यांनी या आकृतीला यंत्र असे नाव दिले.
मी तुम्हाला एक उदाहरण देतो, जेव्हा आपण संगणकावर एखादा ध्वनी ऐकतो तेव्हा त्याची एक आकृती तयार होते, नाही का. संगणकात ध्वनी एक आकृती तयार करते , ज्यातून ऊर्जा विशिष्ट प्रवाहात वाहते. हिच गोष्ट पुरातन काळात आकृती काढून करायचे त्याला यंत्र म्हणतात.
यंत्र ही यज्ञातील एक खूप महत्वाची गोष्ट आहे. यंत्र जेव्हा आपण पंचमहाभूतांबरोबर ( पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ) विशिष्ट ध्वनी आणि कार्य करुन वापरतो तेव्हा चांगली ऊर्जा तयार होते जी वातावरणाचे शुद्धीकरण करते आणि नकारात्मकता घालवते, सकारात्मकता आणते.
लोकांतून जे नकारात्मक विचार, भावना बाहेर पडतात ते कुठेतरी विलीन होणे गरजेचे असते, आणि त्यासाठी यज्ञातील यंत्र, मंत्र आणि तंत्र यांचा उपयोग होतो.