मंत्र – तुमच्यातील प्रत्येक पेशी ध्वनीच्या तरंगांनी व्यापून टाकली जाते आणि तुमचे मन मोकळे होऊन शांत होते. पण मंत्र म्हणजे काय? त्यांचा अर्थ काय? ते कोठून येतात? या प्राचीन शब्दांशांबद्दल असे अनेक प्रश्न आहेत. मंत्रांबद्दल बोलणे म्हणजे अनेक युगांपासून गुपित म्हणून राखल्या गेलेल्या अलौकिकाचे प्रकटीकरण आहे. मंत्र हे असे गुपित आहे ज्यांनी घटना निरपेक्षपणे, कायमच मानवतेला लाभ मिळवून दिला आहे.
मंत्र म्हणजे काय?
मंत्र हे चेतनेचा आवेग किंवा ताल आहेत. मंत्र आत्म्यामध्ये स्पंदने निर्माण करतात. त्यांचे परिणाम, प्रभाव आणि कार्य करण्याची पद्धत हे सर्वच एक गूढ आहे.
संस्कृतमध्ये असे म्हणतात की, ‘मनात त्रायते इति मन्त्र : ‘ – मंत्र तुम्हाला (विचारांच्या) पुनरावृत्तीपासून वाचवतात. पुन्हा पुन्हा येणारा विचार म्हणजे चिंता! मंत्र तुम्हाला ह्या चिंतेपासून मुक्ती मिळण्यासाठी मदत करतात. अनेकदा आपण अर्थ माहीत नसताना देखील काही मंत्रांचा जप का करत राहतो ? ह्याबद्दल आश्चर्य वाटते. आपल्या समजूतीच्या पलीकडील एखादी गोष्ट आपल्याला मदत करते का ?
प्रत्येक मंत्रांचा अर्थ अनंतत्व आहे. मनाच्या समजून घेण्याच्या शक्तीच्या पलीकडली ही ध्वनी स्पंदने आहेत. जेव्हा मनाला हया मंत्रांच्या अर्थाचा बोध होत नाही, तेव्हा ते फक्त विरघळते आणि ध्यानात जाते.
मंत्र मनावर कसा परिणाम करतात ?
मंत्र हे बीजांसारखे असतात, प्रत्येक बीजामध्ये वृक्ष बनण्याची क्षमता असते. तसेच हया स्पंदनांमध्ये निर्मितीच्या सर्व शक्यता अध्याहृत असतात. काही मंत्र हे बीज स्वरुपात असतात, त्यांना बीज मंत्र म्हणतात. काही मंत्र त्यांच्या फळांसहित पूर्ण व्यक्त केलेले असतात. उदा. गायत्री मंत्र.
मंत्र हे रहस्यमय असतात, रहस्य असलेल्या गोष्टी आपल्या सुप्त मनाला जागृत ठेवतात. मंत्र चेतनेच्या पातळीवर कार्य करतात. जेव्हा बीजाला मातीमध्ये लपवून झाकून पेरले जाते तेव्हाच त्याला अंकुर फुटतो. जर ते असेच फेकून ठेवले, तर पक्षी बीज खाऊ शकतात. आपण पुस्तके आणि आंतरजालावरून (इंटरनेट वरून) मंत्राबद्दल वाचू शकतो, शिकू शकतो पण त्यामुळे फक्त बुद्धीचे समाधान होते, त्याचा अनुभव घेता येत नाही.
मंत्र आणि ध्यान
जेव्हा आपण मंत्र ऐकतो किंवा त्यांचा जप करतो तेव्हा आपल्याला मन आणि वाणीची शुद्धता लाभते. त्यामुळे आपण ध्यानासाठी तयार होतो. मंत्राच्या स्पंदनांमुळे मनाचे वेगवेगळे आकृतीबंध स्वतःला पुनःस्थापित करून स्थिरचित्त होता येते. मनाची चळवळ कमी होते, त्यामुळे अंतर्मुखी होण्यास मदत होते. असे पहा की जेव्हा आपण हसतो तेव्हा आपला आनंद वाढतो. जेव्हा आपण रडतो तेव्हा आपला दुःखाचा भार हलका होतो. हसणे किंवा रडण्याने आपल्याला मदत होते, त्याचप्रमाणे मंत्र काम करतात. मंत्राच्या पुनरावृत्तीमुळे होणारा मानसिक परिणाम अतिशय खोल आणि व्यक्त करण्याच्या पलीकडचा असतो. त्याचा फक्त अनुभव घेतला जाऊ शकतो. अनुभवाच्या पातळीवर व्यक्त करणे शक्य होत नसल्याने हा अनुभव सांगताना शब्द कमी पडतात.
जेव्हा मन शांत आणि केंद्रीत असते तेव्हा ते अंतर्मुखी बनते. फक्त अंतर्मुखी मन दैवी चेतनेचे सौंदर्य आणि विशालता अनुभवू शकते.
जेव्हा मनाचे लक्ष बाहेर इंद्रियांच्या मागे केंद्रीत असते तेव्हा मन भरकटलेले आणि लालसेच्या मागे धावत असते. शारिरीक संवेदना बाहेरच्या विश्वाबददल जाणून घेण्याबद्दल उत्सुक असतात. ध्यान हे आंतरिक शोधाचे साधन आहे.
‘अंतर्मुखी सदा सुखी’ – ज्याचे मन आत केंद्रित झाले आहे , तो नेहमी आनंदात असतो. मंत्र हे मनाला विरघळू देण्याचे आणि स्वतःमध्ये विश्राम करण्याचे साधन आहे.
आपण स्वतःमध्ये विश्राम का करावा ? त्याची आपल्या रोजच्या आयुष्यात काय मदत होते ?
जेव्हा नदी शांत असते तेव्हा प्रतिबिंब निर्मळ दिसते. तसेच जेव्हा मन शांत असते तेव्हा व्यक्त होण्यामध्ये जास्त स्पष्टता असते. आपली निरीक्षण क्षमता, आकलनक्षमता आणि व्यक्त होण्याची समज सुधारते.त्यामुळे आपण प्रभावी आणि स्पष्टपणे संभाषण करू शकतो . आपले बरेचसे प्रश्न किंवा गैरसमजुती ह्या योग्य संभाषणा अभावी निर्माण होतात. जेव्हा मन आंदोलनांपासून मुक्त असते तेव्हा आपण अधिक आनंददायी आणि प्रभावीपणे संवाद साधू शकतो. आपल्या प्रयत्नांना संभाषणातील अंतरामुळे निर्माण झालेल्या मतभेदांमुळे अडथळा येत नाही. त्यामुळे आयुष्यात सकारात्मकता आणि प्रगती येते.
पाण्यावर तरंग उत्पन्न करणाऱ्या, हवेसारखे मंत्र सूक्ष्म असतात. हवा सर्वत्र असते परंतु त्याचा परिणाम काही विशिष्ट क्षेत्रांवरच जाणवतो. मंत्रांचेदेखील तसेच आहे. ते सर्वत्र उपलब्ध असतात परंतु त्यांचा प्रभाव फक्त त्यांचा सराव करणाऱ्या व्यक्तीवरच होतो.
(लेखिका गुरुदेव श्री श्री रवी शंकर ह्यांच्या भगिनी असून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या महिला व बाल कल्याण कार्यक्रमाच्या संचालिका आहेत.)