ही दैवी माता सृष्टीचे प्रतीक आहे आणि संपूर्ण सृष्टी पाच घटकांनी बनलेली आहे. या पाच तत्वांमध्ये तीन गुण आहेत. ते आहेत:

  • सत्व
  • रजस
  • तमस

ही तीन गुणांना दिलेली नावे आहेत आणि या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट या तीन गुणांवर चालते. हे तीन गुण आपल्या चेतनेच्या स्थितीशी देखील संबंधित आहेत, जसे की जागे होणे, स्वप्न पाहणे आणि झोपणे.

सत्त्व

आता सत्त्व म्हणजे काय, रजस म्हणजे काय आणि तमस काय याबाबत एक व्यापक समज आहे. सत्त्व हा गुण आहे जो स्पष्टता, ज्ञान आणि सदाचरणी कृतीसाठी जबाबदार आहे. जेव्हा आपल्या वातावरणात किंवा शरीरात सत्त्वगुणांचे वर्चस्व असते, तेव्हा आपल्याला हलके, आनंदी, आल्हादकारक, प्रफुल्लित, सावध, सजग वाटते आणि आपली धारणा अगदी स्पष्ट असते..

रजस

रजस हा एक गुण आहे जो शरीर आणि मनाच्या कृतीशीलतेसाठी जबाबदार असतो. एका विशिष्ट पातळीच्या रजस शिवाय आपण ‘कृती’ करू शकत नाही. रजस इतर दोन गुणांसह समतोल असेल तर त्याचे अनेक फायदे आहेत. परंतु जेव्हा रजस वाढतो किंवा त्याचे वर्चस्व असते , तेव्हा आपल्या मनात बरेच विचार येतात, आपल्याला अस्वस्थ वाटते, आपल्या खूप इच्छा असतात आणि खूप गोष्टी करायच्या असतात. तसेच आपल्याला एकतर आपण खूप आनंदी आणि उत्साही आहोत किंवा खूप कमी आहोत अशा भावना येतात. हा रजो गुणाचा प्रभाव आहे.

तमस

तमस हा एक गुण आहे जो शरीर आणि मनाच्या विश्रांतीसाठी जबाबदार आहे. तमसाच्या एका विशिष्ट स्तराशिवाय माणूस ‘झोप’ घेऊ ​​शकत नाही. तथापि, जेव्हा तमसचा तोल नसतो, तेव्हाच भ्रम, चुकीचा समज, कंटाळवाणेपणा इत्यादी गोष्टी जाणवतात.

कोणत्याही वेळी या तीनपैकी एक गुण आपल्या जीवनावर वर्चस्व गाजवत असतो. जेव्हा आपल्या जीवनात सत्त्वाचे वर्चस्व असते, तेव्हा रजस आणि तमस पार्श्वभूमीत राहतात आणि त्यांचा प्रभाव कमी असतो. जेव्हा रजस वर्चस्व गाजवतात तेव्हा सत्त्व आणि तमस पार्श्वभूमी असतात. आणि जेव्हा तमस वर्चस्व गाजवतात, तेव्हा सत्त्व आणि रजस हे पार्श्वभूमीत असतात आणि त्यांचा प्रभाव कमी असतो. ही जगातील जीवनाची संपूर्ण यंत्रणा आहे.

हे तीन गुण आपल्या अन्नातही असतात. आपले अन्न सात्विक, राजसिक किंवा तामसिक असू शकते. आपले मन आणि बुद्धी सात्विक, राजसिक किंवा तामसिक असू शकते. आपली वृत्ती आणि कृती सात्विक, राजसिक किंवा तामसिक असू शकतात.

हे तीन गुण एकामागून एक कालचक्रात येतात. हे तीन गुण वेळोवेळी अनुभवणे स्वाभाविक आहे. कधी कधी तुम्हाला आनंदी, प्रफुल्लित आणि सतर्क (सत्व) वाटते. कधी कधी तुम्हाला अस्वस्थ, दुःखी, अनेक गोष्टींचे ओझे वाटते आणि अनेक इच्छा (रजस) उत्पन्न होतात. आणि कधी कधी तुम्हाला निस्तेज, झोपाळलेले आणि आळशी (तमस) वाटते.

जरी आपण वेळोवेळी तिन्ही गुण अनुभवत असलो तरीही आपण निरोगी आणि संतुलित जीवनशैली जगून आपला सत्त्व स्तर उच्च ठेवू शकतो. ध्यान, जप इत्यादी अध्यात्मिक पद्धती देखील सत्व स्तर उच्च ठेवण्यास हातभार लावतात. सत्त्वगुण जितके जास्त तितके अधिक आनंद आणि स्पष्टता अनुभवली जाते.

नवरात्र आणि त्रिगुण

त्रिगुण हे आपले जन्मजात गुण आहेत, जे दैवी चेतनेद्वारे शुद्ध केले जाऊ शकतात. देवी त्रिगुणात्मिका आहे – तीन गुणांची स्वामी आणि अधिपति. ती चांगल्या गुणांचे भांडार आहे.

नवरात्री दरम्यान पहिले तीन दिवस तमस म्हणून ओळखले जातात आणि देवीला दुर्गेच्या रूपात सन्मानित केले जाते. पहिल्या तीन दिवसांत दुर्गादेवीची उपासना केल्याने तामसिक प्रवृत्तींचा समतोल साधला जातो.

नवरात्रीचे पुढील तीन दिवस रजसाचे म्हणून ओळखले जातात आणि देवीला लक्ष्मीच्या रूपात सन्मानित केले जाते. देवी लक्ष्मीची उपासना केल्याने राजसिक प्रवृत्तींचा समतोल होतो.

नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस सत्त्वगुणाचे म्हणून ओळखले जातात जेथे देवीला सरस्वतीच्या रूपात सन्मानित केले जाते. देवी सरस्वतीची उपासना केल्याने आपल्यातील सत्त्वगुण वाढते. नवरात्रीच्या काळात शेवटच्या तीन दिवसांत आपली चेतना तमस, रजस आणि सत्त्व या त्रिगुणांनी बहरते.

त्रिगुणांवर विजय मिळवणे (पूजा आणि अध्यात्मिक साधनेद्वारे) आणि केंद्रस्थानी राहणे हा नवरात्रोत्सव साजरा करण्यामागील उद्देश आहे.