नवरात्रि में उपवास करने का तरीका

शरीराला शुद्ध करण्यासाठी, पचनशक्ती वाढवण्यासाठी आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी नवरात्रीमध्ये उपवास करणे हा आदर्श मार्ग आहे.

नवरात्रीमध्ये उपवास करण्याचे अनेक फायदे असले तरीही चुकीच्या पद्‌धतीने केलेले उपवास शरीरातील समतोल बिघडवू शकतात.

इथे तुमच्या शरीर आणि मनासाठी हितकारक ठरतील अश्या पद्धतीने नवरात्रीमध्ये उपवास करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शक दिले आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासाची योजना तुम्ही कशी करू शकता?

१ ल्या दिवसापासून ते ३ रया दिवसा पर्यंत

फलाहार घ्या. पपई, सफरचंद, केळे , चिकू, कलिंगड, द्राक्षे ह्यासारखी गोड फळे तुम्ही  खाऊ शकता. तसेच तुम्ही आवळा, दुधी ह्यांचा रस आणि नारळ पाणी घेऊ शकता.

४ थ्या दिवसापासून ते ६ व्या दिवसा पर्यंत

पुढील तीन दिवस, एकवेळ तुम्ही पारंपारिक नवरात्रीचे अन्न (खाली दिल्याप्रमाणे) घेऊ शकता. बाकीच्या वेळी फळांचे रस, ताक आणि दूध घ्यावे .

७ व्या दिवसापासून ते ९ व्या दिवसा पर्यंत

शेवटचे तीन दिवस तुम्ही पारंपारिक नवरात्रीचे आहार घेऊ शकता.

स्वास्थ्यासंबंधी काही तक्रार असल्यास, उपवास करण्याआधी तुमच्या वैद्यासोबत बोलून घ्या.लक्षात ठेवा, आपल्या शरीराला जितके सहन होईल तेवढेच करा.

नवरात्रीमधील पारंपारिक आहार

नवरात्रीमधील पारंपारिक आहार आपला पाचक अग्नी शांत करतो. खालीलपैकी कोणत्याही पदार्थांच्या संयोगाचा त्यात अंतर्भाव असतो.

  • कुट्टू भाकरी, वरी (भगर) चा भात , वरीचा डोसा, साबुदाण्यापासून बनवलेले पदार्थ, शिंगाड्याचे पीठ, राजगीरा, सुरण, अरबी, रताळे इत्यादि
  • तूप, ताक आणि दूध. हया सर्वांचा शरीरावर शीतकारी परिणाम होतो. 
  • दुधी भोपळा आणि लाल भोपळ्यासोबत दही
  • भरपूर फळे – उदा शहाळ्याचे पाणी, फळांचे रस, भाज्यांचे सूप.आपल्या शरीराला उर्जा मिळवून देण्यासोबतच ते शरीराचे निर्जलीकरण होण्यापासून वाचवतात आणि शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यासाठी मदत करतात.
  • पपई, पेरु आणि सफरचंद घालून बनवलेले फ्रूट सलाड

पारंपारिक नवरात्रीचा आहार घेत असताना पुढील गोष्टींची शिफारस केली जाते.

  • नेहमीच्या मीठाऐवजी स्वयंपाकात सैंधव वापरा.
  • भाजणे, उकळणे, वाफाळणे, विस्तवावर शेकणे अश्या आरोग्यदायी पद्धती वापरा
  • पूर्णपणे शाकाहार पाळा
  • पहिले काही दिवस धान्य खाऊ नका.
  • तळलेले किंवा जड पदार्थ टाळा
  • कांदा आणि लसूण खाऊ नका.
  • प्रमाणापेक्षा जास्त खाऊ नका.

ज्यांना उपवास करणे शक्य नाही त्यानी मांसाहार, दारु, कांदा, लसूण ह्यापासून दूर राहावे. स्वयंपाकात सैंधवचा वापर करावा.

उपवास सोडणे

संध्याकाळी किंवा रात्री जेव्हा तुम्ही उपवास सोडाल तेव्हा हलका आहार घ्या. जड आहार आपल्या शरीराला पचावयास कठीण जातो. शरीरशुद्धीची प्रक्रिया थांबते. पर्यायी उपवासाचे चांगले परिणाम दिसत नाही, म्हणून जड आहार घेऊ नका. सहजपणे पचन होईल असा आहार कमी प्रमाणात घ्या.

योग आणि ध्यानासोबत उपवास

उपवासासोबत हलकी योगासने, व्यायाम करा. त्यामुळे शरीर शुद्धीकरणाचे प्रक्रिया जलद होते. तसेच तुम्हाला ऊर्जावान वाटते आणि ऊभारी येते.

नवरात्रीमध्ये उपवास करण्याचे फायदे

तुम्ही नवरात्रीमध्ये उपवास कां करायला हवा?

रंगाची उधळण असलेला, परंपरा, गाणी आणि नृत्याने परिपूर्ण असलेला नवरात्रीचा काळ आपल्याला अंतर्मुखी होऊन स्वतःला नव्या ऊर्जेने भरून घेण्याचा आणि विश्राम करण्याचा देखील असतो. नवरात्री दरम्यान उपवास करण्याने  हा आनंदाकडे आणि सुखाकडे नेणारा प्रवास सहज होतो. उपवास मनाची अस्वस्थता कमी करून सजगता व आनंद आणतात.

उपवासाची प्रेरक शक्ती

आपण ईश्वराला खूष करण्यासाठी नाही तर आपले शरीर शुद्ध करण्यासाठी उपवास करतो

– गुरुदेव श्री श्री रवी शंकर

आयुर्वेदानुसार, उपवासामुळे आपला जठराग्नि जागृत होतो. वाढलेला जठराग्नि आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये जाळून टाकतो. जेव्हा हे विषारी पदार्थ शरीरातून बाहेर टाकले जातात , तेव्हा शरीरातला आळस आणि जडपणा निघून जातो. शरीरातील सर्व पेशींचे पुनर्नवीकरण होते. म्हणूनच शरीर शुद्ध करण्यासाठी उपवास करणे परिणामकारक ठरते. जेव्हा शरीर शुद्ध बनते तेव्हा मन आणि शरीरातील संबंध दृढ बनतात. त्यामुळे मन शांत आणि निश्चल बनते.

उपवासामुळे जागृत झालेला जठराग्नि तणाव कमी करण्यास व प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतो.

आपल्यापैकी बरेचजण बहुतेकवेळा भूक लागण्याची वाट पाहत नाहीत. आपले शरीर अन्न पचविण्यासाठी तयार आहे याचे लक्षण  म्हणजे भूक लागते. भूक लागण्यापूर्वीच अन्न घेतल्याने आपली पचन संस्था कमकुवत होते.परिणामी ताण आणि अशक्त प्रतिकारक्षमता तयार होते.उपवासामुळे जठराग्नि जागृत होवून ताण कमी करण्यास व प्रतिकारशक्ती दृढ करण्यास मदत करतो.

नवरात्री उपवासासोबत गहिऱ्या ध्यानात डुबकी मारा.

नवरात्रीचा काळ हा स्वतःसोबत वेळ घालवण्याचा, ध्यान करण्याचा आणि अस्तित्वाच्या मूळ स्त्रोतासोबत स्वतःला जोडण्याचा असतो. उपवासामुळे मनाची बेचैनी कमी होते तेव्हा अंतर्मुखी होऊन ध्यान करणे सोपे जाते. परंतु तुम्ही स्वतःला टवटवीत  ठेवण्यासाठी पर्याप्त प्रमाणात ताजी फळे व सात्विक अन्न खाणे आवश्यक आहे.

सात्विक बहराची फळे मिळवा.

उपवासासोबत ध्यान केल्याने आपले सत्व (स्थिरचित्तता आणि सकारात्मकतेची वैशिष्ट्ये) वाढते. सत्व वाढल्यामुळे आपले मन शांत आणि जागृत राहते. परिणामी आपली  उद्दिष्टे आणि प्रार्थना जास्त शक्तिशाली बनतात. सत्वाचा बहर आपल्या शरीराला हलके आणि ऊर्जावान बनवतो. आपण जास्त कार्यक्षम बनतो. परिणामतः आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपली कामे सहज पूर्ण होतात.

जगभरातील सर्व धर्मांमध्ये उपवासासोबत प्रार्थना करण्याची प्रथा कां आहे? कारण जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुम्ही शुद्ध बनता आणि तुमची प्रार्थना सखोल आणि खरी बनते.

– गुरुदेव श्री श्री रवी शंकर

सूचना : काही शरीर रचना आणि स्वास्थ्य परिस्थितीमध्ये उपवास करण्याची शिफारस केली जात नाही. त्यामुळे उपवास करण्याआधी तुमच्या आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेणे योग्य ठरते. तसेच तुम्हांला आरामदायी ठरेल इतकाच उपवास करावा हे ही लक्षात ठेवा.