नवरात्री म्हणजे नऊ रात्री.

रात्र ही मनाला आणि शरीराला विश्रांती देण्याची आणि ताजेतवाने होण्याची वेळ असते. जर आपण रात्री नीट विश्रांती घेतली नाही, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला आपली कामे करणे कठीण जाते, नाही का?

त्याचप्रमाणे नवरात्र हा तुमच्यातील चेतनेच्या विश्रांतीचा काळ आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा आपण स्वतः आपल्या पंचेंद्रियांच्या कार्यांना (खाणे, बोलणे, पाहणे, स्पर्श करणे, ऐकणे, वास घेणे) विराम देतो आणि स्वतःमध्ये विश्रांती घेतो. आपल्या पंचेंद्रियांच्या क्रियाकलापांमधून घेतलेला हा विराम तुम्हाला तुमच्या आत गहिऱ्या स्तरावर घेऊन जातो, जे तुमच्या जीवनातील आनंद, प्रसन्नता आणि उत्साहाचे प्रत्यक्ष स्त्रोत आहे.

आपल्यापैकी बहुतेकांना याचा अनुभव येत नाही कारण आपण सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतो. आपण नेहमी मनाशी गुंतलेले असतो. नवरात्र म्हणजे मनातून बाहेर पडण्याची आणि आपल्या अंतरात्म्यात विश्रांती घेण्याची वेळ आहे. आपल्या अंतरात्म्याची अनुभूती घेण्याची ही वेळ आहे!

म्हणून या नवरात्रीत, स्थूल भौतिक जगातून सूक्ष्म आध्यात्मिक जगामध्ये संक्रमण करण्याची संधी घ्या. सोप्या भाषेत सांगायचे तर, आपल्या दैनंदिन क्रियाकलाप आणि आपण गुंतलेल्या गोष्टींमधून थोडा वेळ काढा आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करा. आपल्या मूळ स्त्रोताचा विचार करा, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कुठून आला आहात. आपल्या आतमधे उतरा आणि दिव्य मातृप्रेमाच्या स्मरणात विश्रांती घ्या.

आपल्या स्त्रोताशी जोडून घ्या

आपण या विश्वाशी जोडलेले आहोत, म्हणजे अशा काही शक्ती सोबत जिने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली आहे. ही शक्ती प्रेमाने भरलेली आहे; संपूर्ण सृष्टी प्रेमाने भरलेली आहे. नवरात्री ही अशी वेळ आहे की ही सृष्टी तुमच्यावर प्रेम करते याची जाणीव असावी आणि या प्रेमाच्या भावनेत विश्रांती घ्यावी. जेव्हा तुम्ही हे करता, त्याचा परिणाम म्हणजे तुम्ही त्यातून बलवान, ज्ञानी, उर्जावान, ताजेतवाने आणि सुसंवादी असे बाहेर याल.

आपल्या दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतून जातो. आपल्या मनात सर्व प्रकारचे आवाज सतत चालू असतात – भांडणे, वाद घालणे आणि मत बनवणे इत्यादी. नवरात्र ही अशी वेळ आहे की या प्रवृत्तींवर मात करत आपल्या स्त्रोताशी एकरूप व्हावे.

नवरात्रीचा अनुभव कसा घ्यावा आणि आपला आत्मा कसा अनुभवावा

अध्यात्मिक जगामध्ये संक्रमणाचा मार्ग – स्वतःच्या आंतरिक जीवनाचा प्रवास करण्यासाठी, मौन, उपवास, जप आणि ध्यान.

मौन

तुम्हाला आंतरिक शांती अनुभवण्यापासून काय थांबवत असेल तर ते म्हणजे तुमचे व्यस्त मन, जे सतत विचार करत असते आणि काहीवेळा तर एखाद्या गोष्टीबद्दल मन व्यापून राहते. काही काळ मौन पाळल्याने बडबड करणाऱ्या मनाला विश्रांती मिळू शकते. जेव्हा मन शांत असते तेव्हा तुम्हाला गहिरी विश्रांती, शांतता आणि स्पष्टता अनुभवता येते. परिणामी, यामुळे स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करण्याची तुमची क्षमता वाढवते. म्हणून मौन पाळण्यासाठी थोडा वेळ काढा, कारण तुमचं मन स्वच्छ करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
मौनाने मन तीक्ष्ण होते; तुम्ही काय बोलत आहात याबद्दल तुम्ही अधिक सजग होतात आणि तुमचे अंतस्फुरण सुद्धा प्रबळ होते.

उपवास

शरीर डिटॉक्स करण्यासाठी उपवास केला जातो. तुम्ही खात असलेल्या अन्नाचा प्रकार, दर्जा आणि प्रमाण यांचा तुमच्या शरीरावर तसतसा परिणाम होतो. काही पदार्थ तुमच्या शरीर प्रणालीमध्ये विषारी तत्व वाढवतात; उपवासाने त्यांना शरीरा बाहेर काढण्यास मदत होते. मग, एकदा तुमचे शरीर शुद्ध झाले, त्यानंतर, योग्य प्रमाणात योग्य प्रकारचे अन्न खाऊन तुम्ही आपली शरीर प्रणाली स्वच्छ राखू शकता.

शरीर आणि मन एकमेकांशी खूप जोडलेले आहेत. त्यामुळे उपवासाने शरीर शुद्ध होते तेव्हा मनही शुद्ध होते. आणि, शुद्ध मन स्थिर आणि शांत असते.

त्यामुळे या नवरात्रीत शरीराला हलके ठेवण्यासाठी थोडीशी फळ आणि पाणी किंवा सहज पचणारे अन्न सेवन करा. तुमच्या मनावर काय फरक पडतो ते तुम्हाला दिसेलच. आपल्या शरीराच्या प्रकृतीला मानवेल असाच उपवास करणे उत्तम. तुमची प्रकृती आणि तुमच्यासाठी विशिष्ट उपवास मार्गदर्शक तत्त्वे समजून घेण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक वैद्य किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

ध्यान

ध्यान तुम्हाला तुमच्या अस्तित्वात खोलवर घेऊन जाते. हे तुम्हाला मनाच्या पलीकडे जाण्यास मदत करते. हा आपला अंतरात्मा अनुभवण्याचा मार्ग आहे. म्हणून या नवरात्रीत, दररोज ध्यान करण्याचे मनावर घ्या.

ध्यान केल्याने तुमचे शरीर मजबूत होते, मन स्वच्छ होते, भावना सकारात्मक आणि तरल होतात आणि त्यामुळे तुमचे एकंदर आरोग्य चांगले राहते. तुमची अंतर्ज्ञान क्षमता अधिक तीव्र होते. ध्यान तुमच्या व्यक्तित्वाची आभा सुधारते, ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते.

शिवाय समूहात ध्यान केले तर तो यज्ञ होतो. समूहात केल्यावर, ध्यानाचे फायदे बहुगुणित होतात, कारण समूह चेतनेमध्ये तुम्हाला वेगवान गतीने उन्नत करण्याची शक्ती असते.

नामजप

बहुतेक शब्दांशी निगडीत त्यांची ऊर्जा असते. उदाहरणार्थ, जेव्हा कोणी तुम्हाला अप्रिय शब्दांनी अपमानित करते तेव्हा त्याचा तुमच्या मनावर विपरीत परिणाम होतो. दुसरीकडे, जेव्हा कोणी तुमची स्तुती करतो, तुम्हाला सुंदर किंवा दयाळू म्हणतो, तेव्हा ते तुमचे चेतना फुलवते.

मंत्र हे अतिशय प्राचीन ध्वनी आहेत जे त्यांच्यासोबत गहिरी, परिवर्तनीय ऊर्जा घेऊन येतात. आणि तेच मंत्र हजारो वर्षांपासून वापरले जात असल्याने, या नादांना बरीच शक्ती प्राप्त झाली आहे.

प्राचीन मंत्रांचा जप करणे किंवा ते ऐकणे देखील मनावर परिवर्तनशील प्रभाव टाकते. यामुळे मन शांत आणि शुद्ध होण्यास मदत होते. तुम्ही बारकाईने निरीक्षण केल्यास, मंत्र ऐकल्यानंतर किंवा जप केल्यावर, सकारात्मक विचार तुमच्या मनात प्रवेश करतात, तर नकारात्मक विचारांचा विलय होतो.

मंत्र ऐकल्याने किंवा जप केल्याने तुमच्या मनातील क्षोभ कमी होतो. हे सकारात्मक संवाद वाढवते, मनात स्पष्टता आणते आणि सकारात्मक भावना वाढीस लागते. मंत्रांचे अनेक फायदे आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ते तुमच्या चेतनेमध्ये शुद्धता आणतात.