शास्त्रीय नांव : Zingiber officinale; संस्कृत : सिंगबेर; इंग्रजी : Ginger.
आल्याच्या लागवडीसाठी उष्ण आणि दमट हवामानाची गरज असते, त्यामुळे उष्ण कटीबंधात सर्वत्र त्याची लागवड होते. ते खरिफ तसेच रब्बी हंगामात येते. याला पाण्याची फारशी गरज लागत नाही.
मुरुमाड, ठिसूळ आणि वालुकामय शेतजमिनीमध्ये आले उगवू शकते. परंतु चांगले उत्पादन येण्यासाठी एकाच जमिनीत सातत्याने आले न लावता जमीन आलटून, पालटून आल्याची शेती करावी.
जगभर आल्याचा उपयोग मसाल्याचा पदार्थ आणि औषधी म्हणून होतो. आल्याला ‘महा औषधी‘ म्हणतात, यावरूनच त्याचे औषधी परिणाम ध्यानात येतात.
आल्याचे फायदे
आले हे अडीच-तीन फुट वाढणाऱ्या झुडुपाची, जमिनीखाली उगवणारी, पिवळ्या रंगाची मुळी होय. आले दीर्घकाळ टिकण्यासाठी उन्हात तसेच काही ठिकाणी दुधात बुडवून वाळवून त्याची सुंठ बनवतात. सुंठ आल्यापेक्षा उग्र असते. सुंठीचे तेल काढतात. ओल्या मातीत ठेऊन आले बराच काल टिकते.
पचन विकार
- अपचन, अन्नाची अनिच्छा, पोटात गॅस धरणे, उलटी, पोट साफ न होणे, इ.साठी
- जेवणापूर्वी ५ ग्रॅम आल्याचा तुकडा मीठ लाऊन चावून चावून खा.
- आल्याचा रस अर्धा चमचा, सम प्रमाणात मध आणि लिंबाचा रस दिवसातून तीनवेळा घ्यावा.
- आले, सैंधव मीठ, काळी मिरी आणि पुदिण्याची चटणी जेवणात असावी
श्वसन विकार
- सर्दी, जुनाट/डांग्या/क्षयरोगाचा खोकला, भरलेली छाती, कफ, दम्यासाठी.
- आल्याचा रस मधासोबत दिवसातून तीनवेळा घ्यावा.
- आल्याचे तुकडे पाण्यात उकळून, त्यात गरजेप्रमाणे साखर टाकून ते पाणी गरम गरम प्यावे. आल्याचा चहा घ्यावा.
- आल्याचा रस दुप्पट खडीसाखर किंवा गुळासोबत चाटवावा.
- सुंठ आणि चौपट खडीसाखर यांचा काढा घेतल्याने कफ पातळ होण्यास मदत होते
स्त्री रोग
- अनियमित मासिक पाळी, पोट दुखी साठी आले टाकून उकळलेले पाणी दिवसातून तीनवेळा घ्यावे.
प्रसूतीमुळे येणाऱ्या इंद्रिय दुर्बलतेवर सुंठीपाक देतात
वेदना शमन
- आले पाण्यात वाटून डोक्यावर, दुखऱ्या भागावर लेप करावा. ओल्या जखमेवर लाऊ नये.
- दाढ दुखीवर आले दाढेत धरावे.
- कान दुखीवर दोन थेंब आल्याचा रस कानात टाकावा.
- संधीवातात आले किसून, गरम करून लावावे
१०० ग्रॅम आल्याच्या रसामध्ये आढळणारे घटक
पाणी – ८०.९% ; वसा – ०.९% ; कार्बोहायड्रेड्स – १२.३% ; कॅल्शियम – २० मि.ग्रॅ. ; चोथा – २.४% ; फोस्फरस – ६० मि.ग्रॅ. ; प्रोटीन्स – २.३% ; लोह – २.६० मि.ग्रॅ. ; खनिज – १.२% ; विटामिन सी – ६0 मि.ग्रॅ.
आल्याचे उष्मांक मूल्य ६७ आहे.
आल्यामध्ये विटामिन बी-१२, कॅरोटीन, थायमिन, रीबोफ्लेवीन आणि क जीवनसत्व आहे.
- आले तिखट,उग्र चवीचे तसेच उष्ण आणि तीक्ष्ण गुणधर्मानी युक्त आहे.
- आले पाचक,सारक,अग्निदीपक,वेदनाशामक,कामोत्तेजक आणि रुचीप्रद आहे.वायू आणि कफाचा नाश करणारे आहे.
आयुर्वेदानुसार शरीरात अनेक मार्ग आहेत ज्यांना ‘ स्त्रोतज ‘ म्हणतात. आल्यामुळे स्त्रोतजरोध दूर होतात.
खबरदारी
- आले उष्ण असलेने उन्हाळ्यात कमी वापरावे.
- उच्च रक्तदाब, अल्सर, रक्तपित्तमध्ये आले खाऊ नये.