किशोरवयीन मुलाला कसे हाताळावे हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर घोड्यावर स्वार कसे व्हावे हे तुम्हाला माहित करून घ्यावे लागेल. प्रथम तुम्हाला लगाम हाती घ्यावा लागेल. आणि तुम्ही तो सतत खेचूनच ठेवू शकत नाही, काही वेळा तुम्हाला तो सैल सोडावा लागतो. त्याच वेळी, आपण तो लगाम पूर्णपणे सोडूनही देऊ शकत नाही. युक्ती अशी आहे: मुलांना तुम्ही खुश करण्याचा प्रयत्न करू नका आणि नाराज ही करू नका. ते भावनिक आणि शारीरिक स्तरावर खूप कठीण काळातून जात आहेत आणि तुम्हाला त्यांना अतिशय कुशलतेने हाताळावे लागेल. प्रश्न आहे हे कसे करावे?
1. त्यांना त्यांच्या भावना तुमच्याजवळ शेअर करण्याची संधी द्या
संस्कृतमध्ये एक जुनी म्हण आहे, “जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी सोळा वर्षाचे होतात, तेव्हा त्यांच्याशी मित्रासारखे वागा”. त्यांचे शिक्षक होऊ नका, त्यांनी काय करावे आणि काय करू नये हे त्यांना सांगू नका. त्यांच्या मनात काय आहे आणि त्यांच्या काय समस्या आहेत हे तुम्हाला सांगण्याची त्यांना संधी द्या. त्यांच्या बरोबरीचे त्यांचे मित्र व्हा.
तुम्ही पालक म्हणून नव्हे तर मित्र म्हणून त्यांच्याशी वागल्यास ते तुमच्या जवळ आपले मन मोकळे करतील. मग तुमच्यातले अंतर कमी होईल. एकदा अंतर कमी झाले की प्रेमळ संवाद घडू लागतो. आणि एकदा का संवाद साधला की सर्व समस्या सुटतात.
2. त्यांना प्रेरणादायी कथा सांगत रहा
आपल्या किशोरवयीन मुलांना वेळोवेळी प्रेरणा देणाऱ्या कथा सांगणे महत्त्वाचे आहे, तेही त्यांना जास्त भरीस न घालता. त्यांना भरकटलेल्या किशोरवयीन मुलांची उदाहरणे देणेही महत्त्वाचे आहे. सरळ मार्गाने जाणाऱ्यांपेक्षा भरकटलेली मुलं आपल्याला जास्त शिकवून जातात, हे तुम्हाला माहीत असेलच. तुमच्या किशोरवयीन मुलाला हळूवारपणे समजावून सांगा, “बघ, तो मुलगा किती अडचणीत सापडला होता. तू सावध राहिलेले बरे.”
3. त्यांना दोष न देता, त्यांना समजावून सांगा
तुमच्या किशोरवयीन मुलाशी संवाद साधताना तुमच्यात कुशलता असणे गरजेचे आहे. अतिशय संयमाने, त्यांना दोष न देता , त्यांना समजून सांगा. आणि जेव्हा तुम्हाला गरजेचे वाटेल तेव्हा सरळ ठामपणे त्याला नकार द्या. त्यामुळे त्यांना कधी अस्वस्थ वाटले तरी ठीक आहे, त्याबद्दल दोषी वाटून घेऊ नका. नंतर, त्यांना त्याबद्दल कृतज्ञताच वाटेल. त्यांचा आरोप आणि संताप सहन करण्याचा त्रास तुम्ही घेतल्याचे त्यांना कौतुकच राहील.
4. तुमच्या मुलाचे चिडणे किंवा निराश होणे सहन करण्यास तयार रहा
आई, वडील आणि शिक्षक यांना मुलाचा राग सहन करावा लागेल. आपण त्यांचा राग किंवा वैफल्य सहन करण्यास तयार राहिले पाहिजे. जरी तुमचे मूल तुमच्यावर खूप रागावले असेल तरी त्याचा स्वीकार करा आणि त्यांच्यासाठी जे चांगले आहे ते तुम्ही करा आणि केवळ तो ज्याने खुश होतोय ते करू नका. हे जाणून घ्या की तुम्हाला नेहमीच योग्य मार्ग सापडेल!