सध्याच्या काहीशा अवघड जगात आपली मुले आनंदाने वाढत असली तर किती छान होईल. मुले ध्यान करण्यासाठी अगदीच लहान असतील तर आपण भरपूर प्रेमा सोबत आपण त्यांना आणखी काय देऊ शकतो ?
गुरूदेव श्री श्री रवि शंकर : त्यांच्या सोबत फक्त खेळा. प्रत्येक वेळी त्यांचे शिक्षक बनून त्यांना शिकवत बसू नका. खरं तर तुम्हीच त्यांच्या कडून शिका आणि त्यांचा आदर करा. आणि त्यांच्या सोबत जास्त गंभीर होऊ नका.
मला आठवते, मी लहान होतो तेव्हा संध्याकाळी वडील घरी आल्यावर फक्त टाळ्या वाजवायचे आणि आम्हाला हसवायचे. माझी आई फार कडक शिस्तीची होती , परंतु माझे वडील संध्याकाळच्या जेवणा अगोदर फक्त टाळ्या वाजवायचे आणि आम्हा सगळ्यांना हसवायचे. आम्ही सगळे एकत्र बसून जेवत असू. त्याआधी ते टाळ्या वाजवत घरभर सर्वांच्या मागे धावत. जेवणाआधी सगळे हसत असू.
तर, त्यांना सारखे शिकवत बसू नका, त्यांच्या सोबत आनंद साजरा करा, त्यांच्या सोबत खेळा, गाणी गा. हे सर्वात छान आहे.
तुम्ही नेहमीच हातात काठी घेऊन, “हे करू नका, ते करु नका” म्हणत असाल तर ते चांगले नाही.
मला वाटते, तुम्ही मुलांच्या सोबत जास्त वेळ खेळले पाहिजे आणि कधी कधी त्यांना गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा खूप छान छान गोष्टी दररोज ऐकायचो. त्यातून मुलांना मूल्य संस्कार देत चांगले वाढवता येते. तुम्ही जर त्यांना छान आवडत्या गोष्टी सांगाल तर ते सारखे टेलिव्हिजनला चिकटून बसणार नाहीत. लहान मुलांना सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पंचतंत्र आहे. आपला एक साधक पंचतंत्रावर कार्टुन बनवत आहे. लवकरच ते प्रकाशित होईल.
म्हणूनच पालकांनी मुलांसोबत बसून त्यांना निती मूल्ये असलेल्या गोष्टी सांगणे उपयुक्त आहे. निती मुल्यावर आधारित कथा चांगली असते. आणि तो अर्ध्या एक तासाचा चांगला वेळ जो तुम्ही तुमच्या मुलांच्या सोबत घालवता तो पुरेसा आहे.
तसेच त्यांना पाच-सहा तास तुमच्या सोबत बसण्यासाठी जबरदस्ती करू नका. ४५ मिनीट ते एक तासाचा बहुमुल्य वेळ पुरेसा आहे, आणि हा वेळ मनोरंजक असला पाहिजे. त्यांना तुमच्या सोबत बसुन पुन्हा पुन्हा गोष्ट ऐकण्याची उत्सुकता लागली पाहिजे.
मला आठवते, माझे एक स्थूल, गोरे आणि गोल चेहऱ्याचे चुलते होते. प्रत्येक रविवारी ते आमच्या घरी यायचे आणि आम्हाला गोष्टी सांगायचे. आम्ही सगळे त्यांच्या सभोवती जमायचो आणि ते आम्हाला छान छान गोष्टी सांगायचे, आणि गोष्ट संपायच्या शेवटी ते काही ना काही रहस्य राखून ठेवायचे , जेणे करुन दुसऱ्या दिवशी आमची रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता टिकून रहावी.
आपल्या भोवती अशा व्यक्ती असतात.जर नसतील, तर तुमची मुले दुसऱ्या मुलांकडे जाऊन त्यांना गोष्टी सांगु शकतात. त्यामुळे त्या मुलांच्या पालकांना सुद्धा खूप आनंद होईल. त्यांच्या मुलांची काळजी घेणारा कुणी तरी भेटेल आणि तुमच्या कडून सेवा सुद्धा घडुन जाईल.
त्यामुळेच मानवी स्पर्श गरजेचा आहे.
आजकाल, मुले सकाळी झोपेतुन उठल्या पासुन निष्क्रियपणे टेलिव्हिजन (टी.व्ही) समोर बसून असतात, बरोबर नां ?
टी. व्ही. समोर बसतात आणि फक्त चॅनल बदलत असतात. आई येते आणि म्हणते ‘अरे! नाष्टा करुन घे’, परंतु ते जागचे हालत नाहीत. काही वेळा आईला नाष्टा टी.व्ही. समोर आणून द्यावा लागतो. अशी सवय चांगली नाही. तुम्हाला काय वाटते?
किती जण माझ्याशी सहमत आहेत?
मुलांना एक तासा पेक्षा जास्त टी.व्ही पाहू देऊ नका. तुम्ही स्वत: टी.व्ही. पहाण्याची वेळ मर्यादित केली पाहिजे, नाहीतर मुलांची एकाग्रता क्षमता कमी होऊन ती अस्थिर होतील. मेंदुवर चलचित्राचा लागोपाठ आघात होत रहातो, ज्यामुळे मेंदु दुसरे काहीच पाहू शकत नाही आणि त्यामुळे मुले भविष्यात मंद बनतात. ते दुसऱ्या कशावरही लक्ष देऊ शकत नाहीत. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा टी.व्ही नावाचा प्रकार नव्हता ही देवांचीच कृपा.
तुमच्या पैकी किती जणांकडे लहानपणी टी .व्ही. नव्हता? आपण सगळे टी.व्ही. शिवायच मोठे झालो.
जास्त वेळ टी..व्ही. पहात मोठी होणारी मुले बुद्धीमान असण्याची शक्यता कमी आहे. तुम्ही टी.व्ही. पहाण्याचे प्रमाण जास्तीत जास्त दोन तासांपर्यंत मर्यादित केले पाहिजे.
अगदी वृद्ध लोकांना सुद्धा एक किंवा दोन तास पुरेसे आहेत, या पेशा जास्त नको. वृद्ध लोकांसाठी हे सुद्धा जास्तच आहे. जास्त वेळ टी.व्ही. पहाण्यामुळे मेंदुच्या नसा जास्त ताणल्या जातात हे तुम्ही अनुभवले असेलच.
बरेच वेळा लोक मला ‘गुरूदेव, हा खूप चांगला कार्यक्रम आहे’ असे म्हणुन टी.व्ही पहाण्यासाठी जबरदस्ती करतात, मला आर्धा ते एक तासा पेक्षा जास्त पहाणे जमतच नाही. यामुळे खरोखर मनावर ताण पडतो. एका आठवड्यात लोक दोन-तीन सिनेमे कसे पहातात याचे मला आश्चर्य वाटते. मी म्हणेन आपण मेंदुच्या पेशींचा ऱ्हास करत आहोत.
सिनेमाघरातुन बाहेर येणाऱ्या लोकांचे चेहरे पहा, ते उत्साही, ऊर्जावान आणि आनंदी दिसतात कां ? ते सिनेमाघरात जाताना आणि बाहेर पडताना काय फरक जाणवतो? कितीही चांगला सिनेमा असला तरी ते ऊर्जाहिन, निस्तेज आणि सुस्त झालेले दिसतात, बरोबर नां? तुम्ही जर कधी बघितले नसेल तर सिनेमाघराच्या एकदा बाहेर उभे रहा. जेव्हा लोक आत जातात आणि सिनेमा पाहून बाहेर येतात तेव्हा त्यांचे निरीक्षण करा. तुम्हाला स्पष्ट फरक दिसेल. तुमच्या पैकी किती जणांनी असे निरीक्षण केले आहे? अगदी स्वत:चे. कुठल्याही करमणुक मनोरंजना द्वारे आपल्याला ऊर्जा मिळणे अपेक्षित असते, पण इथे तसे घडत नाही.
तुम्ही नाटक पहायला जाता, जे सिनेमा पेक्षा जरा बरे आहे, तुम्हाला एवढा कंटाळा येत नाही. तुम्ही संगीत मैफिलीला जाता, तेव्हा ही जास्त कंटाळा येत नाही. थोडे थकल्या सारखे वाटते, पण एवढे जास्त नाही. तुमच्या पैकी किती जणांना असा अनुभव आहे?
जेव्हा तुम्ही सत्संगसाठी येतात, तेव्हा याच्या उलट घडते. जेव्हा तुम्ही येतात तेव्हा वेगळे असता आणि माघारी जाता तेव्हा ऊर्जावान झालेले असता.
लहान मुलांना भीतीदायक कथा सांगाव्यात का? कारण मी ऐकले आहे की काही जर्मन कथा भीतीदायक असतात आणि त्या मुलांना सांगु नये.
गुरूदेव श्री श्री रवि शंकर : भीतीदायक गोष्टी सांगताना संयम पाळावा.
जर त्यांना लहान वयातच एकही भितीदायक गोष्टी ऐकवली नाही तर, ते मोठे होतील आणि मग ऐकतील आणि त्यांना जास्तच भिती वाटेल. हे त्यांना खूपच कमकुवत बनवेल.
उलट जर तुम्ही त्यांना सारख्याच भीतीदायक गोष्टी सांगाल तर ते भीतीने वेडे होतील. दोन्हींचा अतिरेक टाळला पाहिजे. थोड्याफार भीतीयुक्त गोष्टी ठीक आहे परंतु अतिरेक नको; विशेष करून व्हिडीयो गेम.
मला वाटते व्हिडीयो गेम हिंसायुक्त नसाव्यात. मुले व्हिडीयो स्क्रिनवर गोळ्या मारतात आणि त्यांना तो फक्त खेळ वाटतो, आणि नंतर खऱ्या आयुष्यात सुद्धा ते लोकांना गोळ्या घालायला सुरूवात करतात कारण त्यांना आभासी जग आणि खऱ्या जगातील फरक कळत नाही. ही समस्या आहे. म्हणून मी मुलांसाठी हिंसक व्हिडीयो गेम नसावेत यासाठी प्राधान्य देईन.
सगळे नातेसंबंध गतजन्मीच्या कर्मावर आधारित असतात का?
गुरूदेव श्री श्री रवि शंकर – हो.
तुम्हाला माहिती आहे कां, कधी कधी जेव्हा आत्म्याची जन्म घेण्याची इच्छा होते, तो एक पुरूष आणि एक स्त्री निवडतो आणि दोघांच्या मध्ये उत्कट आकर्षण निर्माण करतो. या प्रकारे अशा दोन व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांना पहिले मुल होताच, अचानक दोघांच्या मधले प्रेम नाहिसे होते.
असे घडताना तुमच्या पैकी कुणी पाहिले आहे कां ?
कारण पहिले मुल जन्मताच, आत्म्याचे काम झालेले असते, तो या जगात आलेला असतो, नंतर तो आई-वडील काय करतात याची चिंता करत नाही. म्हणूनच पहिल्या मुलाच्या जन्मा नंतर, अचानक त्या दांपत्या मधले एक दुसऱ्याबद्दलचे आकर्षण नाहिसे होते.
असं नेहमीच घडत नाही, प्रत्येकाच्या बाबतीत असेच घडते असा विचार करू नका. फक्त काहींच्या बाबतीतच असं घडत. काही वेळा, तिसरे किंवा पाचवे मुल जन्मल्यावर सुद्धा असा अनुभव येतो. अचानक त्यांना एकमेकांचे तोंड सुद्धा पहाण्याची इच्छा रहात नाही, कारण त्या दोघांना जन्म घेऊ इच्छिणाऱ्या आत्म्याने कृत्रिम रित्या एकत्र आणलेले असते.
असे घडत असते, पण नेहमी नाही; तुम्ही ३०% म्हणु शकता, आणि याचा शेवट घटस्फोटाने होतो कारण अशा घटनात दोघे एक दुसऱ्यासाठी योग्य जोडी नसतात. त्यांच्या मध्ये काहीच जुळत नाही. अचानक एकाला जाणवत ‘ओह! आपण विचार केला की आपण एकमेकांचे आयुष्यभराचे सोबती आहोत आणि हे काय घडलं? मी एकदम वेगळा आहे आणि आपण एकमेकांबरोबर राहू शकत नाही.’
अशा गोष्टी घडत असतात.
जीवन असेच आहे, मित्र शत्रु बनतात आणि शत्रु मित्र.
तुम्ही एखाद्याचे भले केलेले नसते आणि ते तुमच्या हिताच्या गोष्टी करायला सुरूवात करतात. म्हणुन मित्र किंवा शत्रु, याचा काहीच फरक पडत नाही. तुमचे आयुष्य कर्माच्या काही निराळ्या नियमांद्वारे संचालित असते. म्हणुनच, तुमचे सगळे मित्र आणि शत्रु एकाच तराजुत ठेवा, कारण दहा वर्षांची मैत्री शत्रुत्वा मध्ये बदलु शकते, आणि शत्रु तुमचा जिवलग मित्र कधीही बनु शकतो. हे सगळे तुम्ही आणि तुमच्या कर्मावर अवलंबुन असते.
प्रिय व्यक्तीचे निधन स्विकारण्याचा सोपा मार्ग काय आहे?
गुरूदेव श्री श्री रवि शंकर : वेळ सगळे निभावून नेईल. स्विकार करण्याचा किंवा अजुन काही करण्याचा प्रयत्न करू नका. जर दु:ख वाटत असेल तर वाटु द्या, ते संपुन जाईल. काळ हा रामबाण उपाय आहे. जसा वेळ निघून जाईल तसे तुम्हाला पुढे आणि पुढे घेऊन जाते. म्हणून काहीही करण्याचा प्रयत्न करू नका, काळ सगळे निभावून नेईल. किंवा जागे व्हा आणि पहा सगळे जण एक दिवशी जाणारच आहेत. त्यांनी लवकरचे विमान पकडले, आपण नंतरच्या विमानात असू. बस्स एवढंच.
म्हणुन जे लोक अगोदरच गेले आहेत, त्यांना म्हणा, ‘काही वर्षांनंतर मी तुम्हाला तिथे भेटेन’. आत्तासाठी निरोप घ्या. तुम्ही नंतर त्यांना वेगळ्या ठिकाणी भेटाल.
मला कुटुंब नाही, एकटेपणा घालवण्यासाठी काय करू?
गुरूदेव श्री श्री रवि शंकर :. मी तुम्हाला एवढा मोठा परिवार दिला आहे, खरे कुटुंब आणि तुमची खरोखर काळजी घेणारे कुटुंब.
तुमचे कुटुंब नाही असा विचार कधीच करू नका, मी तुमचे कुटुंब आहे. म्हणुनच मी इथे ख्रिस्मस आणि नवीन वर्षीसाठी प्रत्येक वर्षी येत असतो. नाहीतर मला यायचे कारण काय?!
तुम्हाला आनंदी करण्याचा चांगला मार्ग कोणता?
गुरूदेव श्री श्री रवि शंकर : तुम्ही आनंदी रहा आणि इतरांना आनंदी ठेवा.
तुम्ही मला प्रयत्नपूर्वक आनंदी करण्यासाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही, मी तसाही आनंदीच असतो. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मदत करता, तेव्हा मला जास्त आनंद होतो. फक्त भेटवस्तू देऊन किंवा त्यांच्यासाठी पार्टी ठेऊन नाही, तर त्यांना ज्ञान देऊन आणि त्यांना खंबीर बनवून.
जर तुम्हाला लोकांना या ज्ञान मार्गावर आणता आले तर, ती सर्वोत्तम बाब असेल.
जेव्हा लोक अष्टवक्रगीता ऐकतात, ते सांगतात की त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे. तुमच्या पैकी किती जणांनी याची अनुभूती घेतली आहे? (बरेच जण हात वरती करतात)
जेव्हा तुम्ही अष्टवक्रगीता ऐकता, तेव्हा तुमचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोण पूर्णपणे बदलतो.