चंदनने लहान वयातच आपले आई-वडील गमावले आणि त्याला शाळा सोडावी लागली. सर्वात मोठा असल्यामुळे त्याच्या तीन लहान बहिणींची आर्थिक जबाबदारी त्याला उचलावी लागली. आर्ट ऑफ लिव्हिंगने यात लक्ष घातले आणि चार भावंडांच्या केवळ शिक्षणाचीच नव्हे, तर त्यांच्या घरखर्चाची आणि जीवनावश्यक इतर खर्चाचीही जबाबदारी घेतली. आज चंदनने शाळा पूर्ण केली आहे आणि उदरनिर्वाहासाठी स्कूल बस चालवतो. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्या शाळेने एकेकाळी त्याला आधार दिला त्याच शाळेत शिक्षक आणि मार्गदर्शक बनण्याची त्याची इच्छा आहे.
भारतातील बहुतांश आदिवासी आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत. बालमजुरी, बालविवाह किंवा आई वडिलांचा वियोग यामुळे चंदन सारख्या मुलांना कधीही शाळेत जाण्याची संधी मिळत नाही अशा अनेक कथा आहेत. १९९९ मध्ये पहिली मोफत आदिवासी शाळा स्थापन करण्यापासून आर्ट ऑफ लिव्हिंगने खूप मोठा पल्ला गाठला आहे. दरवर्षी आम्ही ज्यांची पहिलीच पिढी शाळेत जात आहे अशा ३००० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतो ज्यांना अन्यथा कोणतेही औपचारिक शिक्षण मिळाले नसते.
अध्यात्मिक दूरदर्शी प्रेरणा
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मोफत शिक्षणाच्या स्वप्नापासून प्रेरणा घेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक ब्रिजभूषण चावला यांनी झारखंडमध्ये १९९९ मध्ये आदिवासी शाळा सुरू केली. ते म्हणतात, “शाळा बांधणे सोपे आहे. परंतु आदिवासी मुलाला, जो केवळ जीवन जगू शकत नाही तर जीवनाचा आनंद देखील घेऊ शकतो आणि समाजाची सेवा करू शकतो, असा एक आत्मविश्वास पूर्ण प्रौढ बनण्यास मदत करणे, ही जीवनभराची वचनबद्धता आहे.”
एका गावात एकाच वर्गापासून सुरुवात करीत आता आमचा प्रकल्प भारतातील २० राज्यांतील ६७,८८७ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे.
परंतु सुरुवातीची वर्षे कठीण गेली. ब्रिज भूषण सांगतात, “या भागात रस्ते नव्हते, वीज नव्हती आणि पाण्याची योग्य व्यवस्था नव्हती. त्यामुळे दुर्गम आदिवासींना याचा लाभ घेण्यास अडथळा निर्माण झाला. या ठिकाणी पोहोचण्यासाठी वीजवाहिन्या आणि रस्ते तयार करण्यासाठी आमच्या टीमला खूप कष्ट करावे लागले.”
स्थानिक लोक त्यांच्या मुलांना शाळेत पाठवत नाहीत या वस्तुस्थितीमुळे हे आव्हान आणखी कठीण बनले. त्यांना मोठ्या मुलांना घरी ठेवण्याची सवय होती कारण ते कामावर जात तेव्हा मोठी मुले लहान मुलांचा सांभाळ करतात. ही समस्या दूर करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने संपूर्ण समाजाला सामील करून घेईल असा कार्यक्रम आयोजित केला. मोफत वैद्यकीय दवाखाने, वृक्षलागवड मोहीम, सेंद्रिय शेतीवरील कार्यशाळा आणि व्यावसायिक क्षेत्रातील पालकांना प्रशिक्षण यासारख्या आमच्या कार्यक्रमांमुळे स्थानिकांशी संबंध प्रस्थापित करण्यास मदत झाली आणि त्यांना त्यांच्या मुलांना नियमितपणे आमच्या शाळेत पाठवण्यास प्रेरित केले.
मोफत, सर्वांगीण शिक्षण प्रदान करणे
आमच्या शाळा मोफत चालवल्या जातात आणि विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश, शाळेची दप्तरे, सायकली आणि बससेवा यासोबतच दररोज दुपारचे जेवण आणि दूध पुरवले जाते. मुले भाषा, आधुनिक विज्ञान, इतिहास, भूगोल, पर्यावरणशास्त्र आणि देशातील सर्व शाळांमध्ये शिकवले जाणारे इतर विषय शिकतात. सोबतच, त्यांना योग, ध्यान आणि प्राचीन जपजाप्याबद्दल गोडी निर्माण होते.
आम्ही हे सुनिश्चित केले की प्रत्येक आदिवासी शाळेमध्ये स्वतःची बाग आहे ज्याची देखभाल विद्यार्थी स्वतः करतात. आम्ही त्यांना शून्य बजेट नैसर्गिक शेती तंत्र वापरून फळे आणि भाजीपाला लागवड करण्यास मदत करतो. आम्ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग म्हणून कला, हस्तकला आणि क्रीडा यांचादेखील समावेश केला आहे.
संगणकासारख्या आधुनिक माध्यमाचा शिक्षणात सहभाग असला, तरीदेखील आम्ही मुलांना त्यांच्या पारंपरिक भाषेत आणि वेशभूषेत नृत्य-नाट्य सादर करण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या आदिवासी जमातीचा सांस्कृतिक वारसा जपतो.
फलित
आज या आदिवासी गावांमध्ये आणि विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या मानसिकतेत ठळकपणे बदल झाला आहे. वाढीव साक्षरतेव्यतिरिक्त, बालमजुरीमध्ये घट, खेड्यांमध्ये मुलींचे होणारे बालविवाह आणि लवकर गर्भधारणा आणि गर्भपाताच्या घटना कमी झाल्या आहेत.
मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांनी उत्साह दाखवायला सुरुवात केली आहे. अरुणाचल प्रदेशमधील प्रकल्प संचालक मित्रा अगरवाल सांगतात, “जे पालक कधीही शाळेत गेले नाहीत ते आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी रांगेत उभे आहेत हे पाहणे खूप उत्साहवर्धक आहे. पालकांचा प्रतिसाद इतका जबरदस्त आहे की आम्ही प्रौढांसाठीही वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.”
काही शाळांमध्ये मुली आणि मुले यांची संख्या समान आहे आणि विद्यार्थ्यांची सर्वसाधारण उपस्थिती ८९ टक्क्यांच्या जवळपास आहे – आदिवासी प्रदेशामध्ये कार्यरत असलेल्या शाळांसाठी ही एक दुर्मिळ कामगिरी आहे. खरं पाहायला गेले तर दरवर्षी प्रवेशासाठी अर्जांची संख्या वाढत आहे.
शिवाय, आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे या भागात नियमितपणे आयोजित करण्यात येणाऱ्या मोफत वैद्यकीय शिबिरांमुळे आरोग्य आणि स्वच्छता चांगली राहते. प्रकल्प सुरू होण्यापूर्वी या भागात मलेरिया मोठ्या प्रमाणावर पसरला होता आणि बालमृत्यूचे प्रमाण खूप जास्त होते. आज आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी नियमित वैद्यकीय मदत पुरवल्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे, त्यामुळे हा प्रयत्न यशस्वी झाला आहे.
आतापर्यंतचा प्रवास
- झारखंड, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा मधील दुर्गम आदिवासी भागात २० शाळा
- दरवर्षी ३००० हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळत आहे
- शाळा सोडण्याचा दर १०% –देशातील इतर शाळांच्या तुलनेत सरासरीपेक्षा खूपच कमी
- ८९% पर्यंत शाळेतील हजेरीचा दर
- बालमजुरी कमी झाली
- बालविवाह, किशोरवयीन गर्भधारणा आणि गर्भपाताच्या घटनांमध्ये घट
- बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे
- प्रत्येक ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगले आहे
- ४८ मुलींच्या मागे ५२ मुले हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप चांगले आहे
दीर्घकालीन उद्दिष्ट
विद्यार्थ्यांना मोठे झाल्यावर काय व्हायचे आहे, असे विचारले असता, “मला डॉक्टर किंवा शिक्षक बनून स्वत:च्या समाजाची सेवा करायची आहे,” असे त्यांचे एकमताने उत्तर येते. या विद्यार्थ्यांनी शाळेतून पदवी घेतल्यानंतर आमचे स्वयंसेवक सक्रियपणे त्यांच्याकरिता पुढील करिअरच्या संधी शोधतात. हे ध्यानात ठेवून, आम्ही विज्ञान आश्रम नावाचे व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले. इथे विद्यार्थ्यांना अशी कौशल्ये शिकवली जातील ज्यामुळे त्यांना चरितार्थाचे साधन प्राप्त होऊन त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकेल. आमच्या केंद्रात विद्यार्थ्यांना कृषी, पशुसंवर्धन, यांत्रिक कार्यशाळा, इलेक्ट्रिकल आणि दगडी बांधकाम आणि नैसर्गिक ऊर्जा संसाधनांचा वापर या क्षेत्रातील व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाते.
आम्ही पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि या शाळा चालविण्याचा खर्च भागवण्यासाठी भागीदारीच्या / पार्टनरशिपच्या संधी शोधत आहोत.
आम्ही पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि या शाळा चालविण्याचा खर्च भागवण्यासाठी भागीदारीच्या / पार्टनरशिपच्या संधी शोधत आहोत.
आमच्या बरोबर सहभागी व्हा !