मॅडम माँ यांचा परिचय
या आहेत गुंटूरच्या मॅडम माँ, या महिलेने आंध्र प्रदेशातल्या नक्षलवादी भागातील ग्रामीण मुलांचे जीवन बदलले आहे. एकदम कडक, मध्यम उंचीची, मनोवेधक व्यक्तिमत्व असलेली ही महिला, तीन नयनरम्य डोंगरांच्या पार्श्वभूमीवर वसलेल्या श्री श्री सेवा मंदिर शाळेच्या विस्तीर्ण प्रदेशात विशेष ध्येयाने सेवा करत आहे. तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येणारा तिचा निर्धार, आणि त्याचबरोबर असणारा मृदुभाव, अमर्याद करुणा आणि प्रेम. अगदी थोडीशी संधी मिळाली तरी सेवा देण्यास तत्परता दर्शविणारे तिचे छोटे, मजबूत हात हेच सूचित करतात.
याच महिलेने देशभरातील इतर अनेक राज्यांमधील नक्षलवाद्यांना बंदूक त्यागून प्रेम करायला आणि इतरांना सहभागी करून घेण्याची कला शिकण्यासाठी प्रवृत्त केले आहे. खरंच, मॅडम माँ यांचे अतिशय अभेद्य प्रदेशांमध्ये जाऊन सुधारणेच्या पलीकडे असलेल्या लोकांत आर्ट ऑफ लिव्हिंगचा संदेश पसरवण्यात मोलाचे योगदान आहे.
हिंसेकडून प्रेमाकडे
ज्या हातांनी एकेकाळी बंदुका उगारल्या, ज्यांनी निर्दयपणे हत्याकांडाचा कट रचला अशा लोकांना हाताशी घेऊन मॅडम माँ यांनी पाच गावे विकसित केली, जिथे त्यांनी बायोगॅस प्रकल्प, आरोग्य केंद्रे, चांगले रस्ते आणि रेन-वॉटर हार्वेस्टिंगची कामे केली. तसेच तिथल्या रहिवाशांना तणाव दूर करण्याची आणि निरोगी जीवन जगण्याची तंत्रे शिकवली.
स्थानिकांच्या लक्षात आले की आता आपल्या होतकरू मुलांना नक्षलवादी होऊ देऊ नये. विशेषतः, आत्ता त्यांनी जीवनाचा खरा अर्थ आणि त्याचे सौंदर्य याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे आणि त्याला दाद देऊ लागले आहेत. साहजिकच श्री श्री सेवा मंदिर शाळा हा त्याचा परिपाक होता. अशा प्रकारे २००२ साली गुंटूर जिल्ह्यातील पलानाडू या दुर्गम गावात नयनरम्य डोंगराच्या कुशीत या शाळेचा जन्म झाला.
सुरुवात करणे नक्कीच सोपे नव्हते. कारण, मदतीसाठी पुढे येणारे मजबूत हात आणि इच्छूक मन याशिवाय प्रत्यक्ष बांधकामासाठी पैशाची गरज होती. तरीही, प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या मॅडम माँ यांनी सर्व अडथळे पार केले आणि लवकरच एक मायेची ऊब देणारी शाळा तयार केली गेली, जिथे तरुण मनांना हिंसेचा मार्ग सोडून प्रेमाच्या मार्गाकडे वळण्यास चालना देणारे सर्वात मौल्यवान ज्ञान देण्यासाठी पुरेशी जागा असेल.
सर्वांगीण शिक्षण
विद्यार्थ्यांना आधुनिक प्रशिक्षण देण्यासोबतच योगासने आणि ध्यानधारणेचीही सुरुवात केली, तसेच प्राचीन परंपरेसह आधुनिक शिक्षणाचे परिपूर्ण मिश्रण असलेले शैक्षणिक सत्र सादर केले जाते. विशेष म्हणजे काही वर्ग शाळेच्या आवारात वडाच्या आणि बोरांच्या झाडाखाली उघड्यावर भरवले जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात अभ्यास करण्याची संधी मिळते.
मॅडम माँ म्हणतात, “अध्यात्म आणि युगानुयुगे चालत आलेल्या गुरुकुल शिक्षण पद्धतीवर आधारित शिकण्याचे तंत्र यांचा मेळ घालून तसेच सर्वात आधुनिक संवादात्मक पद्धतींसह आपण देत असलेल्या सर्वांगीण शिक्षणाचा हा परिणाम आहे. यामुळे शिकण्याची प्रक्रिया आनंददायी होते तसेच जीवनाला सामोरे जाण्याचा दृष्टीकोन आणि पद्धत या दोन्ही बाबतीत तरुण मनांना बळकटी लाभते.”
शाळेमध्ये क्रीडा शिक्षणालाही महत्त्व दिले जाते आणि त्यासाठी अभ्यागत प्राध्यापक म्हणून तिथे येणारे श्री व्ही. किशोर, क्रीडा संचालक, नागार्जुन विद्यापीठ NU यांची प्रचंड मेहनत आहे. मॅडम माँ यांचे पुढील स्वप्न म्हणजे शाळेसाठी वैदिक ज्ञान विभागाच्या बाजूला एक स्पोर्ट्स ट्रॅक बनवण्याचे आहे, यात अजिबात आश्चर्य नाही. त्या पुढे सांगू लागतात, “आम्ही १५ विद्यार्थ्यांना २० दिवसांच्या क्रीडा-प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विद्यापीठात पाठवले आहे.” आपल्या शाळेतून जागतिक दर्जाचे धावपटू आणि खेळाडू घडवणे हे त्यांचे दीर्घकालीन धोरण आहे.
प्रगती आणि प्रशंसा
गेल्या दशकात, शाळेने खरोखरच खूप मोठा पल्ला गाठला आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांची भरती करण्यासाठी तोंडी माहिती देत जे कार्य सुरू झाले, त्याची परिणती आज तेथील पटसंख्या २५० पेक्षा जास्त आहे. शाळेत इयत्ता आठवी पर्यंतचे वर्ग आहेत, तसेच टाकून दिलेल्या, अनाथ झालेल्या किंवा पोलिसांनी ताब्यात दिलेल्या ६० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा आहे.
तिथे मुले विविध परिस्थितीतून आली आहेत; बाल विवाहातून सुटका केलेल्यांपासून, ज्यांना शिक्षण घेणे परवडू शकत नाही असे काही. काही विद्यार्थी शिक्षण क्षेत्राच्या पवित्र मंदिरात पाऊल ठेवणारा कुटुंबातील पहिलाच व्यक्ती बनण्याचा इतिहास घडवत आहेत.
जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार, आयएएस अधिकारी आणि प्रशासकीय संस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे, कारण आता भावी पिढीला प्रवाहात आणले आहे, आणि त्या भरकटलेल्या मुलांना शोधून त्यांना सुधारण्याचा दबाव कमी झाला आहे. चांगले काम लक्षात घेऊन, अनेक पालकांनी आपल्या मुलांच्या शाळा बदलून श्री श्री सेवा मंदिरात आणले आहे. या शाळेची गुंटूर जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून निवड झाली आहे यात नवल ते काय?
या नक्षलवादी भागात मॅडम माँ यांच्या कामाची दखल घेत अलीकडेच नागार्जुन विद्यापीठ(NU) कडून त्यांना ‘शिक्षणात ग्रामीण सेवा’ या क्षेत्रातील “उत्कृष्ट सेवा पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
अध्यात्मिक गुरूकडून प्रेरित
तथापि आपले आध्यात्मिक गुरू, गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्याकडून प्रेरित मॅडम माँ ह्या तत्परतेने सांगतात की, हे सर्व त्यांच्या प्रेरणेशिवाय शक्यच झाले नसते, ज्यांनी तिला निर्भयपणे, अथकपणे, आपले स्मित न गमावता इतरांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी, परिवर्तन करण्यासाठी मार्ग दाखवला. आणि येणाऱ्या प्रत्येक संधीला त्या हसतच सामोऱ्या जातात, त्यांच्याकडे नेहमी हसण्यासाठी भरपूर कारणे असतात म्हणून नव्हे तर, हा त्यांचा स्वभावच बनला आहे आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्याकडून त्यांना ही सर्वात मौल्यवान शिकवण मिळाली आहे.
“जेव्हा मी इथे आले तेव्हा या तरुण मनांवर तीव्र नकारात्मकता, भीती, क्रोध याचा पगडा होता, ज्यामुळे नवीन आणि वेगळ्या विचारसरणीला समजून घेण्याच्या शक्यतेला बाधा येत होती. सुदर्शन क्रिया, ध्यानधारणा आणि सर्वांगीण शिक्षण यामुळे शिकणे हसत खेळत पार पडत आहे, अनेक नकारात्मक प्रभाव पुसून टाकण्यास मदत झाली, आनंदाने भरलेले आणि तणावमुक्त असे नूतन अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी त्यांची मने आणि अंतरंग उघडले गेले” असे सांगत मॅडम माँ समारोप करतात.
खरंच, हे असे एक चांगले सर्व समावेशक शिक्षण त्यांना अभिमान वाटण्यासारखेच आहे. काहीही झाले तरी, अखेर तिने आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिकवणीच्या भक्कम पायावर ही वीट ठेवली आहे.