दारासिंग मधील परिवर्तन एका कैद्यापासून शिक्षकापर्यंत
खून करायला तयार असणारा व्यक्ती आणि एक व्यक्ती जी पालकांना आदरणीय. दोन वेग वेगळ्या व्यक्ती, होय नां?
“चूक”.
दारा सिंग हा राजस्थानमधील खेरा या दुर्गम भागातील शेतकऱ्याचा एक साधा मुलगा होता. त्याच्या जीवनात एक मोठी घटना घडली जेंव्हा त्याला शाळेत जाण्यासाठी घर सोडावे लागले. योग्य शिक्षण मिळण्याऐवजी त्याचा अंमली पदार्थांशी परिचय करून दिला गेला. समाजविघातक लोकांनी त्याला अंमली पदार्थांच्या नादाला लावले. स्वतःची अंमली पदार्थांची गरज भागवण्यासाठी तो अंमली पदार्थांचा विक्रेता बनला.
व्यसनाची तीव्रता एवढी वाढली की नशेचा एक झुरका मिळवण्यासाठी तो चोरी करण्यासाठी, खून करण्यासाठी पण तयार असे.
एका होतकरू तरुण मुलापासून ते व्यसनाधीन व्यक्तीपर्यंत, दाराचे अंधारात जाणे अपरिहार्य वाटत होते. तरीही, व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीच्या छायेत, आशेचा किरण दिसू लागला, ज्यामुळे परिवर्तनाचा प्रवास सुरू झाला..
त्याच्या आयुष्यातील दुसरी मोठी घटना घडली. दारा पकडला गेला.
७५० ग्रॅम हेरॉईनची, बिहारमध्ये तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल २००१ साली राजस्थान पोलिसांनी पकडले आणि त्याला १२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यांना त्यावेळेस याची कल्पना नव्हती की हीच
व्यक्ती काही वर्षांनी ४५० पेक्षा जास्त मुले आणि त्यांच्या पालकांसाठी आदरणीय बनणार आहे. ज्याचे आयुष्य आज गुन्हेगारीने भरले आहे तो एक अनुकरण करण्याजोगा आदर्श बनणार आहे.
हे सर्व श्वासोच्छवासाच्या साध्या प्रक्रियेमुळे घडून आले.
सुदर्शन क्रियेने एक सकारात्मक विश्व उघडले गेले
सुरुवातीला, तुरुंगाच्या आतील अनुभव हा तुरुंगाबाहेरील अनुभवापेक्षा वेगळा नव्हता. त्याला अजूनही ती भीती आतून छळत होती. त्याच्या तुरुंगवासाचा बदला घेण्यासाठी, तुरुंगातून पळून जायची तीव्र इच्छा त्याला पोखरत होती.
२००७ साली यात बदल झाला जेंव्हा त्याने उदयपूरच्या कारागृहात आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रिझन प्रोग्रॅम केला. त्याचा सुदर्शन क्रियेचा पहिला अनुभव अत्यंत प्रभावी होता, जेंव्हा त्याने त्याच्या मनावर झालेल्या या जबरदस्त आघाताच्या भावनांना धैर्याने तोंड दिले. “मी रडलो”, दारा म्हणतो. “जसा जसा प्रोग्रॅम पूर्ण होत गेला, मला शांत वाटले. मी या प्रक्रियेचा रोज सराव करत गेलो, माझे विचार बदलले आणि मी अधिक सकारात्मक झालो.” त्याने सांगितले.
दाराला युथ लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम (YLTP) आणि अॅडव्हांस मेडीटेशन प्रोग्रॅम केल्याचा फायदा झाला. गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या सोप्या पण सखोल ज्ञानामुळे त्याला एक असा निर्णय घ्यावा लागला की ज्यामुळे त्याचे जीवन कायमचे बदलून गेले. त्याला काहीतरी बदल करायचा होता आणि त्याने तो केला.
YLTP करताना दोन्ही सुदर्शन क्रिया ४१ दिवस सलग करायची दाराला प्रेरणा मिळाली होती. ४१ दिवस अखंडपणे पूर्ण करण्यासाठी दाराला प्रत्यक्षात २ वर्षे लागली. या दोन वर्षांमध्ये तो जास्त एकाग्र आणि अधिक सकारात्मक झाला. योगायोगाने, एकेचाळीसाव्या दिवशी उच्च न्यायालयाने त्याच्या सुटकेचे फर्मान काढले.
त्याच्या सुटकेनंतर, दाराला त्याचे जीवन पुनर्बांधणी करणे आणि त्याच्या समुदायाचा विश्वास संपादन करणे या कठीण कामांचा सामना करावा लागला. नवीन प्राप्त झालेली लवचिकता आणि उद्देशाच्या खोल जाणिवेने सज्ज होऊन त्याने इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या मिशनला सुरुवात केली.
नियमित ध्यान यामुळे त्याला गावकऱ्यांच्या मनात स्थान मिळाले. दाराने गावकऱ्यांसाठी योग आणि ध्यानाचे प्रोग्रॅम आयोजित करायला सुरुवात केली. प्रोग्रॅम संपल्यावर, लोकांना ताजेतवाने आणि प्रफुल्लित वाटायचे आणि या अनुभवासाठी दाराबद्दल कृतज्ञता वाटायची. त्यांना आता त्याच्याबद्दल आणि त्याला दुसऱ्यांच्या आरोग्याविषयी जी मनापासून काळजी वाटत होती , त्याच्याबद्दल, विश्वास वाटू लागला.
२०११ साली तो आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक बनला. आणि त्याला लोकांचा ताणतणाव दूर करायचे सामर्थ्य मिळाले होते. श्वसनाच्या या प्रक्रियेची लोकांनी खूप प्रशंसा केली, क्रिया केल्यानंतर लोकांना प्रसन्न वाटू लागले होते. दाराच्या शब्दात सांगायचे तर “लोक पुढे येऊन माझ्याबरोबर जोडले जाऊ लागले. मी त्यांच्यासाठी चांगल्या जीवनाची आशा बनलो होतो.”
आर्ट ऑफ लिव्हिंगने स्थापन केलेल्या मोफत शाळेच्या प्रशासक पदावर त्याची नेमणूक केली गेली. शाळा ४५० पेक्षा जास्त मुलांची काळजी घेते; ज्यातील ५५% मुली आहेत. यातील ८०% पेक्षा जास्त मुले, ही शाळेत जाणारी पहिलीच पिढी आहे. मुख्य अभ्यासक्रमा व्यतिरिक्त मुलांना योगाभ्यास शिकवला जातो; पौष्टिक अन्न मोफत दिले जाते; शाळेचा गणवेष, पुस्तके आणि दप्तर मोफत दिले जातात; आणि शाळेला नेण्या-आणण्याची सोय केली जाते. दाराबरोबर आणखी १२ शिक्षक आणि इतर ४ कर्मचारी आहेत. शाळा सरकारमान्य आहे आणि अजून महत्त्वाचे म्हणजे मुलांनी ती पूर्णपणे स्वीकारलेली आहे.
परिवर्तनाची प्रशंसापत्रे
समुदायाचे प्रशस्तिपत्र दाराच्या कार्याचा गहन प्रभाव प्रतिबिंबित करतात, गावातील लोकांनी इतरांनी व्यक्त केलेल्या भावनांचे पडसाद आहेत. इतरांची सेवा करण्याच्या दाराच्या अतूट बांधिलकीने पिढ्यानपिढ्यांच्या जीवनाला स्पर्श केला आहे आणि त्याच्या समुदायावर अमिट छाप सोडली आहे. याची साक्ष मुले आणि त्यांचे पालक देतात.
सुलोचना, विद्यार्थी: चौथ्या इयत्तेतील १० वर्षीय सुलोचना अतिशय खुश आहे. ती आणि तिचा भाऊ एकाच शाळेत शिकतात, त्यामुळे खूप मजा येते आणि ती एकही दिवस शाळा चुकवत नाही. तिला गणित, विज्ञान, पर्यावरण विज्ञान हे विषय आवडतात आणि त्यात तिला चांगले गुण मिळतात. शिक्षकांना वाटते की ती एक हुशार मुलगी आहे.
सोनू, विद्यार्थी: पाचव्या इयत्तेतील ११ वर्षीय सोनू, त्याच्या आधीच्या शाळेत आठवड्यातून फक्त दोनदा जायचा. पण दाराच्या शाळेत तो रोज जातो.
जीतमल, पालक: जीतमलची तिन्ही मुले शाळेत जातात; दाराच्या पुर्वाआयुष्याला अधिक महत्त्व न देता, गावातील मुलांच्या शिक्षणाबद्दल दाराची काळजी आणि त्याची क्षमता याबदल जीतमलला पूर्ण विश्वास आहे. तो म्हणतो “मुले व्यवस्थित अभ्यास करत आहेत; त्यांची चांगली काळजी घेतली जाते; मला खर्चाची चिंता नाही; अजून जास्त मी काय मागू शकतो?”
धनराज, पालक: धनराजची तिन्ही मुले चौथी, पाचवी आणि आठवीत शिकतात. त्यापैकी एक सुलोचना आहे. धनराज फक्त सहावीपर्यंत शाळेत गेला होता, आणि त्याची पत्नी कधीही शाळेत गेली नाही. या पार्श्वभूमीवर, त्याला अभिमान वाटतो की त्याच्या मुलांना संपूर्ण शिक्षण मोफत मिळत आहे. दाराच्या सेवा वृत्तीमुळे तो भारावून गेला आहे.
शाळेची प्रगती पाहता, दारा सिंगचा प्रवास अविश्वसनीय आहे. अंमली पदार्थांच्या व्यसनापासून मुलांच्या शिक्षणापर्यंत; तुरुंगवासापासून कैद्यांची सुधारणा; क्रूरपणापासून ते दयाळूपणा पर्यंत. पण दाराच्या वागणुकीबद्दल आणि कामाबद्द्ल जास्त बोलका अभिप्राय आहे, पालकांचा. ते त्यांच्या मुलांना दुसऱ्या कोणत्याही शाळेत पाठवणार नाहीत.
त्यांच्या अनमोल मुलांसाठी ते दारावरच विश्वास ठेवतात.
फक्त दारा वर…