ध्यान करायला शिकण्यापूर्वी, ध्यान म्हणजे काय आहे आणि काय नाही हे समजून घेणे आवश्यक आहे. आणि ध्यान केल्याने आपल्याला काय मिळेल?
ध्यान म्हणजे काय? (What is Meditation)
-
ध्यान म्हणजे एकाग्रता नव्हे; ती झोप पण नाही.
ध्यान ही विश्रांती आणि शिथिल होण्याची जाणीवपूर्वक अवस्था आहे.
ध्यान हे प्रयत्नरहित (विनाप्रयास) आहे.
ध्यान आपल्याला आपला अंतरात्मा, आतील गहीरे मौन, शांतता आणि आपली विशालता शोधण्यात मदत करते.
प्रत्येकजण ध्यान करू शकतो का?
प्रत्येकाला आराम हवा असतो. फक्त एवढेच आहे की आपल्याला माहीत नाही की पूर्णपणे आरामदायक कसे राहायचे.ध्यान तुमच्यासाठी परके नाही. कारण तुम्ही जन्म घेण्यापूर्वी काही महिने ध्यान करत होतात. तुम्ही तुमच्या आईच्या पोटात काहीही करत नव्हता. तुम्हाला अन्न चघळण्याचीही गरज नव्हती. तुम्ही आनंदाने तिथल्या द्रव्यात तरंगत होतात. ते म्हणजे ध्यान किंवा पूर्ण आराम. तुम्हाला काहीही करायचे नव्हते, सर्व काही तुमच्यासाठी केले जात होते. त्यामुळे त्या स्थितीत परत जाण्याची प्रत्येक आत्म्यामध्ये स्वाभाविक उत्कंठा असते, जिथे तुम्ही पूर्ण आरामात होतात. या कार्यकलापाच्या जगात प्रवेश करण्याआधी, ज्या अवस्थेची तुम्ही अनुभूती घेतली होती, त्या स्थितीत परत जाण्याची तुमची इच्छा असणे खूप साहजिक आहे. कारण या विश्वातील प्रत्येक गोष्ट आवर्तन होणारी आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या स्त्रोताकडे परत येऊ इच्छित असते.
भूक लागली की आपण उत्स्फूर्तपणे काहीतरी खायला घेतो. जर तहान लागली तर थोडे पाणी प्यायचे असते. त्याच प्रकारे, आत्म्याची ध्यानासाठी उत्कंठा असते आणि ही उत्कंठा प्रत्येकात असते.
ध्यानातून काय मिळेल?
पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी केवळ योग्य विद्यार्थी आणि साधकांनाच ध्यान शिकवले होते. या युगात, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी प्रत्येकाला ते ज्ञान उपलब्ध केले आहे, जेणेकरून ते आपल्या जीवनाच्या गुणवत्तेत बदल घडवून आणू शकतील. जेव्हा त्यांना उच्च ज्ञान हवे असेल तेव्हा ते त्यात अधिक गहीरे उतरतील. म्हणून, प्रत्येकासाठी, ते काही ना काही लाभ घडवून आणते.
काही लोक समुद्रकिनारी फिरायला जातात आणि त्यांना चांगला ऑक्सिजन आणि ताजी हवा मिळते आणि ते त्यात आनंदी असतात. काही लोक पाण्यात पाय ठेवतील आणि समुद्राच्या हव्याश्या गारव्याचा अनुभव घेतील. काहीजण सर्फिंग किंवा स्कूबा-डायव्हिंग करतील आणि त्यांना कोरल्स आणि मौल्यवान रत्ने गवसू शकतात. तर, हे तुमच्यावर अवलंबून आहे – तुम्हाला समुद्रकिनारी फिरायला जायचे आहे किंवा पोहायला जायचे आहे की खोलवर उतारायचे आहे की स्कूबा-डायव्हिंगला जायचे आहे. महासागर तुमच्यासाठी उपलब्ध आहे. ध्यानाच्या बाबतीतही असेच आहे.
ध्यान करण्याची गरज प्रत्येक माणसाला असते, कारण प्रत्येकाला कधीही न घटणारा आनंद, शाश्वत आणि निखळ प्रेम हवे असते.
-
गहिरी विश्रांती आणि स्पष्टता लाभते
जेव्हा नदी शांत असते तेव्हा त्यातले प्रतिबिंब अधिक स्पष्ट दिसते. त्याचप्रमाणे जेव्हा मन शांत असते तेव्हा अभिव्यक्तीच्या प्रांतात अधिक स्पष्टता येते. ध्यानाचा नियमित सराव केल्याने विश्रांतीची आणि शांततेची गहिरी स्थिती प्राप्त होण्यास मदत होते. आणि ही शांतता अनेकदा ध्यानानंतरही टिकून राहते.
-
सकारात्मक स्पंदने फुलू लागतात
आपल्यापैकी प्रत्येकाची विशिष्ट स्पंदने असतात आणि जेव्हा आपण तणावग्रस्त, रागावलेले, अस्वस्थ किंवा निराश असतो तेव्हा या स्पंदनांवर परिणाम होतो. ध्यानामध्ये यात बदल घडवून आणण्याची आणि या स्पंदनांना सकारात्मक आणि सकस बनवण्याची गुरुकिल्ली आहे, ज्यायोगे आपल्या विचार आणि भावनांमध्ये स्पष्टता येते. यामुळे आपल्या मनावर पडलेली छाप दूर करण्यास तसेच मानसिकदृष्ट्या स्पष्ट आणि भावनिकदृष्ट्या स्थिर अशी स्थिती प्राप्त करण्यासाठी आपले विचार केंद्रित आणि योग्य दिशेने जाण्यास मदत लाभते. आपले निरीक्षण, आकलन आणि अभिव्यक्ती सुधारते.
-
झोपेपेक्षा अधिक प्रभावी
ध्यान आणि झोप दोन्ही गाढ विश्रांती देतात. तथापि, ध्यानातून मिळणाऱ्या विश्रांतीची गुणवत्ता अधिक गहिरी आहे. ध्यानामुळे आपल्याला जी ऊर्जा मिळते ती झोपेपेक्षा कितीतरी जास्त असते. ध्यान केल्याने तुम्हाला विश्रांती मिळते, सर्वात गाढ झोपेपेक्षा ही जास्त. ध्यान केल्याने, आपण उर्जेचा आंतरिक स्रोत निर्माण करत आपल्या शरीराला पॉवरहाऊस बनवू शकतो.
-
ऊर्जेची पातळी वाढवते
चिंता, काळजी आणि ताणतणाव हे नुकसानदायक असू शकतात. रोजच्या समस्या आणि भीती तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. ध्यानामुळे प्राणशक्ती किंवा शरीरातील ऊर्जा पातळी वाढते हे माहीतच आहे. आणि जसजशी प्राणशक्ती वाढते तसतशी चिंता आपोआप कमी होते. म्हणूनच नियमित ध्यान केल्याने नैराश्य, चिंता किंवा पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरच्या लक्षणांमध्ये सुधारणा दिसून आली आहे.
-
मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो
संशोधनात असे दिसून आले आहे की ध्यानाने सकारात्मक भावनांशी निगडीत मेंदूच्या भागामध्ये सक्रियता तर वाढतेच, तसेच तुमच्या एकूण मानसिक आरोग्यावर देखील सकारात्मक परिणाम घडतो.
…आणि बरेच काही!
ध्यान तुम्हाला तुमच्या कृतींबद्दल अधिक जागरूक आणि अधिक हेतुपूर्ण करते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद कसा द्यायचा हे तुम्हाला शिकवते. ध्यानामुळे विचार करण्याची, लक्ष केंद्रित करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता सुधारते आणि भावनिक समस्यांशी जुळवून घेण्याची आणि त्यावर मात करण्याची क्षमता वाढते. संशोधनात असे दिसून आले आहे की ध्यान तुमचा मूड सुधारण्यास, गाढ झोपेची आवर्तने सुधारण्यास आणि आकलनाच्या कौशल्यांना चालना देण्यास मदत करू शकते. अतिविचार, कमी लक्ष आणि मन अस्थिर ठेवणारे मेंदूचे कप्पे ध्यानामुळे नीट कार्यरत होतात, असे सुद्धा आढळून आले आहे.
तुमच्या ध्यान प्रवासातील ५ टप्पे
ध्यानाचा प्रवास विश्रांतीपासून सुरू होतो. तुम्ही नियमितपणे ध्यान करत असताना, तुमचा प्रवास अनेक टप्प्यांतून पुढे जाईल:
- पहिला टप्पा : विश्रांती
- दुसरा टप्पा : ऊर्जा
- तिसरा टप्पा : सर्जनशीलता
- चौथा टप्पा : गहिरे अंतर्ज्ञान, ज्ञान आणि शहाणपण
- पाचवा टप्पा: अवर्णनीय. तुम्ही विश्वाशी एकरूप आहात असे वाटते
ध्यान करण्याचे सोपे मार्ग
शारीरिक व्यायाम
जेव्हा आपले शरीर विशिष्ट लयीत, विशिष्ट आसने करते तेव्हा मन ध्यानात जाऊ लागते. तुम्ही खूप कार्यरत असाल किंवा खूप विश्रांती घेत असाल तर तुम्ही ध्यान करू शकत नाही. पण शरीर योग्य प्रमाणात थकले आहे पण तेवढा थकवा जाणवत नाही; अशा त्या विशिष्ट अवस्थेत, तुमची संपूर्ण शरीर यंत्रणा ध्यानात जाऊ लागते.
संवेदनांचा आनंद
एखाद्या विशिष्ट संवेदनेच्या गोष्टीमध्ये १०० टक्के मग्न राहिल्याने तुम्ही ध्यानाच्या अवस्थेकडे येऊ लागता.
नुसते झोपून आभाळाकडे बघत राहा
जेव्हा तुम्ही संगीत ऐकण्यात पूर्णपणे तल्लीन असता तेव्हा एक क्षण असा येतो की मन शांत स्थिर होते
प्राणायाम
श्वासोच्छवासाचे तंत्र आणि ‘प्राणायाम’ द्वारे मन शांत आणि स्थिर होते आणि तुम्ही सहजतेने ध्यानात जाता. प्राणायामानंतर डोळे बंद करा आणि शांत बसा.
भावनेचे टोक
चौथा मार्ग म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही भावनांद्वारे. जेव्हा तुम्ही पूर्णपणे हताश होता किंवा खूप राग येतो तेव्हा तुम्ही म्हणता, ‘मी हार मानतो!’ याचा अर्थ, ‘पुरे झाले. आता अजून सहन करू शकत नाही.’ त्या क्षणांमध्ये, जर तुम्ही निराशा, उद्वेग किंवा हिंसाचाराकडे वळला नाहीत, तर तुम्हाला लक्षात येईल की एक क्षण येतो, जिथे मन स्थिर होते.
तुमची दृष्टी विशाल करा, तुमची मुळे खोल रुजवा
पाचवे म्हणजे बुद्धी, ज्ञान आणि सजगता. यालाच ज्ञानयोग म्हणतात. हे शरीर कोट्यवधी पेशींनी बनलेले आहे हे जेव्हा तुम्ही बसून जाणता, तेव्हा आतून काहीतरी उत्तेजित होऊ लागते. जेव्हा तुम्हाला विश्वाच्या भव्यतेची जाणीव होते तेव्हा जीवनाचा संदर्भ लगेच बदलतो: तुम्ही कोण आहात? तुम्ही काय आहात? तुम्ही कुठे आहात? अथांग, अनंत विश्वाच्या संदर्भात तुम्ही कसे आहात? तुमच्यात काही बदल घडू लागतो.
पूर्ण विश्रांती
ध्यान करण्यासाठी, आपल्याला फक्त आराम कसा करावा हे माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्ही मसाज टेबलावर असाल तर तुम्ही मालिश करणाऱ्याला तुमची काळजी घेऊ द्या. त्याचप्रमाणे, ध्यानात तुम्ही काहीही करत नाही. निसर्ग किंवा आत्म्याला तुमची काळजी घेऊ द्या.
“मला काहीही नको आहे. मी काहीही करत नाहीए. मी कोणीही नाही.”
ध्यान म्हणजे संपूर्ण विश्रांती; आपल्याला काहीही नको असणे, आपण कोणीही नसणे, काहीही न करणे आणि तरीही सहजरित्या संपूर्णपणे सजग असणे. जर आपण याचे पालन केले तर आपण ध्यानात खोलवर जाऊ शकतो.
ध्यान कसे करावे ते शिका
आर्ट ऑफ लिव्हिंग कडून सहज समाधी ध्यान कार्यक्रम घेतला जातो, ज्यात आपण स्वतःच ध्यान कसे करावे हे शिकण्यास मदत होते.
आपले मन आपण घेतलेल्या मंत्राचे रूप धारण करते. “मनः त्रयते इति मंत्रः” – मंत्र असा असतो, जो मनात वारंवार आणला जातो आणि त्यामुळे मन मंत्र बनते. मंत्राने मन भरले पाहिजे. त्याच क्षणी मन चिंतामुक्त होते.
कधीकधी आपण खूप विचार करतो किंवा गोष्टींबद्दल काळजी करत असतो. मनात विचार आला की त्यातून सुटका करणे सोपे नसते. विचार पुन्हा पुन्हा येत राहतात आणि जर तुम्ही काही वेगळे करायचे ठरवले तरी तो विचार संपेपर्यंत तुम्हाला अस्वस्थ वाटेल. डोळ्यात वाळूचा कण गेल्यासारखी चिडचिड होत राहते. त्याचप्रमाणे, जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल दुःखी असाल तर ते दुःख तुम्हाला सहजासहजी सोडत नाही. अनेकवेळा तुम्ही तुमच्या मनाला सांगता की एखादी गोष्ट क्षुल्लक आहे आणि त्याबद्दल काळजी करू नकोस. पण मन किंवा बुद्धी त्याकडे लक्ष देत नाही. मंत्राचा जप केल्याने मात्र यात मदत होऊ शकते.
मंत्रामध्ये शक्ती आणि चेतना असते. जेव्हा मन मंत्राने भरले जाते तेव्हा ते शक्तिशाली होते. प्रत्येक मंत्राची शक्ती स्पंदनाच्या रूपात जाणवते.
सहज समाधी ध्यान हे मंत्र-आधारित ध्यान आहे. विचारांच्या पलीकडे जाण्याचा आणि आपल्या अस्तित्वाच्या स्त्रोतामध्ये जाण्याचा हा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे. हे म्हणजे बीज खोल पेरण्यासारखे आणि वरून माती टाकून बंद करण्यासारखेच आहे. मंत्र हे बीज आहे.
आज आपल्याला अधिक आनंदी डोक्यांची गरज आहे, कारण नैराश्याच्या आजाराने या भुतलाचा मोठ्या प्रमाणावर ताबा घेतला आहे. सुप्रसिद्ध जेरियाट्रिक मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अक्षय वासुदेव यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की औषधोपचारामुळे केवळ २०% नैराश्याने ग्रस्त लोकांना मदत होते, तर सहज समाधी ध्यान ७०% लोकांना लाभ देऊ शकते.
तुम्हाला एवढेच करायचे आहे… की काहीच करायचे नाही!
ध्यान म्हणजे अतिशय सहज असणे, जणू स्वतःसोबत आणि विश्वातील इतर सर्व गोष्टींसोबत आपल्या घरीच असणे. फक्त आराम कसा करावा हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. जर तुम्ही मसाज टेबलवर असलात तर तुम्ही काय करता? तुम्ही मालिश करणाऱ्याकडे स्वतःला सोपवता. ध्यानातही तेच आहे. तुम्ही काहीही करू नका, निसर्गाला तुमची काळजी घेऊ द्या. सारे प्रयत्न सोडून द्या, कारण प्रयत्नातून जे काही मिळवता, ते भौतिक असते आणि मर्यादित असते. भौतिक जगात प्रयत्नांची गरज असते. जर तुम्ही प्रयत्न केले नाहीत तर तुम्ही व्यवसाय उभारू शकत नाही, घर बांधू शकत नाही किंवा करिअर घडवू शकत नाही. नुसतेच बसून विचार करून काही होत नाही. भौतिक जगतातील प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्न करणे आवश्यक असते. पण अध्यात्मिक स्तरावर काही प्राप्त करण्यासाठी, या उलट करणे गरजेचे असते – कसलाही प्रयत्न न करणे! केवळ काही क्षण बसणे आणि कसलाही प्रयास न करणे आवश्यक आहे. अध्यात्मिक मार्गात काही प्राप्त करण्यासाठी, सर्व प्रयास सोडले पाहिजेत, आणि मग तुम्हाला काहीतरी मोठे मिळेल – खूप मोठे!