प्रेम, आदर आणि आनंद याकरिता मार्गदर्शन
नातेसंबंध हा पैलू मानवी जीवनाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळा बनवितो . इतर प्राण्यांना नातेसंबंधात कोणतीही अडचणी नसते. ते कोणत्याही समुपदेशनासाठी जात नाहीत. आदिवासी समाजात नातेसंबंधांविषयी कोणत्याही अडचणी येत नाहीत. आपण जितके प्रगत होत जातो तितकी नातेसंबंधांच्या बाबतीत अधिक आव्हाने अनुभवत असतो.
ज्ञानासह असलेले प्रेम तुम्हाला आनंदाकडे घेऊन जाते. ज्ञानरहित किंवा अज्ञानी प्रेम तुम्हाला मत्सर, लोभ, क्रोध, निराशा आणि अशाच इतर सर्व गोष्टींकडे घेऊन जाते. या सर्व नकारात्मक भावना केवळ प्रेमाचे अपत्य आहेत. प्रेम नसेल तर तुम्ही कोणाचा मत्सर करु शकत नाही हे लक्षात घ्या. बरोबर? लोभ म्हणजे तुम्हाला काही गोष्टी लोकांपेक्षा जास्त आवडतात, यालाच लोभ म्हणतात. तुम्ही एखाद्यावर आवश्यकतेपेक्षा जास्त प्रेम करता आणि यालाच मालकी हक्काची भावना म्हणतात. तुम्हाला परिपूर्णता इतकी हवी असते की तुम्ही अपूर्णता सहन करु शकत नाही आणि तुम्ही रागावता. बरोबर? प्रेमाबरोबरच थोड्या ज्ञानाची आवश्यकता असते.
~ गुरुदेव श्री श्री रविशंकर
ज्ञानाने जतन केलेले, मागण्या करण्याने नष्ट झालेले, संशयाद्वारे पारखलेले, उत्कटतेने पोसलेले, असे हे प्रेम, विश्वासाने फुलते आणि कृतज्ञतेने वाढते.
निष्पाप व अस्सल नाते कसे जोडावे ?
कोणतेही नाते निर्माण न करण्याचा प्रयत्न करणे हे सर्वात चांगले आहे. फक्त सहज राहा. नैसर्गिक असा. साधे राहा. नातेसंबंध नैसर्गिकरित्या विकसित होत असतात .ज्यावेळी तुम्ही नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करता,तेव्हा तुम्ही थोडे कृत्रिम बनता आणि कृत्रिम वागता. तुमचे वागणे नैसर्गिक रहात नाही. कल्पना करा, की कोणीतरी बॉसवर आपली छाप टाकण्याचा प्रयत्न करत आहे, तुमच्या ते लगेच लक्षात येते. जर कोणी तुमच्यावर आपला प्रभाव पडण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही काय करता? तुम्ही त्यापासून दूर होता. तुम्हाला जे आवडते ते इतरांनाही आवडते हे लक्षात घ्या. तुमच्याशी कोणीतरी खूप प्रामाणिक, मोकळेपणाने, नैसर्गिक आणि नम्रपणे वागणारी अशी व्यक्ती तुम्हाला आवडते. बरोबर? इतरांनाही तुमच्याकडून हेच हवे असते.
तुमच्या बॉसला प्रभावित करण्याचा किंवा तुमच्या प्रेयसीला किंवा प्रियकराला प्रभावित करण्याचा खूप प्रयत्न करु नका. मग सगळे बिघडते.सर्वात उत्तम म्हणजे सहज असणे, नैसर्गिक असणे, क्षमाशील असणे आणि वर्तमान क्षणात असणे. यामुळे मोठा फरक पडतो.सूक्ष्मपणे जाणून घेणारे व्हा!.
नात्यात आपला मान कसा राखून ठेवावा ?
नात्यातील आदर गमावण्याची भीती ही कोणत्याही नात्यातील सर्वात मोठी भीती असते. आदर असण्यासाठी काही अंतर असावे लागते. प्रेम अंतर सहन करु शकत नाही. सर्व नातेसंबंधांमध्ये हाच मूळ संघर्ष आहे. आणि जर तुम्ही केंद्रित नसाल आणि तुमच्यात गहनता नसेल, तुम्ही आतून एकदम उथळ असाल, तर तुम्हाला मानसन्मान व आदर कसा मिळेल? इथे आदर गमावण्याची भीती आहे. जितके कोणी तुमच्या जास्त जवळ येईल तितके त्यांना तुमच्यातील भीती, तुमच्या चिंता आणि तुमच्या छोट्या मनाची जाणीव होते. मग तुम्हाला भीती वाटते, “अरे, मी माझा मान, आदर गमावू शकतो!” आणि तुम्ही नक्कीच तुमचा आदर गमावता! एकदा आदर गमावला की प्रेमात देखील गोडवा रहात नाही.
प्रेम, आदर, या सर्व संवेदना आणि भावना तुमच्या आत असतात. जेव्हा तुमचे हृदय आणि मन स्वच्छ असते, तेव्हा योग्य वेळी योग्य भावना निर्माण होतात . प्रेम, आदर – हे सर्व घडून येते. तुम्ही ते घडवून आणू शकत नाही. तुम्ही एखाद्याला तुमचा आदर करायला लावू शकत नाही.
आपण प्रेम किंवा आदर मुद्दामहून अनुभवण्याचा प्रयत्न केल्यास तो प्रयत्न अपयशी ठरेल. मान मिळण्याची लालसा बाळगू नका. स्वतःला तणावापासून मुक्त करणे आणि मनात शहाणपण ठेवणे,एवढेच तुम्ही करु शकता. शहाणपण म्हणजे जगाकडे विशाल दृष्टीकोनातून पाहणे. काय क्षणभंगुर आहे आणि काय कायमचे आहे याचा विचार करा. लोकांची सर्व मते तात्पुरती असतात. ती बदलत असतात. हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे.
आदराची अपेक्षा करणे हे आपले दौर्बल्य दर्शवते आणि लोक कोण आहेत किंवा त्यांचा दर्जा काय आहे याची पर्वा न करता त्यांना आदर देणे हे आपले शहाणपण दर्शवते.
~ गुरुदेव श्री श्री रविशंकर
स्वाभिमान एक बाब आहे आणि अहंकार ही एक वेगळीच गोष्ट आहे. स्वाभिमान ही अशी गोष्ट आहे जी तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्हाला स्वाभिमान असेल तर लाखो लोकांनी तुम्हाला शिवीगाळ केली तरी तुम्ही हसत राहाल. टीकेचा स्वीकार करा! ज्याला जे बोलायचे आहे ती त्या व्यक्तीची निवड आहे. जर कोणी तुम्हाला काही सांगितले तर तुम्ही त्यांना सांगू शकता की त्यांना त्यांचे अज्ञान दाखवण्याचा पूर्ण अधिकार आहे. दुसऱ्याच्या अज्ञानावर आपण आपले मन का खराब करावे? कोणतेही मूल्य देऊन आपल्या मनाचा बचाव करा!
प्रेम हा या सृष्टीचा आधारभूत घटक आहे. प्रेम कधीही नाहीसे होऊ शकत नाही.ते नेहमी असते. पुन्हा एकदा समजून घ्या, प्रेम देत चला आणि ते तुमच्याकडे लाखो पटीने परत येईल.
नातेसंबंधातील अपेक्षांना कसे सामोरे जावे?
प्रेमात अपेक्षा निर्माण होतात आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर दुःख होते. नात्यात आपण प्रेमाला भावना समजतो. आपण म्हणतो, ‘ मी तुझ्यावर खूप प्रेम करतो!’ मग मागण्या करु लागतो. ‘हे बघ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू माझ्यासाठी काय केलंस? मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हे तुला दिसत नाही का, तुला कळत नाही का?’ आमचा सूर प्रेमाचा नसून मागण्या करण्याचा होतो.
“मागण्या केल्याने प्रेम नष्ट होते”
नात्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा सहभागी होऊन सहाय्य करण्याचा असला पाहिजे, मागण्या करण्याचा नाही. असे असेल तर नाते जोपासले जाईल. प्रत्येक नात्यात, जर आपण असा विचार केला की, “मी या व्यक्तीकडून काय घेऊ शकतो किंवा या व्यक्तीकडून काय मिळवू शकतो?”, तर खूप त्रास होईल. पण “मी या व्यक्तीचा एक भाग होणार आहे, माझ्याकडून जे काही जमेल ते मी देईन आणि या व्यक्तीच्या जीवनात माझ्याकडून जे काही योगदान करता येईल ते करेन” ही वृत्ती तुम्ही ठेवलीत, तर ते नाते दीर्घकाळ टिकेल.
जर तुमचे नाते वैयक्तिक गरजांवर आधारित असेल तर ते जास्त काळ टिकणार नाही. एकदा, शारीरिक किंवा भावनिक पातळीवर, गरज पूर्ण झाली की मन काहीतरी वेगळे शोधू लागेल आणि दुसरीकडे कुठेतरी जाईल .जर तुमचे नाते सहभाग घेण्याच्या,वाटून घेण्याच्या, पातळीवर असेल तर ते जास्त काळ टिकेल.
जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून सुरक्षितता, प्रेम आणि सुख शोधत असता, तेव्हा तुम्ही कमकुवत होता,दुःखी होता .. आणि जेव्हा तुम्ही कमकुवत असता तेव्हा सर्व नकारात्मक भावना तुमच्यामध्ये निर्माण होतात. तुम्ही मागण्या करु लागता. मागण्या केल्याने प्रेमाचा नाश होतो. फक्त ही एक गोष्ट जर आपल्याला समजली तर आपण आपले प्रेम त्रासदायक होण्यापासून वाचवू शकतो. ‘प्रेमात पडणे’ हे शब्द खूप चांगले आहेत. पण खरे तर प्रेमात पडू नका, ‘प्रेमात उन्नत व्हा.’
उलटपक्षी “अरे! हे बघ, मी खूप काही केले पण तरीही ती व्यक्ती माझ्यावर प्रेम करत नाही.” असे उद्गार का निघतात? कारण ते अस्वस्थ झालेले असतात. प्रेमाच्या ठिकाणी दोन्हीकडून देवाणघेवाण होते. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला तुमच्यासाठी काहीतरी करण्याची संधी देता तेव्हा देवाणघेवाण होऊ शकते. यासाठी थोडे कौशल्य आवश्यक आहे. आपण न मागता दुसरी व्यक्ती आपल्याला काहीतरी देऊ शकेल अशी संधी निर्माण करण्यात आपण तरबेज झाले पाहिजे. एखाद्याला आपल्यासाठी काहीतरी करावे असे वाटणे, यासाठी आपल्याला माहित असलेला एकमेव मार्ग म्हणजे तसे करायला सांगणे, मागणी करणे. पण ही गोष्ट खूपच कौशल्याने करावी लागेल. नातेसंबंधात, दुसऱ्याने तुमच्या जीवनात काही योगदान द्यावे यासाठी त्यांना संधी द्या. जेणेकरून त्यांना ते पूर्णपणे निरुपयोगी आहेत असे वाटणार नाही. प्रेम फुलण्यासाठी असा आत्मसन्मान देणे आवश्यक आहे.
जगात लोक तुमच्यावर प्रेम करतात कारण तुमच्यामुळे त्यांना समाधान मिळते. जर तुम्ही त्यांच्या प्रेमाचा पुरावा मागत असाल तर तुम्ही त्यांना समाधानी करत आहात का? जर एखाद्याला तुमच्या प्रेमावर शंका असेल आणि तुम्हाला ते सतत सिद्ध करावे लागत असेल तर या गोष्टीचे तुमच्यावर खूप ओझे होते. तुमचा स्वभाव कोणताही भार टाकून देण्याचा आहे, म्हणून जेव्हा प्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते तेव्हा तुम्हाला चैन पडत नाही.
“समोरची व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते यासाठी प्रेमाचा पुरावा मागू नका.”
जेव्हा तुमचा पाय दुखत असतो तेव्हा तुम्ही डॉक्टरांना असे विचारत नाही की “ डॉक्टर, मला वेदना होत आहेत का? मला सांगा. मला माहीत नाही. मी गोंधळलेलो आहे.” डॉक्टर म्हणतील, “मला माहित नाही की तुम्हाला वेदना होत आहेत की नाही, परंतु मला या गोष्टीची खात्री आहे की तुम्हाला निश्चितपणे मानसोपचार तज्ज्ञाला भेटावे लागेल.” तुम्ही तुमच्या वेदनांचे पुरावे मागत आहात. हे हास्यास्पद आहे. प्रेम हाच पुरावा आहे. जेव्हा तुम्ही कोणाकडे पाहता, जर प्रेम असेल तर तुम्हाला त्या प्रेमाची चमक दिसून येईल. त्यामुळे समोरची व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते याचा पुरावा मागू नका. प्रेमाला पुराव्याची गरज नसते. कृती आणि शब्द प्रेम सिद्ध करु शकत नाहीत.
नातेसंबंधातील भांडणे कशी हाताळावी?
एकदा कोणीतरी मुल्ला नसीरुद्दीनला विचारले की तो आपल्या पत्नीशी इतका का भांडतो, तेव्हा त्याने उत्तर दिले, “कारण मी तिच्यावर खूप प्रेम करतो. मी एकीबरोबर भांडण करेन आणि दुसरीवरच प्रेम करेन? असे कसे शक्य आहे! मी सर्व काही एका व्यक्तीसमवेतच करतो.” वादविवाद हा देखील जीवनाचा एक भाग आहे. जेव्हा तुम्ही एकमेकांवर जास्त लक्ष केंद्रित करता तेव्हा झगडे होतात.
दोन समांतर रेषांच्या सादृश्यतेचा विचार करा.
जर दोन रेषा समांतर जात असतील तर त्या अनंतकाळ समांतर जातात. परंतु जर त्या एकमेकांवर केंद्रित असतील तर त्या एकमेकांना भेटतील आणि त्या एकमेकांपासून दूर जातील.
~ गुरुदेव श्री श्री रविशंकर
कोणत्याही नात्याबद्दल असेच असते. जर तुम्हाला ते कायमचे टिकवायचे असेल तर तुमचे एक समान ध्येय असले पाहिजे आणि एकमेकांवर लक्ष केंद्रित करता कामा नये किंवा एकमेकांवर पाळत ठेवता कामा नये. जर तुमचे लक्ष फक्त एकमेकांवर असेल तर कधी एक दिवस तुम्ही ‘गोड’ व्हाल आणि दुसऱ्या दिवशी कडू व्हाल.
जर तुम्हा दोघांचे समान ध्येय असेल, सेवा करणे, समाजाची उन्नती करणे इ., तर भांडणे होत नाहीत आणि प्रेम फुलते आणि इथे प्रत्येक जोडप्यासाठी भरपूर काम आहे. भारतीय विवाह परंपरेत, सप्तपदी नावाचा एक सोहळा आहे, सात पाऊले, जी जोडप्याला एकत्र चालावी लागतात. यापैकी एक पाऊल (जे प्रतिज्ञा सूचित करते) ते म्हणजे दोघेही समाजाच्या उन्नतीसाठी एकत्र काम करतील.
गेल्या शतकात किंवा या शतकातही, या शतकाच्या सुरुवातीच्या काळात पालकांचे एक ध्येय होते – त्यांच्या मुलांसाठी. मुले हे त्यांचे ध्येय होते. त्यामुळे दोघेही संसारासाठी शंभर टक्के कष्ट करत असत. एकमेकात कुरबुरी झाल्या तरी कुटुंब अभेद्य राहत असे. दोघांचे एकमेकांवर निरतिशय प्रेम असे.
तसेच काही प्रमाणात वादविवाद होणार हे गृहीत धरा. प्रत्येकाने तुमच्यासारखे असावे असे वाटणे योग्य नाही. प्रत्येकजण आपल्यासारखा असेल तर ते खूप नीरस आणि कंटाळवाणे होईल. मतभेद व भांडणे याना सुद्धा महत्त्व आहे. जीवन अधिक आव्हानात्मक आणि मनोरंजक होण्यासाठी या गोष्टी हव्यात. यातून प्रेम वाढते.
याव्यतिरिक्त जीवनात आणि विशेषतः नातेसंबंधांमध्ये विनोदाचे स्थान महत्वाचे आहे.विनोद आवश्यक आहे. त्यामुळे राग कमी होऊ शकतो.वादावादी मुळे वाढलेला रागाचा पारा विनोदाचा वापर केल्याने खाली येऊ शकतो. बघा, मतभेदही असू शकतात. पण जेव्हा विनोद असेल तेव्हा त्यांचा जास्त त्रास वाटणार नाही.मतभेदामुळे दरी निर्माण होते पण ती विनोदाने भरुन येते.
“विनोद ही एकत्र धरुन ठेवणारी शक्ती आहे”
भांडणे फक्त तुल्यबळ असलेल्या व्यक्तींमध्ये होऊ शकतात. जेव्हा तुम्ही एखाद्याशी भांडता तेव्हा तुम्ही त्यांना स्वतःच्या बरोबरीचे,एका पातळीवरचे करता. पण प्रत्यक्षात तुमच्या बरोबरीचे कोणीही नाही. जेव्हा तुम्ही लोकांना तुमच्या वर किंवा खाली समजता तेव्हा भांडण होत नाही. जेव्हा ते तुमच्या वर असतात तेव्हा तुम्ही त्यांचा आदर करता. जेव्हा ते तुमच्या खाली असतात तेव्हा तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता आणि त्यांच्याशी कनवाळूपणाने वागता.
“एकतर शरणागती नाहीतर कणव,कनवाळूपणा, यामुळे भांडणे ताबडतोब टाळली जाऊ शकतात.”
जेव्हा तुम्ही भांडून थकता तेव्हा याकडे पाहण्याचा हा एक मार्ग आहे.छान विश्रांती घ्या,भांडण करा आणि त्याची मजा अनुभवा!!
मनाचेही असेच आहे. जोपर्यंत मन इंद्रियांच्या बरोबरीचे आहे असे आपण समजतो,तोपर्यंत संघर्ष असतो.मन ज्ञानेंद्रियांपेक्षा मोठे आहे हे लक्षात आल्यावर संघर्ष होत नाही.तसेच जेव्हा मन इंद्रियांपेक्षा लहान असते, (जसे इतर प्राण्यांमध्ये असते,) तेव्हासुद्धा संघर्ष नसतो. मन जेव्हा इंद्रियांत अडकते तेव्हा सतत संघर्ष होत असतो. जेव्हा ते इंद्रियांच्या पलीकडे जाते, तेव्हा ते त्याच्या खऱ्या स्वरूपाकडे परत येते, खऱ्या निरागस स्वरूपाकडे … (मन इंद्रियांत (sences) गुंतलेले नसणे म्हणजे निरागस … इंग्रजीत innocence = in no sense)
नात्यातील गैरसमज कसे हाताळायचे ?
गैरसमज झाला,तर फक्त त्याकडे दुर्लक्ष करा.शिक्षित करा आणि दुर्लक्ष करा!! चिरफाड करत बसू नका! “असं का म्हणालास? तसं का बोललास? तू मला आवडतोस! तू मला आवडत नाहीस! तू माझ्यावर प्रेम करतोस. तुझं माझ्यावर प्रेम नाही.” इतका वेळेचा अपव्यय! सगळा भावनिक कचरा.त्या कचऱ्यात आपण राहतो! तुम्ही ते सर्व बाहेर फेकून द्या आणि मोठ्या उत्साहाने पुढे जा.
कौटुंबिक संबंध सुधारण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता आहे :
“कोणतेही स्पष्टीकरण नाही आणि कोणतीही तक्रार नाही” इतकेच.
इतरांकडून स्पष्टीकरण मागणे हा मूर्खपणा आहे आणि इतरांना कळेल असे मानून त्यांना समजावून सांगणे हा आणखी एक मूर्खपणा आहे. हे दोन्ही प्रकार उपयोगाचे नाहीत.
नातेसंबंधातील मत्सर आणि असुरक्षितता कशी हाताळावी?
तुम्ही एखाद्याच्या गुणांवर प्रेम करता पण त्याच्याबद्दल आपलेपणा नसतो. या प्रकारच्या प्रेमामुळे चढाओढ निर्माण होते आणि मत्सर वाटू लागतो.
लहान मुलामध्येही निसर्गतः अशी भावना दिसून येते. घरात दुसरे बाळ जन्माला आले की मोठ्या मुलाला हेवा वाटू लागतो. मत्सर कसा करावा हे त्यांना कोणीही शिकवण्याची गरज नसते. .
तुम्हाला तुमच्यातील गुणवत्तेचा खूप अभिमान आहे,तो अभिमान तुम्ही मिरवता, आणि जर तुम्हाला दुसऱ्या कोणामध्ये यापेक्षा जास्त गुणवत्ता आढळली तर मत्सर वाटू लागतो! काय करावे? मानवी जीवन या भोवऱ्यात अडकले आहे.
बरं, तुम्हाला हेवा वाटतो कारण तुमच्या अगदी जवळची व्यक्ती तुमच्यापेक्षा खूप जास्त साध्य करत आहे. पण स्वतःला त्या व्यक्तीच्या ठिकाणी ठेवून पाहा. समजा तुम्ही काहीतरी साध्य करत आहात.त्यावेळी इतर लोकांनी तुमचा हेवा केला तर तुम्हाला चालेल का? हा विचार आपण कधीच करत नाही. एखादी गोष्ट साध्य केल्यामुळे किंवा काहीतरी अद्भुत मिळाल्याबद्दल इतरांना तुमचा हेवा वाटावा असे तुम्हाला वाटते का? तुम्हाला असे अजिबात वाटत नाही. तुमच्या आनंदात, तुमच्या हर्षात इतरांनी सहभागी व्हावे असे तुम्हाला वाटते ना? असेच तुम्हीसुद्धा त्या व्यक्ती बरोबर वागा. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हा.
तुम्ही इतरांचाही विचार केला पाहिजे. जर कोणी आनंदी असेल तर तुम्ही त्यांच्या आनंदात सहभागी व्हा. होय, तुम्ही त्यांना शुभेच्छा द्या. तुम्हाला त्यांचे पद, त्यांची खेळातील कामगिरी आणि शेवटी नातेसंबंध याबद्दल हेवा वाटू शकतो. तुमचे कुणावर तरी प्रेम असते आणि ती व्यक्ती दुसऱ्या कुणावर तरी प्रेम करत असते. अशा प्रकारच्या परिस्थितीत तुमच्या आत नक्कीच मत्सर आणि गोंधळ निर्माण होईल. येथे तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की या क्षुल्लक घटनांपेक्षा जीवन खूप मोठे आणि सोपे आहे. यात मत्सर करण्यासारखे काही नाही.
जे तुमचे आहे ते नेहमीच तुमचेच राहील. जे काही निघून जाते ते आधी कधीही तुमचे नव्हतेच. जर तुम्हाला हे माहित असेल तर तुम्हाला शांती मिळेल.
~ गुरुदेव श्री श्री रविशंकर
नातेसंबंधामध्ये आपले मन दुखावले गेले असेल तर ?
आपण दुखावले जाणे किंवा न जाणे ही आपली निवड आहे. लोक तुम्हाला दुखवत नाहीत. तुमचे मन, तुमची अगतिकता आणि तुमच्या स्वतःच्या भावना तुम्हाला अडकवतात आणि तुम्हाला दुखावलेपणाची भावना निर्माण करतात.
सर्वप्रथम मी सांगेन, कनवाळू व्हा, त्यांना इशारा द्या. बघा , ‘तुमचे हे असे वागणे मला सहन होत नाही.मला अतिशय वाईट वाटत आहे.’ त्यांना विचारा, ‘तुम्हाला याची जाणीव आहे का? मला दुखवण्याचा तुमचा हेतू आहे का? यापुढे असे चालणार नाही.’ त्यांना एक, दोन,फारतर तीन वेळा संधी द्या. जर हे असेच सुरु राहिले तर तुम्ही ठरवा की, ‘मला माझे मन सांभाळायचे आहे’. जर त्यांचे वागणे सुधारले नसेल, तर तुम्ही समजा की त्यांची प्रकृती बरी नाही ,ते आजारी आहेत किंवा त्यांचे व आपले काही जुळत नाही. मग तुम्ही सांगा, ‘मला माझे आयुष्य आहे, आपण एकत्र नांदावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आता जसे वागताय तो मार्ग तुम्हाला सोडून द्यावा लागेल.’
“वेदना आणि प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत”
दीर्घकालीन नातेसंबंध कसे वृद्धिंगत करावेत ?
प्राचीन ऋषींनी यासाठी एक योजना आखली. त्यांना माहित होते की प्रत्येक व्यक्ती कोणी त्यांचा आदर करते की नाही याची जाणीव न ठेवता पूर्ण आनंदाच्या स्थितीत असू शकत नाही. त्यांनी एक नियम बनवला, जरी कोणी कोणावर खूप प्रेम करत असेल तरी, वर्षातून एक महिना त्याने/तिने एकमेकांपासून वेगळे राहावे आणि एकमेकांना मोकळीक द्यावी. भारतातील काही भागांमध्ये याचे पालन केले जाते. पत्नी पावसाळ्यात एक महिन्यासाठी तिच्या आईच्या घरी जाते. परंपरेनुसार त्या एका महिन्यात पती-पत्नी एका घरात राहू शकत नाहीत. दुराव्यामुळे प्रेम वाढते. जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या जोडीदारासमवेत २४ तास असते तेव्हा काही अर्थ राहत नाही.एकमेकात संवाद नाही,एकमेकांसाठी उत्कट इच्छा,तळमळ नाही!
“प्रेम आणि उत्कट इच्छा हातात हात घालूनच जातात. उत्कट इच्छा प्रेमाला समृद्ध करते आणि प्रेम उत्कटतेला समृद्ध करते”
दोन्ही गोष्टी असणे आवश्यक आहे. ती तळमळ निर्माण करण्यासाठी दुरावा निर्माण करावा लागेल. तुम्हाला परस्परविरोधी मूल्ये माहित असणे आवश्यक आहे आणि काहीही अनुभवण्यासाठी विरोधाभास अनुभवणे आवश्यक आहे. जीवन म्हणजे अशा अनेक विरोधाभासी गोष्टींची गर्दी आहे!