“मूलतः प्रत्येक मानवामध्ये एक ईश्वरी अंश आहे आणि म्हणून तो वाईट असूच शकत नाही, हे जो जाणतो तो खरा साधक आहे. विधात्याने एकही वाईट व्यक्ती निर्माण केली नाही. प्रत्येकामध्ये एक प्रकाश आहे.”
तुम्ही लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवता का?
जगामध्ये प्रमुखतः दोन प्रकारचे दृष्टिकोन किंवा दोन प्रकारचे लोक असतात.
- एक गट जो समजतो की जगामध्ये सगळे लोक मुळातच वाईट असतात.
- एक गट असा असतो जो समजतो की जरी काही लोकांचे वागणे थोडे वाईट असले तरी प्रत्येकजण आतून चांगलाच आहे. वाईट वागणे हे वरवरचे असते.
पहिल्या प्रकारचे लोक कुणावरही विश्वास ठेऊच शकत नाहीत आणि दुसऱ्या प्रकारचे लोक कुणावरही जास्त संशय घेत नाहीत. फरक तुमच्या लक्षात येतो आहे कां ? जेव्हा प्रत्येकजण मूलतः चांगला आहे असा तुम्ही विचार करता तेंव्हा तुमचा संशय वरवरचा असतो. तुम्ही कुणावरही कमालीचा संशय घेत नाही. कारण तुम्हाला माहीत आहे प्रत्येकामध्ये काहीतरी चांगले आहे. प्रत्येकातील चांगल्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवता.
तर दुसऱ्या गटाला नेहमीच विश्वास ठेवण्यास अडचणी येतात , कारण ते समजत असतात की प्रत्येकजण मूळतः वाईट आहे. जरी ते लोक बाहेर वरवर चांगले दिसत असले तरी आतून ते चांगले नाहीत. ही मनाची पूर्वधारणा तुम्हाला कुणावरही विश्वास न ठेवण्यासाठी कारणीभूत असते/होते.
सुज्ञपणा हे पाहण्यात आहे की नकारात्मकता फक्त वरच्या स्तरावर आहे.
एवढे मजेशीर आहे नां ? एखाद्या व्यक्तीत थोडे फार वाईट दिसले की तुम्ही त्या व्यक्तीचा खरा स्वभाव असाच आहे असे समजू लागता.
मला एक प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे.
मागच्या वर्षी उत्तर भारतातील एका शहरात मोठ्या सत्संगसाठी मी गेलो होतो. सत्संग चालू असताना एक खूप कुविख्यात माणूस आत आला आणि स्टेज वर चढून इकडे तिकडे फिरू लागला. सगळे पत्रकार आणि बाकी लोक म्हणू लागले हा माणूस गुन्हेगार आहे त्याला गुरुदेवांपर्यंत येण्याची परवानगी कुणी दिली तो? गुरुदेवांसोबत कसा उभा राहू शकतो.
तो माणूस इतका बदनाम होता की तो म्हणत असे, “मी एक फोन केला तर कुठलेही विमान थांबवू शकतो.”
कुठल्याही टॅक्सी चालकाला तो गाडीतून बाहेर यायला सांगायचा आणि ती गाडी तो घेऊन जायचा. ती मोठी गुन्हेगारी इतिहास असलेली व्यक्ति होती. म्हणून जेंव्हा तो मंचावर आला तेंव्हा प्रत्येकाला आश्चर्य वाटले की, “गुरुदेवांनी ह्याला परवानगी कशी दिली?”
तुम्हाला माहित आहे , ज्या माणसाने आर्ट ऑफ लिव्हिंग चा कुठलाही प्रोग्राम केला नाही किंवा काहीही केले नाही तोच हा माणूस तीन महिन्यांनी शिवरात्री च्या वेळेस बंगलोर आश्रमात मला भेटायला आला. त्याने त्याच्या खिशातून माझा फोटो काढला आणि म्हणाला, “गुरुदेव जेव्हापासून हा फोटो माझ्या खिशात ठेवला आहे मी माझे काम करू शकत नाही. काय झालं? तुम्ही काय केलंय? माझे संपूर्ण जीवन अस्ताव्यस्त आहे; माझे सगळे जीवन बदलले आहे.इथे आश्रमात सगळीकडे किती आनंद आहे आणि आता हा आनंद मला माझ्या राज्यात पोहोचवायचा आहे. प्रत्येक घरात पोहोचवायचा आहे.*
”हा तोच माणूस आहे ज्याला प्रत्येकजण समाजविरोधी समजत होते. पत्रकार सुद्धा ह्याला घाबरत असत. सहसा पत्रकार कुणाला घाबरत नाही पण ते सुद्धा म्हणत असत की, “हा माणूस खूप भयंकर आहे.”
जशी दृष्टी तशी सृष्टी
तुम्हाला माहित आहे जसे तुम्हाला वाटते किंवा जाणवते तसे जग बनते. संस्कृत भाषेत एक म्हण आहे ‘यथा दृष्टी तथा सृष्टी’. जसे तुम्ही जगाकडे बघता तसे जग तुमच्यासाठी बनते. जगात सगळीकडे वाईट लोक आहेत असा विचार केला तर तुम्हाला असेच अनुभव येत राहतील. जर तुम्ही जग चांगल्या लोकांनी भरले आहे असा विचार केला तर अगदी वाईटातला वाईट गुन्हेगार असेल तरी तुम्हाला त्याच्यामध्ये लपलेला चांगला माणूस दिसेल. तुम्ही तो ओळखू शकाल.
म्हणून लोकांना चांगले वाईट अशी काही नावे ठेऊ नका. त्यांच्या विषयी तुमचे काही मत बनवू नका. एकच ईश्वरी तत्त्व वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या लोकांमध्ये, वेगवेगळ्या रंगामध्ये, वेगवेगळ्या भावनांमध्ये दिसते.सगळीकडे फक्त एकच प्रकाश आहे. जर आपण हे ओळखू शकलो तर तुमच्या अंतरंगात एक अशी शांती येईल असा एक विश्वास आणि श्रद्धा येईल की कुणीही तुम्हाला हलवू शकणार नाही.
प्रत्येकामध्ये प्रकाश आहे
मूळतः प्रत्येकामध्ये एक ईश्वरी अंश आहे. म्हणून तो कधीही वाईट असू शकत नाही. हे जो जाणतो तो खरा साधक. निर्मात्याने एकही वाईट व्यक्ती निर्माण केली नाही. मी तुम्हाला खात्री देतो की एकही वाईट व्यक्ती नाही. प्रत्येकात तो दिव्य प्रकाश आहे. कुठे लपलेला आहे, कुठे झोपलेला आहे तर कुठे कुठे जास्त कार्यशील आहे.
म्हणून हे दोन मार्ग आहेत. बघा तुमच्या मनात तुम्ही कोणत्या बाजूला जात आहात. तुम्ही श्रध्दा आणि विश्वास याकडे झुकताय की संशयाकडे? जर तुम्ही इतरांना नापसंत करण्याच्या बाजूने जात असाल किंवा स्वतःला नापसंत करत असाल, तर आता त्यामध्ये बदल करण्याची वेळ आली आहे आणि म्हणा, “नाही, मुळात प्रत्येकजण चांगला आहे.”