फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. चार वयस्क गृहस्थ होते. त्यांना काही प्रश्न पडले होते आणि ते त्या प्रश्नांची उत्तरे शोधत होते. पहिला दुःखी होता आणि या दुःखातून बाहेर कसं पडायचं याचा शोध घेत होता. दुसऱ्याला यश पाहिजे होतं आणि आपली प्रगती कशी होईल याचं उत्तर हवं होतं. तिसऱ्याला या आयुष्याचा अर्थ जाणून घ्यायचा होता. चौथा पूर्ण ज्ञानी होता पण तरीही काहीतरी कमी आहे असं त्याला वाटत होतं. ते काय कमी आहे याचं उत्तर त्याला हवं होतं.
हे चार जण आपापली उत्तरे शोधण्यासाठी भटकत होते. फिरत फिरत ते एका वडाच्या झाडाखाली एकत्र आले. त्या झाडाखाली एक तरुण सुहास्य मुद्रेने बसला होता. एकदम त्या चौघांना वाटले की ह्या तरुणाकडे आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील ! हाच आपल्या समस्या सोडवू शकेल, म्हणून चौघेही त्याच्याजवळ बसले. प्रसन्न व हसतमुख चेहऱ्याने तो तरुण त्यांच्याबरोबर बसला होता. त्याने एकही शब्द उच्चारला नाही ! तरीही त्या चौघांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती !!
ही गुरुपौर्णिमेची मूळ कथा आहे. त्या दिवशी पौर्णिमा होती, अशा प्रकारे गुरुपरंपरा सुरु झाली. ते चारही जण ‘ गुरू ‘ झाले.
त्या चौघांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. ती अशी:
- दुःख संपले होते !
- आनंद मिळाला, सुखसमृद्धी आली !
- आयुष्याचा अर्थ कळला, शोध संपला !
- ज्ञानी माणसाला गुरु मिळाला. तो त्याच्या मनातलं गुरुजवळ व्यक्त करु शकत होता.
यातल्या चौथ्या माणसाकडे सर्व काही होतं, ज्ञान होतं, पण ज्याच्याशी जोडले जाऊ असा गुरु नव्हता, तो मिळाला व गुरुशी त्याचे आतून नाते जुळून आले.
म्हणूनच आदि शंकराचार्य म्हणतात, “मौनव्याख्या प्रकटित परब्रह्मतत्वं युवानं“. (अर्थ – ज्यांनी सर्वोच्च ब्रह्माचे खरे स्वरुप त्यांच्या
मौनातून वर्णन केले त्या आद्य गुरु दक्षिणामूर्तीना नमस्कार असो!).
ही कथा काय सूचित करते
या गोष्टीतला गुरु तरुण आहे. म्हणजेच चैतन्यरुपी आत्मा कायम चिरतरुण असतो. शिष्य हे वृद्ध आहेत. या गोष्टीत बऱ्याच उपमा दिलेल्या आढळतात. जसे – कोणत्याही गोष्टीचा शोध घेता घेता तुम्ही वृद्ध होता, जगाचा शोध, मुक्तीचा शोध किंवा अन्य कशाचाही शोध घेतांना तुम्ही वृद्ध होता. म्हणून शिष्य वयस्कर होते व गुरु तरुण होते.
गोष्टीतलं वडाचं झाड काय सूचित करते? वडाचं झाड स्वतःच वाढतं. ते वाढण्यासाठी कुणी संगोपन किंवा राखण करायची गरज नसते. वडाचं बी दगडाच्या खोबणीत जरी पडलं , त्याला फारस पाणी त्याला नाही मिळालं तरी रुजतं, वाढतं. अगदी थोडी माती व थोडंसं पाणी पुरेसं असतं. कधी कधी माती व पाण्या शिवाय सुद्धा ते वाढतं. वडाचं झाड कायम प्राणवायू देतं. हा देण्याचा स्वभाव म्हणजे गुरुतत्वाचंच प्रतीक आहे!
गुरु म्हणजे जो अंधःकार, दुःख, एकटेपणा व अभाव दूर करतो आणि समृद्धी देतो. अभाव हा फक्त आपल्या मनातूनच असतो. म्हणून गुरु अभाव घालवतो व मुक्ती देतो.