आपल्या आयुष्यात आपण हरलो आहोत, दोषी आहोत, निराश आणि दुःखी आहोत असे वाटण्याचे क्षण कधी ना कधी आलेले आहेत. पण पुढे काय होते? आपण आनंदाने, स्वतःला सावरुन घेतो का? की आपण आपला दिवस अर्धवट उत्साहात, भीती आणि नकारात्मकतेकडे जाण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करत राहतो? नेमके काय चालले आहे हे आपण समजून घेतले तर आपण, शक्यतो, नंतरचा काळ बदलू शकतो.
जेव्हा आपण निराश असतो, तेव्हा आपल्या मनात नकारात्मकतेची मालिकाच चालू असते. आणि आपल्यापैकी काहीच जण आपण मन आणि शरीर याहूनही वेगळे आहोत, सरस आहोत हे जाणून घेण्याइतपत शहाणे असतात. आपल्याला याची नेहमीच जाणीव असते असे नाही. आपल्याकडे अहंकार, बुद्धी, स्मृती तर आहेच आणि अंतर्मन सुद्धा आहे!
आपले अस्तित्व म्हणजे अनेक गोष्टींची सरमिसळ आहे. जर आपण शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ किंवा आपल्या सूज्ञ पूर्वजांवर विश्वास ठेवत असाल तर :- “मनुष्य हा या विश्वात अस्तित्वात असलेला सर्वात जटिल आणि प्रतिभावान कार्य करणारा जीव आहे.” याची खात्री पटेल! हे सर्व ज्ञान खूप डोईजड होतंय ना? आपण अगदी साधी माणसं आहोत, होय ना?
अवचेतन मन (अंतर्मन) म्हणजे काय?
- मी कोण आहे?
- आपली एक अवचेतन बाजू आहे.
- अवचेतन मन (अंतर्मन) हे एक अतिशय शक्तिशाली साधन आहे जे आपल्या आजूबाजूला आणि आपल्यासाठी घडणाऱ्या सर्व गोष्टी आत्मसात करते.
- आपण संस्कारांचे भांडार आहोत: आपल्या आत एक आंतरिक संवाद चालू असतो – जवळजवळ एक चांगला माणूस आणि एक तितकासा चांगला नसलेला माणूस. पण, जेव्हा आंतरिक संवाद फक्त नकारात्मकता आणि निराशेभोवती फिरत राहतो तेव्हा काय होते? आपल्याला वाटते की नकारात्मकता निघून जात आहे. खरं तर, तेव्हा नकारात्मकता आपल्या आत साठत असते. कुठे? सर्वत्रच, परंतु विशेषतः अवचेतन मनात, अंतर्मनात.
- आपण जे मानतो तसे आपण बनतो: जेव्हा विचार नकारात्मक असतात, तेव्हा त्याची फलश्रुती नकारात्मक होते. आपण जसा विचार करतो, तसे आपण होतो. आपण राग आणणारा विचार करतो आणि आपल्या आजूबाजूला चिडचिड निर्माण करणारी परिस्थिती निर्माण करतो. आपण अपयशाची कल्पना करतो आणि आपल्या पदरी अपयश यायला लागते, नव्हे नव्हे, ते येतेच!
तर, आता आपल्याला माहित झाले आहे की आपले अंतर्मन दररोज आपल्या समवेत असते. प्रत्येक क्षणी असते. आपण विचार कसे बदलू शकतो आणि आपल्या अंतर्मनाला आनंद आणि यशाकडे कसे वळवू शकतो? आपण आपल्या अंतर्मनाची काळजी कशी घ्यायची ?
अवचेतन मनाचे संवर्धन कसे करायचे ?
- नकारात्मक विचार शेवट पर्यंत नेण्याचा त्रास घेऊ नका. विचार तिथेच थांबवा आणि त्याला आनंदी, सकारात्मक विचारात बदला. होय, मला माहित आहे की हे कठीण आहे परंतु सराव आणि संयमाने हे नक्की जमेल. प्राचीन भारतात, असे मानले जात होते की सर्वत्र देवदूत असतात, जे लोकांची इच्छा पूर्ण करण्याची वाट पहात असतात. म्हणून, जर तुम्ही म्हणालात: “माझा आजचा दिवस खूप कष्टदायक जाईल” – तर सावध रहा! जवळपास एक देवदूत असू शकतो ज्याला तुमची इच्छा पूर्ण करण्यास खूप आनंद होईल !
- सकारात्मक विचार करा आणि फक्त चांगले विचार करा. कधीकधी ते शक्य नसते. मग फक्त आराम करा. जर नकारात्मक विचार येत असतील तर त्यांना येऊ द्या.स्वतःमध्येच राहा,आणि ध्यानाद्वारे सकारात्मकता निर्माण करा. कोणी एक कल्याणकारी श्रेष्ठ शक्ती आहे,त्या शक्तीवर आणि स्वतःवर विश्वास ठेवा.
- दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा. दररोज सकाळी करदर्शन करा (हातांकडे पहा) आणि स्वत: ला सांगा: हे हात आज असामान्य काम करणार आहेत!
- दररोज रात्री, झोपण्यापूर्वी दहा मिनिटे ध्यान करा आणि कृतज्ञता व्यक्त करा. तुमचा दिवस कसा गेला, तुम्हाला कोणती आव्हाने आली आणि अपयश आले याने काही फरक पडत नाही. फक्त कृतज्ञ रहा आणि आनंदी रहा. वर्तमान क्षणात इथे आणि आत्ता तुमच्यासाठी खूप काही घडत आहे.
- ध्यान करा. होय,ध्यान ही एक अतिशय छान गोष्ट तुम्हाला लाभलेली आहे. आपले अंतर्मन हे आपल्या भावना, अनुभव आणि विचारांचे भांडार आहे. आपण सर्व मनुष्य प्राणी आहोत. वेगवेगळ्या घटना व लोकांचे वागणे आपल्यावर प्रभाव टाकत राहते,आणि ते स्वाभाविक आहे. तुमच्याअंतर्मनासाठी निचरा करणारे खास साधन म्हणून फक्त ध्यानाचा वापर करा. ध्यान हे बरेच काही करते. ध्यान खूप चांगले काम करते हे लक्षात घ्या आणि तुमच्या अंतर्मनाला तुमची ध्यानाची सवय नक्कीच आवडेल.
- नीट झोप घ्या. झोपेच्या कमतरतेमुळे, थकलेल्या शरीर आणि मनावर अधिक काम करण्यासाठी ताण येऊ शकतो. थकलेले मन चिडचिड, राग आणि नकारात्मकतेला बळी पडू शकते. थकलेले शरीर आपला स्वतःचा ऊर्जेचा साठा कमी करत जाते. जीवनाच्या सकारात्मक स्थितीकरीता स्वतःला सुयोग्य करण्यासाठी कमीतकमी ६ ते ८ तास झोप घ्या.
- मोठा विचार करा. आयुष्यापेक्षा मोठे स्वप्न पहा. आणि हे जाणून घ्या की एक चांगला हेतू असलेल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे . यामुळे तुम्हाला उद्दिष्टाची जाणीव होईल, आव्हानांवर मात करण्याची शक्ती मिळेल आणि आयुष्यातील लहान, क्षुल्लक समस्या असल्या तरी त्यातूनही तुमचे मन उभारी घेईल.
- आत्मविश्वास बाळगा. या विश्वाकडून तुम्हाला काय हवे आहे ते मागा. अजिबात संकोच करु नका. जर तुम्ही मागणी करण्यास संकोच करत असाल किंवा पाहिजे ते मिळवण्याची खात्री नसेल तर, विश्व तुमची उर्जा प्रतिबिंबित करत असते. त्यामुळे कदाचित तुम्हाला जे हवे आहे ते मिळणार नाही. म्हणूनच असे नकारात्मक विचार करणे योग्य नाही!
- मेहनत करा. तुम्ही आधीच काय हवे ते सांगितले आणि स्पष्टपणे व्यक्त केले आहे. आता, त्यासाठी काम करा. कणभरही कष्ट न करता एखादी सुंदर गोष्ट तुमच्या दारात येईल असे समजू नका. तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या इच्छांसाठी, तुमच्या मागण्यांसाठी कार्य करा.
- विश्वास ठेवा. तुम्ही आत्मविश्वासाने मागितले आहे; आणि त्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. आता समर्पण करा. आनंदी रहा आणि विश्वास ठेवा की तुमच्यासाठी जे सर्वोत्तम आहे तेच होईल.
विश्राम करा. तुम्ही जसे आहात तसे परिपूर्ण आहात. साधना तुम्हाला आणखी परिपूर्ण बनवते. वर्षानुवर्षांची स्थिती लगेच पूर्ववत करणे किंवा आपल्या आत सुरु असलेले नकारात्मक कथन अचानक थांबवणे सोपे नाही. धीर धरा, सहज रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या अंतर्मनाची शक्ती तुमच्याकडे आहे. तुमचा अध्याय आता नुकताच सुरु झाला आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या फॅकल्टी सदस्य डॉ. प्रेमा शेषाद्री यांच्याकडून. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांची ज्ञानसत्रे व त्यातील माहितीवर आधारित.