होळी काय आहे
भारतामध्ये चंद्र पंचांगाप्रमाणे ही शेवटची पौर्णिमा. वर्षाच्या शेवटच्या पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. पुढची पौर्णिमा म्हणजे नूतन वर्षातली, म्हणून परंपरा अशी आहे की शेवटच्या पौर्णिमेच्या आधी सर्व जुने, पुराणे,मोडलेले असे सर्व काही गोळा करून अग्नीस समर्पित करून मग रंगांनी होळी खेळावी.
होळी हा रंगांचा उत्सव आहे. शेकडो वर्षांपासून हा एकमेव सण असा आहे जो समाजातील सर्व जाती, वर्ग, वय आणि पिढ्यांना एकत्र आणतो. सर्वजण एकत्र येतात आणि मानव जातीची एकी साजरी करतात, आणि होळीचा हाच संदेश आहे.
विविध पार्श्वभूमी (गरीब, श्रीमंत, हुशार, मंद) असणारी छोटी मुले जर एका खोलीत सोडली, ती कशी खेळतील, माहित आहे? कोणताही भेदभाव न बाळगता ते खेळत राहतील? तसेच होळी हा एकच सण असा आहे जो विरुध्द पार्श्वभूमी आणि व्यवसाय असणाऱ्या लोकांना एकत्र आणतो.
समाज लोकांचे विभाजन करतो, कधी व्यावसायिकतेमुळे, लिंग भेदामुळे, कधी वयाच्या आधारावर. होळी एक अशी संधी आहे जेंव्हा आपण लिंग, राष्ट्रीयता, जात-कुळ आणि धर्म अशा सर्व अडथळ्यांवर मात करून – सर्व तरूण, वयोवृध्द एकमेकांना आलिंगन देत रंग लावतात. हा एकतेचा उत्सव आहे.
होळीचे महत्व
आपल्या मनोभावना आणि विविध रंग यांचा जवळचा संबंध आहे. क्रोध हा लाल रंगाशी, मत्सर हा हिरव्या रंगांशी, चैतन्य आणि आनंद हा पिवळ्या रंगांशी, प्रेम हा गुलाबी, विशालता हा निळ्या, शांती सफेद रंगाशी, त्याग केशरी रंगाशी तर ज्ञान हे जांभळ्या रंगाशी संबंधित आहे. प्रत्येक एक व्यक्ती ही रंगांचे कारंजे आहे , ज्याच्या रंगछटा या सतत बदलत असतात. जर आपले जीवन हे होळीसारखे असेल , जिथे सर्व रंग स्पष्ट दिसत असतील तर आपले जीवन आणखी आकर्षक बनते. विविधतेमधील एकतेमुळे जीवन आणखी खेळकर, आनंदी आणि रंगीबेरंगी बनते.
होळीप्रमाणेच जीवन रंगीबेरंगी हवे, बेरंगी नसावे. सर्व रंग स्पष्ट दिसत असतील तर जीवन खेळकर बनते. सर्व रंग मिसळतात तेव्हा काळा रंग बनतो. तद्वत आपल्या दैनंदिन जीवनात आपण विविध भूमिका अदा करत असतो. प्रत्येक भूमिका आणि भावना या स्पष्ट दिसाव्यात. भावनिक गोंधळ समस्या निर्माण करतो.
जेव्हा आपण वडील असता तेव्हा वडिलांची भूमिका करावी लागते. कार्यालयात आपण वडील असून चालणार नाही. जीवनात भूमिका मिसळल्या की तुमच्याकडून चुका व्हायला सुरु होते. जी भूमिका आपण निभावत असता तिच्यात झोकून द्या.
अज्ञानामध्ये भावना त्रास देतात तर ज्ञानामुळे त्याच भावना रंगत वाढवतात. स्वतःला हे बजावा की जी भूमिका आपण करत आहात तिला न्याय देऊया. सर्व भूमिका कराव्या लागतील, उत्तम जोडीदार, उत्तम पाल्य, उत्तम पालक आणि उत्तम नागरिक. समजून चला की हे सारे गुण आपल्यात आहेत, फक्त त्यांना उमलू द्या.
होलिका दहनाचे महत्व
होळीच्या आदल्या रात्री होलिका दहन होते, ज्याचा परिणाम येणाऱ्या पावसाळ्यावर होतो.
प्रल्हादाची एक कथा आहे.(जेथून होळीच्या सणाची सुरवात झाली). प्रल्हाद हा एक लहान मुलगा होता , जो देवाचा अत्यंत भक्त होता, पण त्याचे वडील पक्के नास्तिक होते. तो अत्यंत अहंकारी आणि क्रूर राजा होता. आणि त्याचा मुलगा सतत देवाचा जप करत असल्याने त्याला आपल्या मुलाला धडा शिकवायचा होता.
त्याने आपल्या मुलाला बदलण्याचे (देवभक्ती पासून परावृत्त करण्याचे) अतोनात प्रयत्न केले परंतु त्याच्या मुलामध्ये काहीही बदल होत नव्हता, म्हणून त्याने आपल्या मुलाला ठार मारण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने त्याच्या एका बहिणीचे सहकार्य घ्यायचे ठरवले. तिला वरदान होते की ज्याला ती आपल्या मांडीवर घेईल ती व्यक्ती जळून जाईल. तिचे नांव होलिका. कथेत पुढे तिने प्रल्हादाला जाळण्यासाठी आपल्या मांडीवर घेतले. परंतु त्याच्याऐवजी तीच जळून भस्म झाली, प्रल्हाद सुरक्षित बाहेर आला कारण तो देवाचा भक्त होता आणि सतत हरिओम चा जप करत होता. आणि यामुळे त्याचे आगीपासून संरक्षण झाले.
भारतातील काही गावांमध्ये लोक आगीतून चालतात. पण त्यांना काहीही होत नाही, पायावर एक साधा फोडसुद्धा येत नाही. कारण? विश्वास !! विश्वासामध्ये फार मोठे सामर्थ्य आहे आणि त्याचा परिणाम जीवनात होत असतो. होलिका दहनाचा हाच संदेश आहे.