चार मोठ्या चिंता
लोकांना चार गोष्टींबद्दल चिंता असते- पैसा, नाते, प्रतिष्ठा आणि आरोग्य. एके दिवशी हे सारे निघून जाणारं आहे, तरीही तुम्हांला त्याची चिंता वाटते.
आयुष्याकडे मोठ्या दृष्टीकोनातून बघा. दहा वर्षापूर्वी तुम्ही कोणत्या तरी गोष्टीमुळे चिंतेत होता, पण तरीही तुम्ही जिवंत आहात. तुम्ही पाच वर्षांपूर्वी चिंतेत होता, तुम्ही तीन वर्षापूर्वी चिंतेत होता. ही चिंता / काळजी केल्याने तुम्ही स्वतःला काही करुन घेतले नाही. तुम्ही फक्त तुमच्या शरीरात जास्त विषारी द्रव्य बनवलीत. आयुष्य तर चालूच आहे असे काय आहे जे तुम्हांला त्रास देतेय?
उठा आणि पहा , एके दिवशी सर्वच संपून जाणार आहे. सर्वकाही संपणार आहे ही जाणीव तुमच्या मनाला सतत चिंता करण्याच्या वृत्तीमधून बाहेर आणू शकते. सर्वकाही बदलतेय, सर्वकाही संपतेय हे जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुम्ही अतिशय मजबूत आणि कणखर बनतानाच अतिशय सौम्य आणि केंद्रित बनतात.
चिंता करणे निरुपयोगी आहे. त्यापेक्षा तुम्हांला काय हवे आहे किंवा कोणत्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतो त्यांवर काम करणे फायद्याचे आहे.काम करण्यासाठी तुमच्याकडे सामर्थ्य आणि ऊर्जा असायला हवी. अध्यात्मिक क्रियाकलपांच्या सरावामुळे तुमची उर्जा आणि सकारात्मकता वाढते.
चिंतेचे स्त्रोत
पैसा तुमच्या चिंतेचे कारण आहे का? पक्षी – प्राण्यांकडे पहा . त्यांना सर्वांना अन्न मिळते नां? निसर्ग सर्व गोष्टी पुरवतो. निसर्ग सर्वात मोठा पुरवठादार आहे; तेव्हा तुम्हांला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या निसर्ग पुरवणार हयावर विश्वास ठेवा. तुमची चेतना एका शेताप्रमाणे आहे. तुम्ही जसे बियाणे तिथे पेराल तसे उगवेल. जर तुम्ही अभावाचे / कमतरतेचे बीज पेरलत , तर अभावच येईल, जर तुम्ही म्हणालात की, ‘माझ्याकडे समृद्धी आहे, तर समृद्धीच येईल.
नातेसंबंधांमुळे अडचणी उभ्या राहतात आणि तुमचे हृदय पिळवटून निघते. उठा आणि पहा! नातेसंबंधांच्या आधीदेखील तुम्ही जिवंत आणि उत्साही होतात. तुम्ही आनंदी, हसत होतात. तुम्ही त्या व्यक्तीला भेटण्यापूर्वी, त्याच्याशी नातेसंबंध प्रस्थापित होण्यापूर्वीचे दिवस आठवा. तेव्हा आयुष्य सुरळीत होते मग नंतरही ते असेच असेल! तर तुम्हांला का त्यासाठी नाराज व्हायचे आहे?
एके दिवशी सर्व काही संपून जाणार आहे या गोष्टीची जाणीव तुमच्या मनाला चिंतातुर प्रवृत्तीमधून बाहेर आणते.
गुरुदेव श्री श्री रवी शंकर
तुम्ही तुमच्या स्वास्थ्याविषयी चिंतित आहात का ? तुम्ही स्वतःला किती आरोग्यपूर्ण ठेवू शकणार आहात ? तुम्ही कितीही स्वस्थ असाल तरी एके दिवशी तुमच्या शरीरासोबत असलेले हे नाते संपुष्टात येऊन सर्वकाळी संपणार आहे. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देवू नका. पण आरोग्याविषयी चिंता करत बसणे मूर्खपणाचे आहे.
रिकामे बसून विश्लेषण करणे आणि आरोग्याची चिंता करणे व्यर्थ आहे. तुम्ही जितकी काळजी कराल तितकी तुमची तब्येत आणखी बिघडते. हे तुमच्या प्रणालीमधील कॉर्टिसोल हार्मोन्स वाढवते ज्यामुळे बरे होण्यास विलंब होतो.
तुम्ही नोकरी मिळण्याच्या चिंतेत आहात आणि काळजीत दिसता आहात. तर कोणी तुम्हांला नोकरी देईल का? कोणीही नियोक्ता तुम्हांला, एका चिंताग्रस्त, शून्यमनस्क, दुःखी, नाखुश अशा व्यक्तीला नोकरीवर ठेवेल का ? जर तुम्ही स्वतः नियोक्ता असाल तर तुम्ही अशा निरस, निरुत्साही , चिंतातुर व्यक्तीला नोकरी द्याल का ? जर तुम्ही व्यावसायिक आहात आणि चिंताग्रस्त झालात तर चिंतेमुळे तुमचा व्यवसाय चालणार आहे का?
जर तुम्ही एकटे आहात आणि जोडीदाराच्या शोधात आहात ; आणि चिंताग्रस्त दिसत आहात, तर कोणी तुमच्यासोबत लग्न करेल का ? तुम्ही एखादा नीरस, चिंतातुर जोडीदार निवडाल की आनंदी आणि उत्साही जोडीदार निवडाल? लक्षात घ्या, जगात ७ अब्ज लोक आहेत त्यापैकी अडीच अब्ज लोक विरुद्धलिंगी आणि तुम्हांला सुरुप वयाचे आहे. मग जोडीदार शोधण्याची चिंता तुम्ही का करत आहात?
चिंतेविषयी ज्ञान
आयुष्याकडे विशाल दृष्टीकोनातून पहा. तुम्ही मनोरुग्णालयात आहात अशी कल्पना करा. तिथे असलेल्या सर्व रुग्णांचे बोलणे ऐका. त्यांची अवस्था पहा आणि देवाचे आभार माना की आपण तिथे दाखल झालो नाहीत, आपण फक्त तिथे भेट देण्यासाठी आलेले पाहुणे आहोत, तिथले निवासी नाही.
जर ह्याचाही उपयोग होत नसेल तर स्मशानभूमी किंवा दफनभूमीत जा. तिथे रोज येणारी आणि जळणारी प्रेते पहा. एकेदिवशी तुम्हीसुद्धा तिथे असणार आहात. काळजी करण्यात काय अर्थ आहे?
तुमचे आयुष्य कितीही चांगले असो, कितीही पैसा, प्रसिद्धी, सामर्थ्य असो, तुम्ही आणि सर्वचजण एके दिवस जाळले किंवा दफन केले जाणार आहात. तिथे (स्मशानात ) फक्त अर्धा दिवस बसा. तुम्ही पहाल की लोकं तिथे प्रेत घेऊन येतात, थोड्यावेळ रडतात, अंत्यसंस्कार करतात आणि घरी परत जाऊन जेवतात.दुसऱ्या दिवशी नाश्ता घेतात.
एके दिवशी ह्या साऱ्यावर पडदा पडणारच आहे. चिंता करण्यात काय अर्थ आहे?
पण त्याचा अर्थ असा नाही की एके दिवशी सर्वकाही संपणारच आहे तर तुम्ही आत्महत्याचा विचार करावा. निसर्गाला त्याचा मार्ग चोखाळू दया, निसर्गासोबत छेडछाड करू नका. दुसऱ्यांसाठी अडथळे निर्माण करून त्यांना दुःखीकष्टी बनवू नका.
अध्यात्मिक क्रियाकलप तुमच्यामधील ऊर्जा वाढवतात ज्यामुळे तुम्ही कार्य करू शकता. ते तुम्हाला तुमच्या हृदयाशी, भावनांशी जोडतात त्यामुळे तुम्ही बुद्धी मध्ये अडकत नाही.
गुरुदेव श्री श्री रवी शंकर
आत्महत्या करणे निरुपयोगी आहे कारण त्यामुळे तुम्हाला त्या चक्रातून पुन्हा एकदा जावे लागते. तुम्हांला इथे परत येऊन त्याच सर्व गोष्टी पुन्हा अनुभवाव्या लागतात. सर्वकाही संपणार आहे गोष्टीची जाणीव ठेवून सर्वकाही इथेच संपवा.
चिंतेचे कार्यतंत्र
तुम्हांला जेव्हा काही हवे असते तेव्हा तुमच्यामध्ये इच्छा उत्पन्न होतात, इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हांला तुमची ऊर्जा, हृदय आणि आत्मा त्यामध्ये व्यतित करावा लागतो. जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काम न करता त्याबद्दल फक्त विचार करत बसता तेव्हा चिंता निर्माण होते. तुमची इच्छाशक्ती आणि क्रिया शक्ती त्यामध्ये संतुलन असायला हवे.
चिंता करून काहीही बदल घडत नाही. चिंता करणे निरुपयोगी आहे, पण ज्या गोष्टी तुम्हांला त्रास देतात त्यावर काम करणे किंवा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काम करणे तुमच्यात बदल घडवून आणतात.
अध्यात्म तुम्हांला काम करण्याची उर्जा, सामर्थ्य देते. अध्यात्मिक क्रियाकलपांमुळे तुमच्यांमध्ये कार्य करण्याची शक्ती निर्माण होते.अध्यात्मामुळे तुम्ही बुध्दीमध्ये अडकून न पडता तुमच्या भावनांशी, हृदयाशी जोडले जाता.
आपला मेंदू विचार करतो आणि हृदयाला भावना समजतात. ते एकाचवेळी कार्य करत नाही, ज्यावेळी तुमच्या भावना वरचढ ठरतात त्यावेळी चिंता विरघळून जातात, जर तुम्ही खूप चिंता करत असाल, तर तुम्ही तुमच्या मेंदूत अडकून पडला आहात.तेव्हा तुमच्या भावना मृत होतात. चिंता करण्यामुळे तुमचे मन आणि हृदय नीरस आणि निष्क्रीय बनते. चिंता ह्या मेंदूमध्ये एखादया खडकाप्रमाणे असतात.चिंता तुम्हाला गुरफटून टाकतात.चिंता तुम्हांला पिंजऱ्यात टाकतात. ज्यावेळी तुमच्या भावना प्रबळ असतात तेव्हा चिंता नसते.
भावना ह्या फुलांसारख्या असतात. त्या येतात, बहरतात आणि मरून जातात. भावना उचंबळून येतात, शांत होतात आणि निघून जातात. जेव्हा भावना व्यक्त केल्या जातात तेव्हा तुम्हांला दिलासादायक वाटते. जेव्हा तुम्हांला राग येतो आणि तुम्ही राग व्यक्त करता, पुढच्या क्षणी तुम्हाला व्यवस्थित वाटायला लागते. किंवा तुम्ही दुःखी असता आणि तुम्ही रडून मोकळे होवून जाता. भावना खूप कमी वेळासाठी राहतात आणि निघून जातात, परंतु चिंता जास्त काळासाठी राहतात आणि तुम्हांला आतून खात राहतात. भावना तुम्हांला उत्स्फूर्त बनवतात. लहान मुलांमध्ये भावना असतात म्हणून ते उत्स्फूर्त असतात.
मोठी माणसे आपल्या भावनांना थांबवतात आणि चिंतेत पडायला लागतात. कोणत्याही गोष्टींची काळजी कृतीत अडथळा आणते. पण भावनेमुळे कृतीप्रवणता येते.