या व्हॅलेंटाईन दिवशी आपल्या प्रेमाबाबतच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देतील गुरुदेव श्री श्री रवि शंकर!
प्रश्न: मी प्रेमात पडलोय, हे मला कसे कळेल, त्याची काय लक्षणे आहेत?
जेंव्हा तुम्ही कोणावर तरी प्रेम करता तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये काहीही चुकीचे वाटत नाही. जरी त्यांच्यात काही दोष आढळला तर तुम्ही त्याचे समर्थन करत म्हणता, “ठीक आहे नां, असे सर्वजणच करतात. असेच असते.”
मग तुम्हास वाटते की तुम्ही त्यांच्यासाठी काहीही केलेले नाही. त्यांच्यासाठी जेवढे कराल तेवढे आणखी करावेसे वाटते. रात्रंदिवस तुम्ही त्यांच्यासंबंधीच विचार करत असता. त्यांना आनंदी पाहण्याची इच्छा असते., त्यांना सगळे काही उत्कृष्ट मिळावे, ही तुमची इच्छा असते, छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही दुखावले जाता. जेंव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा साध्यासुध्या गोष्टी सुद्धा विशेष बनतात.
प्रश्न: मला कोणाबद्दल तरी आकर्षण आहे, पण मला काय वाटते ते तिला सांगावे की नाही हे मला कळत नाही. मला प्रेमात पडायचंय.
तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्यात तर त्या नाहीशा होतील. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करताय त्यांना ते सांगायची गरज नाही. ते संवेदनशील असतील तर ते त्यांना जाणवेल. तुम्ही तुमच्या भावना त्यांना सांगितल्यास सारे काही बदलून जाईल.
प्रेम हे आपले अस्तित्व आहे. तुम्ही श्वास घेता आणि तेथे प्रेम आहे. तुम्ही प्रेमात आहात आणि त्याबद्धल तुम्ही निवांत आहात, तुम्ही प्रेमात आहात हे कोणालाही पटवून देत नाही आहात, स्वतःला खूप व्यक्त करत नाही आहात, हीच खरी जवळीक आहे. म्हणून फक्त स्मितहास्य करा आणि जवळीक निर्माण होऊ द्या.
तुम्हाला जवळीक वाटली आणि त्या व्यक्तीकडून तुम्हाला त्याबद्दल प्रतिसाद मिळावा असे वाटणे हे स्वाभाविक आहे. त्यांनाही तुमच्या बाबतीत जवळीक वाटली तर, हे तुम्हाला देखील आवडेल. त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्या. तुमची जवळीक व्यक्त करण्यासाठी घाई करू नका.
प्रश्न: माझ्या मनातल्या “ती” चे माझ्यावर १००% प्रेम आहे का ? मला कसे कळेल ?
मला माहीत नाही, तुम्हाला देखील माहीत नसणार. प्रयत्न करून बघा. जरी ती ९०% प्रेम करत असेल तरी तेही खूप झाले.
समजा, इतर कोणी तुम्हाला हाच प्रश्न विचारला तर आपले काय उत्तर असेल. तुम्हाला देखील एखाद्या व्यक्तीबद्दल १००% प्रेम आहे याची खात्री तुम्ही देऊ शकत नाही. आत्ता, या क्षणी, कदाचित असेलही, पण पुढच्या महिन्यात काय खात्री? मी सांगू, तुम्ही तुमच्या मनाची खात्री देऊ शकत नाही. तुम्हाला तुमचे स्वतःचे मन माहित नाही. दुसऱ्याचे मन जाणून घेण्याची अपेक्षा कशी करता?
जेव्हा तुमचे स्वतःच्या मनावर नियंत्रण नसते, तेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही.
ते अशक्य आहे! एक गोष्ट समजून घ्या- जे तुमचे आहे ते नेहमी तुमचेच आहे. जे तुमच्या पासून दूर जात असते ते कधीच तुमचे नव्हते. हे समजून घेतलेत तर तुम्ही शांत रहाल. जेंव्हा तुम्ही आतून शांत असाल तेव्हा समस्त जगच तुमचे असेल. जर तुम्हीच आतून शांत नसाल तर कितीही तुम्ही दुसऱ्याला जिंकण्याचा प्रयत्न कराल तर ते निसटून जातील. म्हणून हे अध्यात्मिक ज्ञान गरजेचे आहे, कारण निव्वळ ते तुम्हाला आतून मजबूत बनवत नाही तर विश्वाशी केंद्रित बनवते. तुम्ही इतके केंद्रित होता की सारे काही तुम्हाला आपसूक प्राप्त होईल.
भगवत् गीतेतील एका सुंदर श्लोकामध्ये म्हटले आहे, “जो उच्च चेतनेमध्ये स्थिर झाला आहे त्याच्याकडे सहजच परिपूर्णता येईल जशी नदी सागराला मिळते.” सर्व नद्या सागरास जाऊन मिळतात, हे स्वाभाविक आहे. तसेच जो मोठ्या मनाशी स्थिर झाला आहे त्याच्या सर्व इच्छा विनासायास पूर्ण होतात. म्हणूनच योग, ध्यान आणि अध्यात्मिक ज्ञान गरजेचे आहे.
जी व्यक्ती आपल्या इच्छांच्या मागे धावते, तिच्या हाताला काहीही लागत नाही. म्हणून सारे काही सोडून द्या आणि हृदयातील त्या शांत कोपऱ्याचा आश्रय घ्या, मग सारे काही तुमचेच असेल.
प्रश्न: खरे, शुद्ध नाते कसे निर्माण करावे?
नातेसंबंध जुळवायला जाऊ नका हे उत्तम, तुम्ही जसे आहात तसे रहा, नैसर्गिक, साधे आणि मग नातेसंबंध आपोआप बनू लागतील. नातेसंबंध जोडायचा प्रयत्न कराल तर तुम्ही थोडेसे कृत्रिम व्हाल. मग तुमचे वागणे पण कृत्रिम बनेल, नैसर्गिक राहणार नाही.
कल्पना करा, कोणीतरी तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल, तुमच्या ते लक्षात येते नां? कोणी तुमच्यावर प्रभाव पाडत असतील तर तुम्ही काय कराल? तेथून निघून जाल. जे तुम्हाला आवडते तेच इतरांना आवडते. तुमच्याशी प्रामाणिक, खुले, नैसर्गिक, नम्र असणे तुम्हाला आवडते, बरोबर? नेमके हेच इतर व्यक्तीला देखील तुमच्याकडून अपेक्षित असते. तुमच्या प्रेयसी किंवा प्रियकरावर प्रभाव टाकायचा खूप प्रयत्न करू नका. स्वत:त असणे, क्षमाशील असणे सर्वोत्तम आहे आणि वर्तमान क्षणात रहा.
प्रश्न: जीवनसाथी कसा ओळखावा ?
प्रथम तुम्ही तुमच्या आत्म्याला जाणून घ्या, मग तुमच्या जीवनसाथीला. तुम्हाला तुमच्याबद्दल काहीही माहिती नाही, तुम्ही कोण आहात हे माहिती नाही. तुम्ही तुमच्या मनाला जाणत नाही. तुमचे स्वतःचे मन तुम्हाला पागल बनवते. आत्ता ह्या क्षणाला काहीतरी हवे असते तर दुसऱ्या क्षणाला मनाला दुसरे काही हवे असते. म्हणूनच म्हणतात , “तुमचे स्वतःचे मन तुमच्या बंधनाला आणि मुक्तीसाठी जबाबदार असते, अन्य काहीही नाही.”
नातेसंबंध, एकतर सामर्थ्याचे किंवा कमजोरीचे स्वरूप घेतात आणि हे मनावर अवलंबून असते. मन खंबीर असेल तर नातेसंबंध एक देणगी बनतात नाहीतर मन कमकुवत असेल आणि आपल्या नियंत्रणात नसेल तर नातेसंबंध बंधन वाटू लागतात.
खूप आवडीनिवडी मनात ठेऊन एखाद्या परिपूर्ण जीवनसाथीची प्रतीक्षा करत नका बसू. जर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार परिपूर्ण जीवनसाथी मिळाला तर ती व्यक्ती देखील तिच्या इच्छेप्रमाणे परिपूर्ण जीवनसाथी शोधत असेल. तुम्ही ती परिपूर्ण व्यक्ती आहात का? चांगली व्यक्ती पहा आणि विवाह करा. जरी ती व्यक्ती तुमच्या संपूर्ण अपेक्षा पूर्ण करणारी नसेल तर, मी सांगतो, त्यांना बदलण्याची क्षमता तुमच्यात आहे! याची खात्री बाळगा आणि पुढे चला.
जेंव्हा तुम्ही केंद्रित असता आणि निवडरहित स्थितीत असता तेव्हा सर्वकाही आपल्या पद्धतीने होईल.
प्रश्न: माझे त्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम आहे की हे निव्वळ आकर्षण आहे, हे मला कसे कळेल?
वेळच सांगेल. हे नेहमी लक्षात घ्या कीं प्रेमात त्यागाची भावना असते तर आकर्षणामुळे दुःखच प्राप्त होते. प्रेमाच्या नावाखाली जर मोह वा आकर्षणात अडकलात तर तुम्हाला निव्वळ दुःखच प्राप्त होईल. परंतु खऱ्या प्रेमात जर त्याग करायची वेळ आली तर त्यात देखील समाधान प्राप्त होईल. प्रेम त्याग आणि समाधान देते, तर आकर्षण आणि आसक्ती निव्वळ दुःखच देऊ शकते.
प्रश्न: एखादी व्यक्ती आपल्यावर खरोखर प्रेम करते की नाही हे आपण कसे ओळखावे?
कोणाकडूनही तुम्हाला प्रेम मिळत असेल तर जाणून घ्या की हे प्रेम ईश्वराकडून प्राप्त होत आहे. एकमेव सर्वोच्च उर्जेकडून तुम्हाला प्रेम प्राप्त होत आहे. तुमचा स्नेहभाव देखील निव्वळ त्या उर्जेप्रतीच आहे आणि ते प्रेम या व्यक्तीकडून किंवा त्या व्यक्तीच्या मार्फत मिळत आहे. हे जाणून घ्या आणि निवांत व्हा.
ती व्यक्ती खरी आहे की खोटी, योग्य की अयोग्य, मनाच्या या जाळ्यात अडकू नका.
सूर्यप्रकाश जर खिडकीतून येत असेल तर हे माहीत असू द्या की तो सूर्यापासून प्राप्त होत आहे. तो त्या खिडकीचा उजेड नव्हे. हे जाणून घ्या आणि निवांत असा.
प्रश्न: मी उत्कृष्ठ जीवनसाथी कसा/कशी बनू शकेन ?
हा प्रयत्न करू शकता. ज्याला तुम्ही जीवनसाथी म्हणून निवडले आहे, त्यांच्या जीवनात सहभागी व्हा आणि तृम्ही काहीही अपेक्षा करू नका. ज्या क्षणी तुमच्या मागण्या सुरु होतील, तुम्ही दुःखी झालात म्हणून समजा.
त्यांना तुमच्या प्रेमाने आणि सेवा करून त्यांना जिंका.
प्रश्न: वचनबद्धतेची भीती वाटते, त्यातून कसे बाहेर पडू?
कोणी जर तुम्हाला सांगितले की, “उद्या मी तुम्हाला सिनेमाला घेऊन जातो” आणि तुम्ही थिएटरच्या बाहेर त्यांची वाट पाहत आहात आणि ती व्यक्ती आलीच नाही. कसे वाटेल तुम्हाला? स्वतःला फक्त त्या व्यक्तीच्या भूमिकेत ठेवून बघा आणि मग वचनबद्धता किती महत्वाची आहे हे तुम्हाला समजेल.
आपण सोयीच्या पुढे जातो तेंव्हा वचनबद्धता समजते. जी सोयीनुसार असते ती वचनबद्धता नव्हे. खरेतर जे सोयीचे असते त्यातून समाधान मिळत नाही तर ते समाधानाचा भ्रम देते. तसेच तुम्ही वचनबद्धतेला फारच चिकटून आहात आणि ती सोयीची नाही तर त्यामुळे तुमची वचनबध्दता पूर्ण तर होणार नाही तसेच ती तुम्हाला निराश करेल. हुशारी यातच आहे की सोय आणि वचनबध्दता यामध्ये सुवर्णमध्य साधणे.
एक पेक्षा अधिक प्रेमसंबंध ठेवणे चुकीचे आहे का? प्रेमसंबंधात शारीरिक संबंध ठेवणे गरजेचे आहे का?
ऐका, तुमचा जोडीदार, प्रियकर वा प्रेयसीचे दोन प्रेमसंबंध असतील तर तुम्हाला आवडेल काय? पहिले याचे उत्तर द्या! जे तुम्ही करत आहात तेच इतरांनी तुमच्याबाबतीत केले तर? तुम्ही स्वीकराल का ? तुमचे मन म्हणेल, “नाही”. प्रेमसंबंधांमध्ये एकाशी प्रामाणिक असणे केंव्हाही चांगले. एकाच वेळी दोन व्यक्तींना दुखावणे चांगले नव्हे.
प्रश्न: तुम्ही एखाद्याला माझ्या प्रेमात पडून राहायला लावू शकता का?
असा प्रश्न कोणीतरी देवाला विचारला. प्रथम तो म्हणाला, “देवा, तू युरोप ते उत्तर अमेरिकेपर्यंत रस्ता बनवू शकतोस का?
देव म्हणाला, “हे फार कठीण आहे.”
मग तो म्हणाला, “ठीक आहे, जर ते अवघड असेल, तर तुम्ही एखाद्याला माझ्या प्रेमात पडून राहायला लावू शकता का?”
यावर देव उत्तरला, “ठीक आहे, मी तुझी पहिली मागणी पूर्ण करतो. पहिलंच शक्य दिसतंय, केव्हा हवाय तो पूल बांधून ?”