‘सुखी संसार’ असावा असे प्रत्येकालाच वाटत असते. पण ते खरोखर आनंदी आणि सुखी राहतात का?
तुमचे लग्न होऊन बरीच वर्षे झाली असतील किंवा नुकतेच लग्न झाले असेल; सुखी वैवाहिक जीवनासाठी या १० व्यावहारिक युक्त्या आहेत ज्या तुम्हाला आनंदाने जगण्यास मदत करतील!
१. लक्षात ठेवा लग्न म्हणजे एकमेकांना साथ देण्याची बांधिलकी आहे
विवाह ही अशी संस्था आहे ज्यामध्ये प्रत्येकाला संयम ठेवावा लागतो, त्याग करावा लागतो, एकमेकांची काळजी घ्यावी लागते आणि जिथे सुख-दुःखे वाटून घ्यावी लागतात. आपल्या पूर्वजानी सप्तपदी, म्हणजे लग्नाच्या प्रसंगी घ्याव्या लागणाऱ्या सात प्रतिज्ञा सांगितल्या आहेत. वचनबद्धता, सहकार्य, करुणा, काळजी आणि अल्प अहंकार ही आनंदी वैवाहिक जीवनाची वैशिष्ट्ये आहेत. जर तुम्ही एकमेकांची मानगूट धरलीत तर ते बंधनासारखे वाटेल. जर तुम्ही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून एकत्र चालत असाल तर ते एक आधार म्हणून काम करेल. म्हणून, एकमेकांना आधार द्या, सोबती बना आणि पुढे जा.
तुमचे नाते तुमचे सामर्थ्य आहे की कमजोरी?
नातेसंबंध आपल्या मनःस्थितीनुसार शक्ती देऊ शकतात किंवा कमकुवतपणा आणू शकतात. मन मजबूत असेल तर नाती ही आपल्यासाठी देणगी ठरतात. पण जर मन कमकुवत असेल आणि नियंत्रणात नसेल तर नातेसंबंध बंधनासारखे वाटू शकतात.
२. मागण्या करण्याऐवजी एकमेकांसाठी उपलब्ध व्हा
वैवाहिक जीवनात तुम्ही तुमच्या साथीदाराला तुमच्याच अस्तित्वाचा हिस्सा मानले पाहिजे – जसे की तुमचा हात किंवा पाय. तुम्ही दोघे दोन शरीर, एक मन, एक आत्मा आहात. म्हणून तुमच्या जोडीदाराची जी काही इच्छा असेल, तिला तुम्ही स्वतःची इच्छा बनवा. तुमच्या जोडीदाराची चव तुमची स्वतःची चव समजा. जेव्हा तुमची अभिरुची वेगळी होऊ लागते तेव्हा संघर्ष उद्भवतो. तुझी आवड हीच माझी आवड; तुझा आनंद हाच माझा आनंद असे म्हणायला सुरुवात करा. तू माझ्यासाठी काय करू शकतोस/शकतेस? असे म्हणण्याऐवजी मी तुझ्यासाठी इथे आहे, असे म्हणा.
हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की:
- नातेसंबंधात जेव्हा आपण ‘तू माझ्यासाठी काय करू शकतोस?’ असा दृष्टीकोन ठेवतो तेव्हा दोन्ही भागीदार नाखूष होतात.
- “काहीही असो, आनंदाचा काळ किंवा दुःखाचा काळ मी तुझ्यासोबत कायम आहे! आयुष्यात कधी निराशा येते, कधी यश मिळते. दोन्ही प्रसंगात, ‘मी तुझ्याबरोबर आहे.” असा निर्धार प्रत्येक जोडप्याने केल्याने वैवाहिक जीवन आनंदी राहते.
३. स्वामित्वाची भावना ठेवू नका
लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर जर तुम्ही मालकीहक्काची भावना दाखवत असाल तर दुसरा साथीदार निघून जातो.कुणावर तरी ताबा किंवा मालकीहक्क मिळवणे हे काही फार बुद्धिमत्तेचे लक्षण नव्हे! जेव्हा तुम्ही स्वामित्वाची भावना ठेवता तेव्हा नकारात्मक विचारांची संपूर्ण साखळी सुरू होते.
४. तुम्हाला आनंदी करण्याची जबाबदारी समोरच्या व्यक्तीवर टाकू नका
अनेकदा तुम्हाला कुणी खुश करावे, शांत करावे आणि आनंदी करावे असे वाटते. अशा वेळी तुम्ही चेहरा कठोर, नाराज ठेवता आणि तुम्हाला संतुष्ट करणे कठीण व्हावे असे तुम्ही वागता. प्रेमी युगुले अनेकदा असे वागतात. ते एकमेकांना लाडीगोडी लावण्यात भरपूर ऊर्जा खर्च करतात आणि यामुळे त्या क्षणाचा आनंद आणि उत्साह कमी होतो. जे लोक ओढलेला चेहरा ठेवतात आणि इतरांनी त्यांना खूश करावे अशी अपेक्षा करतात, त्यांच्यापासून दुसरे दूर जातात.
सोपा सल्ला: तुम्ही नाराज असल्याचे कधीतरी दाखवणे ठीक आहे, पण ते पुन्हा पुन्हा करणे तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी जाचक आहे.
तुम्हाला निराश वाटत असल्यास स्वतःला शांत करा आणि स्वतःच संतुष्ट व्हा.
दुसऱ्याने तुम्हाला संतुष्ट करणे आवश्यक वाटावे हे असभ्यतेचे लक्षण आहे.
जर तुम्हाला लक्ष वेधून घ्यायचे असेल तर तुम्ही तणावग्रस्त व्हाल.
५. बोलण्याआधी विचार करा
एक म्हण आहे, ‘शब्दांतूनच संघर्ष सुरू होतो. शब्दांतूनच लोकांना मजा येते. शब्दांनीच माणसाला संपत्ती मिळते. त्यामुळे शब्द जपून वापरावेत.’ सहसा लोकांचा काही गैरसमज झाला की ते म्हणतात, ‘आपण यावर बोलू या.’ याचा काहीच उपयोग होत नाही. तो विषय सोडून द्या. बसून चर्चा करू नका किंवा भूतकाळाबद्दल कोणतेही स्पष्टीकरण विचारू नका. जेव्हा एखादी चूक होते, ती झाली. तिथेच विषय संपवा. पुढे चला.
अशा स्थितीची नुसती कल्पना करा जिथे तुम्ही चूक करता आणि कोणीतरी त्याबद्दल पुन्हा पुन्हा स्पष्टीकरण विचारत राहते. स्वतःची बाजू समजावून सांगणे किंवा स्वतःचे समर्थन करणे हे एक ओझे आहे. समोरच्याला कधीही अपराधी वाटू देऊ नका. त्यामुळे मैत्रीचे बंध सैल होतात. माणसाला अपराधी वाटू न देता त्याच्या चुकीची जाणीव करून देणे हे एक कौशल्य आहे.
तुमचा जोडीदार नाराज असताना काय करावे?
जर दोघांपैकी एक नाराज असेल, तर दुसऱ्या जोडीदाराने गप्प बसावे आणि रुसण्यापूर्वी नाराज होण्यापूर्वी त्याचा/तिचा मूड चांगला होण्याची वाट पहावी. एकाच वेळी दोघेही नाराज झाले तर समस्या आहे! आणि मुलांसमोर तुमचे वर्तन सुसंस्कृत असायला हवे. ‘अरे, माझा जोडीदार रुसला आहे! ठीक आहे.’ त्याला किंवा तिला अस्वस्थ राहू द्या काही काळ. ‘तुम्ही इतके अस्वस्थ का आहात?’ असा प्रश्न विचारू नका. जर कोणीतरी नाराज असेल, तर दुसऱ्याला राग येतो आणि तो नाराज होऊ नये अशी अपेक्षा करतो. ही एक मोठी चूक आहे! कोणी नाराज आहे, त्यांना नाराज होण्याचे सुद्धा स्वातंत्र्य असू द्या.
६. तुमच्या अस्सल स्वभावानुसार वागा
स्वाभाविक रहा आणि साधे असा. नातेसंबंध नैसर्गिकरित्या विकसित होतात. जर तुम्ही नातं निर्माण करण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही थोडे कृत्रिम वागता. मग तुमचे वर्तन नैसर्गिक राहात नाही. कोणीतरी तुम्हाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते तुमच्या लक्षात येते, नाही का? जर कोणी तुम्हाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही काय करता? तुम्ही त्याच्यापासून दूर जाता.
तुम्हाला काय आवडते, इतरांनाही तेच आवडते का, ते पहा. तुमच्याशी इतरांनी खूप प्रामाणिक, मोकळे, नैसर्गिक, नम्र असावे असे तुम्हाला आवडते, बरोबर? इतरांनाही तुमच्याकडून तेच हवे असते. प्रभावित करण्याचा खूप प्रयत्न करू नका. मग सगळं बिघडतं. सर्वात चांगले म्हणजे स्वाभाविक असणे, नैसर्गिक असणे, क्षमाशील असणे आणि वर्तमान क्षणात रहाणे. त्यामुळे मोठा फरक पडतो.
सोपा सल्ला: कालापरत्वे तुमचे नाते अधिक घट्ट करा! नातेसंबंधात जसजसा काळ जातो तसतसे बदलणाऱ्या अपेक्षा आणि दृष्टीकोन यांचे आपण जोडीने साक्षीदार होतो. योग आणि ध्यानाच्या जास्त सरावाने संबंध अधिक चांगले होऊ शकतात. नातेसंबंधात सुसंवाद कसा साधायचा, अधिक संयमी आणि क्षमाशील कसे राहायचे हे आपण शिकू शकतो. संसारात मौज,आनंद तर कधी क्षणिक दुरावा असे चक्र चालूच असते.संसारातील बांधिलकी ही एकच गोष्ट तुम्हाला एकत्र ठेवत असते.यासाठी अध्यात्म तुम्हाला बळ देत असते.
७. एक जोडपे या नात्याने समाज कल्याणाचे उच्च ध्येय ठेवा
जेव्हा पती-पत्नी सर्वकाळ एकमेकांवर लक्ष केंद्रित करतात तेव्हा त्यांच्यात भांडणे सुरु होण्यास वेळ लागत नाही. लग्नाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सर्व काही जादुई आणि अद्भुत असते. या टप्प्यानंतर दोष खूप लवकर समोर येऊ लागतात. एकमेकांकडे जाणाऱ्या रेषा केवळ छेदनबिंदूनंतर लगेच दूर जाऊ लागतात.
उलट, जेव्हा पती-पत्नी एकमेकांवर लक्ष केंद्रित करत नाहीत आणि त्यांची जीवनातील ध्येये भिन्न असतात, तेव्हा ते एकमेकांकडे बघायचेसुद्धा टाळतात आणि संवाद आणि विश्वास तुटतो. याशिवाय, जेव्हा उद्दिष्ट केवळ वैयक्तिक इच्छांची पूर्तता करणे असते, तेव्हा फारसे समाधान किंवा चांगलं असं काही होत नाही.
जेव्हा दोघेही एकत्र वाटचाल करताना समाजासाठी, जगासाठी उच्च ध्येयावर लक्ष केंद्रित करतात तेव्हाच नात्यात मूल्ये टिकून राहतात आणि सौंदर्य, प्रेम आणि विश्वास यात वाढ होते. समांतर रेषा अनंतापर्यंत एकत्र जातात.
तुमच्या नात्यात हे आहे का? वैयक्तिक उद्दिष्टे आणि समाजासाठी ध्येय दोन्ही असणे आवश्यक आहे. तरच आपल्याला पूर्ततेची आणि उच्च उद्दिष्टाची जाणीव होईल. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा “माझे काय?” या भूमिकेतून हटून विचारसरणीत बदल घडून “मी इतरांसाठी काय करू शकतो?” ही भूमिका नैसर्गिकरित्या येते. काहीही झाले तरी एकत्र वाटचाल करण्याचे कौशल्य, धैर्य आणि वचनबद्धता ध्यानामुळे येते आणि बळकट होते. पाया जितका खोल असेल तितकी इमारत उंच असू शकेल. ध्यान आपल्या नात्यात ही खोली आणते जेणेकरून आपले जीवन आणि आकांक्षा आकाशापर्यंत पोहोचू शकतील!
८. स्त्रियांसाठी नातेसंबंधाचे रहस्य
पुरुषासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला घरात प्रेम, आदर आणि प्रशंसा हवी असते. याचा अर्थ त्याच्यातील सर्व चांगुलपणाच्या गोष्टी लक्षात ठेवणे व त्या काहीशा अतिशयोक्ति करुन सांगणे. सकारात्मक शक्ती मिळाल्याने त्याला सुरक्षित वाटेल आणि पाठिंबा मिळतोय असे वाटेल. शिवाय स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
सोपा सल्ला: “संपूर्ण जग म्हणू शकते की तुमच्या पतीकडे मेंदू नाही, परंतु तुम्ही, त्याच्या पत्नीने, असे कधीही म्हणू नये. तुम्ही नेहमी म्हणावे, ‘तुम्ही पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान व्यक्ती आहात. तुम्ही तुमचा मेंदू वापरत नाही याचा अर्थ तुमच्याकडे तो नाही असा होत नाही!’ तुम्ही नेहमी त्याच्या अहंकाराला प्रोत्साहन दिले पाहिजे. नेहमी त्याची स्तुती करा आणि काही वेळा प्रशंसा करा. जरी त्यानी काही चूक केली असेल, तरीही त्याला सांगा की त्याच्यात चांगले करण्याची क्षमता आहे. केवळ थोड्या प्रशंसेने त्यांना बरे वाटेल.” गुरुदेव श्री श्री रविशंकर
९. पुरुषांसाठी नातेसंबंधाचे रहस्य
स्त्रीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिचे म्हणणे ऐकून घेणे, समजून घेणे आणि तिच्याविषयी आदर असणे. याचा अर्थ तिचे म्हणणे सहानुभूतीने,सय्यम पूर्वक ऐकणे व तिला आधार देणे होय. स्त्रियांच्या भावना खूप शक्तिशाली असतात आणि तुम्ही त्यांच्यात सहज अडकून पडू शकता.
सोपा सल्ला: एक पुरुष म्हणून स्त्रीच्या भावना कुशलतेने हाताळणे महत्वाचे आहे. कधीकधी तुम्हाला त्या भावना चांगल्या जोपासाव्या
लागतील. ध्यानसाधनेमुळे तुमच्या पत्नीच्या भावनांना सामोरे जाताना एकाच वेळी संवेदनशील आणि समजूतदार होण्याचे कौशल्य तुमच्यामध्ये येते. तुम्हाला वातावरणात आनंद आणण्याची क्षमता प्राप्त होते, जे निरोगी नात्यासाठी महत्वाचे आहे.
१०. पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही नातेसंबंधाविषयीचे गुपित
ज्याप्रमाणे दिवसा सूर्याच्या प्रकाशाला कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नाही, त्याप्रमाणेच काही गोष्टी अगदी स्पष्ट असतात आणि त्यांना कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नसते. प्रेम ही अशा गोष्टींपैकी एक आहे ज्याला कोणत्याही पुराव्याची गरज नाही. पण आपण नेहमी आपल्या जोडीदाराकडून प्रेमाचा पुरावा शोधत असतो आणि त्यामुळेच नाते बिघडते.
ही एक गोष्ट तुमचे नाते वाचवू शकेल: “तुमच्या जोडीदाराच्या तुमच्यावर असलेल्या प्रेमाचा पुरावा कधीही मागू नका! एकमेकांना विचारू नका की, ‘तुम्ही माझ्यावर खरंच प्रेम करता का?’ जरी तुम्हाला काही उणीव दिसली, तरी फक्त म्हणा, ‘तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम का करता?’ ते तुमच्यावर प्रेम करतात हे गृहीत धरा. प्रेमाचा वसंत ऋतू संपला असला तरी असे केल्याने तो पुन्हा सुरू होईल.”
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर