“युज” या संस्कृत शब्दा पासून उत्पन्न झालेला शब्द – योग. ज्याचा अर्थ “एकत्र/अखंड” असा होतो, “योग” ही ५००० वर्षापेक्षा जास्त जुनी भारतीय ज्ञानशाखा आहे. मनाची समतोल अवस्था टिकवून ठेवणे, कोणतीही कृती सजगतेने करणे शक्य होणे हीच योगाची मध्यवर्ती शिकवण आहे.
योगाच्या सहाय्याने ‘करण्याचा प्रयत्न सोडण्याची कला’ शिकल्यास आपल्या स्व च्या अस्तित्वाचे अनंताशी संधान होत असल्याची अनुभूती येते. योगामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात संपूर्ण समतोल प्राप्त होणे शक्य आहे. योगामध्ये आजच्या वर्तणुकीच्या शास्त्रामधील समस्यांसाठी आवश्यक उपाय नक्कीच आहेत. मानवी क्षमतांना संपूर्णपणे बहरण्याचा मार्ग आणि अनंताशी संधान साधण्याच्या सर्वोच्च ध्येयपूर्तीचा मार्ग योगामध्येच आहे.
~ गुरुदेव श्री श्री रवि शंकर
योगाबद्दल आपणास या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे :-
महर्षी पतंजली जे योगाचे प्रणेते आहेत, त्यांनी प्रतिपादन केले आहे की,”दुःख येण्यापुर्वीच रोखणे हाच योगाचा उद्देश आहे.” लोभ असो की क्रोध, मत्सर असो की द्वेष असो की नैराश्य, या सर्व नकारात्मक भावना रोखणे वा निर्माण न होणे हे योगामुळेच साध्य होते.
“योगः कर्मसु कौशलम् ”, अर्थात योगामुळे कृतीमध्ये आणि व्यक्त होण्यामध्ये कौशल्य प्राप्त होते. मनाचे व्यवस्थापन करत, भावनांना हाताळत, सर्व मानवांप्रती प्रेममय व्यक्ती बनून, ते प्रेम कदापि द्वेषात रुपांतर न होता आपले जीवन कुशलतेने जगण्याची कला म्हणजे योग. या जगात प्रेम तर सर्वजण करतात पण तेच प्रेम दीर्घ कालावधीसाठी टिकून रहात नाही. पुढे ते द्वेषात बदलते, काहीवेळा अगदी अल्पावधीतच ते द्वेषात बदलते. योगामुळे प्रेम हे प्रेमच राहण्याची कला, दृष्टीकोन प्राप्त होतो.
योगाचा संक्षिप्त इतिहास
पदानुक्रमाने वेदिक ज्ञानाचे चार वेद आहेत – ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद, त्यानंतर चार उप वेद – आयुर्वेद, अर्थवेद, धनुर्वेद आणि गंधर्ववेद. त्या खालोखाल सहा उपांगे – शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष. पुढे जाऊन त्यांचे आणखी सहा उपांगामध्ये वर्गीकरण होते – न्याय, वैशेषिक, सांख्य, मीमांसा, वेदांत आणि योग.
अगदी हिंदू सरस्वती संस्कृतीमधील (इ.स. पूर्व २७०० वर्षे) बऱ्याच शिक्के आणि मोहोरांवर योगासने करत असलेल्या आकृती आढळतात. याचाच अर्थ इतक्या प्राचीन संस्कृतीमध्ये देखील योगाचे ज्ञान होते, योग करत होते. योगाच्या उगमाबद्दल येथे आणखी जाणून घेऊया.
योगशास्त्राचा अंगीकार केल्याने जीवन जगण्याचे संपूर्ण सार म्हणजेच ज्ञानप्राप्तीचा ज्ञानयोग किंवा तत्वज्ञान; भक्ती आणि आनंद प्राप्तीचा भक्तियोग, आनंददायी कर्तव्याचा कर्मयोग आणि मनोनिग्रहाचा राजयोग हे प्राप्त होतात.
ज्ञान योग
ज्ञानयोग हा स्वच्या अस्तित्वाचे प्रायोगिक ज्ञान आहे, ज्यामुळे पुन्हा मनःशुद्धी प्राप्त होते.
भक्तियोग
चैतन्याची, मूर्त स्वरुपातील देवाची भक्ती करण्याची अध्यात्मिक कृती म्हणजे भक्तियोग.
कर्मयोग
फळाची अपेक्षा न करता शंभर टक्के कर्तव्य करणे हाच कर्मयोगाचा मार्ग आहे. फळाची अपेक्षा न ठेवता कृती मधून स्व शी संधान पावणे, हेच तर योगाचे उद्दिष्ट आहे.
राजयोग
राजयोगाची आठ अंगे आहेत. विविध मार्गांनी योगासनांचा सराव करुन समतोल आणि एकसंघत्व प्राप्त करणे हाच राजयोगाचा निव्वळ उद्देश आहे.
योगाचे बहुगुणी उपयोग
योगामुळे आपल्या वागण्यात बदल होतो; सर्वांसोबत आपण मित्रत्वाने आणि प्रसन्नतेने वागतो.
विश्राम, आनंद आणि सृजनशीलता.
तणाव असला तरी चेहऱ्यावरील हास्य टिकून असते
मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते.
आपणास अंतर्ज्ञान, सजगता, स्पष्टता आणि शांती सारखे योगाचे अतिरिक्त लाभ प्राप्त होतात.
श्री श्री योग डीप डाईव्ह ही खास प्रक्रिया बनवली आहे ज्यामध्ये शरीरातील विषारी द्रव्यांचा निचरा करणारी प्रगत योगिक क्रिया आहे, जिचा आपल्या शरीर आणि मनावर सखोल परिणाम घडतो.
योगाचे विज्ञान हे ज्ञानयोग अर्थात तत्वज्ञान, भक्तियोग अर्थात आनंदमय भक्तिमार्ग, कर्मयोग अर्थात आनंददायी कर्तव्याचा मार्ग आणि राजयोग म्हणजे मनोनिग्रहाचा मार्ग यांनी युक्त आहे. योगाची आठ अंगे असून त्यापैकी एक आहे शारीरिक कृती म्हणजे आसने. राजयोगाचे मुख्य सारच हे आहे की आसनांच्या सरावाने या सर्व विविध दृष्टीकोनांमध्ये समतोल आणि एकी साधणे.
महर्षी पतंजली यांनी पतंजली योग सूत्रा मध्ये योगाची आठ अंगे स्पष्ट केली आहेत. ती म्हणजे यम(सामाजिक नीतीतत्वे), नियम(वैयक्तिक नीतीतत्वे), आसन, प्राणायाम, प्रत्याहार(पंचेंद्रियांना अंतर्मुख करणे), धारणा(केंद्रित लक्ष), ध्यान आणि समाधी(स्व मध्ये विलीन होणे).
योग म्हणजे निव्वळ शारीरिक हालचाली किंवा आसने नव्हे तर एक संपूर्ण विज्ञान होय. यामुळे शरीर, मन, आत्मा आणि विश्व एकत्र येतात. यामुळे शांती लाभून व्यक्तीचे वागणे, विचारशैली आणि दृष्टिकोनामध्ये मोठा बदल घडून येतो. आसने हे योगाचे एक अंग असले तरी तो निव्वळ व्यायाम प्रकार आहे असा सीमित गैरसमज करून घेऊ नये. प्रत्येक लहान बालक हे योगी असते – त्याची आसने, श्वसन प्रकार, ज्ञानेंद्रियांची क्षमता, तीक्ष्णता आणि वर्तमान क्षणात राहण्याची क्षमता. म्हणून योग हा सर्वांगीण नातेसंबंध आणि मानवी जीवनाचा संबंध साधणारी सर्वांगीण प्रगती आहे.
कुशल, शांत, आनंदी, समाधानी आणि लहान बालकाप्रमाणे असणारी व्यक्ती म्हणजे योगी होय. बालकाप्रमाणे म्हणजे वाढ न झालेले किंवा बालिश नव्हे तर लहान बाळाप्रमाणे ताजे तवाने, ज्यामध्ये साधेपणा, प्रामाणिपणा , निर्भय मन, निराभिमानी आणि मुक्त आणि ज्याची चेतना पूर्ण विकसित झाली आहे. ही लक्षणे असणारा योगी होय.
आपण जसजसे वाढत जातो तसे आपण आपली नैसर्गिकता आणि अंतर्ज्ञान शक्ती गमावतो. प्राणी आणि लहान मुले यांच्यामध्ये मोठ्या व्यक्तीपेक्षा जास्त अंतर्ज्ञान शक्ती असते. याचे कारण आपण आपल्या मनामध्ये साऱ्या गोष्टी खूप गुंतागुंतीच्या बनवतो पण वास्तवात त्या तशा नसतात. आपल्या मनाचा स्वभाव आहे की आपण नकारात्मकतेत अडकून बसतो. जर आपल्याला दहा वेळा चांगलं म्हटलं असेल आणि एकदा अपमान केला असेल तर आपले मन झालेल्या अपमानामध्येच अडकून बसते. नकारात्माकतेमध्ये अडकून बसण्याचा हा स्वभाव बालकामध्ये असत नाही. आपण मोठे होत असता काही कारणवश असा स्वभाव बनत जातो. योगाच्या सहाय्याने आपण आपल्या मूळ स्वभावात परत येऊन जीवनातील सकारात्मक पैलू पाहू शकतो आणि काय करणे गरजेचे आहे हे पाहू शकतो. हे सर्वच कार्यक्षेत्रात आवश्यक आहे. जेव्हा आजूबाजूला सर्वत्र खिन्नतेचे वातावरण असेल तर तेथे उत्साह, ऊर्जा आणि अंतर्ज्ञान क्षमता निर्माण होण्यासाठी योगाचीच अत्यंत गरज असते.
योग एक तंत्रज्ञान आहे, असे तंत्र जे आपल्याला अधिक ऊर्जावान, आनंदी आणि अधिक दयाळू बनण्यास सक्षम करते. योग असे तंत्रज्ञान आहे जे ताणतणाव, क्रोध, लोभ आणि सर्व नकारात्मक भावना नाहीसे करते. हे जर कोणाला धार्मिक वाटत असेल तर ते त्यांचे अज्ञान आहे कारण योगशास्त्र तसा विचार करण्याचे स्वातंत्र्यही त्यांना देते . धर्म जर विचारांच्या स्वातंत्र्याचे आणि मुक्तीचे समर्थन करत नसेल तर तो धर्म त्याच्या अनुयायांवर आणि मानवजातीवर अन्याय करत आहे. सर्व श्रद्धांचा उद्देश् आणि ध्येय हे या पृथ्वीतलावर शांती, प्रेम, स्वातंत्र्य आणि आपलेपणा, बंधुभाव उत्पन्न करणे हा आहे आणि योग हे असे तंत्रज्ञान आहे जे सर्व श्रध्दांचे ध्येय साध्य करून देते.
हे असे आहे की, आत्मा आहे आणि त्यावर इतर सर्व गोष्टी परिधान केल्या आहेत. आत्म्याशिवाय शरीर असू शकत नाही आणि शरीराशिवाय आत्मा असू शकत नाही. महर्षी पतंजलींनी योगाच्या आठ अंगाचे विश्लेषण केले आहे. अंगांची म्हणजे अवयवांची वाढ एकदमच होत असते, एकामागून एक नाही! आईच्या गर्भात बाळ वाढत असताना प्रथम पाय, मग हात किंवा डोके असे वाढत नाही. सारे अवयव एकाच वेळी वाढत असतात. त्याप्रमाणे योगाच्या आठही अंगांचा एकत्रित विचार केला पाहिजे.
प्राचीन ऋषी म्हणतात, ”विस्मयो योग भूमिका”, म्हणजे विस्मय, नवल ही योगाची प्रस्तावना आहे. जेव्हा आपल्या आंतमध्ये स्वतःच्या आणि निसर्गाच्या निरीक्षणाने नवल,गूढ वाटते तेव्हा आपल्यामध्ये द्रष्टाभाव निर्माण होतो, आणि मग त्या अति नाजूक, अति सुंदर, साकार पण तेवढ्याच निराकाराचे आपल्या जीवनात आगमन होते. जर आपणामध्ये नवल निर्माण होत नसेल तर आपण योगी नाही आहात.
योगामुळे आपल्या जीवनात आपण आणखी जबाबदार होण्यास मदत होते. आपणास योगी असणे किंवा योगी नसणे, ही भूमिका धारण करण्याचा पर्याय असतो – आपण जबाबदार आहोत की नाही आहोत. आपण जबाबदार शिक्षक, जबाबदार डॉक्टर वा जबाबदार व्यावसायिक असू शकतो, जे काळजी घेणारे, आदान प्रदान करणारे. योगामुळे आपल्यामध्ये असलेला जबाबदारी हा गुण वृद्धिंगत होतो. योग आपणास आणखी जबाबदार बनवू शकतो कारण योगामुळे आपणामध्ये खूप ऊर्जा आणि उत्साह निर्माण होतो. आपण केव्हा जबाबदारी घेऊ इच्छित नाही? जेव्हा आपण थकलेले आणि तणावग्रस्त असतो, जेव्हा आपण या दोन गोष्टींची काळजी घेतो तेव्हा आपण नक्कीच जास्त जबाबदारी घेतो, ते देखील अगदी हसत खेळत !
जेव्हा आपण संघर्षाच्या मुळाशी जातो तेव्हा आपणास ताणतणाव, अविश्वास आणि इतरांप्रती भीती हीच कारणे आढळतात. योगाद्वारे या तिन्हीवर मात करू शकतो. इतरां बद्दलची भीती निघून जाते कारण आपली सजगता, आपली चेतना विस्तृत झालेली असते. प्रत्येकजण आपला अंश आहे आणि आपण सर्वांचे अंश आहोत. आपली ओळख हरवण्याची वा आपले अस्तित्व हरवण्याची भीती खूप खोलवर असते. अशी भीती मनातून जाण्यासाठी योग हा उत्तम उपाय आहे.
आपल्या उपस्थितीने आणि आपल्या तरंगांच्या द्वारे आपण बरेच व्यक्त होत असतो. योगाद्वारे आपल्या तरंगांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती “आपला दिवस चांगला जावो” म्हणते किंवा हेच शब्द कोणी दुकानदार वा विमानातून उतरताना हवाई सुंदरी उच्चारते, यामधील फरक जाणवतो ना ? जेव्हा दुकानदार वा हवाई सुंदरी हेच वाक्य उच्चारतात, त्यांच्या बोलण्यात तो भाव नसतो. पण आपल्या जवळची व्यक्ती ते उच्चारते तेव्हा त्यामध्ये चांगल्या लहरी असतात. जेव्हा संवाद बिघडतो तेव्हा आपण म्हणतो, ”आपले तरंग (लहरी) जमत नाहीत”. कारण आपल्या संवादाची क्षमता इतरांचे तरंग स्वीकारण्याच्या आपल्या क्षमतेवर अवलंबून असते. अशावेळी आपले मन साफ करण्यास योग सहाय्य करतो.