इ. स. पूर्व दुसऱ्या शतकाच्या काळात, महर्षी पतंजली नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांनी पूर्वी पासून अस्तित्वात असलेल्या योगविद्येच्या प्राचीन परंपरांची पद्धतशीरपणे मांडणी केली. त्यांना योगाचे जनक मानले जाते. या ऋषींची १९६ योगसूत्रे आज योगसाधनेचा आधार ठरली आहेत.

तंदुरुस्तीच्या आधुनिक संकल्पनांनी योगाबद्दल अशी धारणा बनवली आहे की हे आपल्याला केवळ वजन कमी करण्यासाठी व शरीर लवचिक बनवण्यासाठी योगाचा उपयोग आहे! त्यामुळे सर्वांगीण जीवनशैलीबद्दल आपली समज मर्यादित रहाते. याचा एक दुर्दैवी परिणाम म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचा सर्वांगीण विकास साधणारा योग म्हणजे नेमकं काय आहे हे आपण समजून घेत नाही. योग हा आपल्यासाठी ज्ञान आणि आत्मज्ञान मिळवून देणारा मार्ग आहे हे आपण लक्षात घेत नाही.

ऋषी पतंजलींचा अष्टांग योग विशेषतः प्रसिद्ध आहे तो असा: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात की योगाची ही आठ अंगे एकत्रित रित्या विकसित व्हायला हवीत आणि त्यायोगे आपण दैवी चैतन्य आणि शाश्वत आनंद यांचा अनुभव घ्यायला हवा.

ऋषी पतंजलींचे अष्टांग योगावरील विवेचन – योगाची आठ अंगे

योगांग अनुष्ठानाद शुद्धि क्षये ज्ञान दीप्तिर विवेक ख्याते:॥

(II २८ वे सूत्र)

“योगाच्या आठ अंगांच्या निरंतर अभ्यासाने,अशुद्धता नष्ट होते आणि विवेक प्राप्त होतो व ज्ञानाचा प्रकाश पसरतो.”

हे ज्ञान मिळविण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

यम नियमासन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयोsष्टावङ्गानि॥

(II २९ वे सूत्र)

“यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार (मनाला पर्यायी अन्न), धारणा (मनाची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता), ध्यान आणि समाधी (उच्च चेतनेची अवस्था) ही योगाची आठ अंगे आहेत.”

अष्टांग योग – योगाची आठ अंगे

या प्रत्येक अंगांचा संदर्भ काय आहे ते आपण तपशीलवार जाणून घेऊया.

१. यम – सामाजिक कर्तव्ये

यम म्हणजे आपण ज्या वातावरणात राहतो त्या अनुषंगाने आपल्याला पाळायला हव्यात अशा वृत्ती सांगणारी शिकवण. त्या आचारसंहिता आहेत ज्या आपल्याला संयम पाळायला शिकवतात.

अ. अहिंसा

“अहिंसा प्रतिष्ठायां तत्सन्निधौ वैरत्याग:॥” (II ३५ वे सूत्र)

“जेव्हा एखादी व्यक्ती अहिंसेमध्ये दृढमूल होते, तेव्हा त्या व्यक्तीच्या उपस्थितीत हिंसेचा त्याग होत असतो.”

जाणीवपूर्वक अहिंसेच्या मार्गावर चालण्याची निवड करणे, विनाशाकडे झुकणारे सर्व हेतू सोडून देणे. कारण हेच हेतू तुमची तत्वे आणि मुळे नष्ट करु शकतात.

जेव्हा तुम्ही अहिंसेमध्ये दृढमूल झालेले असता तेव्हा तुमची आभा तुमच्या सभोवतालच्या लोकांवर प्रभाव पाडते. जेव्हा तुम्ही अहिंसेचे पालन करता तेव्हा तुम्ही आतून शांतता साधता आणि जेव्हा तुम्ही आतून शांत असता तेव्हा अहिंसेकडे वळता.अशाप्रकारे हा दुहेरी मार्ग आहे.

ब. सत्य

“सत्य प्रतिष्ठायां क्रिया फला श्रययत्वम्॥” (II ३६ वे सूत्र)

“जेव्हा एखादी व्यक्ती सत्यात स्थापित होते तेव्हा कृतीचे फळ प्राप्त होऊ लागते.”

आपल्या आत खोलवर, एक न बदलणारा गुण आहे आणि हा यम त्या संदर्भात आहे.आपण सत्यवादी असले पाहिजे हे केवळ शाब्दिक नाही. हे आपल्या कृतींद्वारे, आपल्या हृदयातून आणि मनातून यायला हवे आणि तसा हेतू असणे खरोखर महत्त्वाचे आहे. हे आपल्या अगदी आत,गाभ्यात,असले पाहिजे,जे अपरिवर्तनीय आहे;तेच सत्य आहे.

क. अस्तेय – चोरी न करणे

“अस्तेय प्रतिष्ठायां सर्वरत्नोपस्थानम्॥” (II ३७ वे सूत्र)

जेव्हा अस्तेय प्रस्थापित होते, तेव्हा सर्व रत्ने (संपत्ती) त्या व्यक्तीकडे जातात.”

जे आपल्या हक्काचे नसते ते काहीही आपण कृती, हेतू किंवा विचाराने मिळवण्याचा प्रयत्न करु नये. चोरी ही केवळ धनसंपत्तीच्या संदर्भात नसते – तर भौतिक, बौद्धिक व ऐहिक गोष्टींच्या स्तरावर सुद्धा असते; यात विचार देखील आले.

जेव्हा आपण चोरी न करण्याच्या इराद्याने प्रस्थापित होतो आणि प्रामाणिक असतो तेव्हा संपत्ती सहजपणे प्राप्त होते.

ड. ब्रह्मचर्य

“ब्रह्मचर्य प्रतिष्ठायां वीर्यलाभ:॥” (II ३८ वे सूत्र)

“ब्रह्मचर्यात प्रस्थापित झाल्यावर सामर्थ्य प्राप्त होते.”

ब्रह्मचर्याचा अर्थ फक्त ब्रह्मचर्य असा नाही. याचा अर्थ अनंतात व्यापून जाणे. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपण शरीर, मन आणि सर्व इंद्रिये विसरतो आणि अनंत चैतन्यात वावरतो. हे आपल्याला आपल्या विशाल चेतनेशी जोडते. हे शक्ती आणि जोम देते. इंद्रियांच्या लहरी आणि कल्पनांमध्ये गुंतून न राहणे आणि आतील असीम चेतनेशी एकरुप होणे आपल्याला सामर्थ्यवान बनवू शकते. हाच ब्रह्मचर्याचा अर्थ आहे.

ई. अपरिग्रह – कसलाही लोभ नसणे

अपरिग्रह स्थैर्ये जन्मकथन्ता संबोध:॥” (II ३९ वे सूत्र)

कसलाही संचय न करण्याच्या अवस्थेत प्रस्थापित झाल्याने भूतकाळातील आणि भविष्यातील सर्व जन्मांचे ज्ञान मिळते.”

अपरिग्रह म्हणजे वस्तू जमा न करणे किंवा कोणाकडून काहीही न घेणे – आपल्या स्वतःच्या अस्तित्वात आनंदी आणि तृप्त असणे. आणि देण्यातच सर्वात मोठा आनंद आहे हे समजून घेणे. जेव्हा आपण एखाद्याला काही देतो तेव्हा सकारात्मक स्पंदने आपल्याकडे परत येतात.

२. नियम – वैयक्तिक नियम

शौच संतोषतपः स्वाध्यायेश्वर प्रणिधानानि नियमा: ॥”(II ३२वे सूत्र)

स्वच्छता, समाधान, तप, स्व-अध्ययन आणि देवत्वाची भक्ती हे पाच नियम आहेत.”

नियम या अशा पद्धती आहेत ज्या आपल्यात रुजतात आणि आपल्याला धर्माचे पालन करण्यास मदत करतात:

  • शौच (स्वच्छता): शारीरिक शुद्धता (स्नानाने बाह्य स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याद्वारे अंतर्गत स्वच्छता) आणि आपण राहत असलेल्या वातावरणाची शुद्धता तसेच मानसिक शुद्धता – चिंतांपासून मुक्त राहणे
  • संतोष (आनंद, समाधान): काहीही असो –बिनशर्त आनंदी राहणे – आणि आपला खरा स्वभाव ओळखणे
  • तप: (तपश्चर्या, अध्यात्मिक तपस्या): शिस्त आणि तपस्येद्वारे नकारात्मक विचारांना नष्ट करणे,जेणेकरुन आपण आपल्या आत्म्यात,स्व मध्ये जाऊ शकू, शांतपणे विश्रांती घेऊ शकू.
  • स्वाध्याय (स्व-अभ्यास): धर्मग्रंथ वाचणे, परंतु अनुभवातून आणि वाचनाद्वारे शिकणे,त्यातून स्वत:बद्दल अधिक समजून घेणे.
  • ईश्वर प्रणिधान (परमात्म्याची भक्ती किंवा शरणागती): विशाल विश्वाच्या संदर्भातून जीवनकडे पाहणे – प्रेम, सौंदर्य आणि सत्याने भरलेल्या असीम आणि विशाल चेतनेमध्ये विहार करणे आणि त्याला शरण जाणे.

आधुनिक जगात यम आणि नियम कसे अर्थपूर्ण आहेत याबद्दल अधिक वाचा.

३. आसन – शरीराची विशिष्ट स्थिती

स्थिरसुखमासनम् ॥ ’’ (II ४६ वे सूत्र)

शरीराची जी स्थिती स्थिर आणि आरामदायी असते ते आसन होय.

आसन ही शारीरिक स्थिती आहे जी शरीराला ध्यानासाठी स्थिर करण्यास मदत करते. आसनामुळे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी तसेच रोग आणि अस्वस्थतेपासून मुक्त राहील हे सुनिश्चित होते. शरीर निरोगी असणे महत्वाचे आहे कारण ते आपल्याला आपल्या स्वमध्ये गहिरे उतरण्यास आणि आंतरिक आत्म्याचा शोध घेण्यास तयार करते. शारीरिक स्तरावरील समतोल मानसिक, बौद्धिक आणि अखेर आध्यात्मिक स्तरावर समतोल राखण्यास सक्षम करतो.

४. प्राणायाम – नियंत्रित श्वास

प्राण म्हणजे जीवनशक्ती. आपल्या जीवनशक्तीला चालना देणारी श्वासोच्छवासाची तंत्रे म्हणजे प्राणायाम. ऋषी पतंजली म्हणतात की श्वासाला विशिष्ट प्रकारे खंडित करणे आणि विभाजन करणे आणि श्वासाची लय बदलणे हा प्राणायाम आहे. शरीराच्या विविध भागांकडे लक्ष देत जाणीवपूर्वक दीर्घ श्वास घेऊन आपण श्वासाची हालचाल खंडित करतो तेव्हा मनातील अशुद्धता दूर होते.

५. प्रत्याहार – इंद्रियांची जाणीवपूर्वक माघार

ही अशी अवस्था आहे जेव्हा इंद्रिये बाह्य वातावरणात गुंतत नाहीत, त्याऐवजी चेतनेकडे वळतात. या अवस्थेत इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. आपले पंचकोश म्हणजे पाच आवरणे किंवा स्तर आहेत, जे आंतरिक आत्मन किंवा चेतना व्यापून टाकतात :

  • अन्नमय कोश – अन्न आवरण
  • प्राणमय कोश – श्वास आवरण
  • मनोमय कोश – मनाचे आवरण
  • विज्ञानमय कोश – बुद्धीचे आवरण
  • आनंदमय कोश – परमानंदाचे आवरण

ध्यानाद्वारे, कोशांमध्ये प्रवेश करत त्या पलिकडे जाता येते. आणि शेवटी चेतनेशी, प्रत्याहाराच्या उद्दिष्टाशी आपण जोडले जातो.

धारणा आणि ध्यान हे सहसा समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात. एक दुसऱ्याकडे कसा नेतो ते जाणून घेऊ या.

६. धारणा – लक्ष देणे

धारणा म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे, कल्पनेकडे किंवा जागेकडे लक्ष देणे आणि तेथेच केंद्रित करणे असा अर्थ आहे. कधीकधी, हे करण्यासाठी लोक मंत्र किंवा श्वास वापरतात. जेव्हा तुम्ही तुमचे मन एका विशिष्ट गोष्टीवर स्थिर करता, तेव्हा काही वेळाने तुमचे मन भटकणे थांबते; तुम्ही संघर्षापासून मुक्त होता; ही एक अनोखी वेळ असते, जेव्हा तुमचे विचार आणि कृती एकरुप होतात. त्यायोगे, तुम्ही हळूहळू आणि स्थिरपणे स्वतःला स्थिर करता आणि त्या क्षणात विलीन होत शांत होता. तुम्ही वर्तमान क्षणात एकरुप होताना, सहजतेने ध्यानात प्रवेश करु शकता.

७. ध्यान

या अवस्थेत तुम्हाला तुमचे मन स्थिर झाल्याचे लक्षात येईल. ध्यानाचा परिणाम म्हणजे एकाग्रता. ध्यानाच्या अवस्थेत तुम्हाला गहिरी विश्रांती देखील लाभते ज्यायोगे तुम्ही समाधी अवस्थेकडे जाऊ शकता.

८. समाधी – स्वतः मध्ये विलीन होणे

ही चैतन्याची परमोच्च अवस्था आहे. हा एक भावातीत करणारा विचार आहे. तुम्ही फक्त आपल्या स्वबद्दल जागरुक असता आणि आपल्या खऱ्या स्वभावाशी – प्रेम, आनंद आणि सामर्थ्याशी जोडलेले असता. हेच अंतिम ध्येय आहे जे आपण जीवनात प्राप्त करु इच्छितो.

नव्याने सुरुवात करणाऱ्यांसाठी योग म्हणजे फक्त आसने म्हणून विचार करण्याची जर तुम्हाला सवय झाली असेल , तर आम्हाला आशा आहे की यामुळे तुमचा दृष्टीकोन केवळ शारीरिक आरोग्याऐवजी सर्वांगीण कल्याणाकडे वळण्यास मदत झाली आहे. योगाच्या या आठ अंगांनी, तुम्ही आपले शरीर, इंद्रिये आणि मन कसे नियंत्रित करायचे ते शिकाल. जोपर्यंत तुम्ही आपल्या चेतनेच्या संपर्कात येत नाही, तोपर्यंत आपल्या अंतर्मनाकडे जाण्याचा हा प्रवास आहे. तिथे तुम्ही असीम, विशाल, अनंत आहात.

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या पतंजली योग सूत्रांवरील भाष्य व त्यांच्या ज्ञानपत्रांवर आणि श्री श्री स्कूल ऑफ योगचे प्राध्यापक प्रमोद तिमसीना यांनी पुरवलेल्या माहितीवर आधारित.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity


    *
    *
    *
    *
    *