भ्रमरी प्राणायाम हे तुमच्या मनाला एका क्षणात शांत करण्यात अत्यंत प्रभावी आहे. मनाची चळवळ, निराशा, काळजी आणि क्रोधापासून सुटका मिळवण्याकरिता हा एक सर्वोत्तम श्वसनाचा व्यायाम आहे. हे करायला एकदम सोपे तंत्र. कार्यालय किंवा घर कुठेही सराव करता येण्याजोगे आणि स्वतःला तणावमुक्त करण्याचा एक झटपट पर्याय आहे.
या श्वसनाच्या तंत्राचे नाव भ्रमर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय काळ्या भुंग्यावरून पडले आहे. (भ्रमरी = एक प्रकारचा भारतीय भुंगा; प्राणायाम = श्वसनाचे तंत्र) या प्राणायामातील उच्छ्वासाचा आवाज हा भुंग्याच्या वैशिष्ट्यपूर्ण भुणभुणण्याप्रमाणे असतो, यावरून त्याचे असे नाव का पडले हे लक्षात येते.
भ्रामरी प्राणायामाचा (भुंग्याप्रमाणे श्वसन) सराव कसा करावा
- एका शांत, हवेशीर कोपऱ्यात डोळे बंद करून ताठ बसावे. चेहऱ्यावर मंद हास्य असावे.
- तुमची तर्जनी तुमच्या कानांवर ठेवा. तुमचा कान आणि गाल यांच्या मध्ये एक कुर्चा असतो. तुमच्या तर्जनीना या कुर्च्यावर ठेवा.
- एक दिर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना, कुर्चावर किंचित दबाव द्या. भुंग्याचा तार स्वरात आवाज काढीत असताना, तुम्ही कुर्चाला दबलेले ठेवू शकता किंवा तुमच्या बोटाने दाब देणे आणि बंद करणे अशी क्रिया करीत राहा.
- तुम्ही खालच्या स्वरातसुद्धा आवाज काढू शकता परंतू चांगल्या परिणामांकरिता एकदम वरच्या स्वरात आवाज काढणे हे चांगले राहील.
पुन्हा श्वास घ्या आणि हा संच ६-७ वेळा करावा.
तुमचे डोळे थोड्या वेळासाठी बंद ठेवा. तुमच्या शरीराच्या आत जाणवणाऱ्या अनुभूतीचे आणि शांततेचे निरीक्षण करा. भ्रमरी प्राणायामाचा सराव तुम्ही झोपून किंवा उजव्या कुशीवर झोपून करू शकता. झोपून प्राणायामाचा सराव करीत असताना, केवळ भुणभुणण्याचा आवाज करा आणि कानावर तर्जनी ठेवण्याची तितकी अवश्यकता नाही. भ्रमरी प्राणायामचा सराव तुम्ही दररोज दिवसातून ३-४ वेळा करू शकता.
भ्रामरी प्राणायाम वीडियो
भ्रामरी प्राणायामाचे फायदे
- मानसिक ताण, संताप आणि अस्वस्थता यापासून झटपट सुटका.
- उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांकरिता हे अतिशय परिणामकारक आहे कारण हे त्यांच्या क्षुब्ध मनाला शांत करते.
- जर तुम्हाला गरमी जाणवत असेल किंवा तुम्हाला किंचित डोकेदुखी होत असेल तर त्यापासून आराम मिळतो.
- अर्धशिशी सुसह्य करण्यात मदत करते.
- एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते.
- आत्मविश्वास निर्माण होतो.
- रक्तदाब कमी करण्यात मदत करते.
भ्रामरी प्राणायाम करताना लक्षात ठेवण्याच्या काही टिपा
- तुम्ही बोट कानात न घालता कुर्चावर ठेवत आहात याची नीट खात्री करा.
- कुर्चाला जोरात दाबू नये. बोटाने हळुवार दबाव द्यावा आणि सोडवा.
- भुणभुणण्याचा आवाज काढीत असताना तोंड बंद ठेवावे.
- हे प्राणायाम करताना तुम्ही तुमच्या हाताची बोटे (हाताची स्थिती) षण्मुख मुद्रेमध्येसुद्धा ठेवू शकता. षण्मुख मुद्रेमध्ये बसण्याकरिता तुमच्या हाताचे अंगठे हळुवारपणे कानाच्या कुर्चावर ठेवा, दोन्ही तर्जनी कपाळावर भुवयांच्या वर, मधली बोटे डोळ्यांवर, अनामिका नाकपुड्यांवर आणि करंगळी ओठांच्या कोपऱ्यांवर ठेवावी.
खबरदारी
काहीच नाही. एकदा का हे प्राणायाम एका योग प्रशिक्षकाकडून व्यवस्थित शिकून घेतले की मग एका बालकापासून ते प्रौढ व्यक्तीपर्यंत कोणीही या प्राणायामाचा सराव करू शकते. केवळ एकच पूर्व-आवश्यकता आहे ती म्हणजे हे प्राणायाम रिकाम्या पोटीच करावे.
नियमित सरावाने शरीर आणि मन यांचा विकास होतो आणि सोबत आरोग्याचा लाभ होतो पण हे औषधाला पर्यायी नाही. श्री श्री योग प्रशिक्षित शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योग शिकणे व त्याचा सराव करणे हे अतिशय महत्वाचे आहे. वैद्यकीय समस्या असल्यास, योगाचा सराव करायच्या आधी डॉक्टर आणि श्री श्री योग शिक्षक यांचा सल्ला घ्यावा. तुमच्या जवळील आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर मध्ये श्री श्री योग शिबिराचा शोध घ्या. तुम्हाला शिबिरांसंदर्भात माहिती हवी आहे का किंवा तुम्हाला तुमची प्रतिक्रिया नोंदवायची आहे का? आम्हाला info@srisriyoga.in इथे लिहा