“जेव्हा मन स्थिर असते तेव्हा ते कोणत्याही विचारांची पूर्ती करण्यासाठी सक्षम असते.”
~ गुरुदेव श्री श्री रवी शंकर
प्राणायाम म्हणजे काय? तर प्राणायाम म्हणजे प्राणाच्या स्तरावर कार्य करणे. प्राण ही एक शक्ती आहे जी आपल्या शरीरासाठी आणि सूक्ष्म स्तरांसाठी गरजेची असते. प्राण शक्ती नसेल तर शरीर नाश पावते. आपल्यात प्राण शक्ती म्हणजेच जीवन शक्ती असल्यानेच आपले मन आणि शरीर जिवंत रहाते.
प्राणायाम म्हणजे काय
योग शास्त्राचे चौथे अंग प्राणायाम म्हणून ओळखले जाते. असे म्हणतात श्वासावर नियंत्रण ठेवल्याने आपण मनाच्या शक्तीवर नियंत्रण ठेवू शकतो. प्राणायाम हा शब्द संस्कृत मधील ” प्राण ” आणि ” आयाम ” या शब्दांनी बनला आहे ज्याचा अर्थ अनुक्रमे श्वास आणि विस्तारणे असा आहे. योगिक श्वसन पद्धतीचा प्रयोग करून आपण जीवन ऊर्जा म्हणजेच प्राण याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो.
प्राणायाम ही एक गहन पद्धत हजारो वर्षांपासून भारतीय योगिक परंपरेतून पुढे चालत आली आहे. यामध्ये श्वास वेगवेगळ्या लांबीचा, वेगळेगळ्या लयीमध्ये आणि वेगवेगळ्या कालावधी साठी घेतला जातो. यामध्ये आपल्या शरीराला आणि मनाला प्राणायामद्वारे जोडण्याचे ध्येय असते. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातून बाधक / विषारी द्रव्य बाहेर पडतात , शरीरात पुरेसा प्राणवायूचा पुरवठा होतो , तसेच लवकर बरे होण्यासाठी मदत होते. प्राणायामाच्या एका चक्रात तीन स्थिती असतात :
- पूरक ( श्वास आत घेणे )
- कुंभक ( श्वास रोखून धरणे )
- रेचक ( श्वास बाहेर सोडणे )
‘प्राण’ म्हणजे काय
प्राणाचा श्वासाशी संबंध असून सुद्धा प्राण म्हणजे श्वास नाही. प्राण ही एक ऊर्जा आहे जी हजारो ऊर्जेच्या नळ्यांतून म्हणजेच नाडी मधून आणि ऊर्जेच्या केंद्रातून म्हणजेच चक्रातून फिरत असते. प्राण आपल्या शरीराच्या अवतीभवती एक आभा तयार करतो. प्राणाची उपलब्धता आणि गुणवत्ता तसेच त्याची वेगवेगळ्या नाडयांतून आणि चक्रातून जाण्याची गती यावर आपली मानसिक स्थिती अवलंबून असते.
आपले कार्य, विचार आणि खास करून आपली श्वास घेण्याची पद्धत हे सर्व आपल्या प्राणाच्या हालचालीवर, प्राणाच्या साठ्यावर तसेच वैश्विक ऊर्जा जी आपल्या आतून व आजूबाजूनी फिरते यावर परिणाम करतात.
जेव्हा आपल्यात प्राणाचा साठा खूप असतो तसेच त्याची गती सतत स्थिर असते तेव्हा आपले मन शांत, सकारात्मक आणि ऊर्जावान रहाते. ज्ञानाची कमी आणि श्वसनाकडे दुर्लक्ष केल्याने आपली नाडी आणि चक्रामध्ये बाधा निर्माण होऊ शकतात. दुर्दैवाने असे झाल्याने प्राणाची हालचाल खंडित होते किंवा अस्थिर होते. त्यामुळे आपल्यात चिंता, भीती, अनिश्चितता, तणाव, भांडणे आणि इतर नकारात्मक गोष्टी वाढतात. प्रत्येक समस्या या आधी अवचेतन स्तरावर निर्माण होतात आणि मग भौतिक स्तरावर येतात. आजार हा शारीरिक स्तरावर येण्याच्या खूप आधी प्राणाच्या स्तरावर दिसतो.
प्राणायामाचे प्रकार
भारतीय ऋषी मुनींना माहिती होते की प्राणायाम करणे ही एक सोपी पद्धत आहे जी आपल्या शरीराला आणि मनाला खूप आराम देते. आत्तापर्यंत आपण प्राणायाम म्हणजे काय हे जाणून घेतले आता प्राणायामाचे प्रकार जाणून घेऊया. प्राणायामाचे विविध प्रकार आपण दिवसभरात कधीही करू शकतो फक्त पोट रिकामे असले पाहिजे.
आता आपण प्राणायामाचे प्रकार आणि ते कसे करायचे हे बघुया.
१. भ्रामरी प्राणायाम
तुमचे मन सतत विचार करत रहाते का? तुम्हाला कोणी काय बोलले तर त्याचा विचार तुम्ही थांबवू शकत नाही का? तर मग एक शांत कोपरा पकडा आणि हे प्राणायाम करा. ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांच्यासाठी हे प्राणायाम एक वरदान आहे.
भ्रामरी प्राणायाम ज्याला भुंग्याच्या आवाजाचे प्राणायाम असेही म्हटले जाते, एक योगिक श्वसन पद्धती आहे, जी आपल्या मज्जासंस्थेला आराम देते आणि आपल्याला आपल्या खऱ्या स्व शी जोडते. हे प्राणायाम नवशिक्यांना शिकवले जाते आणि हे गळ्याच्या मागच्या भागातून हळुवार पणे भुंग्याचा आवाज काढत केले जाते.
भ्रामरी प्राणायामची अधिक माहिती आणि भ्रामरी प्राणायाम कसे करायचे हे जाणून घेऊया
२. कपालभाती
कपालभाती हे एक योगिक पद्धतीचे प्राणायाम आहे जे संस्कृत शब्द कपाल म्हणजे कवटी आणि भाती म्हणजे उजळणे या शब्दांपासून बनले आहे.
वेगवेगळ्या प्राणायामपैकी हा एक महत्वाचा प्राणायाम आहे. याचा एक महत्वाचा फायदा असा आहे की हे शरीरातील विषारी पदार्थांचा निचरा करते आणि नाडीतून ऊर्जेचा प्रवाह चांगला होतो.
कपालभाती हे प्राणायाम प्रगतीशील किंवा प्रगत विद्यार्थ्यांना शिकवले जाते. हे प्राणायाम केल्याने मज्जासंस्था व्यवस्था आणि रक्ताभिसरण प्रणाली ऊर्जावान होते. छाती बळकट होते आणि पोटातील अवयव स्वछ होतात.
३. भस्त्रिका प्राणायाम
तुम्हाला मरगळल्यासारखे वाटते का? भस्त्रिका प्राणायाम ( लोहाराचे भाते ) प्राणायाम चे 3 फेरी करून तुम्ही लगेच ऊर्जावान व ताजे तवाने व्हाल. भस्त्रिका प्राणायाम म्हणजे काय?
संस्कृत शब्द भस्त्रिका ज्याचा अर्थ लोहाराचे भाते, या प्राणायामात जोरदार पणे श्वास आत घेतला जातो आणि बाहेर सोडला जातो. यामध्ये फुफ्फुसे पूर्णपणे भरली जातात आणि मोकळी केली जातात. यामध्ये शरीरातील आणि मनातील अग्नी प्रज्वलीत होतो, पचनशक्ती सुधारते.
भस्त्रिका प्राणायामाचे फायदे आणि ते कसे करावे याबद्दल अधिक जाणून घ्या
४. नाडी शोधन प्राणायाम
तुम्ही तुमच्या कामात खूप वेळ लक्ष केंद्रित नाही करू शकत? मग तुम्हाला नाडी शोधन प्राणायाम आणि त्यानंतर १० मिनीटांचे ध्यान हे खूप उपयोगी पडेल. नाडी शोधन प्राणायाम मन स्थिर आणि शांत करते तसेच मेंदूतील दोन्ही बाजूमध्ये संतुलन आणते.
एका नंतर एक नासिकेतून श्वासोछवास म्हणजेच नाडी शोधन प्राणायाम ही एक प्रभावी प्राणायाम पद्धत आहे ज्याचे अनेक फायदे आहेत.
संस्कृत शब्द शोधन म्हणजे शुद्धीकरण आणि नाडी म्हणजे नलिका किंवा वाहिनी. त्यामुळे नाडी शोधन प्राणायाम चे मुख्य उद्धीष्ट आहे संपूर्ण संतुलिकरण करणे आणि शरीर आणि मनाच्या नलिका स्वच्छ आणि शुद्ध करणे. हा एक खूप चांगला व्यायाम आहे आणि तीनही दोशांना हे प्राणायाम संतुलित ठेवते.
नाडी शोधन प्राणायामची अधिक विस्तारित माहिती आणि हे प्राणायाम कसे करायचे जाणून घ्या
प्राणायामाचे फायदे
प्राणायाम म्हणजे काय आणि प्राणायामाचे प्रकार आपण बघितले. आता आपण प्राणायाम चे फायदे बघुयात. प्राणायामाचा नियमित सराव केल्याने आपल्या जीवनाच्या गुणवत्तेत अमूलाग्र बदल होतो.
योगिक प्राणायाम सराव केल्याचे फायदे हे अनेक वैद्यकीय आणि शास्त्रीय प्रबंधात सांगितले आहेत. जरी वेगवेगळ्या प्राणायाम प्रकारचे वेगवेगळे परिणाम होतात तरी एकंदरीत प्राणायामाचे फायदे व महत्व लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही जर एखाद्या फायद्यासाठी प्राणायाम करत असाल तर पहिले त्याच्या तंत्राचा नीट अभ्यास करा आणि नकारात्मक परिणाम होणार नाहीत याची काळजी घ्या.
प्राणायामाचे सर्वसाधारण फायदे:
- प्राणाचा स्तर आणि गुणवत्ता वाढते, त्यामुळे आपला ऊर्जेचा स्तर वाढतो.
- आपली नाडी आणि चक्र यांना मोकळे करते त्याने आपल्या चेतनेचे विस्तारिकरण होते.
- आपल्याला अधिक ऊर्जावान, उत्साहित, शांत आणि सकारात्मक बनवते. अशी मानसिक स्थिती आपल्याला कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेण्यास मदत करते आणि अधिक आनंदी बनवते.
- आपले शरीर, मन, आत्मा यांच्यात ताळमेळ निर्माण होतो. त्यामुळे शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक प्रगती होते.
- प्राणायामाने मन पारदर्शक राहते आणि शारीरिक आरोग्य चांगले रहाते.
ध्यान व प्राणायाम केल्याने आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो
सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे आपल्या भावना व्यक्त करणे आणि दुसऱ्यांच्या भावना बरोबर समजून घेणे. या कलेची कमी असणे हे आजच्या समाजातील मोठी समस्या आहे. ही कला विकसित करण्याची गरज आहे. हे तंतोतंत बरोबर होत नाही थोड कमी जास्त होत रहाते. जसे आपली भावना आपण तंतोतंत व्यक्त करू शकत नाही तसेच दुसऱ्याची भावना तंतोतंत ओळखू शकत नाही.
हे जीवनात घडत रहाते, पण आपण जेव्हा अधिक शांत, आनंदी असतो तेव्हा आपण दुसऱ्यांचे मन अधिक समजू शकतो. त्यामुळेच ध्यान व प्राणायाम करणे गरजेचे आहे. ते आपल्याला अधिक आंतरिक दृष्टी देते आणि तेव्हा आपल्या लक्षात येते की इतर लोक आपल्याला चांगले ओळखताहेत आणि आपण आपले विचार चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतोय.
~ गुरुदेव श्री श्री रवी शंकर
आपला श्वास हा आपल्या भावनांशी जोडला आहे. प्रत्येक भावनेच्या वेळी श्वासाची एक विशिष्ट लय असते ,म्हणून आपण आपल्या भावना श्वासाच्या आधारे बदलू शकतो.
जेव्हा नाटकात राग आलेला दाखवायचा असेल, तेव्हा नाटक करताना, निर्देशक कलावंतास जोरात श्वास घ्यायला सांगतो. तसेच एखादा शांत क्षण दाखवताना निर्देशक श्वास हळू आणि संथ घ्यायला सांगतो. जेव्हा आपण श्वासाच्या लयीबद्दल जाणतो तेव्हा मनावर ताबा मिळवू शकतो. तसेच आपण राग, इर्षा, लोभ अशा नकारात्मक भावनांवर विजय मिळवू शकतो आणि हृदयापासून हसू शकतो.
~ गुरुदेव श्री श्री रवी शंकर श्वास आणि भावनांचे नाते याबद्दल बोलताना
लक्षात घ्या – योगाचा सराव केल्याने शरीराला आणि मनाला मजबूत होण्यास मदत होते, पण हे औषधांना पर्याय नाही. एका प्रशिक्षित योग प्रशिक्षकाचा सल्ला घेऊन योगाचा सराव करणे अनिवार्य आहे. जर काही वैद्यकीय तक्रारी असतील तर आधी तुमच्या वैद्यांचा आणि श्री श्री योग प्रशिक्षकांचा सल्ला घ्या.प्राणायामाच्या पद्धती सूक्ष्मपणे कार्य करतात त्यामुळे त्या पद्धतीबरोबर किंवा तंत्रा बरोबर खेळ करणे टाळावे.