'योगा' हा शब्द कानावर पडताच तुमच्या डोक्यात त्रासदायक अश्या शरीराला पीळ देणाऱ्या लोकांचे विचार येण्याची शक्यता असते. होय, आसने हा योग शिकण्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. पण हेच म्हणजे सारी योग साधना नव्हे. योगा बद्दल तुम्हाला खरोखरच कितपत माहिती आहे? आता जगभरात 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' साजरा करण्याची तयारी जोमात सुरू आहे. तेंव्हा आपण या प्राचिन तंत्राविषयीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करू या.
वैदिक ज्ञानाच्या अधिकार श्रेणी नुसार चार प्रमुख वेद आहेत - ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. यानंतर चार उपवेद येतात- आयुर्वेद, अर्थवेद, धनुर्वेद आणि गंधर्व वेद. ह्याच्या खालोखाल सहा उपांग किंवा घटक आहेत,-शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष. ह्यांची परत सहा उपघटकांत वर्गवारी होते, - न्याय, वैसेशीक, सांख्य, मीमांसा, वेदांत आणि योग.
योग हा शब्द संस्कृत मधील 'युज' पासून बनलेला आहे. ज्याचा अर्थ आहे 'वैयक्तिक आणि वैश्विक चेतनेचे एकीकरण'. ऋग्वेद हा मानवी इतिहासातील सर्वात प्राचिन आणि पवित्र ग्रंथ आहे, जो आठ ते दहा हजार वर्षांपूर्वी लिहिला गेला असावा. योग हा वैदिक साहित्याचा भाग आहे जो पाच हजार वर्षांपूर्वी महर्षी पातंजली द्वारा संपादित करण्यात आला. त्यांनी योगाचे आठ भाग स्पष्ट केले आहेत. त्यांची नावे अशी- यम (सामाजीक आचार संहिता), नियम (व्यक्तिगत नीतिनियम), आसन (शारीरिक स्थिती), प्राणायाम (जीवन ऊर्जा), प्रत्याहार (ज्ञानेंद्रियांना आत एकाग्र करणे), धारणा (एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करणे), ध्यान आणि समाधी (स्व मध्ये विलीन होणे).
योगामध्ये अलग अलग तत्वज्ञानांचा समावेश आहे. जसे, ज्ञान योग, भक्ती योग, कर्म योग, हटयोग, राजयोग, मंत्रयोग, शिवयोग, नादयोग, लययोग आणि इतर बरेच काही. यापैकी हटयोग परंपरेचा 'आसने' हा एक भाग आहे. आजकालच्या काळात योगाचा संबंध निव्वळ शारीरिक आसनांशी जोडला जातोय. पण योगाची मध्यवर्ती शिकवण मनाची अविचल स्थिती राखण्याची आहे. भगवद्गीतेत सांगितले आहे, "योगः कर्मसु कौशलम्." म्हणजेच 'कर्म आणि अभिव्यक्तीतील कौशल्य म्हणजे योग'.
हटयोगात आसनांद्वारे शारीरिक व मानसिक स्तरावर प्रगती होते. योगाचे विविध प्रकार हे चाकाच्या आराप्रमाणे आहेत आणि व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे सारखेच महत्व आहे. हठयोग आपणास शारीरिक तंदुरुस्ती बहाल करतो, तर इतर प्रकारच्या योगाने आपल्यात ज्ञान आणि भक्ती इत्यादीचा उदय होतो. व्यक्ती विकासाच्या सर्वांगीण पद्धतीमुळे मध्ययुगात ह्याला अतिशय आदर प्राप्त झाला होता, पण केवळ उच्च आणि विद्वत वर्गापुरते हे ज्ञान सिमीत होते. हे ज्ञान केवळ गुरुकुला तून, कठोर चाचणीतून पार झाल्यावरच दिले जात होते.
तरीही गेल्या काही दशकांपासून योगाला संपूर्ण स्थित्यंतरातून जाताना पाहिले जात आहे. योगाच्या नांवाने कपाळावर आठ्या पडण्यापासून ते प्राकृतीक उपचाराचा सर्वोत्तम पर्याय म्हणून उत्साहाने स्वागत करण्यापर्यंतचा योगाचा इथपर्यंत प्रवास झालेला आहे. जात, पंथ, सामाजिक स्तर असे सारे अडथळे मुळापासून उखडून फेकत आज योग घरोघरी पोहोचला आहे. योगाचे फायदे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नजरेतून सुटले नाहीत आणि आता संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' म्हणून साजरा करण्याचे विधेयक मंजूर केले आहे.
योग हा केवळ शारीरिक व्यायाम नव्हे, तर आपण किती कुशलतेने इतरांशी संबंध प्रस्थापित करतो आणि एखाद्या परिस्थितीत आपण कसे अभिव्यक्त होतो हे आहे. म्हणून इथे योगाची व्याख्या मनाची कुशलता अशी करता येईल. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "समत्वम योग उच्यते".- मनाचे समत्व हे योगाचे लक्षण होय. विपरीत परिस्थितीतही केंद्रित राहू शकण्याची आपली क्षमता म्हणजे योग होय. जे काही आपल्याला आपल्या मूळ स्वभावाकडे परत आणते, जो आतला सुसंवाद, आनंद आहे, तोच योग आहे. आसनांमुळे शरीर तंदुरुस्त होते, तर प्राणायाम, ध्यानामुळे मन गहरे होते. आयुष्याच्या, आपल्या अस्तित्वाच्या ह्या साऱ्या पैलूंचे एकत्रीकरण म्हणजेच योग होय.