सूर्यामुळे पृथ्वीवर जीवन आहे. आपल्या प्राचीन द्रष्ट्यांनी हे सत्य जाणले आणि सूर्याला आदराचे स्थान दिले. सूर्यनमस्कार ही विशिष्ट लयबद्ध हालचालींमधून सूर्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. यामध्ये सुमारे सव्वाबारा वर्षे चालणारे सूर्याचे चक्र दर्शविणाऱ्या बारा योग मुद्रा किंवा आसनांचा समावेश आहे. जर तुमची शरीर प्रणाली उत्साही व ,चैतन्यपूर्ण असेल, तर तुमचे कालचक्र सौर चक्राशी सुसंगत असते. सूर्यनमस्कार हे तुमचे भौतिक चक्र आणि सूर्याचे चक्र यांच्यात सुसंगती निर्माण करण्यास मदत करतात.
सूर्यनमस्कार घालताना आपण सूर्य नमस्काराचे मंत्र म्हणू शकतो. हे मंत्र शरीर, श्वास आणि मन यांच्यात सुसंवाद आणतात. जसजसा याचा सखोल सराव होतो, तसतसे फायदेही दिसून येतात. प्रामाणिकपणे व कृतज्ञता पूर्वक हे मंत्र म्हटले तर आपल्या सरावाची पातळी उच्च आध्यात्मिक स्तर गाठू शकते.
‘ॐ भानवे नमः’ म्हणजे ‘प्रकाश देणाऱ्या सूर्याला नमस्कार असो.’ हा मंत्र म्हणताना आपल्याला प्रकाश दिल्याबद्दल आणि पृथ्वीवर जीवन शक्य केल्या बद्दल सूर्याप्रती कृतज्ञता असू द्या. ‘ॐ सूर्याय नमः’ म्हणजे ‘अंधार दूर करणाऱ्या सूर्याला नमस्कार .’ थोडक्यात याचा अर्थ असा आहे की आपल्याला प्रकाश दिल्याबद्दल आपण सूर्याची आराधना करतो.
गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, “अणूमध्ये जसे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन केंद्रस्थानी असतात आणि इलेक्ट्रॉन फक्त परिघावर असतात, तसेच आपल्या जीवनाच्या बाबतीत सुद्धा आहे. आपल्या अस्तित्वाचे केंद्र म्हणजे परमानंद, सकारात्मकता आणि उल्हास! पण ते नकारात्मक आयनांच्या ढगांनी वेढलेले आहे. मंत्र (संस्कृत मंत्र) हे नकारात्मकतेचे ढग दूर करतात. नामजप केल्याने वातावरण सकारात्मक कंपनांनी भरुन जाते आणि अशा वेळी ध्यान नैसर्गिक आणि सहजतेने होते.”
चला सहजतेने, आणि कृतज्ञतेने, मंत्रांचा उच्चार करु या आणि सूर्यनमस्काराचे टप्पे समजून घेऊ या.
सूर्यनमस्काराचे मंत्र आणि आसनांची नावे
आसन क्रम १: प्रणामासन
मंत्र: ॐ मित्राय नमः
अर्थ: सर्वांचा मित्र असणाऱ्या सूर्याला नमस्कार.

- प्रणामासनामुळे शरीराचा समतोल राखण्यास मदत होते.
- मज्जासंस्थेला विश्रांती मिळते.
आसन क्रम २: हस्तउत्तानासन
मंत्र: ॐ रवये नमः
अर्थ: दैदीप्यमान व तेजःपुंज असलेल्या सूर्याला नमस्कार .

- हस्तउत्तानासनामुळे पोटाचे स्नायू ताणले जातात आणि लवचिक होतात.
- छाती विस्तार पावते, त्यामुळे प्राणवायू पूर्ण भरुन घेतला जातो व फुफ्फुसे पूर्ण क्षमतेने वापरली जातात.
आसन क्रम ३: हस्तपादासन
मंत्र: ॐ सूर्याय नमः
अर्थ: अंधार दूर करणाऱ्या आणि त्याद्वारे क्रियाशीलता निर्माण करणाऱ्या सूर्याला नमस्कार.

- हस्तपादासनाने कंबर आणि पाठीचा कणा लवचिक बनतो.
- गुडघ्या मागील स्नायू (हॅमस्ट्रिंग्स) ताणले जातात.
- नितंब, खांदे आणि हात मोकळे होतात.
आसन क्रम ४ : अश्व संचलनासन
मंत्र: ॐ भानवे नमः
अर्थ: जो प्रकाशित किंवा तेजस्वी आहे त्याला नमस्कार.

- अश्वसंचलनासनामुळे पायाचे स्नायू मजबूत होतात.
- पाठीचा कणा आणि मान लवचिक होते.
- अपचन, बद्धकोष्ठता आणि सायटिका (कंबरेपासून पायाकडे वेदना होणारा आजार) साठी उपयुक्त.
आसन क्रम ५ : दंडासन
मंत्र: ॐ खगाय नमः
अर्थ: जो सर्वव्यापी आहे, जो आकाशातून संचार करतो, त्याला नमस्कार.

- दंडासनाने पाठ आणि हात मजबूत होतात.
- बांधा सुधारतो.
- खांदे, छाती आणि पाठीचा कणा ताणला जातो.
- मन शांत होते.
आसन क्रम ६ : अष्टांग नमस्कार
मंत्र: ॐ पूष्णे नमः
अर्थ: पोषण करुन आपणास तृप्त करणाऱ्या सूर्याला नमस्कार.

- अष्टांग नमस्कारामुळे पाठ आणि कण्याची लवचिकता वाढते.
- पाठीचे स्नायू मजबूत होतात.
- तणाव आणि चिंता कमी होतात.
आसन क्रम ७ : भुजंगासन
मंत्र: ॐ हिरण्यगर्भाय नमः
अर्थ: ज्याची चमक (तेज) सोनेरी रंगाची आहे त्याला नमस्कार.

- भुजंगासनामुळे खांदे, छाती आणि पाठ यांना ताण मिळतो.
- लवचिकता वाढते.
- मनस्थिती चांगली होते.
- हृदयाला चालना मिळते.
आसन क्रम ८ : पर्वतासन
मंत्र: ॐ मरीचये नमः
अर्थ: अनंत किरणांनी प्रकाश देणाऱ्याला नमस्कार.

- पर्वतासनाने हात आणि पायांचे स्नायू मजबूत होतात.
- पाठीच्या कण्यातील रक्ताभिसरण वाढते.
आसन क्रम ९ : अश्व संचलनासन
मंत्र: ॐ आदित्याय नमः
अर्थ: वैश्विक दिव्य माता आदितीच्या पुत्राला नमस्कार.

- अश्वसंचलनासन पोटातील अवयवांना कार्यक्षम करते.
- पायाचे स्नायू अधिक लवचिक होतात.
आसन क्रम १०: हस्तपादासन
मंत्र: ॐ सवित्रे नमः
अर्थ: या जीवनाचा कारक असणाऱ्या सूर्याला नमस्कार.

- हस्तपादासनाने गुडघ्या मागचे स्नायू (हॅमस्ट्रिंग्स) ताणले जातात.
- नितंब, खांदे आणि हात मोकळे होतात.
आसन क्रम ११: हस्तउत्तानासन
मंत्र: ॐ अर्काय नमः
अर्थ: जो स्तुती आणि गौरवास पात्र आहे त्याला नमस्कार.

- हस्तउत्तानासन केल्याने पोटाचे स्नायू ताणले जाऊन कार्यक्षम होतात.
- छाती विस्तार पावते. त्यामुळे प्राणवायू पूर्णपणे भरुन घेतला जातो व फुफ्फुसे पूर्ण क्षमतेने वापरली जातात.
आसन क्रम १२: ताडासन
मंत्र: ॐ भास्कराय नमः
अर्थ: बुद्धी आणि वैश्विक प्रकाश देणाऱ्याला नमस्कार.

- ताडासनामुळे शरीराची ठेवण सुधारते.
- मांड्या, गुडघे आणि घोटे मजबूत होतात.
- सायटिकापासून आराम मिळतो.
अचूक मंत्रोच्चारण कसे करावे
तुम्ही सूर्य नमस्कार घालताना मंत्रांचा तोंडी किंवा मनात उच्चार करु शकता. कृतज्ञ भावाने उच्चार करणे महत्त्वाचे .
श्वास सामान्य आणि सहज असावा . मंत्रांचा उच्चार करताना श्वासोच्छवासाची जाणीव ठेवा. हे मनाचे नियमन करण्यास मदत करते.
योग्य स्वरशैलीने मंत्रांचा जप करावा. योग्य उच्चारासाठी, तुम्ही याचा व्हिडिओ बघू शकता.
सूर्य नमस्काराच्या क्रमामध्ये, एका संचामध्ये दोन फेऱ्या असतात. उजव्या पायाने एक फेरी आणि डाव्या पायाने दुसरी. दररोज बारा सूर्यनमस्कार घालावेत . पण तुम्हाला योग्य वाटतील तेवढे सूर्यनमस्कार तुम्ही घालू शकता. बारा क्रमांच्या या व्यायामाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही मंत्रोच्चार करु शकता.अथवा, तुम्ही संपूर्ण एका नमस्कारासाठी एका मंत्राचे उच्चारण करु शकता आणि असे बारा नमस्कार घालू शकता.
सूर्य नमस्कार घालताना केलेल्या मंत्रोच्चारणाचे फायदे
वेगवेगळ्या फायद्यांसाठी तुम्ही वेगवेगळ्या वेगाने नमस्कारातील आसने करु शकता. मंत्राच्या जपासहित सूर्यनमस्कार घातल्याने सूर्यनमस्काराचा सराव अधिक शक्तिशाली होतो. त्याचा मन आणि शरीर या दोन्हींवर सूक्ष्म, तरीही भेदक प्रभाव पडतो. शरीरातील कोणत्याही अस्वस्थतेवर लक्ष न देता मन मंत्रोच्चारांवर केंद्रित होते .
हे मंत्र सूर्याच्या विविध गुणांचे गुणगान करतात. या गुणांचे कौतुक करुन आणि हे गुण ओळखून, तुम्ही त्यांना आपल्यामध्ये धारण करण्यासाठी स्वतःला तयार करता.
शब्दांमध्ये निर्माण करण्याची क्षमता असते. सूर्य नमस्काराच्या मंत्रांचे स्वर आणि अर्थ तुमच्यासाठी सकारात्मकता आणि ऊर्जेचे जग निर्माण करतात.
हे मंत्र मन आणि शरीर, श्वास आणि आत्मा एक करतात. त्यामुळे आसने अधिक प्रगल्भ आणि परिपूर्ण होतात.
सूर्यनमस्कार घातल्याने सूर्याची ऊर्जा प्राप्त करण्यासाठी मन आणि शरीराची द्वारे खुली होतात. मंत्रोच्चारणामुळे ही ऊर्जा हस्तांतरित होण्यास आणि पचनी पडण्यास मदत होते.
तुमच्या रोजच्या सूर्यनमस्कारात या १२ ‘सूर्य नमस्कार मंत्रांचा’ समावेश करा. त्यामुळे तुमच्यात आद्य ऊर्जास्रोताबरोबर प्रभुत्वाची व एकात्मतेची भावना निर्माण होईल. तुमचे शरीर आणि मन प्रभारित होईल आणि तुम्ही तेजाने चमकाल – अगदी सूर्याप्रमाणे!
योगाभ्यास केल्याने शरीर आणि मन विकसित होण्यास मदत होते, तरीही औषधाला पर्याय नाही. प्रशिक्षित योग शिक्षकाच्या देखरेखीखाली योग शिकणे आणि सराव करणे आवश्यक आहे. आरोग्याबाबत कोणतीही समस्या असल्यास, तुमच्या डॉक्टरांचा आणि श्री श्री योग शिक्षकाचा सल्ला घ्यावा आणि त्यानंतरच योगाभ्यास करावा.